पालकत्वाचे प्रयोग : . ..फळे रसाळ गोमटी Print

आई - बाबा तुमच्यासाठी
अनघा सांगेलकर , शनिवार , १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it   

मला दोन मुली. त्यांना वाढवताना जाणीवपूर्वक त्यांच्या आवडीच्या गोष्टींना खतपाणी देत गेले. अभ्यासाबरोबर इतर छंदानांही वाव देत गेले. म्हणूनच करिअरमध्येच नव्हे तर आयुष्यही त्या समृद्धपणे जगत आहेत.
माझ्या दोन कन्यांपैकी मोठी मृण्मयी आणि धाकटी श्रद्धा. मृण्मयी सातव्या महिन्यात जन्मलेली. खूप अशक्त, एक किलो वजनाची होती. खूप काळजी घ्यावी लागायची. म्हणूनच साडेतीन वर्षांनंतर दुसऱ्या खेपेला पूर्ण दिवसांचं सुदृढ बाळ जन्माला यावं म्हणून डॉक्टरांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करीत मी स्वत:ची योग्य ती काळजी घेतली. त्यावेळी टेलिफोन ऑपरेटरची नोकरी असल्यामुळे शक्यतो सकाळची डय़ुटी करून मी दुपारी दोननंतर घरी येत असे. त्यामुळे घरातलं आवरून छोटय़ा मृण्मयीला सांभाळत मी भरपूर वाचन करीत असे. त्यावेळी ‘मृत्युंजय’, ‘स्वामी’, ‘ययाति’ अगदी हिटलरही वाचला. तो मीच माझ्यावर केलेला प्रयोग होता. गरोदरपणात वाचन आणि सकारात्मक विचार! ‘या खेपेस जन्माला येणारं माझं बाळ तेजस्वी, बुद्धिमान आणि आरोग्य संपन्नच आहे’ सतत हा एकच ध्यास!
१५ ऑगस्ट १९८६ ला पहाटे साडेसहाच्या ठोक्याला पावणेचार किलो वजनाची गोंडस, गुटगुटीत कन्या माझ्या पोटी जन्माला आली. माझी श्रद्धा फळाला आली. नाव अर्थातच श्रद्धा ठेवलं. श्रद्धाच्या जन्मापासून तिच्यात एक विलक्षण तेज जाणवत राहिलं. एकदा आम्हाला भेटायला माझे वडील आले होते. तेव्हा अडीच वर्षांची श्रद्धा त्यांना बुद्धिबळ शिकवत होती. वडील आनंदाश्चर्याने गहिवरून म्हणाले, ‘पुष्पा (माझं माहेरचं नाव), श्रद्धा खूप बुद्धिमान आहे. तिच्याकडे जरा जास्त लक्ष दे. तुझ्या वैयक्तिक आवडीनिवडी, छंद बाजूला ठेवून नोकरी, घर सांभाळून या दोन चिमण्यांवरच पूर्ण लक्ष केंद्रित कर.’ वडिलांचे शब्द कायमचे मनावर कोरले.
तोपर्यंत आम्ही दोघींना सर्वसाधारण मुलींसारखं वाढवत होतो. त्यानंतर मात्र आम्ही दोघी मुलींचं वागणं, बोलणं, हालचालींचं जास्त बारकाईने निरीक्षण करू लागलो. पुस्तकं, खेळ, चित्रकला किंवा इतर कशात त्या जास्त रमतात याचा अंदाज घेत राहिलो. त्यांना आवडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देत गेलो. घरात मोजकीच खेळणी असूनही एखादं खेळणं दोघी आपसात ठरवून ठेवत. कमालीचा समंजसपणा दोघींमध्ये पुरेपूर होता. हट्टीपणा जवळपास नव्हताच.
वाचनाची आवड आम्हा दोघांना असल्यामुळे दोघींमध्ये ही उपजतच आवड आली. त्यांना बक्षिसं बहुधा पुस्तकरूपानेच आम्ही देत होतो. शाळेला बुट्टी मारून किंवा परीक्षांच्या दिवसांत घरगुती समारंभ, उत्सव, सहली या गोष्टी प्रसंगी नातेवाईकांचा रोष पत्करून कटाक्षाने टाळल्या.
मुलींची शाळा सकाळची असल्यामुळे मीही सकाळचीच डय़ुटी करावी याबाबत पती आग्रही राहिले. त्यासाठी घरातली बरीचशी कामे ते आनंदाने करीत. त्यामुळे दुपारनंतरचा पूर्ण वेळ मला मुलींसाठी देता येई. दहावीपर्यंत दोघींना शिकवणी लावली नाही. गणित, शास्त्र विषय त्यांचे वडील शिकवत. आणि बाकीच्या विषयात अडलं तर आम्ही दोघं शिकवत असू. दोघींना त्यांच्या पप्पांनी सातवीत गेल्यावर मोटरसायकल चालवायला शिकवली. हॉलीबॉल, पोहणे यांसारख्या गोष्टी त्या कँपला जाऊन शिकल्या. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात दोघी नृत्य, वक्र्तृत्व, खेळ सगळ्यात आवर्जून भाग घेत.
आज मृण्मयी बी. ई. इन्स्ट्रमेंटेशन आहे. अमेरिकन कंपनीत अधिकारपदावर नोकरी करतेय. सांगेलकरची गुप्ते होऊन संसारात रमलीय. आणि आईही झालीय.
श्रद्धा २००२ साली दहावीत इंग्रजी माध्यमातून ९२ टक्के गुण मिळवून बोर्डात एकोणिसावी आली आणि पालघर तालुक्यामधून पहिली आली होती. रूपारेलमधून बारावीत ९० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर व्हीजेटीआयमधून मेकॅनिकल स्ट्रीममधून बी. टेक् झाली. मेकॅनिकलला जाण्याचा निर्णय सर्वस्वी तिचाच.
कोणतेही खाजगी क्लासेस न लावता जी. आर. ई. आणि टोफेल अव्वल गुणांनी पास झाली. २००८ साली एम्. एस्. करण्यासाठी अमेरिकेत गेली. तिथे स्कॉलरशिप मिळवून आणि रिसर्च असिस्टंट म्हणून काम करून तिने एम. एस. पूर्ण केलं. आज मेकॅनिकल मधूनच डिझाइनिंगमध्ये ती पी.एच.डी. करतेय आणि त्याच युनिव्हर्सिटीमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतेय.
भाडय़ाचंच पण स्वतंत्र घर, गाडी, स्वकष्टाने शिक्षण घेत स्वकर्तृत्वाने मिळवलं. आमच्यावर कुठलाही आर्थिक बोजा पडू द्यायचा नाही याबाबत आग्रही राहिली.
आमच्या मुली वाढत असताना त्यांच्या वाटय़ाला इतरांकडून केवळ कौतुकच कौतुक किंवा कायम यशच आलं असं नाही; तर सर्वसाधारणपणे व्यवहारात हेवेदावे, मत्सर, कारणाशिवाय नाऊमेद करणे, स्पर्धेमुळे येणारे, नकोसे असणारे मनस्ताप इ. गोष्टी त्यांच्या वाटय़ाला अगदी बालपणापासून आल्या. परंतु या सगळ्याने विचलित न होता आणि सूडबुद्धीने न वागता आपलं ध्येय्य गाठण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा याची शिकवण त्यांना देत गेलो आणि त्याही तशाच वागल्या.
आज एखादी तरुण आई, ‘तुम्ही तुमच्या मुलींना कसं वाढवलं याविषयी काहीतरी सांगा’ असं जेव्हा म्हणते तेव्हा आपण केलेल्या प्रयोगांतील आणि प्रयत्नांतील यशाची पावती आहे असं वाटतं.