हम साथ साथ है.! Print

अनिल हर्डीकर , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजच्या काळात एकत्र कुटुंबात राहणं, तेही गुण्यागोविंदाने ही काहीशी ‘हटके’ गोष्ट, विशेषत: मुंबई किंवा परिसरातील कमी जागेत राहताना! आम्हाला भेटली अशी कुटुंबं, छोटय़ा असो वा मोठय़ा घरात असणारी, पण आनंदाने एकमेकांना सांभाळून राहणारी, नकारात्मक गोष्टींनाही सकारात्मकतेने पाहणारी.
अलीकडेच माझ्या मित्राचा फोन आला; तो ‘आजोबा झाला’ हे सांगण्यासाठी! त्याच्या एकुलत्या एका लेकीला मुलगा झाला होता. अक्षरश: वर्षांत घरी पाळणा हलला. त्याची लेक मानसी आमच्या अंगाखांद्यावर खेळलेली. आम्ही बाळ पाहायला गेलो. मानसी आनंदात होती. मानसीचा नवरा महेंद्रही तिथेच होता. मी गमतीनं म्हणालो, ‘‘काय मग, आता फुलस्टॉप का?’’ त्यावर महेंद्र म्हणाला, ‘‘फुलस्टॉप का? आता शक्य तेवढं लौकर या बाळाला ‘दादा’ करायचं आहे.’’
मानसी म्हणाली, ‘‘आमच्या कुटुंब नियोजनाची स्लोगन थोडी आल्टर केल्येय. ‘हम दो, हमारे कम से कम दो’.’’
महेंद्र म्हणाला, ‘‘काका, मला ना भाऊ, ना बहीण, ना काका, ना आत्या, ना मावशी, ना मामा.’’
‘‘आमच्याकडेही तसंच,’’ मानसी म्हणाली. ‘‘चुलतभाऊ नाही, बहीण नाही, आतेभाऊ नाही, आतेबहीण नाही, मावसभाऊ नाही, मामेभाऊ नाही, मामेबहीण नाही. त्यामुळे आमच्या मुलांना तरी ते हवेत.’’
महेंद्र म्हणाला, ‘‘काका, अलीकडे मुलांचे संगोपन, शिक्षण परवडत नाही ही कारणं सांगितली जातात. असं असेल तर मी कर्ज काढेन. महागडे कपडे नकोत, खेळणी नकोत, टय़ूशन्स ठेवणार नाही. घरात शिकवू, पण आम्ही आमच्या मुलांना भावंडं देऊ. एकलकोंडे नाही होऊ देणार.’’
मानसी म्हणाली, ‘‘काका, मला महेंद्रनं बघण्याच्या कार्यक्रमाची पसंती कळवण्यापूर्वी ही ‘भविष्यातल्या मुलांची’ अट घातली होती नि मला ती मान्य होती.’’
 आजच्या काळात असा विचार करणारे तरुण आहेत हे ऐकून अचंबा वाटला होता.
हे सगळं आता आठवायचं कारण म्हणजे अशोक मुळ्ये नावाच्या एका अविवाहित उत्साही अवलियानं दादरच्या शिवाजी मंदिरात आयोजलेलं एकत्र कुटुंबांचं संमेलन! अशोक मुळ्यांनी जवळजवळ ४२ एकत्र कुटुंबे ‘पाहिली’. त्यातल्या  १८ कुटुंबांना एकत्र बोलावण्याचं निश्चित झालं. बरं ही सगळी मंडळी इकडे विरार, तिकडे अंबरनाथ-कल्याण अशी टोकाची, पण उत्साहाने कार्यक्रमाला आली आणि आपलं एकत्रपण चक्क साजरं केलं. या एकत्र कुटुंबांपैकी काहीजणांशी संवाद साधला. त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडला तो त्यांच्यातल्या अखंड नात्याचा प्रवास !
परळ व्हिलेजमध्ये चांगलं १७००/१८०० स्क्वेअर फुटांचं घर, २५० स्क्वेअर फुटांची टेरेस, वेगवेगळ्या बेडरूम्स असणारे बलराम बेर्डे यांचं एकत्र कुटुंब. ७१ वर्षांच्या अंजली बलराम बेर्डे या मूळच्या माहेरच्या रत्नागिरीच्या. अनेक अडीअडचणींना तोंड देत आज आनंदानं पतीराजांसह ३ मुलगे, ३ सुना आणि सहा नातवंडांच्या एकत्र कुटुंबाची देखरेख करताहेत. ३ मुलांपैकी दोघे नोकरदार. एकाचा संगणकाचा उद्योग, तीनही सुना नोकरी करणाऱ्या. अंजलीताईंच्या बोलण्यात प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा. त्या म्हणाल्या, ‘‘मुलांना, सुनांना सांगितलं, बाकी काही मागणं नाही. प्रत्येक जोडप्यानं कमीत कमी दोन नातवंडं द्यायचीच. आम्ही त्यांच्याकडे पाहायला समर्थ आहोत आणि खरं म्हणजे त्यामुळे मी ठणठणीत आहे आणि तुम्हाला सांगते, आम्हाला करावं असं काहीच लागत नाही. तीच आपापसात रमतात, भांडतात, खेळतात, खिदळतात. आजी-आजोबा आहोत म्हणून अधूनमधून ओरडतोही आणि तितकंच प्रेमानं करतोही, या एकदा.’’ अंजलीताईंनी गप्पा मारता मारता आमंत्रणही केलं. मीही मजेत म्हणालो, ‘‘अहो, आणखी कशाला मला बोलवता?’’ त्यावर हसून त्या म्हणाल्या, ‘‘ऐंशी तिथे पंचाऐंशी.’’ अंजलीताईंनी मला विचारलं, ‘‘तुम्ही किती घरात?’’ मी कमी गुण मिळवलेल्या मुलासारखं दबक्या आवाजात म्हणालो, ‘‘तीन. मी, बायको, मुलगा.’’ अंजलीताई म्हणाल्या, ‘‘तुमच्या पत्नीचा स्वयंपाकाचा अंदाज नसेल जमत. आमच्याकडे आयत्या वेळी आलेला पाहुणाही खपून जातो. मला सुनाही चांगल्या मिळाल्या. त्यांना त्यांच्या मुलांच्या आजारपणात रजा घ्याव्या लागत नाहीत आणि काळजीही करावी लागत नाही आम्ही घरात असल्यामुळे. आणखी काय हवं माणसाला? अगदी खरं सांगते, भाग्यवती मी या संसारी. देवाला फक्त सांगते, दृष्ट नको लावू.’’
यांच्या बरोबर उलट १८० स्क्वेअर फुटांच्या जागेत राहणारं चर्नी रोडच्या ठाकूरद्वारमधलं सुहास पावसकरांचं कुटुंब. १२ जण एकत्र राहणाऱ्या या कुटुंबाने त्यातल्या सकारात्मक गोष्टी जास्त पाहिल्या. खर्चात बचत होते, नातवंडांवर संस्कारही होतात. मुंबईतल्या जागेचे अवाच्या सव्वा वाढलेले भाव लक्षात घेता नवीन जागा घेणं या कुटुंबाला परवडणारं नाही, पण त्यांची त्याबद्दल तक्रार नाही. पावसकरांचं वय आहे ७१, तर पत्नीचं ६४. त्या म्हणाल्या, ‘‘इथेच झाली सगळी बाळंतपणं. इतकंच कशाला आमच्याकडे दरवर्र्षी पाच दिवसांचा गणपती असतो. ४५ जण येऊन जातात. मस्त साजरे होतात सण. रोजच्या जगण्यात काही गोष्टी स्वीकारायला लागतात, पण ते चालायचंच. पाणी फक्त सकाळचं येतं. त्यासाठी लवकर उठावं लागतं. टीव्हीचा त्रास होतो. झोपही अनेकदा अपुरी होते, पण आता त्याची सवय झालीय.’’
परशुराम देवरुखकर यांचीही जागा १६० स्क्वेअर फुटांची. सासूबाई ७७, तर सासरे ८२ वर्षांचे. या दहा जणांच्या कुटुंबाला पाणीही तितकंच लागतं. मग सगळी पाण्याची भांडी, बादल्या भरून ठेवाव्या लागतात. त्यामुळे मोठय़ा कपाटातलं सामान दिवसातून एकदाच काढता येतं. सासू-सासरे, २ मुलगे, दोन सुना असलेल्या या कुटुंबात सकाळी एका सुनेनं जेवण करायचं, तर दुसरीने रात्री असं ठरलेलं आहे. मुलगे नोकरी करतात, परंतु तरीही घरातली आर्थिक घडी स्थिर राहावी म्हणून घरातल्या घरात सीझनल लघुउद्योग करणारं हे कुटुंब हसतमुखाने संसार करत आहेत.  
विलेपाल्र्यात राहणारे तरुणेश जोगळेकर ५१ वर्षांचे. घरात वडील, दोन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि मुलं. एकूण ८ जण. ते म्हणाले, ‘‘आम्हा नवराबायकोला कुठे बाहेर जायचं असेल तरी मुलांची कसलीच काळजी नसते. अर्थात माझ्या भावाबहिणीलाही तोच फायदा. कामं वाटून घेणं हे आपापसातल्या सामंजस्याने शक्य होतं, विशेषकरून आजारपणात मनुष्यबळाचा फायदा खूप जाणवतो. माझ्या मित्रांकडे, नात्यातील अनेक घरांत पाहतो, मुलं एकेकटी कॉम्प्युटरसमोर बसलेली असतात. आमच्या घरात भावंडांना भावंडांची ‘कंपनी’ मिळते. स्वत:ला काही तरी वेगळं करायचं असलं तर मात्र मनाला मुरड घालावी लागते, पण तसं पाहायला गेलं तर प्रत्येक कुटुंबपद्धतीत गुणदोष हे असायचेच.
भाई सावंत यांचंही एकत्र कुटुंब. पंचावन्न जणांच्या या एकत्र कुटुंबाचा फॅमिली बिझनेस एकच आहे. त्यांची गोरेगावला स्वत:ची इमारत आहे. त्यात ही कुटुंबं राहतात. मात्र जेवण एकाच मोठय़ा स्वयंपाकघरात होतं. अण्णा सावंत म्हणाले, ‘‘आमच्या एवढय़ा मोठय़ा कुटुंबाच्या एकत्रित राहण्यामागचं गुपित म्हणजे मोकळेपणा. सगळे जण एकमेकांसाठी आहेत. कुणी एकटं पडलंय असं होत नाही. ज्यांना काही बोलायचंय ते मोकळेपणे बोलू शकतात. अर्थात एकत्र कुटुंब म्हणजे समस्या नाहीत असं नाही, पण कुटुंबप्रमुख या नात्याने भाई काय किंवा मी काय पुढाकार घेऊन ती समस्या वाढणार नाही याकडे लक्ष देतो. काही वेळा माघारही घ्यावी लागते, पण नंतर त्यांना ती गोष्ट समजून सांगण्याचा अधिकारही मिळतो. आमच्या सुना अगदी सातारा, कोल्हापूर, बेळगाव इथल्या आहेत. लग्न जुळवताना आम्ही त्या कुटुंबाला आमच्या घरीच बोलावतो. त्यांना आमचं कुटुंब दाखवतो. गंमत म्हणजे या सगळ्यांना भावतो तो मोकळेपणाच. काही वेळा एखादं वर्ष जातं त्यांना अ‍ॅडजस्ट व्हायला, पण मग रुळतात सगळ्या. अर्थात आता काळ बदलला आहे, त्यामुळे तरुण पिढीच्या वागण्यात- कपडय़ांमध्ये फरक आला आहे. तो स्वीकारण्याचा समंजसपणा मोठी माणसं म्हणून आम्हाला दाखवावाच लागतो. इतरांच्या बाबतीत ते किती शक्य आहे हे मला माहीत नाही, पण आमचं कुटुंब एकत्र राहतं हे सत्य आहे.’’ त्यांच्या सुनबाई म्हणाल्या, ‘‘एकत्र कुटुंब म्हणजे फायदे-तोटे असणारच, पण व्यक्तिगत माझ्या बाबतीत सांगायचं तर मी जेव्हा कधी टेन्स असते तेव्हा तेव्हा मला ऐकणारं, ऐकून घेणारं कुणी तरी असतंच घरात. हा माझ्यासाठी सर्वात मोठा फायदा आहे.’’
अलीकडेच केवळ सोय व नाइलाज म्हणून एकत्र कुटुंबातून पुण्याला राहायला गेलेल्या बाईंशी ओळख झाली. एकत्र कुटुंबाचा नुसता विषय काढल्यावर त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही शास्त्री हॉलमध्ये एकत्र राहायचो. मी धाकटी भावजय म्हणून घरात आले. माझ्या मोठय़ा जाऊबाईंनी (३ वर्षांनी मोठय़ा) मी धाकटी आहे हे मला जाणवू दिलं नाही. मला नेहमी प्रत्येक कौटुंबिक निर्णयात सामील करून घेत. माझी सूचना लक्षात घेत. एखादी गोष्ट नाही पटली तर त्यांचा दृष्टिकोन बोलून दाखवत. माझ्या मुलांवर ओरडत, पण तितकंच प्रेम करत. आमच्या घरात माझे पती आणि दीर एक तारखेला ठराविक रक्कम एका पेटाऱ्यात जमा करत. त्यात एक रायटिंग पॅड असे. घरातील कुणाही व्यक्तीने पैसे खर्च करावेत. मात्र खर्चाचा तपशील लिहून ठेवायचा अशी पद्धत होती. गरज पडली तर दुसऱ्यांदा पैसे ठेवावे लागत, पण जबाबदारीने सगळेच वागत. त्यामुळे कधीही वाद, तंटा झाला नाही. मीही आपसूक जाऊबाईंसारखं वागायची. माझ्या माहेरी माझ्या जाऊबाईंचंही कौतुक होतं. शेजारपाजारचे म्हणत, ‘अगदी सख्ख्या बहिणी आहात तुम्ही.’ मी कबूल करते की, मी जी काही चांगली वागले ती माझ्या जावेमुळे. आज आम्ही वेगळे राहतो आहोत ती केवळ एक सोय म्हणून, गरज म्हणून. मात्र माझं हक्काचं घर शास्त्री हॉलमध्ये आहे आणि माझ्या भावजयीचं पुण्यात.’’
सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ एकत्र कुटुंबात राहणारे. एकत्र कुटुंबाचा पुरस्कार करताना गप्पात म्हणाले होते, ‘‘अरे, आपण नोकरी-व्यवसाय करत असताना आपले वरिष्ठ, सोबतचे आणि हाताखाली काम करणारे यांच्याशी कैकदा मतभेद असूनही जमवून घेतो ना? नाही ना नोकरी सोडून देत? मग संसारात वेगळी चूल मांडायचा प्रयत्न का?’’
एकत्र कुटुंबात राहायचं तर एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतंच आणि यशस्वी कुटुंबाचं बहुतांश यश हे घरातल्या स्त्रियांवर असतं हे अगदी खरं आहे. मी अनेक वर्षे एकत्र कुटुंबात राहिलेल्या एका काकूंशी गप्पा जमवल्या. त्या म्हणाल्या, ‘‘एकत्र कुटुंबात सगळी माणसं आपापल्या कामात व्यस्त असतील आणि घरातल्या कामांची व्यवस्थित वाटणी झाली असेल तर एकत्र कुटुंबाइतकी चांगली व्यवस्था नाही, पण बऱ्याचदा दुर्दैवाने काही माणसं अधिकाधिक आळशी, परावलंबी आणि बेजबाबदार होतात. आमच्या घरात तसं घडलं नाही. मी मोठी सून होते. माझ्या सासूबाईंचे कितीही केलं तरी त्यांचं समाधान होत नसे. माझे सासरे मात्र माझ्या वडिलांसारखे होते, अगदी लाख माणूस. माझ्या पाठीशी खंबीर उभे राहायचे. माझा दीर धाकटा, पण समजूतदार. त्यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीला सांगितले, ‘माझ्या आईशी तुला जमवून घेता आलं नाही तरी हरकत नाही. वहिनीशी जमवून घे.’ मला म्हणाले, ‘तुझे अनुभव तिला सांग, तुम्ही आपापसात भांडा, पण मागे काही वाईट बोलू नका.’ आम्ही ती पथ्यं पाळली. २५ वर्षे एकत्र राहिलो. क्वचित कधी भांडलो, नाही असं नाही, पण आम्ही दोघींनी नवऱ्यांजवळ कधीच तक्रार केली नाही. माझ्या धाकटय़ा जावेचा मला खूप आधार मिळाला. सासूबाई मला जो त्रास देत त्यासाठी मला भागीदाराची गरज होती ती तिनं भागवली. आमच्या घरी सकाळचं जेवण तिनं केलं, तर रात्रीचं मी करायचे. माझ्या माहेरची माणसं आली तर मी पूर्ण मोकळी असायची, त्यांच्याबरोबर फिरायला, गप्पा मारायला आणि तिच्या माहेरची माणसं आली की तीही मोकळी असे आणि आमची नणंद येणार अशी चिठ्ठी-पत्र आलं की आम्ही दोन्ही जोडपी बाहेरगावी फिरायला जायचो. यात सासऱ्यांचीच भूमिका मोठी होती. ते नणंदेला सरळ सांगत, एरवी ११ महिने सासरी असतेच मग एक महिना आईवडिलांचीही सेवा कर. आता मुलगा व्यवसायामुळे अमरावतीला असतो. मी नातवंडांच्या ओढीनं तिथे जाते. मध्यंतरीच्या काळात सासू-सासरे गेले, पण त्या आठवणी मात्र अजून ताज्या आहेत.’’
ठाण्याच्या चेंदणी कोळीवाडय़ातल्या दौडकरांच्या कुटुंबातल्या गोरक्षनाथ आणि शैलेश यांच्याही घरात एकूण माणसं १६, गोरक्षनाथांचं वय ५१, शैलेश तरुण. तो म्हणाला, ‘‘आमचा हॉटेलचा व्यवसाय. घरातील पुरुष मंडळी याच व्यवसायात. तुम्हाला घरातल्या कुणाचा वाढदिवस साजरा करायचा असला तर बाहेरून नातेवाईक बोलवावे लागतात. आमचं तसं नाही. आम्ही वाढदिवस साजरा करायचं म्हटलं की घरचाच फोर्स भरपूर असतो.’’
विलेपार्ले येथे राहणाऱ्या एका तरुणानं नाव न देण्याच्या अटीवर एकत्र कुटुंबातील काही गुपितं सांगितली. तो म्हणाला, ‘‘आमच्या घरात पसारा पडला तर कुणालाच त्याचं काही वाटत नाही. घरच्यांनाही, बाहेरच्यांनाही. घराला कुलूप लागत नाही, आंघोळीला कुणी जायचंय या भांडणात चतुर सभासद न बोलता आंघोळ उरकून येऊ शकतो. घराबाहेर न सांगताही राहता येतं. आल्यावर कुणी विचारलं तर त्या वेळी जो घरात नसेल त्याला सांगून गेलो होतो असं सांगता येतं. पण जी माणसं घरात असतात त्यांच्याच आवडीच्या सीरियल्स पाहाव्या लागतात. सर्व खरेदी घाऊक प्रमाणात, त्यामुळे पैसे वाचतात आणि मोठं गिऱ्हाईक जायला नको म्हणून दुकानदार जपून वागतात आणि गंमत म्हणजे बायको रागावली तरी वहिनी, आई जेवायला वाढतात. विनोदाचा भाग सोडा, पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे आहेत. व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचे झाले तर एकत्र कुटुंब म्हणजे टीम वर्क नाही तर सिनर्जी. २ अधिक २ बरोबर ४ नव्हे तर २ अधिक २ बरोबर ४ हून अधिक. मी तर म्हणेन एकत्र कुटुंबाचे काही तोटे असतीलही, पण फायदे जास्तच आहेत. मग ती नोकरी करणारी भावंडं असोत वा व्यवसाय करणारी असोत. वैयक्तिक, आर्थिक आणि मानसिक प्रगतीसाठी एकत्र कुटुंबाइतकं सशक्त माध्यम नाही.’’