परीसस्पर्श Print

अनुराधा गांगल , शनिवार , २१  जुलै २०१२
alt

वैद्यकशास्त्रात भरपूर पैसे मिळवून देणाऱ्या अनेक शाखा असताना त्यांनी निवड केली वेगळ्या शाखेची. पक्षाघात झालेल्यांना, सेरिब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी त्या ठरल्या आहेत आशेचा किरण. डॉ. राजुल वासा यांची रुग्णांविषयीची तळमळ इतकी प्रामाणिक आहे की या जोरावर त्यांनी ‘असाध्य ते साध्य’ असा पल्ला गाठला आहे. मेंदूच्या आजारानं सामान्य जगण्याला मुकलेल्या अनेकांसाठी डॉ. राजुल वासा यांचा हस्तस्पर्श जणू परीसस्पर्श ठरतो आहे.अ लीकडे चाळिशीतही पक्षाघाताला बळी पडलेल्यांची उदाहरणे कानावर पडतात. बदलत्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे स्ट्रोक पेशंटची संख्याही वाढू लागली आहे.

अशा रुग्णांचं आयुष्य एका क्षणात एकाकी, परावलंबी आणि नीरस होऊन जातं. इलाज असले तरी ते खूप खर्चिक आणि दीर्घकालीन असतात. त्यात पैसा तर जातोच पण पूर्णत बरं होण्याची आशा रुग्णच सोडून देतात. म्हणूनच पेशंटबरोबर त्यांचे कुटुंबीयसुद्धा मनोधैर्य, आत्मविश्वास हरवून बसतात. अशा रुग्णांसाठी आशेचा किरण ठरल्या आहेत डॉ. राजुल वासा. त्यांची उपचार पद्धती नवा मंत्र देते, तो म्हणजे या आजाराचे निराकरण फक्त रुग्णच करू शकतात. अनेक उपाय करून थकलेल्या पेशंटच्या नातेवाइकांना त्या वाटतात आश्वासक दूत.
डॉ. राजुल वासा यांचा आतापर्यंतचा प्रवासच थोडा वेगळा आहे. गुजराती कुटुंबातली ही हुशार तरुणी खरं तर होणार होती सर्जन. पण वळली फिजिओथेरेपीकडे. फिजिओथेरेपीने व्याधीग्रस्त माणसाला आराम मिळतो पण आपल्या शरीराला झालेली दुखापत आणि मेंदू यांची योग्य सांगड घातली तर मनुष्याला पूर्वपदावर येणे जास्त सोपे होईल, या विचाराने त्यांच्या मनाची पकड घेतली आणि मेंदू व मज्जातंतू (सीएनएस) यांच्या अभ्यासाला पुढे सुरुवात झाली. या विषयात आतापर्यंत अनेक संशोधन व अभ्यास झाला आहे पण राजुल यांना गवसलं काही वेगळं. मेंदू व शरीराच्या क्रिया यांच्या अंतर्गत नात्यांसंबंधीचे त्यांचे संशोधन यथावकाश प्रसिद्ध होईलच. पण त्यांच्या या विषयातील अभ्यासामुळे अनेक रुग्णांचे जीवन मात्र आत्ताच बदलून गेले आहे.
डॉ. राजुल यांनी स्वित्झर्लंड येथून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. सध्याही तेथील नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये त्या अध्यापनाचे काम करतात. त्यामुळे महिन्यातले काही दिवस त्या तिथेच असतात. तिथले पेशंट, त्यांच्यातला जागरूकपणा, त्यांना मिळणाऱ्या सुविधा बघून डॉ. राजुल यांना भारतातल्या पेशंटबद्दल हळहळ वाटते. म्हणूनच त्या इथल्या स्ट्रोक पेशंटसाठी झटत आहेत.  
डॉ. राजुल यांना भेटून आल्यावर मीही एका सकारात्मक प्रेरणेने भारावून गेले. तसं पाहिलं तर त्यांच्या आजूबाजूला स्ट्रोकचे पेशंट, जन्मजात किंवा लहानपणापासून सेरिब्रल पाल्सीग्रस्त रुग्ण आणि हताश झालेले पेशंटचे नातेवाईक..या गराडय़ात राहूनही त्या आशेचा ओघवता झरा आहे..त्याचं बोलणं इतकं आश्वासक आहे की नकळत तुम्हीही त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवू लागता. त्यांच्याकडे येणारे अनेक पेशंट्स, खरं तर मोठमोठाली हॉस्पिटल्स आणि बक्कळ पैसा खर्च करून रुग्णाच्या स्थितीत काही प्रगती न झाल्याने निराश झालेले असतात. कुठून तरी डॉ. राजुल वासा याचं नावं कळतं आणि त्यांना विश्वास मिळतो बरं होण्याचा..
 डॉ. राजुल मुंबईत पॅरालिसिस झालेल्या रुग्णांवर किंवा सेरिब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर इलाज करतात, तेही एकही पै न आकारता. त्यांना भेटायला गेल्यावर पहिलीच रुग्ण भेटली प्रगती पंगेरकर. ती १४ वर्षांची आहे. चारचौघांसारखी छान गुटगुटीत बालिका म्हणून जन्मली. आठ दिवसांची असतांना काहीतरी झालं, औषधांची अ‍ॅलर्जी की काय ते कळलं नाही पण तिची हालचाल मंदावली. तिचं रडणं कमी झालं आणि तीन महिन्यांची असताना तिची दृष्टी गेली. तालुक्याच्या डॉक्टरकडे नेलं. मुंबईतली प्रसिद्ध रुग्णालये पालथी घातली. खूप पैसा खर्ची पडला पण पदरी निराशा आली. अखेर कुणीतरी डॉ. राजुल यांचं नाव सुचवलं. गेल्या तीन वर्षांच्या नियमित उपचारांनंतर प्रगतीची दृष्टी परत आली आहे. ती आता बघू शकते, माणसं ओळखते, त्यांच्याशी बोलते. ती पूर्ण बरी झालेली नाही, पण ती बरी होईल ही आशा-नव्हे खात्री तिच्या आईला आहे. हा विश्वास त्यांना मिळवून दिलाय डॉ. राजुल यांनी.
किशन बत्रा हे सी.ए.झालेले मध्यमवयीन गृहस्थ. स्वतच्या कंपनीचा डोलारा हाताळण्यात बिझी होते. आठ वर्षांपूर्वी अचानक स्ट्रोकचा झटका आला. नामवंत डॉक्टर्सकडच्या फेऱ्या सुरू झाल्या. प्रख्यात फिजिओथेरपिस्ट सकाळ-संध्याकाळ घरी येऊ लागले. पण सुधारणा होत नव्हती. मग राजुल यांच्याकडे उपचार सुरू झाले. ते राजुल सांगतील तो व्यायाम न चुकता करू लागले. सुरुवातीला त्यांचे उच्चार अस्पष्ट व्हायचे. हळूहळू प्रयत्नपूर्वक ते एकेक शब्द बोलू लागले. आता ते जवळपास ८० टक्के बरे झालेत. अजून एक हात थोडा दुमडलेला व मान थोडी डावीकडे झुकलेली असते. पण त्यांनी कंपनीत जाणं सुरू केलंय .उजवी बाजू पॅरालाइज्ड झाल्यामुळे लिहिणंही थांबंलं होतं. आता तेही त्यांनी थोडं-थोडं सुरू केलंय.
माधुरी भिडे, पाली येथे राहणारी युवती. बी.ई. कॉम्प्युटर इंजिनीअर झाली आहे. वांद्रे येथून येताना अपघात झाला. मानेच्या मणक्याला मार लागला. अनेक हॉस्पिटल्स झाली,ऑपरेशन्स झाली. बोलता येत नव्हते, चालता येत नाही. मानेला तर आधारच नव्हता. राजुल भेटल्या अन जादूची कांडी फिरवावी तशी सुधारणा होऊ लागली. तिची आई खंबीरपणे पोरीच्या पाठीशी उभी आहे ते राजुलच्या आत्मविश्वासावरती.
रत्नागिरीच्या वैशाली पटवर्धन यांचा नचिकेत हा आठ वर्षांचा मुलगा. सव्वा वर्षांपासून त्याचं बोलणं बंद झालंय. त्याला तोल सांभाळता येत नाही पण खुणेची भाषा नीट कळते. नचिकेतसाठी आई-बाबा खूप प्रयत्न करतायत डॉ. राजुलच्या मार्गदर्शनाखाली. त्यांनाही डॉ. राजुल नसत्या तर..या नुसत्या विचारानेही अंगावर काटा येतो.
अशी अनेक उदाहरणं राजुल यांचं यश अधोरेखित करण्यासाठी देता येतील. काहीतरी जादू असल्यासारखी त्यांच्याकडे येणारे रुग्ण बरे होऊ लागतात. त्यांच्याशी बोलताना याचं रहस्य उलगडलं. रुग्णांना त्यांचं कळकळीचं एकच सांगणं असतं, तुमच्याबाबत बरं-वाईट कसलीही नोंद ठेवण्यात मेंदूची प्रमुख भूमिका आहे. म्हणूनच पक्षघाताने स्थितप्रज्ञ झालेले अर्धे शरीर पूर्ववत करण्यासाठी रुग्णाचा मेंदूच त्याच्या शरीराला आज्ञा देऊ शकतो व हा बदल घडवून आणू शकतो. हेच त्यांनी मांडलेल्या ‘वासा संकल्पनेचं’ मूळ आहे. रुग्णाच्या शरीराच्या हालचाली, त्याचा तोल सांभळणे व नियंत्रण राखणे या कामी हेच लागू असल्याचे राजुल यांचे म्हणणे आहे.
राजुल सांगतात, स्ट्रोकच्या पेशंटची असहायता बघून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या दृढ निश्चय मी केला व इथवरचा प्रवास झाला. पक्षाघात झालेली माणसे कधीही बरी होणार नाहीत असा अनेकांचा समज असतो, नव्हे दृढ विश्वास असतो. यामुळे ही माणसे परत कधीच पूर्वीसारखी बोलू शकणार नाहीत किंवा कुणाच्याही आधाराशिवाय बसू अथवा चालू शकणार नाहीत असा अशक्यप्राय विचार रुग्णाच्या मनात नकळतपणे ठसतो. मात्र तुमचा मेंदू आणि तुमचं शरीर यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच रुग्ण पूर्ववत होऊ शकते, हे त्रिवार सत्य आहे.’ म्हणूनच रुग्णाचा सक्रिय सहभाग तिच्यासाठी महत्त्वाचा नव्हे बंधनकारक आहे. त्या थेट असंच सांगतात, ‘मी काही करू शकत नाही, तुमच्याच हातात तुम्ही बरं होण्याची शक्ती आहे.’
‘वासा संकल्पने’चं मूळ सूत्रं असं आहे-सेरिब्रल पाल्सीच्या पेशंटने त्याच्या लुळ्या पडलेल्या शरीराला मेंदूशी जोडून गुरूत्वाकर्षणाशी समतोल राखण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या शरीराचे संतुलन राखता येणे शक्य आहे. अर्थातच हे डॉक्टरांची भेट घेतल्याच्या अध्र्या तासात करून उपयोग नाही. त्यासाठी दिवसातले सात-आठ तास तरी यासाठी दिले पाहिजेत. आपल्या शरीराचे ‘सेंटर ऑफ मास’ गुरूत्वाकर्षणाशी जोडले गेले तर पेशंटला शरीराचा समतोल राखता येतो, असं ही संकल्पना सांगते.
राजुल यांचं शास्त्रच निराळं आहे..त्यांच्या मते तुम्हाला होणारा त्रास हा पक्षाघातामुळे संभवणारा आणि न टाळता येणारा त्रास असल्याची भूमिका घेऊ नका. तुम्ही ते टाळू शकता यावर विश्वास ठेवा. एखादी गोष्ट तुमच्या मेंदूने स्वीकारण्याआधी सावध व्हा. मेंदूला कार्यरत करा. त्याला आदेश द्या. असं त्यांचं सतत सांगणं असतं.
रुग्णाच्या स्थितीनुसार त्याच्यासाठी काही व्यायामप्रकार, आवश्यक असल्यास स्पीच थेरेपी व खाण्यापिण्याची काही बंधनं त्या सांगतात. साधारण पंधरा दिवसांनी पुन्हा बोलावतात. रोज रुग्णाकडून हा व्यायाम करून घेण्याची जबाबदारी घरच्यांची. अर्थातच त्या फक्त सूचना देऊन थांबत नाहीत तर सुचवलेला व्यायाम घरी किती नेटाने केला जातो, याचं चित्रीकरण करून ठेवा, असं त्या सांगतात. आणि मुख्य म्हणजे पंधरा दिवसांनी तुम्ही परत गेलात की हे चित्रीकरण काळजीपूर्वक बघून ‘काय चुकतंय, मूल कुठे कंटाळा करतंय, काय अडचण आहे, किती प्रगती आहे’ याचा आलेख तयार करतात. ही पद्धत प्रत्येक रुग्णासाठी. प्रत्येकाचा लहान-सहान तपशीलही त्यांच्याकडे नोंदवलेला असतो. एका खोलीत त्यांचं क्लिनिक चालतं, असं नाही. एका प्रशस्त हॉलमध्ये रुग्ण व कुटुंबीय जमलेले असतात. एकेकाची जातीने तपासणी करत सूचना देत त्या तब्बल पाच-सहा तास न थकता बोलत असतात. व्यायाम शिकवला की पालकांना त्याची उजळणी करण्याचा त्यांचा आदेश. खडय़ा आवाजातल्या त्यांच्या सूचना. प्रसंगी पालकांवरही डोळे वटारणे, यातून दिसते त्यांची रुग्णांमधली भावनिक गुंतवणूक..म्हणूनच तर बोलू न शकणारे रुग्ण काय सांगताहेत हे त्यांना अचूक कळतं. रूग्णांशी त्यांचा सुसंवाद सुरू असतो. विशेष म्हणजे त्यांच्याकडे येणारे ६० टक्के रुग्ण साधारण पंधरा वर्षांखालील असतात. या लहानग्यांकडून व्यायाम करून घेणं महादिव्य असतं. ते त्यांच्या उपस्थितीत लीलया केलं जातं. एक मात्र नक्की..रुग्णासाठीची डॉ.राजुल यांची धडपड, मेहनत यांची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. रुग्णाला बरं करण्याचा त्यांचा ध्यास त्यांचं वेगळेपण ठळक करतो. ‘वासा संकल्पना’ अमंलात आणली तर डॉ. राजुल वासा हयात असो वा नसो त्यानंतरही भविष्यात पेशंट याचा लाभ घेऊ शकतात. पेशंटला बरं होण्याचं उघड गुपित सांगत सेरिब्रल पाल्सीमुक्त जग व्हावं, अशी इच्छा डॉ.राजुल वासा बाळगतात.