सेवा ‘भाव’ Print

छाया दातार , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पूर्वी ज्या गोष्टी कुटुंबातलेच लोकप्रेमासाठी, नात्याच्या घनिष्ठतेसाठी करत होते त्या आता वेळेअभावी किंवा विभक्त कुटुंबपद्धतीमुळे करणे शक्य होत नाही. या गोष्टी आता सेवा या स्वरूपात बाजारात मिळू लागल्या आहेत, थेट सरोगेट मदरपासून पाळणाघरापर्यंत. ‘पैसे फेका सेवा मिळवा’ हे आम होऊ लागलंय, पण भावनिक नात्याचं काय? सेवा मिळतील पण त्यामागचा ‘भाव ’ कुठून आणायचा ? का पुढे आपणही रोबोचं जीवन जगणार आहोत ?
हो, प्रेम बाजारातूनच विकत घ्यायची वेळ आली आहे. अजून भारतात नाही, पण अमेरिकेत नक्कीच. हे मी म्हणत नाहीये, तर होस्चाइल्ड नावाची लेखिका तिच्या पुस्तकात म्हणतीय.

पुस्तकाचे नाव आहे, 'The Outsourced Self'. मी त्याला नाव दिलंय, ‘स्वच्या भावनिक गरजापूर्तीसाठी सेवापुरवठादारांचा शोध’. येथे प्रेम म्हणजे शारीरिक प्रेम किंवा लंगिक गरजा अजिबात अभिप्रेत नाहीत. मग आणखी कोणत्या प्रेमाची किंवा आपण अधिक विस्तारित शब्दप्रयोग वापरू- भावनिक प्रेमाच्या- माणसाला गरजा असतात? आणि त्या गरजा बाहेरून पसे देऊन विकत घेता येतात? आपल्याकडेही आपण अशा सेवा अलीकडे विकत घेऊ लागलो आहोत, पण अजून त्या खूप सार्वत्रिक नाहीत आणि कुटुंब संस्था बऱ्यापकी स्थिर आहे, अर्थात बाईच्या जिवावर! त्यामुळे अशा सेवांची गरज आपल्याला पटकन जाणवत नाही. पण होस्चाइल्ड बाई म्हणतात की, जेव्हा जवळजवळ ७० टक्के घरांतून आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे आहेत व जबाबदारीच्या जागेवरही त्यातील बरेच आहेत, त्या वेळी व्यापारी जीवन व खासगी जीवनही जेथे मिळतात तेथे फारच गोंधळ उडालेला दिसतो आणि अनेक प्रकारच्या कसरती कराव्या लागतात.
पूर्वी कुटुंबातील लोक आणि शेजारीपाजारी, वाडी-वस्तीतील लोक मिळून अनेक अनौपचारिक श्रम एकमेकांना फुकट पुरवीत असत. सर्वाना जाणीव असते की, हे प्रेमाचे श्रम आहेत, भावनिक समाधान मिळविण्याच्या या जागा आहेत आणि आपणच खरे म्हणजे ही कामे केली पाहिजेत, कारण त्यातूनच आपले नातेसंबंध बांधले जाणार आहेत, पण आजच्या गतिमान जीवनात लोकांचा पेशन्स हरवून गेलाय. पसे देऊन कामे होतात हे माहिती असते. त्यामुळे अशी सेवा घेतली जाते; परंतु तरीही अशा सेवा घेताना अपराधी वाटत असते. म्हणूनच हे पुस्तक लिहिताना होस्चाइल्डने माणसे निवडताना मध्यमवयीन माणसे निवडली, कारण तिच्या मते त्यांच्या मनात अजूनही जुनी मूल्यव्यवस्था आहे. ताज्या दमाच्या तरुण-तरुणींना बाजारपेठेची इतकी सवय असते की, ते सहज निर्णय घेऊन टाकू शकतात आणि वेबसाइटवरून त्या सेवा शोधू शकतात. अमेरिकेत तर हे फारच मोठय़ा प्रमाणात जाणवते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नोकऱ्यांमधील संचारसुलभता. सतत दूरदूर नोकऱ्या घेणाऱ्या मुलांची मुले सांभाळायला जायला कोणते आईवडील तयार असणार? विशेषत: निवृत्त झाल्यावर बरेच काही करण्याचे बेत आखलेले, शिकलेले आईवडील असे मुलांबरोबर िहडायला कसे तयार होतील? उलटय़ा अंगाने वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी याच मध्यमवयीन लोकांना वेळ देता येत नाही आणि मग सेवा बाजारात शोधायची गरज भासते.
लेखिकेने कोणत्या प्रकारच्या सेवा लागतात याची एक यादीच तयार केली आहे आणि त्या सेवा पुरवठादार लोकांना ती भेटली आणि त्यांच्या ग्राहकांनाही ती भेटली. नॅनीज म्हणजे मुलांना सांभाळणारी बाई, वृद्धसेवा देणारे, विवाहाचा सोहळा आखून साजरा करून देणारे, वेबसाइटवरून जोडीदार निवडण्यासाठी मदत करणारे (स्वत:चे प्रोफाइल कसे तयार करावे वगरे सल्ला देणारे, विशेषत: मध्यम वयात विवाहाचा विचार करताना माणसे अधिक सावध असतात.), घराचे म्हणजेच कुटुंबाचे व्यवस्थापन करणारे आणि अर्थात सरोगेट मदर, तात्पुरती माता किंवा भाडय़ाने गर्भाशय देणारी माता. या सेवा पुरविणारे पशासाठीच हे करतात आणि काही प्रमाणात त्यांनी हे कौशल्य हस्तगत केलेले असते.    
मी येथे सर्व प्रकारच्या मुलाखती देऊ इच्छित नाही. दोनच देत आहे. अ‍ॅलिस ही गुगल सॉफ्टवेअर डिझायनर आहे आणि तिने मास्रेला नावाच्या फिलिपिनो बाईला तिच्या मुलीला सांभाळायला ठेवले आहे. मुलीचे नाव आहे क्लेअर. क्लेअर आणि अ‍ॅलिस दोघीजणी मास्रेलावर प्रेम करतात. तिलाही क्लेअरचा खूप लळा आहे. अ‍ॅलिसच्या मुलाखतीत तिची अपराधीपणाची भावना दिसत होती. मुलाचे सुख तर पाहिजे होते, पण काम इतके होते की मूल वाढवायला वेळ देणे शक्य नव्हते. मास्रेलाची नेमणूक म्हणूनच केली होती. मास्रेला फिलिपाइन्स या देशातील, म्हणजेच तिसऱ्या जगातील असल्याचा तिला आनंद झाला होता. महत्त्वाचे कारण होते की, तिची अशी ठाम श्रद्धा होती की, तिसऱ्या जगात अजूनही कौटुंबिक मूल्ये कायम होती. मास्रेलाला आईचे प्रेम, भावंडांचे प्रेम मिळाले असणार. म्हणून तीही तसेच प्रेम आपल्या घरावरही करत राहील. तिची दोन मुले फिलिपाइन्समध्ये होती आणि त्यांना तिला पसे पाठवावे लागत होते याचे तिला भान होते. मास्रेलाबद्दल तिला कौतुक होते, कारण ती क्लेअरचे सर्व हट्ट पुरवीत होती आणि तिला पेशन्स होता, उबदार अगत्य होते, प्रेमळ स्वभाव होता. क्लेअरला ओव्हनमधून बेक केलेल्या बिस्किटांचा व केकचा सेल लावायचा होता. त्या दिवशी अ‍ॅलिसला वेळ नव्हता, पण मास्रेलाने सगळे निभावून नेले. क्लेअरचा उत्साह कायम राहिला; पण मास्रेलाच्या मुलाखतीत ती म्हणाली की, क्लेअरच्या मत्रिणींच्या आया आल्या होत्या, पण त्यांनी तिची दखलच घेतली नाही. त्या अ‍ॅलिसचं कौतुक करत राहिल्या. जणू मास्रेला तेथे नव्हतीच. लेखिका जेव्हा मास्रेलाला भेटली तेव्हा तिला थोडी वेगळी कहाणी कळली. मास्रेलाच्या आधी जन्माला आलेली तीन मुले मेली म्हणून की काय, पण आईने तिला कधी चांगले वागविले नाही. तिला सतत शेजाऱ्यांकडे राहायला पाठविले जात असे. घरी आली की आई फारच खडूस शिक्षा करत असे आणि कधीही जवळ घेत नसे. लग्नही लवकर करून दिले. तेथे नवऱ्याने मारहाण सुरू केल्यावर ती मुलांना घेऊन पळून आली. मुलांवर प्रेम वगरे करण्यास तिला कधी वेळ मिळाला नाही. ती ओपेराचे कार्यक्रम बघत असते, त्यातून तिला प्रेम करणे आणि कवटाळणे याचे महत्त्व कळत गेले. ती क्लेअरवर प्रेम करते, कारण आज ती तिची गरज आहे. तिला बाकी कोणी नातेवाईक नाहीत आणि मानवी स्पर्शाची ओढ वाटते. अ‍ॅलिसचे सर्व घर इतके शांत असते आणि एका अर्थाने थंडगार असते की, क्लेअरकडून मिळणारा ओलावा आणि ऊब हवीहवीशी वाटते. लेखिका हे उदाहरण घेऊन सांगते की, अ‍ॅलिस आपल्या मनात फॅंटसी वागवीत जगते, की तिसऱ्या जगात अजून कौटुंबिक ओलावा आहे आणि बाजारात विकत घेतलेले श्रम नाहीत, पण प्रेमाने केलेल्या श्रमांची परंपरा कायम आहे आणि ती थोडासा तो ओलावा, ते प्रेम बाजारात विकत घेते. तिचा भरपूर पगार त्यासाठी तिला उपयोगी पडतो. तिच्या स्वची तिने विभागणी केलेली असते. प्रोफेशनल, व्यापारी पलू ती बाजारात विकून पसे कमाविते आणि मातृत्वाची भावनिक गरज ती दुसऱ्याचे मातृत्वाचे कौशल्य विकत घेऊन भागविते. तिच्याकडे तेवढा वेळ आणि मुख्य म्हणजे धीर- पेशन्स- नाही, पण मानव म्हणून जगायचे असेल तर तिला त्या ओलाव्याची गरज आहे. दुसरे उदाहरण आहे, सरोगेट मदरच्या सेवा ज्या भारतीय बाईने घेतल्या होत्या तिची मुलाखत. तिचा नवरा गोरा अमेरिकी होता आणि तिला मूल होऊ शकत नव्हते, पण स्वत:च्या रक्तामांसाच्या मुलाची आस होती. तिने भारतीय बाईचे गर्भाशय भाडय़ाने घेण्याचा विचार केला. महत्त्वाचे कारण होते की, अमेरिकेतील या सेवा फारच महाग होत्या. अमेरिकन गोरी बाई या सेवेसाठी जास्त पसे घेते. शिवाय डॉक्टर मंडळीसुद्धा जास्त पसे मागतात. तिचीही मन:स्थिती गंमतशीर होती. एका बाजूने तिला त्या भारतीय बाईबरोबर संवाद साधायचा होता आणि भाषेची अडचण नसल्यामुळे तिला वाटले होते की, ते सहज जमेल; पण प्रत्यक्षात तिच्या लक्षात आले की, ती सरोगेट मदर मोकळेपणाने बोलत नव्हती. तिला समजून सांगावेसे वाटत होते की की, ‘माझ्याकडे एक श्रीमंत अमेरिकन बाई म्हणून बघू नकोस. मी पसे देऊन तुझे गर्भाशय भाडय़ाने घेते आहे खरे, पण मलाही आई होण्याची आस आहे. आपण दोघी बरोबरीच्या आहोत, एकाच पातळीवर आहोत, मी पसेवाली म्हणून श्रीमंत आणि तू गरीब असा भेद नाही. तू मला एक व्यावसायिक सेवा पुरवीत आहे.’ असे सगळे समजून सांगून तिचा ओशाळवाणेपणा कमी करण्याची आवश्यकता या अमेरिकन बाईला वाटत होती. तिला कल्पना होती की, या गर्भाशय भाडय़ाने देणाऱ्या बाईला तिच्या समाजामध्ये मान नसणार म्हणून तिला अपराधी वाटत होते; परंतु त्या भारतीय बाईला एक अमेरिकन बाई तिची बॉस आहे याचे दु:ख व्हायचे. या दोन्ही उदाहरणांमध्ये सेवा पुरविणाऱ्या तिसऱ्या जगातील स्त्रिया आहेत.
होसचाइल्ड प्रश्न विचारते की, आपण असे तर करत नाहीत ना, की जग दोन भागांमध्ये विभागून वरचा भाग, श्रेष्ठ भाग हा शिस्तप्रिय, आखीवरेखीव पद्धतीने वागणारा, गतिमान पद्धतीने चालणारा आणि उद्यमशील, कर्तृत्ववान असा आणि खालचा, तळचा भाग हा भावनाशील, मानवी गरजांशी एकरूप होऊन त्याप्रमाणे आपली जीवनशैली आखणारा आणि वरच्या भागाला वंगण पुरविणारा, मानवी गरजा भागविण्यासाठी सेवा पुरविणारा- यामुळे अमेरिकन जनतेच्या मानवीपणाचा ऱ्हास होत नाही का? ती प्रश्न विचारते की, हे सर्व आपण का करतो? उत्तरे नेहमीचीच आहेत. जगात स्पर्धा इतकी वाढली आहे की, नोकरीत टिकायचे तर जास्तीत जास्त वेळ आणि अवधान द्यावेच लागते. तिने एका पित्याचे उदाहरण दिले आहे. त्याला आठवडय़ाला ६० तास काम करावे लागते आणि तरीदेखील तो मुलांच्या शाळेतील सर्व कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे प्रयत्न करतो, कारण त्याच्या वडिलांनी कधीही त्याचे यश पाहण्यासाठी येण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्याचा सल त्याच्या मनात अजून आहे. ती शेवटी म्हणते की, कितीही अशा ‘पॅकेज्ड’ सेवा खरेदी केल्या तरी काही तरी हरविल्यासारखे वाटत राहते आणि शेवटी दु:खाची झालर अशा जीवनाला येतेच. कदाचित आपल्याकडेही अशी वेळ लवकरच येणार आहे.
 यासाठीच माझा आवडता उपाय आहे की, आयएलओ या जागतिक लेबर ऑर्गनायजेशनने कामाचे तास कमी करून रोजी सहावर आणावेत म्हणजे जीवनातील प्रेमाचे श्रम आनंदाने करता येतील आणि भावनिक सुख मिळविता येईल. मानवी जीवन जगता येईल. रोबोचे नाही.