लिंगभेदापलीकडे Print

नयना सहस्रबुद्धे , शनिवार , २१  जुलै २०१२

पिंकी प्रामाणिक या राष्ट्रीय खेळाडूवरचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी तिला देण्यात आलेली वर्तणूक निषेधार्ह होती. ती स्त्री आहे म्हणून तिच्यावर हा अन्याय झाला का? हा प्रश्न तपासून पाहण्याबरोबरच आजच्या वाढत्या युनिसेक्स संकल्पनेच्या जमान्यात स्त्री-पुरुष भेदभाव खऱ्या अर्थाने कधी संपणार, लिंगभेदाच्या पलीकडे आपण कधी जाणार ? त्यासाठी लिंगभाव जाणीव आपण कधी तपासणार आहोत? या प्रश्नांचीं उत्तरं शोधण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचं गांभीर्यही अधोरेखित होत आहे.

गेले महिनाभर पिंकी प्रामाणिक या खेळाडूवर केले गेलेले आरोप, तिला झालेली अटक, लिंग निश्चितीच्या चाचण्या आणि नंतर जामिनावर झालेली सुटका यांनी वर्तमानपत्रे, चॅनेल्स भरून गेली होती. अनेक पदकं मिळवणाऱ्या या राष्ट्रीय खेळाडूला जामीन मिळाल्यानंतर तिने पोलिसांनी गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचे सांगितले आहे. पिंकीचं लिंगनिदान तिच्या शारीरिक रचना किंवा गुणसूत्रांवरून न करता पिंकी स्वत:चं जे लिंग मानते त्यावरून करावं असाही एक प्रवाह आहे. त्यामुळे लिंग (Sex) आणि लिंगभाव (Gender) हे मुद्दे चर्चेत आले आहेत. पिंकी स्त्री असल्यामुळे पोलिसांनी तिला अशी वागणूक दिली का? याचीही उहापोह व्हायला हवा. आणखी एक बातमी आली आहे की, इंटरनेटवर पिंकीची लिंग निदान चाचणी होत असतानाही आक्षेपार्ह, अपमानास्पद अशी क्लिप वितरीत होत आहे. इथे गरज उत्पन्न होते ती आपल्या जेंडर जाणिवा, लिंगभाव जाणीव तपासून बघण्याची.
ती क्लिप सत्य असेल तर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ती महाजालावरून पसरली कशी? नसेल तर, तिचा उगम काय? हेतू काय? एका राष्ट्रीय खेळाडूची अप्रतिष्ठा करण्याचा परवाना कुणी दिला? असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि जाणवतं आधुनिक काळात वावरत असलो तरी समाजाच्या ‘स्त्री’विषयक धारणा- लिंगभाव- बदललेला नाही. तिला उपभोग्य वस्तू मानणे, पुरुषी श्रेष्ठत्व आणि अहंकार, आक्रमकता हे सगळे अन्यायकारी, अपमानास्पद लिंगभाव मनात घेऊनच आपण आजही वावरतो आहोत.
लिंग (Sex) हा शब्द स्त्री-पुरुषांमधला जैविक, शारीरिक भेद दर्शवितो. भिन्न लिंग असल्यामुळे स्त्री-पुरुषांची शारीरिक रचना वेगळी, त्यांची निसर्गदत्त कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या वेगळ्या. ‘लिंगभाव किंवा जेंडर’ हा शब्द स्त्री-पुरुषांच्या भूमिका, वर्तन, मान, क्षमतांवरचा विश्वास अशा अनेक छटांनी पाहिला जाणारा दृष्टिकोन दाखवतो. अर्थातच हा दृष्टिकोन समानतेचा, सदृढ नाही याचा अनुभव पदोपदी येतो.
अंतरिक्षापासून खेळापर्यंत, स्वयंपाकघरापासून सैन्य, अग्निशमन दलांपर्यंत, कॉर्पोरेटपासून ग्रामपंचायतींपर्यंत स्त्रियांचा वावर दर्जेदार, आत्मविश्वासपूर्ण आहे. गेल्या पन्नास वर्षांतल्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदलांमुळे त्या सक्षम झाल्या आहेत. त्यांच्या आकांक्षांना ‘गगन ठेंगणे’ वाटते आहे. मात्र एका पायात भेदभावाची बेडी अडकवलेली आहे. घरोघरी खेळ, राजकारण, सिनेमा, सरकारी नोकरी, सेवा क्षेत्र सर्वत्र Gender descrimination म्हणजे भेदभावाचा अनुभव येतो आहे.
राष्ट्रीय महिला आयोग व भारतीय स्त्री शक्ती यांनी मिळून २००५ मध्ये क्रीडा क्षेत्रातील महिलांबद्दल एक जेंडर स्टडी केला होता. त्याच्या निरीक्षणांनुसार पुरुष खेळाडू व स्त्री खेळाडू यांना मिळणारा दर्जा, पुरस्कार, नोकरीच्या संधी, मानधन, खेळ सुविधा, प्रायोजक सर्वच ठिकाणी भेदभावाचा सामना करावा लागतो. याशिवाय छेडछाड, लैंगिक छळवणूक यांनाही तोंड द्यावे लागते. निवड चाचण्यांमध्येही खेळांच्या क्षमतांपेक्षा सुंदर चेहऱ्याला प्राधान्य दिले जाते, असे अनुभव खेळाडूंनी सांगितले आहेत. म्हणजे क्रिकेट, टेनिस, फुटबॉल अशा तारांकित खेळांच्या जोडीने पॅरा जम्पिंग, ट्रेकिंग अशा साहसी खेळांमध्येही महिला आहेत. पुरुषी मानलेल्या क्रीडा क्षेत्रात मैदानापासून, त्याच्या वृत्तांकनापर्यंत, कॉमेंटेटर, कोचपासून प्रेक्षकांपर्यंत महिलांचा वावर आणि प्रमाण वाढले आहे. आयपीएलच्या काही टीम मालकसुद्धा  स्त्रिया आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग असा वाढताना दिसला तरी गुणात्मक पातळीवर बराच पल्ला गाठायचा आहे याची बोच लागतेच.
दरवर्षी दहावी-बारावी, एमपीएससी, यूपीएससीच्या निकालांमध्ये वाढणारी मुलींची संख्या, मिळवलेलं घवघवीत यश पाहून आपण सुखावतो. पण आयएएस अधिकाऱ्यांशी वरिष्ठांनी केलेलं गैरवर्तन, उच्च पदावरच्या महिलांनाही कनिष्ठ पदावरच्या सहकाऱ्यांनी मारलेले टोमणे, चारित्र्याबद्दल घेतलेल्या शंका आणि केली जाणारी बदनामी असे अनुभव टाळता येत नाहीत. कामकाजाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक होत असेल तर ‘विशाखा कमिटी’चा सहारा महिलांना घेता येतो. तरीही महिलांचा कल असतो तक्रार दाखल करण्यापेक्षा दुर्लक्ष करण्याचा, प्रकरण तडीस नेण्यापेक्षा संपवून टाकाण्याचा. याचही कारण या लिंगभेदातच आहे.
ऑफिसमधल्या भेदभावाविरुद्ध न्याय मिळवताना घरातल्या पुरुषांकडून सहकार्य मिळेलच याची खात्री नसते. घरात, नातेवाईकांत बदनामी होईल ही भीती असते. न्याय मिळवण्याची प्रक्रियाही वेळखाऊ, खर्चिक, किचकट असते. अशा अनेक मुद्दय़ांचा परिणाम होतो आणि आयटी कंपन्यांत रात्रपाळीला जाणाऱ्या उच्चशिक्षित मुलींवर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्यापर्यंत मजल जाते.  कौटुंबिक जीवनापासून सामाजिक जीवनापर्यंत हिंसा बोकाळलेली आहे. अशा परिस्थितीत ‘स्त्री-पुरुष समानता’ आणि ‘लिंगभाव समानता’ या नव्या मूल्यांची कास कोण आणि कशी धरणार?
काळाच्या ओघात स्त्री-पुरुषांमधल्या जैविक भेदाचं रूपांतर भेदभावात कसं झालं हे आपण जाणतोच. पुरुषी वर्चस्वाची जाणीव, आक्रमकता, सत्ता आणि अर्थाचं बळ यामुळे श्रेष्ठत्वाची भावना विकसित झाली, हजारो र्वष दृढ झाली. स्त्रियांना हीन लेखणं, अपमानित करणं, त्यांच्यावर शारीरिक- मानसिक अत्याचार करणं, अन्याय करणं, अभाव उत्पन्न करणं हेही हजारो र्वष घडत आहे. आपणही त्यात सहभागी आहोत किंवा बघ्याची भूमिका घेत आहोत.
या विषमतेने विज्ञानालाही सोडलेलं नाही. जे तंत्रज्ञान गर्भातील बाळाची अवस्था कळण्यासाठी विकसित झालं. त्याच्याच आधारे गर्भलिंग निदान करून आपण अजन्मांचे कत्तलखाने उघडले आहेत. ज्या इंटरनेटच्या आधारे ज्ञान-विज्ञानाचं महाभांडार आपल्यासमोर खुलं झालंय. त्याच्याच आधारे पिंकीसारख्या अनेकींना आपण बदनाम करत आहोत. इंटरनेट गेम्सनी मनोरंजन करताना विज्ञानाचा विकृत उपयोग करणाऱ्यांनी बलात्काराचाही व्हिडीओ गेम काढावा.. हे पाहिलं की मती कुंठीत होते.
म्हणून लिंगभाव समानता मनात आणि व्यवहारात रुजवली नाही तर असे अनर्थ घडतच राहतील. स्त्री-पुरुषांमधल्या जैविक फरकांना उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठतेची लावलेली लेबलं ही मानवनिर्मित आहेत. हे फरक सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आहेत हे समजून घेतलं पाहिजे. लिंगभाव समानतेच्या आधारावर त्याचं विश्लेषण- परीक्षण केलं पाहिजे आणि विचारात व्यवहारात कृतीत बदल केला पाहिजे तोही या क्षणापासून.
आजच्या उत्क्रांत समाजात स्त्री-पुरुषांमधला जैविक भेदा(फरक)चा भेदभाव झाला. मग स्त्रियांचं ते सर्व कमी महत्त्वाचं लेखलं जाऊ लागलं. म्हणजेच शारीरिक फरक हे नैसर्गिक तर अन्य फरक हे सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक आहेत हे समजून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. दृष्टिकोन बदलायला हवा. लहानपणापासूनच ‘जेंडर जाणिवा’ विकसित केल्या तर संवेदनशीलतेचा स्तर उंचावेल.
आज स्त्री-पुरुषांच्या कौटुंबिक, सामाजिक भूमिकांमध्ये बदल झाला आहे. म्हणजे ना कुणा पुरुषाला शिकार करावी लागते किंवा स्त्रियांनाही स्व-संरक्षण करावं लागतं. मूल जन्माला घालण्याची जबाबदारी स्त्रीकडे असली तरी अपत्यसंगोपनामध्ये पुरुषांचा सहभाग वाढतो आहे . यंत्र-तंत्र विकासामुळे शारीरिक श्रमांचं प्रमाण कमी झालं आहे. शिक्षण-नोकरीमुळे स्त्रियांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण द्विगुणित झालं आहे.जेंडर स्टीरिओटाइप वर्तनाची अपेक्षा आपण करतो म्हणजे स्त्रियांनी ‘स्त्रियां’सारखं व पुरुषांनी ‘पुरुषां’सारखं वागावं. एखादा पुरुष रडला की बायकांसारखा रडतोस काय? धीट-धाडसी मुलीला पुरुषी असं लेबल चिटकवलं जातं. विम्बल्डनसारख्या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात हरल्यावर मरेसारख्या खेळाडूच्या डोळ्यातही अश्रू येतात किंवा सातव्यांदा चषक जिंकलेल्या फेडररच्या डोळ्यातही आनंदाश्रू येतात. ते भावनांचे निदर्शक असतात. अशा घटना सामान्य माणसांच्या आयुष्यातही घडतात. मग त्यांना रडण्याचं ‘स्वातंत्र्य’ आजही का नाकारलं जातं ?
वैयक्तिक सांसारिक जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत स्त्रियांना व पुरुषांनाही कसोटीच्या क्षणातून जावं लागतं. एखादा कटू वाटणारा निर्णय घेणं आणि तो राबवावा लागतो. व्यवसायात २०-२५ लोकांना घेऊन काम करण्यासाठी कोमलता, परस्पर संवाद अशा स्त्रीविशिष्ट गुणांची आवश्यकता पुरुषांनाही असते किंवा नीडरता, निर्णयक्षमता, श्रम अशा पुरुषविशिष्ट गुणांची गरज स्त्रियांनाही असते. त्यासाठी मानवी गुणवैशिष्टय़ांची ‘स्त्रियांचं’, ‘पुरुषांचं’ अशी विभागणी टाळायला हवी. हे कसं होईल? जेंडर जाणिवेच्या निकषावर आपलं वर्तन, विचारप्रक्रिया, भाषा, खेळ, शालेय अभ्यासक्रम, जाहिराती, मालिका, सिनेमा, पत्रव्यवहाराची- कार्यालयीन भाषा, सण-उत्सव, धार्मिक रूढी-परंपरा, यंत्र, वैज्ञानिक साधनं, कपडे, सौंदर्यप्रसाधनं, कला, साहित्य, कायदे- मुख्य म्हणजे आपली धोरणं आणि अंमलबजावणी यांची चिकित्सा करायला हवी. शालेय अभ्यासक्रमात घराचं चित्रण दाखविताना आई स्वयंपाकघरात काम करते, बाबा वर्तमानपत्र वाचतात, मुलगी आईला मदत करते तर मुलगा सायकल चालवितो अशा पारंपरिक भूमिका दाखविलेल्या असतात.
आपली जेंडर जाणीव मोजायची कशी? काही शब्द उच्चारल्यावर आपल्या मनात कोणत्या प्रतिमा उमटतात? विरुद्धलिंगी व्यक्तीबाबत कोणत्या धारणा मनात आहेत? त्यामध्ये बदलायला आपण तयार आहोत का?
‘बँक कर्मचारी संपावर’ अशी बातमी वाचल्यावर आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र येतं? कॅशियरच्या केबिनमध्ये बसलेला पुरुष, स्त्री की संमिश्र ? ‘मागण्यांसाठी नर्सेसचा मंत्रालयावर मोर्चा, वैमानिक संपावर’ अशा घटनांची चित्रं डोळ्यांसमोर आणा. आपण वापरत असलेली भाषा-कृती आठवा. एखाद्या मुलीचं लग्न ठरल्यावर आपण सहज म्हणतो, तिला अमूक गावाला दिली, तीव्र राग व्यक्त करण्यासाठी स्त्रियांवरून दिलेल्या शिव्या अपमानित करणाऱ्या असतात. निष्क्रिय कर्मचाऱ्यांना बांगडय़ांचा आहेर दिला जातो. ऑफिशियल पत्रव्यवहारात ‘डिअर सर’ वापरून आपण स्त्रियांचं अस्तित्वच नाकारतो. त्यातून सवयीनं किंवा जाणूनबुजून स्त्रियांना कमी लेखलं जातं. दुजाभाव निर्माण होतो. त्यातून भेदभाव केला जातो. त्याचं रूपांतर अन्याय व अत्याचारात होतं.
असं वर्तन केवळ पुरुषांकडूनच होतं असं नाही. पुरुषांना घरकाम करायला आवडत नाहीच, पण अनेक स्त्रियांनाही पुरुषांनी घरात काम केलेलं चालत नाही. (विशेषत: सून आल्यावर सासूला) किंवा बाहेरून दूध, भाजी आणलेलं चालतं, पण भांडी घासलेली चालत नाहीत. बाळाला फिरवून आणलेलं चालतं, शी-शू काढलेली चालत नाही. याला उत्तर स्त्रियांच्या व पुरुषांच्या कामात अदलाबदल असं आहे का? अजिबातच नाही. स्त्री-पुरुष यांच्यात- तुलना आणि स्पर्धा टाळून - केले जाणारे फरक टाळायचे हे त्याला उत्तर आहे. त्यासाठी लहानपणापासूनच छोटय़ा कामांची सवय मुलांना व मुलींना लावावी. उदा. खोलीची साफसफाई, कपडय़ांना इस्त्री, पाणी भरणं, त्यातून श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाचीही सवय लागेल.
जेंडर जाणिवा विकसित करण्यात मुलांसाठी रोल मॉडेल असलेल्या आई-वडिलांचं वागणं खूप महत्त्वाचं असतं. प्रसारमाध्यमांचाही मोठा वाटा असतो. मात्र आपल्या मालिका स्त्रियांना अतिपारंपरिक उदा. दागिन्यांनी मढलेल्या तर पुरुषांना आक्रमक दाखवतात. कुटुंबं पितृसत्ताक, पितृकेंद्री दाखवतात किंवा स्त्रियांना सतत कट-कारस्थानात गुंतलेल्या दाखवून दिशाभूल करतात. स्त्री-पुरुषांमधलं समानतेचं नातं, सहकार्य, दोघांच्या विकासाला पूरक साहचर्य असणं आणि दाखवणं ही काळाची गरज आहे. कुटुंबात दोघांसाठी समान अधिकार, समान न्याय, समान संधी आणि समान सन्मान रुजविण्यासाठी लिंगभाव समानता या नवमूल्याचा स्वीकार, विचारांत आणि व्यवहारात बदल करायला हवा.
आजचा जमाना युनिसेक्सचा आहे. मात्र तो कपडे, सौंदर्यप्रसाधने, जिम आणि सलोनच्या वापरापर्यंत मर्यादित न राहता, मनातल्या, गाभ्यातल्या विचारांपर्यंत पोचला पाहिजे. त्या विचारांना वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक कृतींची जोड दिली पाहिजे. यासाठी पुढील काही गोष्टी करता येणं शक्य आहे. आमच्या घरात असा भेदभाव होत नाही हा भ्रमही तपासून पाहिला पाहिजे. कौटुंबिक बेबनाव, घटस्फोटाचंही हे एक महत्त्वाचं कारण आहे.
जनमत तयार करणाऱ्या माध्यमातील मजकुराबद्दलचा आक्षेप इ-मेलने कळवणे.
घरातल्या मुलाला व मुलीला समान निकष लावणे.
फरक करणारी भाषा व्यवहारात, कौटुंबिक, सार्वजनिक ठिकाणीही टाळणे.
पत्रव्यवहाराच्या भाषेत ‘डियर सर व मॅडम’ किंवा पदाप्रमाणे उल्लेख करणे. उदा. डियर कस्टमर, डियर मॅनेजर. घरकामात लहान-मोठय़ा सर्वानीच सहभाग घेणे- घर सर्वाचं काम सर्वाचं, ही संकल्पना रुजवणे.
 अशी अनुवर्तनासाठी यादी खूप मोठी करता येईल किंवा विश्लेषण करायला लागलात की तुम्हालाही नक्की सुचेल.. त्यानंतरची पायरी आहे ती हे विचार प्रत्यक्षात आणण्याची.. प्रत्येकाने.