तुम्ही मोठय़ा ना! Print

alt

शैलजा शेवडे , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सण, धार्मिक विधी करायची प्रथा असते; परंतु काळाच्या ओघात ते लक्षात राहातात थोडेच? अशा वेळी मग त्यातल्या त्यात वयाने मोठय़ा असणाऱ्या व्यक्तीकडे नजर जाते. मिसेस देशपांडे यांची तीच तर पंचाईत झाली.. ‘तुम्ही मोठय़ा ना!’ हे पालुपद त्यांना वयाची जाणीव करून देत होतं.. आणि त्यांना काही माहीत नाही याचीही..
ख रं तर मिसेस देशपांडे आज अगदी मजेत होत्या. नुकत्याच ब्युटीपार्लरमधून फेशिअल करून आल्या होत्या. २-४ दिवसांपूर्वीच केसही कलर केले होते. दुसऱ्या दिवशी मिसेस सक्सेनाकडे त्यांच्या वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरीला जायचं होतं ना! तेवढय़ात फोन खणखणला. मिसेस जोशींचा फोन होता.
‘हॅलो, तुम्ही थोडय़ा वेळासाठी आमच्याकडे येणार का?’
‘का हो, काही विशेष?’ मिसेस देशपांडय़ांचा प्रश्न. ‘हो, आज हळदीकुंकू करणार आहे.’ मिसेस जोशी.
‘हळदीकुंकू’? मिसेस देशपांडय़ांची शंका. ‘‘खरं सांगायचं तर, आज आमच्या पिंकीच्या लग्नाच्या मुहूर्ताचे गव्हले, सांडगे घालायचे आहेत. पाच सवाष्णींना बोलावलेय. या प्लीज लगेच.’’ मिसेस जोशी.
‘‘हो. येते की,’’ मिसेस देशपांडे म्हणाल्या आणि १०-१५ मिनिटांत रिक्षा करून जोशींकडे पोहोचल्यासुद्धा.
‘‘या या!’’ मिसेस जोशींनी सुहास्य वदनानं त्यांचं स्वागत केलं. अजून कोणी बाकीच्या सवाष्णी आल्या नव्हत्या.
‘‘पाट मांडून ठेवलेत. खलबत्ता ठेवला आहे. गव्हल्यांसाठी पीठ भिजवून ठेवलं आहे. आता मला सांगा, पाटावर काय काय ठेवायचं? तुम्ही मोठय़ा ना.., म्हणून मुद्दाम तुम्हाला बोलावलं. जरा काय काय करायचं असतं, ते नीट सांगा.’’ मिसेस जोशी म्हणाल्या. मिसेस देशपांडे एकदम गांगरूनच गेल्या.
‘मी?’ त्या स्वत:शीच म्हणल्या. किटी पार्टी, क्लब, वेगवेगळ्या पार्टीज या नादात त्या आपलं वय वाढतंय, पन्नाशी ओलांडलीय आपण, हे विसरूनच गेल्या होत्या. तसं काही वर्षांपूर्वी पांढऱ्या केसांनी ती जाणीव दिली होती, पण ती जाणीव मिटविण्याचे मार्ग होतेच की, आधी मेंदी मग डाय.
वयाचं सोडा, पण तसंही त्यांना धार्मिक कार्याबाबत काही माहीत नव्हतं. कशी असणार? धाकटय़ा सुनबाई म्हणून कोडकौतुक करून घ्यायचं अंगवळणी पडलं होतं. सासुबाई जसं सांगायच्या तसं आणि तस्संच करायचं एवढं त्यांना माहीत. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असला की सासुबाई सांगणार तशी तयारी करून ठेवायची आणि मस्तपैकी रेशमी, जरीकाठाची साडी नेसून, दागदागिने घालून नटून-सजून पूजेला बसायचं. गुरुजी सांगतील तसं तसं करायचं एवढंच फक्त माहीत आणि आज एकदम हे काय भलतंच उपटलं?
थोडय़ा वेळात बाकीच्या चार सवाष्णी आल्या. कार्यक्रमाला सुरुवात करायची. मग मिसेस देशपांडय़ांनी हळूच मोठय़ा बहिणीला मोबाइलवरून फोन केला. तिनं थोडी फार माहिती सांगितली तसं मिसेस जोशींनाही काय काय करायचं असतं ते थोडंफार माहीत होतं, पण बाकीच्या चारजणी वयानं लहान होत्या ना..! गणपतीला नमस्कार करून सुरुवात तर केली गव्हले करायला. खाली बसायचं होतं, पण ५ मिनिटांत प्रत्येकीचे गुडघे दुखायला लागले. मग खाली बसायची कशी सवय नसते, आजकाल ४० वर्षांच्या झाल्या की प्रत्येक स्त्रीचे कसे पाय दुखतात.. पूर्वीची जीवनशैली, आताची जीवनशैली यावर एक चर्चासत्र झालं. चर्चासत्र चांगलं रंगलं. प्रत्येकजण व्यवस्थित बोलत होती, पण मजा म्हणजे कुणाला धड गव्हले करता येत नव्हते. मग रवा जरा सैल भिजवला गेला आहे, यावर एकमत झालं. नाचता येईना अंगण वाकडे ..
रवा परत नीट भिजवला गेला. तोपर्यंत मिसेस जोशींच्या म्हणजे यजमानीण बाईंच्या डोक्यात कल्पना आली. कुणाला लग्नाच्या वेळी गायली जाणारी पारंपरिक गाणी माहीत असतील तर म्हणावी. झालं! परत पंचाईत! परत सगळ्यांचे डोळे आशेने मिसेस देशपांडेंकडे लागले, पण त्यांना कुठली येत होती गाणी ? गाण्याशिवाय कार्यक्रमाला शोभा कुठली? मग परत एकदा मिसेस देशपांडय़ांचा मोठय़ा बहिणीला मोबाइलवरून फोन, पण या वेळी हातात वही-पेन घेऊन सरळ गाणं उतरवून घेतलं. घाणा भरण्याचं गाणं होतं. त्या सगळ्यांनी मिळून ते हळकुंड कुटताना, सुपारी कुटताना, जसं जमेल तसं, जमेल त्या चालीत म्हटलं.
मग थोडा वेळ होणाऱ्या नवरीची चेष्टा केली, पण सगळ्यांना गाण्याचा मूड आला होता. मग ‘लग्न’ या विषयावरची असतील नसतील तेवढी सगळी हिंदी- मराठी गाणी म्हटली. अगदी कोळीगीतंसुद्धा आणि खरं सांगायचं तर त्या कोळीगीतांनीच जास्त बहार आणली.
मुहूर्ताचे सांडगे घातले गेले. नाही नाही म्हणता सगळा मिळून ३ तासांचा कार्यक्रम झाला होता. त्यामुळे चहापाणी आवश्यक होतंच. यजमानीणबाईंनी सवाष्णींची ओटी भरली. आधी देशपांडेबाईंची भरली, कारण त्या वयाने मोठय़ा होत्या ना..! मिसेस देशपांडेंना अगदी अवघडल्यासारखं झालं, कारण त्यांनी पंजाबी सूट घातला होता. साडी नेसली नव्हती. तसं तर यजमानीणबाई सोडता प्रत्येकीनं ड्रेसच घातला होता, पण तरी मिसेस देशपांडय़ांना जास्त टोचणी लागली. किती केलं तरी त्या ग्रुपमध्ये त्या मोठय़ा होत्या ना!
आधी प्रत्येकीसमोर सामोशांची डिश आणली गेली. यजमानीणबाई चहा करायला गेल्या तेव्हा देशपांडे म्हणून गेल्या, ‘माझ्या चहात साखर कमी घाला हं. चिनी कम..!’
पण मग नंतर ठरावीक वयानंतर डायबेटीसचा कसा प्रॉब्लेम होतो, साखर कशी कमी खावी लागते यावर चर्चासत्र झालं. सगळ्याजणी मिटक्या मारत सामोसे खात होत्या. शेजारच्या स्वीट मार्टमधून आणले होते. खरं तर मिसेस देशपांडय़ांची नुकतीच ब्लड टेस्ट झाली होती. त्यात त्यांचं कोलेस्ट्रॉल बऱ्यापैकी वाढलं आहे हे सिद्ध झालं होतं आणि ते कमी करण्यासाठी तळलेलं खाणं पूर्ण बंद करायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्या पथ्य नीट पाळताहेत ना, याकडे देशपांडे अगदी डोळ्यात तेल घालून वॉच ठेवत असत, पण तरीही मिसेस देशपांडेंनी एक सामोसा खाल्लाच. उगीच त्यावर चर्चा नको आणि वाढत्या वयाची जाणीव नको ही सुप्त इच्छा मनात होती.
गव्हले केलेच होते, पण सांडगे घालण्याचाही अयशस्वी प्रयत्न झाला. त्यांना तसं थोडंथोडं आठवत होतं, पण नाहीच जमलं. गव्हले करण्याचे पीठ वापरून केस विंचरायच्या फणीवर घासून आणखी एक काही तरी प्रकार करतात हेही आठवलं. बाकीच्या सवाष्णींना उत्साह आला होता. काही तरी नवीन शिकायला मिळणार होतं, पण नेमकी यजमानीण बाईंकडे नवीन फणी नव्हती. त्यामुळे तो प्रकार ट्राय करून बघायचा राहिलाच.
जमलेल्यांपैकी एकजण ठसक्यात म्हणाली, ‘दादरच्या एका दुकानात सगळं रुखवताचं सामान मिळतं, पैसे टाकले की अगदी हव्वं ते मिळतं. कोणाला वेळ असतो आजकाल हे सगळं करायला? नावापुरते मुहूर्ताचे गव्हले- सांडगे घालायचे बास.’ यजमानीणबाईंना ही माहिती नवीन होती. त्यांचा एकदम जीव भांडय़ात पडला. मग त्यानंतर रुखवताचं साहित्य दादर, ठाणे येथील दुकाने, पुण्यातली तुळशीबागेतली दुकाने यावर चर्चासत्र झालं.
नव्या शहरातली त्यांची कॉस्मोपोलिटिन हाऊसिंग सोसायटी, ती चौकोनी कुटुंबं, नोकरी करणाऱ्या स्त्रिया आणि स्वत:च्या फिटनेसबद्दल विलक्षण जागरूक असणाऱ्या गृहिणी यामध्ये वावरताना मिसेस देशपांडे आपले सणवार, परंपरा आणि वाढत्या वयामुळे त्यांच्यावर येणारी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी विसरल्याच होत्या.
सगळ्याजणी बांगडय़ा भरायला या बरं का! यजमानीणबाईंनी आग्रहाचं निमंत्रण दिलं. सगळ्यांनी माना डोलावल्या, पण कुणाच्याही हातात काचेची बांगडी नव्हती. हल्ली बायका घालतात का हातात काचेच्या बांगडय़ा?
मिसेस देशपांडे घरी निघाल्या, पण त्यांना आठवलं, पुढच्या आठवडय़ात सोसायटीतल्या एका मराठी कुटुंबात बारशाचं निमंत्रण आहे. अरे बापरे! ताबडतोब दादरला जाऊन पुस्तकांच्या दुकानात आपले सणवार, धार्मिक विधी यावर एखादं पुस्तक मिळतंय का बघायला हवं. तो पाळणा, ते वरवंटय़ाला टोपडं घालून गोप म्हणून ठेवणं, कुणी तरी नक्की पाळणा म्हणायला सांगणार, कसं कसं करायचं.. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या म्हणताना काय करायचं, पाळण्याची दिशा, बाळ-बाळंतिणीला औक्षण करतानाची दिशा, सगळं सगळं आपल्यालाच विचारणार, कारण किती झालं तरी त्या मोठय़ा ना!