ओढ मातीची Print

alt

प्रभाकर बोकील , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बंगल्यात शिरताना पाहिलं एन्ट्रन्स पोर्टिकोमध्ये तुळशी वृंदावन! मी गजाकडे पाहिलं. गजा नजर टाळत हसला. ‘‘ इथे अमेरिकेत फार नाही वाढत तुळस, माती बदलतो, रोपं बदलतो.. घरावरचा हक्क सोडला, तरी आठवणींवरचा आहेच ना!
पु ण्यातल्या लॉ-कॉलेज रोडवरील एका गल्लीतील एक बंगला. लहानसाच. दीड मजली. झाडीत हरवलेला. सहज कुणाचं लक्ष जाऊ नये असा.
पंधरा-सोळा वर्षांपूर्वी एकदा त्या गल्लीतून जाताना बंगला लक्षात राहिला, तो मात्र पुढील अंगणातील गुलमोहरामुळे. प्रचंड फुललेला गुलमोहर.
केशरी-लाल रंगाच्या छटांनी ब्रशचे फटकारे मारताना कॅनव्हास अपुरा पडावा, तसा विस्तारलेला गुलमोहर. मागच्या बंगल्याचं अस्तित्व विसरायला लावणारा. त्यापूर्वी इतका फुललेला गुलमोहर मी कधीच पाहिला नव्हता. बंगल्याच्या बाहेरच क्षणभर थांबून त्या भरगच्च रंगपसाऱ्याकडे भान हरवून पाहू लागलो.
‘‘कोण हवंय?’’
प्रश्नानं मी भानावर आलो.
त्या बंगल्याच्या व्हरांडय़ात येऊन एक वयस्कबाई उभ्या होत्या.
‘‘नाही, नाही.. कुणी नाही. सहजच.’’
‘‘मग ठीक आहे. मला वाटलं कुणाचा पत्ता शोधताय..’’
‘‘नाही, पत्ता नाही.. पण हा इतका फुललेला गुलमोहर पाहण्यासाठी जरा थांबलो होतो.’’
बाई किंचित दुखावल्यासारख्या दुसरीकडे पाहू लागल्या.
मी निघणार, इतक्यात त्याच पुढे म्हणाल्या,
‘‘याच वर्षी इतका फुललाय. लावल्यापासून कधीच इतका फुलला नव्हता!’’
‘‘आश्चर्य आहे.’’
‘‘तसंच असेल कदाचित. पस्तीस वर्षांपूर्वी बंगला बांधताना सुरुवातीलाच यांनी लावला होता. म्हणायचे, घरात आपण असू नसू, घरात येणाऱ्याचं स्वागत गुलमोहरानंच व्हायला हवं!’’
माझं बाईंच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं.
‘‘सहा महिन्यांपूर्वीच गेले ते.. म्हणूनच कदाचित इतका फुललाय यावर्षी!’’
‘‘ओह. सॉरी..’’ काय बोलावं नकळून मी वळणार, इतक्यात त्या बाई पाठमोऱ्या होताना थबकल्या. म्हणाल्या,
‘‘झाडांनादेखील माया लागते माणसांची..’’
आणि त्या पदराने चष्मा पुसत, आत वळल्या. तिथून निघताना मात्र माझ्या मनात त्यांनी सहज उच्चारलेले शब्द कायम राहिले.. आज त्या बंगल्याच्या जागी पाच मजली अपार्टमेंट्स आहेत. इमारतीला जागा करून देण्यासाठी छाटल्यामुळे गुलमोहर पार खुरटलाय, ‘कायदेशीरपणे’ उभा आहे, एवढंच. अजूनही त्या रस्त्याचं नाव मात्र ‘गुलमोहर पथ’ आहे.
* * *
त्याच लॉ-कॉलेज रोडच्या दुसऱ्या बाजूला, प्रभात रोडवरील एका गल्लीत एका बंगल्यावर कामानिमित्त गेलो होतो. बंगला पाडून तिथं अपार्टमेंट्सचं प्लॅनिंग करायचं होतं.
पन्नास पंचावन्न र्वष जुना, मजबूत दगडी बंगला.
बंगल्याच्या मालकांचं वयदेखील साठी पार असावं. त्यांच्या वडिलांनी १९४८-४९ च्या सुमारास तो बंगला बांधला होता. मूळ सोळा माणसांच्या कुटुंबापैकी आता दोघंच राहिले होते. मालक स्वत: आणि त्यांचा अमेरिकेतील मुलगा. तिकडेच स्थायिक झालेला. बंगल्याभोवती फिरून ‘साइट’ पाहताना सहज मालकांना म्हटलं,
‘‘इतका सुरेख-मजबूत बंगला पाडून अपार्टमेंट्ससाठी डेव्हलपला प्लॉट देण्याचा निर्णय घेताना जड गेलं असेल नाही?’’
‘‘खरं सांगू, नाही तितकंसं जड गेलं. निर्णय कधी ना कधी घ्यायचाच होता. माझ्यानंतर आमच्यापैकी कुणीच इथं राहणार नसेल तर, कशासाठी या बंगल्याच्या मोहात पडायचं? एवढय़ा मोठय़ा बंगल्यात मी एकटाच कुठवर राहणार? सोबतीशिवाय? प्रश्नच स्वत: कधी कधी उत्तर समोर ठेवतात, तेव्हा निर्णय घेणं सोपं होऊन जातं. फक्त पॉझिटिव्हली सगळं पाहता आलं पाहिजे. गुंतून कशात पडायचं? परत न येणाऱ्या माणसात की कधीही अवचित येणाऱ्या पन्नास वर्षांच्या जुन्या आठवणीत? तशाही चांगल्या आठवणी कमीच. मग ठरवलं, माणसंच जर सोडून गेली अध्र्या वाटेवरनं, तर कशाला गुंतायचं, या दगडा-विटांच्या वास्तूत, नुसता पोकळ अट्टाहस..’’
विचार तर अगदी नितळ-स्वच्छ.
‘‘मुलाला हे पटलं असेलच, अर्थात..’’
‘‘त्याच्यासाठीच तर.. ‘नंतर’ हा व्यवहार तिकडून करणं म्हणजे..’’ बोलताना ते माझ्याकडे पाहून हसले. अन् एकदम चालता चालता थांबले. एका झाडापाशी.
‘‘हा सोनचाफा तेवढा नवीन बांधकामात जपता आला तर पाहा.. अर्थात तुमच्या प्लॅनिंगआड येत नसेल तर.. माझ्या पत्नीनं पहिल्या मंगळागौरीला हा लावला होता. तिला जाऊनही आता वीस र्वष होतील. अजूनही बेटा फुलतो. मस्त घमघमतो. होणाऱ्या माझ्या फ्लॅटमधनं हा दिसत राहिला, तर तेवढंच बरं वाटेल.. पण हे उगाचच. मन उगाचच गुंतलंय या चाफ्यात. साथ देणारा एवढाच, एकमेव. या झाडांपासूनदेखील किती शिकण्यासारखं असतं नाही! फुलं, फळं, सुगंध देणं हा तर त्यांचा अंगभूत धर्मच. पण त्यांची मातीची ओढ, त्या मातीतच पाय रोवून उभं राहाणं, कधी शिकवलं जात नाही. ते मुळातच असावं लागतं. आपल्या मातीची ओढच असावी लागते.. साता समुद्रापार नजर लागलेल्यांना ती कशी असणार..’’
भानावर येत ते म्हणाले, ‘‘जाऊ द्या, उगाच भरकटलो.’’
‘‘खरं आहे, मातीची ओढ ‘मुळातच’ असावी लागते.’’
* * *
फिलाडेल्फिया एअरपोर्टवरून गजाच्या घराकडे जाण्याचा मार्ग, दोन्ही बाजूंनी छान निसर्गाने नटलेला. उंचसखल भागातून जाणारा. निसर्गाचं रूप बघत राहावं असं फुललेलं.. गजाच्या गप्पा मात्र ड्रायव्हिंग करताना सुरूच..
‘‘सो, कसं काय वाटतंय अमेरिकेत येऊन?’’
‘‘भन्नाट. हे जगच वेगळं आहे गजा. पण एक सांगू, देशोदेशी सगळं काही बदलतं. माणसं, त्यांची ठेवण, त्यांचे रंग, भाषा, वेशभूषा, राहणी, संस्कार, समाज, राजकारण.. पण निसर्ग काही फारसा बदलत नाही. आश्चर्य वाटतं!’’
‘‘आश्चर्य कसलं त्यात? आणि मूळ माणूसदेखील तसा कुठं बदलतो? राग, लोभ, प्रेम, मत्सर, ईर्षां, हव्यास.. जगभर सारं तेच! बाह्य़रूप-राहणी बदलली तरी अंतरंग तेच. आपणदेखील निसर्गाचाच एक भाग नसतो का? आपल्याकडचा भारतातला निसर्ग, काही फळंफुलं, झाडं, इकडं नसतील. तशी इकडची तिकडे नसतील. हवामानाप्रमाणे, मातीप्रमाणे, ऋतुबदलाप्रमाणे. पण निसर्गाचा धर्म कुठं बदललाय कधी? नद्या-नाले-समुद्र, दऱ्या-खोऱ्या-वाळवंटं, सूर्य-चंद्र-तारे.. सारे तेच..’’
‘‘लेक्चरसाठी बरेच दिवस कुणी भेटलेलं दिसत नाही. मीच बरा भेटलो.’’
गजा हसला. जरासा विषादानंच.
‘‘कुणी हल्ली फारसं इथं येतच नाही माझ्याकडे, भारतातून. इकडं सेट्ल झालेले भरपूर इंडियन्स आहेत, बरेचसे व्हिसा-लाइफ जगणारे. इकडे सुखसोयी आहेत, तसे कष्टदेखील आहेत. सगळ्यांचं वेगळंच जग आहे. पण खरं सांगू, मन नाही लागत कधी कधी या सगळ्यांत.’’
‘‘कमाल आहे. गजा, तूच असं म्हणावंस, इतकी वर्षे इकडं राहिल्यानंतर अमेरिकन सिटिझन झाल्यानंतर?’’
‘‘पंधरा वर्षांपूर्वी, गौरी तीन वर्षांची असताना तिला प्रथम इंडियात घेऊन गेलो होतो. त्यानंतर तिनं परत तिकडे जायचं नाव काढलं नाही! अगदी माझी आई तिथं असतानादेखील. वास्तविक त्याआधीच आई इकडे राहून गेली होती. गौरीला आजीचा लळादेखील लागला होता. पण सहा महिन्यांसाठी आलेली आई दोन महिन्यांतच परत गेली. हवा मानवली नाही, हे तसं तितकंसं खरं नाही. पण नाही रमली इथे. मातीची ओढ तिला परत भारतात घेऊन गेली. पुन्हा ती इकडे कधीच आली नाही. मीच जायचो तिला भेटायला अधनंमधनं.’’
‘‘तेव्हा गौरीला नाही न्यायचास?’’
‘‘छे रे. तिला तिकडची हवा, माणसं, गर्दी.. काहीच मानवलं नाही, एकदाच आली होती तेव्हा. म्हणायची, आय लव्ह आज्जी, बट नॉट इंडिया! तिला आजीचं पहाट होण्यापूर्वीच, संध्याकाळचं तुळशीपुढे दिवा लावणं, शुभंकरोति म्हणणं.. तुळशीच्या मागच्या प्राजक्ताचा पहाटे पडणारा सडा.. त्या फुलांचा मंद सुवास, हे सारं काही तिला अजूनही आठवतं! अशा वेळेस वाटतं, आय मेड अ मिस्टेक ट्वेंटी इयर्स बॅक टू सेट्ल हिअर. सुरुवातीला शिक्षणासाठी. करियरसाठी आलो. लग्नानंतर इथंच सेट्ल झालो.’’
‘‘आता या अशा वाटण्यात काय अर्थ आहे, गजा? जे हवं होतं, जसं हवं होतं, ते तर सर्व मिळालंय ना?’’
‘‘गॉड ओन्ली नोज! मी जरी रिप्लांट केलेल्या झाडासारखा, इथं रुजलोय, तरी त्या मातीची ओढ अजूनही वाटतेच. गौरीच्या बाबतीत ती ओढ मुळातच नव्हती. दोष तिचा नाहीच. निर्णय माझाच, रादर आम्हा दोघांचाच होता.’’
‘‘वहिनींना असं तुझ्यासारखं कधी वाटतं का?’’
गजा हसला.
‘‘तिच्यामुळेच तर निर्णय घेतला इथं सेट्ल होण्याचा. तिचे बरेचसे नातेवाईक आता इथेच सेट्ल्ड आहेत.. अ‍ॅट लिस्ट नाऊ शी इज हॅपी. मला तेवढंच समाधान..’’
काही क्षण शांततेत गेले.
गाडी एका छोटय़ा लेनमध्ये शिरली. दुतर्फा भरपूर हिरवळ.
‘‘आई गेल्यानंतर तुझं भारतात येणं बंदच झालं नाही?’’
‘‘जवळपास. आलो होतो तीन वर्षांपूर्वी. पुण्यातल्या घरावरचे हक्क सोडले. भावाने मग तो घराचा प्लॉट डेव्हलपरला विकला. आता तिथं अपार्टमेंट्स आहेत. तुळशी वृंदावन.. आईचं तुळशी वृंदावन गेलं. मागचा प्राजक्त मी ग्रॅज्युएशननंतर इथं येण्यापूर्वी लावला होता. आईचा फार जीव होता त्या प्राजक्तावर, जिवापाड जपलं होतं त्याला!’’
गाडी बंगल्यासमोर आली. गेट रिमोटनं उघडलं.
बंगल्यात शिरताना, एन्ट्रन्स पोर्टिकोमध्ये तुळशी वृंदावन!
मी गजाकडे पाहिलं. गजा नजर टाळत हसला.
‘‘फार नाही वाढत तुळस इकडे, माती बदलतो, रोपं बदलतो.. घरावरचा हक्क सोडला, तरी आठवणींवरचा आहेच ना!