एक उलट.. एक सुलट : तुरुंग Print

alt

अमृता सुभाष , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘ तुरुंगातल्या त्या कैद्यासाठी, खाशाबांसाठी जोशात वाजणाऱ्या त्या टाळ्या.. कैद्यांच्या.. निळूभाऊंच्या.जेलरकाकांच्या..त्या बलात्कार केलेल्या कैद्याकडे मी पाहिलं. तोही जोशात टाळ्या वाजवत होता. असीमच्या कडेवर त्याचं बाळ होतं. काही न कळून चेकाळून आनंदात टाळ्या पिटणारं! त्या काही क्षणांसाठी टाळ्या वाजवणारे ते सगळे जीव.. त्या तुरुंगात.. पूर्णपणे स्वतंत्र होते! ’ अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या अनुभवांवरचं हे नवकोरं सदर
सर्वोदय ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट आहे पुण्यात. सरोदे त्याचे चालक. त्यांच्या मुलाचा, असीमचा एक दिवस मला फोन आला. त्यांच्या ट्रस्टतर्फे तुरुंगातल्या कैद्यांची एक परीक्षा घेतली जाते. गांधीजींच्या विचारसणीवर आधारित प्रश्नपत्रिका असते. असीमचे वडील स्वत: तुरुंगात या विषयावर कैद्यांचे तास घेतात. मग परीक्षा होते. या परीक्षेचा निकाल सांगून उत्तीर्ण कैद्यांना प्रशस्तीपत्रकं द्यायचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला येशील का, हे विचारायला असीमने फोन केला होता. ‘नंतर तू कैद्यांशी थोडं बोल’ असंही म्हणाला.
असीम स्वत: वकील आहे. बुधवार पेठेत ‘सहेली’ नावाची संस्था आहे, त्यायोगे वेश्यांच्या प्रश्नावरही तो आणि त्याची बायको काम करताहेत, असं कळलं. मी त्याला म्हटलं, ‘तू खूप महत्त्वाचं काम करतो आहेस, त्यामुळे मी येईन तर खरं, पण मी काय बोलायचं त्या कैद्यांशी हे आत्ता समजत नाही.’ तो म्हणाला, ‘तुम्ही जड काही बोललं पाहिजे असं नाही.. त्यांनी तुमच्या क्षेत्रातल्या व्यक्तींना भेटण्याची इच्छा दाखवली आहे.’
मी स्वत: कधी प्रत्यक्ष तुरुंग पाहिला नसला तरी माझ्या आजोळी. रहिमतपूरला ‘तुरुंग’ हा शब्द अभिमानाने उच्चारला जायचा. आम्ही लहान असताना सुट्टीत आजोळी गेलो की रात्रीची जेवणं झाल्यावर गच्चीवर ओळीनं अंथरुणं घातली जायची. मग सगळी भावंडं त्या पांढऱ्याशुभ्र, थंडीमुळे थंडगार पडलेल्या अंथरुणांवर लोळत पडायची. मग आमचे अण्णा, माझ्या आईचे वडील जुन्या जुन्या आठवणी सांगायचे. ‘बरं का अमृता, स्वातंत्र्यपूर्व काळात. म्हणजे. एकोणीसशे.. सोळा साल असेल तेव्हा.. आपले नाना पुण्याच्या तुरुंगात होते..’ नाना म्हणजे अण्णांचे वडील, माझे पणजोबा नरहर देशपांडे. ते स्वातंत्र्य चळवळीत होते. हळूहळू अण्णांचा आवाज अभिमानाने फुलायला लागायचा. ‘त्या वेळी नानांबरोबर लोकमान्य टिळकही त्याच तुरुंगात होते! नानांना तीन महिने सक्तमजुरी झाली होती. आणि पाचशे रुपये दंड. बरं का, त्या काळात.. सोनं सात रुपये तोळा होतं त्या काळात पाचशे रुपये दंड!’ त्यांना दररोज आठ तास घाण्यावर तेल काढायला लागायचं! आम्ही डोळे विस्फारून ऐकत राहायचो. खालच्या खोलीत नानांचा फेटा घातलेला फोटो होता. मला फोटोतले नाना घाण्याला जुंपलेत आणि तेल काढतायेत असं चित्र समोर यायचं. स्वातंत्र्य चळवळीत अण्णा स्वत: एक महिना, माझ्या आईची आई साडेतीन महिने, अण्णांचे भाऊ वासू आजोबा पण तुरुंगात गेलेले आहेत. माझा जन्म झाला तेव्हा माझा धाकटा मामा विकास देशपांडे आणीबाणीमुळे तुरुंगात होता. ‘तुला बघण्यासाठी एक दिवसाची सुटी घेऊन आलो होतो मी तुरुंगातून.’ असं तो सांगायचा. तेव्हा मी फार कुणीतरी महत्त्वाची आहे असं वाटायचं. आणि मामा तुरुंगातून आला आपल्यासाठी म्हणजे त्याचं आपल्यावर फारच भारी प्रेम आहे याची खात्री पटायची!
सिनेमात दाखवलेले किंवा मी स्वत: शूटिंग केलेले तुरुंगाचे सेट पुठ्ठय़ाचे आणि खोटे. मात्र खऱ्या तुरुंगात जाणं हे माझ्यासाठी किती भीषण असेल याची चुणूक  ‘एक हसीना थी’ या श्रीराम राघवनच्या सिनेमातून मिळाली होती. त्यामध्ये एका साध्या, चांगल्या मनाच्या, मध्यमवर्गीय मुलीवर केवळ कुणीतरी फसल्यामुळे तुरुंगात जायची वेळ येते. तिची तुरुंगातली पहिली रात्र.. जेवणात झुरळं..आजूबाजूला उंदीर फिरतायेत.. गलिच्छ!      
त्यावरुन आठवलं, एकदा बांद्रय़ाच्या माझ्या घरी उंदीर आला -एकच उंदीर- तर मी दाराला कुलूप घालून दाराबाहेर उभी राहिले. माझा नवरा, संदेश घरी येईपर्यंत स्वत:च्याच घराबाहेर आश्रितासारखी त्याची वाट पाहात होते. त्याने उंदराला बाहेर काढेपर्यंत घरात पाऊल ठेवलं नाही. एकटी राहायचे मुंबईत तेव्हा कधीही वेळी-अवेळी झुरळं, पालींना घाबरून घराबाहेर धावायचे. तेव्हा दारासमोरून जाणारा माणूस ओळखीचा आहे किंवा नाही हेसुद्धा गावी नसायचं. अचानक मी गयावया करत त्यांना म्हणायची ‘भैया प्लीज रसोई में जाओ ना मेरे, वो कॉक्रोच मार के आओ!’ तर या अशा मला जर स्वत:मुळे किंवा दुसऱ्यामुळे किंवा परिस्थितीमुळे तिथे.. तुरुंगात जाऊन पडावं लागलं तर ? ..
कार्यक्रम सकाळी साडेदहाचा होता. माझ्याबरोबर निळू फुले असणार होते कार्यक्रमासाठी. माझी चुलत आजी आवाबेन देशपांडेसकट आमच्या घरात सगळेच सेवा दलाचे. निळूभाऊपण सेवा दलाचे, त्यामुळे माझ्या घरात सगळ्यांनाच ओळखणारे. माझ्या आजोळी रहिमतपूरला येऊन राहिलेले वगैरे. मला घेऊन जाण्यासाठी असीमची बायको रमा, तिची आई आणि रमाचं छोटं बाळ असे आले होते. बाळ खूप गोड. टुकूटुकू बघणारं. त्याला पहिल्यांदा घराबाहेर आणलं होतं तेसुद्धा तुरुंगात! असं सगळे गमतीत म्हणत होते.
मनात काय बोलावं याचा विचार चालूच होता. व्हिक्टर फ्रँकल यांच्या संदेशने, माझ्या नवऱ्याने सांगितलेल्या पुस्तकाचा उल्लेख करावा का.. व्हिक्टर ज्यू छळछावणीत असताना तिथे त्यांनी ते पुस्तक लिहिलं. तो तर सर्वात भयंकर तुरुंग! पण त्यांनी ठरवलं की माझं शरीर त्यांच्या ताब्यात असलं तरी मन माझ्या ताब्यात आहे आणि माझं मन स्वतंत्र आहे.. माझं.. मन.. स्वतंत्र.. आहे. त्यांनी हे ठरवलं आणि त्याचं आयुष्यच बदललं. त्यानंतर तुरुंगातल्या सगळ्यांनाच त्याचा सहवास इतका आश्वासक वाटायचा की आसपासच्या कैद्यांबरोबरच त्या कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले जर्मन सैनिकही त्यांच्या घरच्या अडचणींविषयी व्हिक्टरशी येऊन बोलत.. व्हिक्टरचा विचार करता करता ‘कॅरोलिना मारीया डी जीझस’ आठवली. ब्राझीलमधली कचरा गोळा करणारी बाई.. ती झोपडपट्टीत राहायची. आजूबाजूला दारिद्रय़, अज्ञान, भांडणं. मारामाऱ्या. ती परिस्थितीच्या तुरुंगात होती. पण या बकालीत तिने तिचं मन मात्रं स्वतंत्र ठेवलं होतं. तिला लिहायला आवडायचं. कचरा गोळा करता करता ती दररोज न चुकता तिची डायरी लिहायची. या डायरीवर पुढं पुस्तक काढलं गेलं. ब्राझीलमधलं सर्वाधिक खपाचं पुस्तक ठरलं ते! ‘चाइल्ड ऑफ द डार्क!’
तर स्वातंत्र्य म्हणजे काय? आणि तुरुंग म्हणजे काय? गाडी येरवडय़ाच्या तुरुंगापाशी पोचली. तुरुंग येण्याआधी त्या उंचच उंच दगडी इमारती पोटात काहीतरी हलवू लागल्या होत्या. मग ते भलंमोठं प्रवेशद्वार!
त्याच्या छोटय़ा दारातनं आम्हाला मोजून आत घेण्यात आलं. हजारो लाखो हिंदी सिनेमांमधून अनेक वर्षांच्या कारावासानंतर हीरो किंवा व्हिलन.. दाढी वाढलेल्या अवस्थेत.. ज्या दारातनं बाहेर पडताना दाखवतात त्याच दारानं मी आत आलेय असं वाटलं..  मग अचानक ‘साहेब आले साहेब आले’ अशी थोडी लगबग झाली. अनेक सॅल्यूट ठोकले गेले. एक धिप्पाड पण अगदी मृदू चेहऱ्याचे गृहस्थ मंद हसत आले आणि सगळीकडे बघत डावीकडच्या दारानं आत गेले. असीमच्या बायकोनं त्यांच्यामागोमाग आम्हालाही आत नेलं, ते शांत होते, मृदू होते पण त्यांच्यात आब होता. काही माणसांसमोर आपण  खुर्चीवर बसू धजत नाही, त्यांच्यासमोर उभंच राहायला हवं असं वाटतं, तशी त्यांच्यासमोर मी उभीच. ते अत्यंत सौम्यपणे उठून म्हणाले, ‘नमस्कार, मी प्रमुख तुरुंग अधीक्षक, फणसे, बसा ना. आपण काय घेणार?’ ‘काही नको..’ ‘असं मी म्हणतानाच निळूभाऊ पोचले आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. फणसेंनी आम्हाला त्यांनी लिहिलेल्या नाटकाविषयी सांगितलं. ‘एका पाटलाचा मृत्यू’ नाव त्याचं. तुरुंगातल्या कैद्यांना घेऊन त्यांनी ते बसवलं होतं. त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. पाटलाचं काम करणाऱ्या कैद्याला अनेक बक्षिसं मिळाली होती. त्याला त्यांनी बोलावून घेतलं. ‘हे खाशाबा’ मी पाहतच राहिले. सिनेमात पाहिलेले कैदी सगळे बेरड, मिशाळ, भयानक. खाशाबा.. मी पाहिलेले पहिले खरे कैदी. असं मनात आलं आणि मनात थोडी ओशाळलेच. खरे ‘कैदी’ म्हणजे? माणसंच ना. माझ्या लहानपणी आम्ही नेवासा गावी राहायचो तिथे लक्ष्मण मामा म्हणून होते. मला शाळेतून न्यायचे-आणायचे. धोतर, कुडता, पांढरी टोपी, सावळा चेहरा, शांत प्रेमळ डोळे.. अगदी तसेच होते हे खाशाबा. ‘हे नाटकातला काही भाग करून दाखवतील कार्यक्रमात.. काय खाशाबा?’ फणसेंनी हसत विचारलं. ‘जी. कपडे घालायचे नाटकाचे?’
‘नाही नाही, तसंच..’ खाशाबा वरही पाहात नव्हते. ‘नमस्ते’ म्हणून गेले. ‘यांना खुनासाठी जन्मठेप झाली आहे.’ जेलर फणसे निळूभाऊंना सांगताना मी ऐकलं.
चहानंतर ‘चला’ असं म्हणून जेलरकाका आम्हाला तुरुंगाच्या  आत घेऊन निघाले. गांधीजी, नेहरू जिथे राहिले होते त्या तुरुंगाच्या खोल्या आम्हाला दाखवल्या. इथल्याच कुठल्यातरी खोलीमध्ये नाना राहिले असतील का? ..
एकोणीसशे सोळा साली..
दोन-तीनशे पुरुष, वेगवेगळ्या वयाचे. हॉलमध्ये ओळीने शिस्तीत बसलेले. आम्ही शिरताच टाळ्यांचा जोराचा कडकडाट. निळूभाऊंना पाहून ते हरखून गेलेले!
कार्यक्रमास सुरुवात झाली. बक्षीस मिळवलेल्या कैद्यांचे प्रतिनिधी म्हणून दोन कैदी त्यांचं मनोगत व्यक्त करणार होते. पहिला कैदी ध्वनिक्षेपकापाशी आला, ‘नमस्कार’ त्यांनी एकापाठोपाठ एक रंगमंचावरच्या मान्यवरांची नावं घ्यायला सुरुवात केली. माझ्या नावाशी येऊन थबकला. मी समोर पाहात होते, नजर वळून त्यांच्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात पाहिलं न् पाहिलं करून तो समोर पाहात म्हणाला, ‘आज अमृताताई इथे आल्या म्हणून बरं वाटलं. त्यांनी स्वत: मला पास दिला होता आणि मी त्यांचं ‘विक्रमोर्वशीयम्’ हे नाटक दिल्लीला राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात पाहिलं होतं.’ मी सर्द. टक लावून त्याच्याकडे  पाहायला लागले. म्हणाला, ‘त्यांना अर्थातच आठवत नसेल..’ मला खरच काही आठवत नव्हतं. मी पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पाहात होते. त्याचे डोळे स्थिर नव्हते. सतत इकडे तिकडे, जास्त करून खालीच. एका क्षणी त्यांनी ओझरतं माझ्याकडे पाहिलं. ओळखीचं हसला. मीही हसले. ‘यांना का शिक्षा झाली आहे?’ मी हळू आवाजात शेजारच्या जेलरकाकांना विचारले.
‘बलात्कार.’ ते म्हणाले..‘ जन्मठेप.’ मी हबकलेच. त्यानंतर त्याच्याकडे पाहाण्याचा धीरच होईना.
पुढचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम खरा आणि अनौपचारिक होत गेला. कैद्यांनी ‘एका पाटलाचा मृत्यू’ नाटकातला थोडा भाग करून दाखवला. मगाशी तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या खाशाबांनी जो काय खडा आणि दणदणीत आवाज लावला आणि जी ऐटदार एन्ट्री घेतली की टाळ्यांचा कडकडाट थांबेच ना! इतक्या टाळ्या वाजायला लागल्या की नाटक थांबवून आसपासचे कलाकारही खाशाबांसाठी टाळ्या वाजवायला लागले.. हे सगळं होईपर्यंत खाशाबा बेअरिंग न सोडता टाळ्या थांबण्याची वाट बघत उभे!
खाशाबांसाठी जोशात वाजणाऱ्या त्या टाळ्या.. कैद्यांच्या..निळूभाऊंच्या.. जेलरकाकांच्या.. असीमच्या.. त्याच्या वडिलांच्या.. त्या बलात्कार केलेल्या कैद्याकडे मी पाहिलं. तोही जोशात टाळ्या वाजवत होता. असीमच्या कडेवर त्याचं बाळ होतं. काही न कळून चेकाळून आनंदात टाळ्या पिटणारं! त्या काही क्षणांसाठी टाळ्या वाजवणारे ते सगळे जीव.. त्या तुरुंगात.. पूर्णपणे स्वतंत्र होते! मीही हळूहळू टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि त्यांच्या जल्लोषात सामील झाले...