अभ्यासाशी मैत्री : ताण मुलांना वाढवण्याचा Print

alt

आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांच्या हिताचंच सांगतोय या सबबीखाली मुलांवर अत्याचार करायचा की मुलांनाच त्यांच्या हिताचा विचार करायला शिकवायचं? जर मुलंच आपल्या हिताचा विचार करू लागली तर तुम्हाला त्याचा येणारा ताण आपोआपच संपून जाईल.
ए क कुटुंब त्यांची समस्या घेऊन माझ्याकडे आलं. त्यांचा पाच वर्षांचा मुलगा त्यांचं काही ऐकत नाही, ही त्यांची तक्रार होती. मुळात, समस्या ही नव्हती की मूल ऐकत नाही, पण ती जिथे मुलाला घेऊन गेली होती तिथे आलेली इतर मुलं त्यांच्या आई-बाबांचं ऐकत होती, आणि त्यांचं मूल मात्र त्यांचं ऐकत नव्हतं. मी त्यांना विचारलं की, त्या उपस्थित पालकांची मुलांशी बोलायची पद्धत कशी होती? तर हे पालक म्हणाले, ‘‘अहो, त्या मुलांना सांगायलाच लागत नव्हतं. ती अगदी स्वत:हूनच इतकी चांगली वागत होती की विचारूच नका!’’ मी त्या पालकांना सांगितलं की, तुम्ही या सगळ्या प्रसंगाचा नीट अभ्यास करा आणि कारणमीमांसा तुम्हीच सांगा. तर ते दोघेही काही विचार न करताच म्हणाले, ‘‘अहो आमचं मूल खूप मस्ती करतं, ती इतर मुलं खूपच शहाणी आहेत. मी परत विचारलं, ‘‘हाच का तुमचा निष्कर्ष?’’ तर ती आई म्हणाली की, ‘‘अहो, आमच्या मजल्यावरची सगळी माणसंसुद्धा आता तक्रार करायला लागलीत की हा सारखा इकडून तिकडे धावत असतो, पडला म्हणजे? तुम्ही दोघे दिवसभर ऑफिसमध्ये असता.’’ मी म्हटलं, ‘‘म्हणजे तो काही तोडफोड करीत नाही ना?’’ पालक म्हणाले, ‘‘नाही हो, तसं नाही. पण एका जागेवर बसणं नाही, सारखी आपली चुळबुळ..’’       
        म्हणजे बघा हं, इतर मुलं जसं करतात, तसंच त्यांच्या मुलांनी वागलं पाहिजे ही अपेक्षा चुकीची नाही का? मग मी त्या पालकांना सांगितलं की खरं कारण असं आहे की ते पालक मुलांना सारखं सारखं अमुक कर, अमुक करू नको असं सांगत नाहीत. त्यामुळे त्यांना घरी थोडीबहुत मस्ती करायला मिळते. म्हणून ती बाहेर गेली की त्यांना तिथे मस्ती कराविशी वाटत नाही. तुम्ही घरात पण मुलाला मस्ती करू देत नाही, म्हणून तो जिथे चान्स मिळेल तिथे मस्ती करतो, त्याला माहीत आहे, इथे या सगळ्यांच्या समोर आई-बाबा आपल्याला ओरडणार नाहीत.
आता याचा अभ्यासाशी संबंध कसा ते पाहू. पालकांचा समज असा आहे की, अभ्यास कठीण झाला आहे, पण सत्य परिस्थिती अशी आहे की, उलट अभ्यास सोपा झाला आहे, फक्त त्याचे तुकडे तुकडे करून वेगवेगळे विषय केले आहेत. म्हणून दिसताना तो जास्त दिसत असेल, पण खरंतर तो झालाय सोपा आणि पालकांच्या तावडीतून मुलांना सोडवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासावर आणि मुलांनी स्वत: अभ्यास करावा असा अभ्यासक्रम आहे. पण पालक हे समजत नाहीत. माझी एक पेशंट केजीमध्ये असताना असं लक्षात आलं की तिचं वजन वाढत चाललंय, तर मी तिच्या आईबाबांना सांगितलं की तिला जरा सकाळी पळायला एखाद्या मदानात घेऊन जा किंवा मदानी खेळात घाला. आई म्हणाली ‘अहो, तिला वेळच नसतो, सकाळी शाळा, मग टय़ुशन, मग टय़ुशनचा अभ्यास. मी म्हटलं, ‘‘अहो, काय केजीमध्ये टय़ुशन?’’ तर पालक म्हणाले, ‘‘अहो, आजकाल शाळेत कुठे काय शिकवतात? आणि ही इंग्रजी माध्यमात आहे, तर शिकवणी पाहिजेच.’’ ती मुलगी ज्या शाळेत जात होती तिथल्या अनेक शिक्षिका माझ्या पेशंट होत्या. त्यांच्याकडून मला त्या शाळेची शिकवण्याची पद्धत माहीत होती. त्यावरुन मी त्या पालकांना म्हटलं की, शाळेच्या कॅलेंडरमध्ये तर चक्क लिहिलंय की मुलांचा घरी अभ्यास घेऊ नका, मग? बरं, शाळेत पूर्ण वेळ शिकवलं तर मुलं कंटाळून नाही का जाणार? म्हणून मध्येच मुलांना ‘हेडडाऊन’ करून बसायला सांगतात. त्याचा असा अर्थ असा होत नाही की शाळेत शिकवत नाहीत. पण तुम्ही दोघं ठरवा की तुम्हाला सुदृढ मूल हवंय की नुसतं पुस्तकी ज्ञान असलेलं रोगिष्ट मूल? तिला आतापासून व्यायामाची सवय लावलीत तर तिचं वजन कधीच वाढणार नाही. जाडी झाली तर मुलं चिडवतील आणि तिला मानसिक ताणतणावाला तोंड द्यावं लागेल.. मग तीच तुम्हाला म्हणेल की, माझ्यामागे नुसता अभ्यासाचा धोशा लावलात. जर तुम्ही सारखा सारखा सल्ला देत राहाल, सारखा सारखा अभ्यास एके अभ्यास करीत राहाल तर मुलांना त्याचा निश्चितच कंटाळा येईल.
असाच एक अनुभव मारण्याच्या बाबतीतला. एक ओळखीची बाई होती. तिचा नवरा अकालीच हृदयविकाराने गेला होता. आपल्यावर मुलाची सर्वस्व जबाबदारी आहे आणि ती आपण सर्वतोपरी प्रयत्न करून पार पाडायची आहे हे तिच्या जीवनाचं ध्येय होतं. हे सगळं मान्य आहे, पण त्यासाठी जो मार्ग  तिने अवलंबला होता, फारच भयानक होता. तिने मुलाला शिकवणीला घातला होता, ती शिकवणारी बाई पट्टीची बाजू नाही तर पट्टी हातात उभी धरून मुलांना मारायची. एके दिवशी तर ही बाई त्या मुलाला माझ्याकडे तपासायला घेऊन आली. त्या मुलाच्या डोक्याला टेंगळं आली होती, किमान चारपाच तरी होती. डोक्याला हात लावला तरी कळवळत होतं ते पिल्लू. तो मुलगा पहिलीत होता. तेव्हा मला कळलं की ही शिकवणीची बाई मारते आणि ही बाई तिला म्हणते, ‘तू मार, काही हरकत नाही, पण माझ्या मुलाला अभ्यासाची आवड लाव, ती तर सुट्टीमध्येसुद्धा तिच्याकडे शिकवणीला पाठवणार होती.. का तर त्याची अभ्यासाची सवय जाऊ नये म्हणून. शेवटी अगदी न राहवून मी तिला विचारलं, ‘काय गं, तुझं तुझ्या मुलावर प्रेम आहे का?’ तर ती म्हणाली, ‘प्रेम आहे म्हणूनच तर मी हे सगळं करीत आहे.’ मी म्हटलं, ‘अगं, मला इथे प्रेम कुठेच दिसत नाही.’
मुलांच्या हिताचंच सांगतोय या सबबीखाली मुलांवर  अत्याचार करायचा की मुलांनाच त्यांच्या हिताचा विचार करायला शिकवायचं? जर मुलंच आपल्या हिताचा विचार करू लागली तर तुम्हाला टेन्शन कशाला घ्यायला पाहिजे? शिवाय त्यांच्या हिताचा विचार हळूहळू प्रगल्भ होत गेला पाहिजे. शेवटी आयुष्यात त्यांनी समाधानी व्हावं हेच तर आपल्याला हवं असतं.
अखेरीस पालकहो, एवढेच सांगेन, सुट्टीमध्ये अभ्यासाची सवय जाऊ नये म्हणून शिकवणी शोधण्यापेक्षा गोष्टीची पुस्तके वाचून दाखवणे किंवा बाहेर फिरायला घेऊन जाणे व त्यातून मुलांना जगाचं ज्ञान देणं जास्त सयुक्तिक नाही का ? आणि तुम्हाला असं नाही का वाटत, आई-बाबा जे शिकवू शकतात ते त्याची इतरांशी तुलना होऊ शकत नाही. हे ज्ञान जर आई-बाबांच्या मांडीवर मिळालं तर दुग्धशर्करा योग नाही का?