माझी आई Print

 

alt

शनिवार , २८ जुलै २०१२
रोहिणी गवाणकर आणि मृणाल गोरे यांचा साठेक वर्षांचा स्नेह. या साठ वर्षांत  त्या दोघींमध्ये  जे नातं निर्माण झालं होतं ते कोणत्याही पारंपरिक नात्यापलीकडलं होतं..  नुकत्याच निधन झालेल्या आपल्या या सखीच्या  आठवणी जागवताहेत रोहिणी गवाणकर  तर आईपणाच्या पलीकडे मैत्रिणीचं नातं जपलेल्या मृणाल गोरे यांच्या कन्या अंजली वर्तक सांगताहेत आपली सखी असलेल्या आईविषयी ..
स न १९४९! भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आता तरुणांना उचलायचा होता. त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची स्थापनाही झाली होती आणि सेवा दलाचे कार्यकर्ते एका शिबिरासाठी पुण्यात एकत्र जमले होते.
‘‘माझ्या बाळंतपणात माझ्याबरोबर राहायचं सोडून आई दिल्लीला गेली. मी तिला म्हटलं की, अगं, माझी ही पहिली वेळ आहे आणि तू इथे हवी आहेस. पण तिने ठरलेली कामं पार पाडली आणि मगच माझ्याकडे आली. तिला वैयक्तिक आयुष्यापेक्षा सामाजिक आयुष्य खूप महत्त्वाचं होतं.’’
दे वाला सगळीकडे धावून जाणं शक्य होत नाही. म्हणून त्याने आई निर्माण केली, अशा अर्थाचं एक वचन आहे. कोणत्याही सहृदय माणसाच्या हृदयाच्या गाभ्यात आईसाठी वेगळी जागा असते. माझं हृदयही त्याला अपवाद नाही. आज आई मलाच नाही, तर या जगालाही सोडून गेल्यानंतर तिचं महत्त्व जास्त जाणवतंय. याआधी ते जाणवत नव्हतं, असं नाही.

पण ते मोठेपण अगदी ठसठशीतपणे समोर येतंय. माझ्याच नाही, तर माझ्या मुलांच्या आणि त्यांच्याही मुलांच्या..
लहानपणी आईने मला कधीच वेगळं वागवलं नाही. म्हणजे आपली मुलगी आणि इतरांची मुलगी, यात तिने जराही फरक केला नाही. लहानपणी या गोष्टीचा मला खूप राग यायचा. माझ्या आईने माझ्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. माझी बाजू घेऊन बोलायला हवं, मला पाठीशी घालायला हवं, असं लहानपणीच नाही, तर मोठेपणीही कोणत्याही मुलीला वाटत असतं. मलाही तसंच वाटायचं. पण माझ्यासाठी काही वेगळा न्याय तिच्याकडे नव्हताच. म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नाही. पण ते व्यक्त करण्याचे तिचे मार्ग खूप वेगळे होते.
लहानपणी नेहमी घडणारा एक प्रसंग अजूनही डोळ्यासमोर आहे. माझे बाबा लवकर गेले. त्यामुळे घरी मी आणि आईच. आम्ही टोपीवाला बंगल्यात राहायचो. तिथेच आईच्या जनता दलाचं ऑफिस होतं. आई ग्रामपंचायतीवर निवडून आली, त्या वेळी मी लहान होते. आईच्या मागे बाबुराव सामंतांसारखी भक्कम माणसं खंबीरपणे उभी होती. ही सर्व माणसं आमच्या घरी, कार्यालयात यायची आणि मग आईच्या बैठका चालायच्या. या सगळ्या बैठका मी आईच्या मांडीवर बसून पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. त्यांच्या जोरदार चर्चा चालायच्या आणि माझ्या मनात मात्र एकच विचार असायचा, ‘हिच्या बैठका संपणार कधी आणि माझी आई  माझ्या वाटय़ाला येणार कधी’!
पुढे मग मला या गोष्टींची सवय झाली. आईदेखील महापालिका, विधानसभा, लोकसभा अशी एक एक पायऱ्या चढत गेली. रात्री-अपरात्री आमच्या घरावर थाप पडली की, ती मदतीला धावून जात असे. ती वृत्ती कुठे तरी माझ्यातही रुजली. त्या वेळी मी तिच्याबरोबर धावले नसेन कदाचित, पण ती हिंमत मात्र तिने नक्कीच दिली. साधारणपणे माणूस जोपर्यंत पदावर असतो, तोपर्यंत त्याच्या आजूबाजूला माणसांचा घोळका असतो. एकदा तो त्या पदावरून दूर झाला की, त्याच्या बाजूला माणूस सोडा, चिटपाखरूसुद्धा फिरकत नाही. ही जगाची रीत आहे. पण आईच्या बाबतीत ही रीत खोटी ठरली. सक्रिय राजकारणातून ती दूर झाल्यानंतरही तिच्याकडे असलेला माणसांचा राबता कधीच कमी झाला नाही.
आई मला नेहमी सांगत असे, ‘अंजू, ही माणसं माझी संपत्ती आहेत.’ आपल्या कार्यकर्त्यांचा तिला अभिमान होता. तसाच तिला अभिमान होता स्वत:च्या कामाचा. तिला स्वत:वर विश्वासही तेवढाच होता. त्याबाबतीत ती ठाम असायची. अनेकदा मला तिच्या तब्येतीची काळजी वाटावी, एवढी दगदग ती करायची. मग मी तिला म्हणायचे की, दौरा रद्द कर किंवा कार्यक्रम रद्द कर आणि घरी बस. पण ते तिला पटायचं नाही. तिचं मला नेहमी सांगणं असायचं की, ‘बायो, मी घरी बसले तर संपूर्ण पंचक्रोशीतून माझ्यासाठी येणाऱ्या बायकांचं काय?’ ही काळजी तिला alt

नेहमी भेडसावायची. बायकांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रसंग ऐकताना तर ती अक्षरश: विव्हळायची. आई वरवर खूप कठोर वाटायची, पण आतमधून फणसाच्या गऱ्यासारखीच होती.
एक गोष्ट मात्र नक्की की, आम्ही दोघीच एकत्र राहायचो. त्यामुळे जसजशी मी मोठी होत गेले, तसतसं आमचं नातं आई-मुलगी यापेक्षा मैत्रिणीत बदलत गेलं. हा बदल व्हावा, हीसुद्धा तिचीच जादू. पण तरीही तिनं मला चारचौघींसारखीच एक मुलगी म्हणून वाढवलं. मला आठवतं, मी पहिल्या बाळंतपणासाठी म्हणून आईकडे राहायला आले. त्या वेळी तिच्याकडे एक बाई राहत होत्या. आई खासदार होती त्या वेळची गोष्ट. आता बाळंतपणात माझ्याबरोबर राहायचं सोडून आई दिल्लीला गेली. मी तिला म्हटलं की, अगं, माझी पहिली वेळ आहे आणि तू इथे हवी आहेस. पण तिने ठरलेली कामं पार पाडली आणि मगच माझ्याकडे आली. तिला वैयक्तिक आयुष्यापेक्षा सामाजिक आयुष्य खूप महत्त्वाचं होतं. तिथे वावरताना तिचा आवेश रणरागिणीसारखा होता.
एक आठवण आहे. आई आणीबाणीच्या वेळी तुरुंगात होती. आणीबाणी जाहीर व्हायच्या आधीच नुकतंच माझं लग्न झालं होतं. आमचा प्रेमविवाह होता आणि आईनं त्याला कधीच विरोध केला नाही. ते असो.. पण आमचं लग्न झालं त्यानंतर आई भूमिगत झाली. आणीबाणीला विरोध केल्याबद्दल पुढे तिला अटक झाली आणि ती पुण्याच्या येरवडा जेलमध्ये होती. आमचा दिवाळसण होता आणि आम्ही आईला भेटायला येरवडा जेलमध्ये गेलो. मी माझ्या आईचीच मुलगी, त्यामुळे आमचा दिवाळसण असा जगावेगळा तुरुंगातच साजरा झाला.
एका आयुष्यात मला तिची केवढाली रूपं पाहायला मिळाली. पाण्याच्या प्रश्नासाठी झगडताना ती पाणीवाली बाई झाली, सामान्यांचे प्रश्न संविधानिक चौकटीत मांडताना ती विधान सभेची सन्माननीय सदस्य बनली, पण माझ्यासाठी ती एक आईच होती.. केवळ माझीच नाही, तर सगळ्यांचीच आई!!!        
शब्दांकन - रोहन टिल्लू