माझी सखी Print

 

alt

शनिवार , २८ जुलै २०१२
रोहिणी गवाणकर आणि मृणाल गोरे यांचा साठेक वर्षांचा स्नेह. या साठ वर्षांत  त्या दोघींमध्ये  जे नातं निर्माण झालं होतं ते कोणत्याही पारंपरिक नात्यापलीकडलं होतं..  नुकत्याच निधन झालेल्या आपल्या या सखीच्या  आठवणी जागवताहेत रोहिणी गवाणकर  तर आईपणाच्या पलीकडे मैत्रिणीचं नातं जपलेल्या मृणाल गोरे यांच्या कन्या अंजली वर्तक सांगताहेत आपली सखी असलेल्या आईविषयी ..
स न १९४९! भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आता तरुणांना उचलायचा होता. त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची स्थापनाही झाली होती आणि सेवा दलाचे कार्यकर्ते एका शिबिरासाठी पुण्यात एकत्र जमले होते.

त्यांच्या राहण्याची सोयही तेथे करण्यात आली होती. या शिबिरात मीसुद्धा सहभागी झाले होते. त्या वेळी माझी रूम पार्टनर होती नुकतीच मॅट्रिक झालेली आणि लग्न केलेली  मृणाल मोहिले नावाची एक तरुणी. आम्ही दोघीही ठाणे जिल्हय़ातल्याच असल्याने एकमेकींची तोंडओळख होती. पण घट्ट स्नेह जुळला तो या शिबिराच्या निमित्ताने!
नेमकं कारण नाही सांगता येणार, पण मला मृणाल प्रचंड आवडली होती. त्या वेळी ती दोन वेण्या कानांवर घालायची आणि त्याबद्दल मी तिला नेहमी बोलायचे. वेण्या कानामागून घे, हे माझं सांगणं तिनं वेणी घालणं सोडेपर्यंत कधीच ऐकलं नाही. या शिबिरात आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचे गट केले होते आणि प्रत्येक गटाला ठराविक कामं आखून दिली होती. त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा एक ग्रुप होता, एक बौद्धिकांचा ग्रुप होता. मृणालने मला सांगितलं की, तू मॅट्रिक आहेस तर तू बौद्धिक गटात ये. त्याही वेळी मी तिला म्हटलं की, अगं, मला ते बौद्धिक वगैरे जमणार नाही. मला झोप यायची. पण मृणालने मला तिथे खेचलंच.
गंमत अशी होती की, मृणाल, बंडू गोरे, मधू लिमये, दादा नाईक अशी सगळी मंडळी साथी सहाध्यायी म्हणून एक गट मुंबईत चालवायचे. तिथे त्यांच्या सतत बैठका होत असत. मला तशी कोणतीही पाश्र्वभूमी नव्हती. पण एक गोष्ट होती. वसईतलं आमचं घर खूप मोठं होतं. चाळीसेक माणसं त्या घरात राहायची. घर नुसतं आकारानेच नाही, तर कार्यानेही मोठं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळे पुढारी आमच्याकडे राहून गेले होते. त्यांचे विचार मी ऐकत असे. तेवढंच काय ते बौद्धिक! पण म्हणून मला नेहमी वाटायचं की, हे सगळे हुशार आणि हे नेहमी पुढे जाणार. पण मी मागे पडणार.
मृणालचा पिंड तसा नव्हता. आपल्याबरोबर असलेल्यांना ती पुढे घेऊन जायची. ज्या वेळी तिला माझी आवड शिक्षणात आहे हे कळलं, त्या वेळी तिने मला तो मार्ग निवडायला सांगितलं. मृणालची जडणघडण झाली ते तिचं लग्न झाल्यानंतरच. बंडू गोरे यांनी तिला सांगितलं होतं की, मला नोकरी करणारी बायको नको. माझ्या कामात तीच नाही, तर तिचा आत्माही सहभागी असायला हवा. त्यांचं लग्न वनमाळी हॉलमध्ये झाल्याचं मला आठवतं. मी काही त्यांच्या लग्नाला नव्हते. एकतर त्यांनी खूप साधेपणाने आणि छोटेखानी समारंभात लग्न केलं, आणि दुसरं म्हणजे मी वसईला राहत होते त्या वेळी वसई-दादर हे अंतर पार करणं कठीणच होतं.
मला बंडू गोरेंचं नेहमी कौतुक वाटायचं. त्यांनी मृणालच्या कार्याला खूपच वाव दिला. बाबूराव सामंतांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मृणालने उभं राहावं, असं सुचवलं होतं; पण त्या वेळी नुकताच अंजलीचा, मृणालच्या मुलीचा जन्म झाला होता. ती अक्षरश: तान्ही होती. मृणालने ठाम नकार दिला निवडणूक लढवायला. पण बंडूभाऊंनी अंजलीची जबाबदारी घेत मृणालला पुढाकार घ्यायला सांगितला. ती घरी परतली की तिच्यासाठी ते गरमागरम चहा तयार ठेवत. कधी खूप पाऊस पडत असला की कांदा भजी करायचे. तिला कांदा भजी खूप आवडायची.
कांदा भजीवरून आठवलं. एकदा मृणाल आणि अहिल्याताई दोघीही येरवडय़ाच्या तुरुंगात होत्या. त्या वेळी मी आणि माझे पती आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. आता तुरुंगात भेटायला जाताना तिच्यासाठी काय घेऊन जावं, हा प्रश्न मनात होता. मग पुण्यात आमच्या एका नातेवाइकांकडे मी कांदा भजी तयार केली आणि ती गरमागरम कांदा भजी घेऊन मृणालला alt

भेटायला तुरुंगात गेलो. ती कांदा भजी पाहूनच मृणाल त्या जेलच्या अधिकाऱ्यांना म्हणाली, ‘रोहिणी आली असणार’. मृणाल सामाजिक कार्यात असली तरी तिने स्वत:ची कधीच आबाळ केल्याचं मला आठवत नाही. अरबटचरबट नाही, पण सकस आहार नक्कीच घ्यायची ती.
मृणाल असताना आणि आता ती गेल्यानंतरही एक गोष्ट सतत जाणवते, ती म्हणजे तिची माणसं जोडण्याची हातोटी. आयुष्यभरात तिने अनेक माणसं जोडली आणि जपलीही. ‘पाणीवाली बाई’ ही तिची ओळख तर खूपच प्रसिद्ध होती. या ‘पाणीवाली बाई’चा वेळचाच किस्सा आठवतोय. त्या वेळी मी दादरला राहायचे. मृणाल एकदा माझ्याकडे जेवायला येणार होती आणि त्याच वेळी आमच्या बिल्डिंगच्या टाकीत काहीतरी बिघाड झाला होता. तो दुरुस्त करायला ते सगळे कामगार आले होते आणि आम्ही करणार नाही, वगैरे हुज्जत घालत होते. त्यापैकी एकाने मृणालला जिना चढून वर, माझ्याकडे येताना बघितलं. तो कामगार माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘आपने पानीवाली बाई को बुलाकर ठीक नहीं किया. हम वो काम करनेवाले थे ना..’ मला हसायलाच आलं. मी मृणालला बाहेर बोलावलं आणि त्याला तिच्यासमोरच सांगितलं की, ‘ये पानीवाली बाई मेरी सहेली है.. वो यहाँ खाना खानें आयी है’ त्या वेळी त्याचा जीव भांडय़ात पडला.
मृणालचे दोन किस्से मला नेहमी आठवतात. दोन्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळचे. त्यावेळी मृणाल विधानसभा गाजवत होती. मी माझ्या एम.ए.च्या विद्यार्थीनींना घेऊन नागपूरला जात असे. मग अधिवेशनाचं कामकाज संपल्यावर संध्याकाळी आम्ही तिच्या खोलीत चहा पित गप्पा मारत असू. अशाच एका संध्याकाळी मी मृणालच्या खोलीवर गेले. माझ्या हातचा चहा तिला आवडायचा. मी चहाचं आधण गॅसवर ठेवलं आणि तेवढय़ात तिच्या खोलीत १५-२० माणसांचा लोंढा शिरला. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या काही केल्या थांबेचना. ते काहीतरी त्यांची गाऱ्हाणी मांडत होते. मी त्यांच्यापैकी एकाला विचारलं की, तुम्ही कोणत्या पक्षाचे? त्याने मला ‘काँग्रेस’, असं उत्तर दिलं. मग मी त्याला म्हटलं की, तुम्ही तुमच्या आमदारांकडे का जात नाही. आता दहा वाजत आले आहेत आणि तिने आल्यापासून चहासुद्धा धड घेतलेला नाही. त्यावर त्या कार्यकर्त्यांने मला उत्तर दिलं, ‘मॅडम, आमच्या आमदार साहेबांनीच सांगितलं आहे की, हा प्रश्न सोडवायचा तर मृणालताईंना गाठा.’ आता यावर मी काय बोलणार होते!
दुसरा एक किस्सा पण नागपूर अधिवेशनातला. त्यावेळी मला वाटतं, शेषराव वानखेडे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्या अधिवेशनाआधी नागपूरमध्ये काहीतरी शेतकऱ्याच्या एका कुटुंबावर अत्याचार वगैरे प्रकार घडला होता. तो विषय सोमवारी चर्चेसाठी येणार होता. मृणाल शुक्रवारी मला म्हणाली की, मी जरा दोन दिवस बाहेर जाऊन येणार आहे. ती एसटीने त्या गावापर्यंत गेली. वाटेत त्या प्रकरणाबद्दल जे जे काही कानावर पडलं ते तिने साठवलं. त्या गावी जाऊन तिने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली. सर्व प्रकार जाणून घेतला आणि परतली.
अधिवेशनात सोमवारी तो प्रश्न चर्चेला आला. मृणाल बोलायला उभी राहिली. मी गॅलरीत प्रेक्षक म्हणून गेले होते. मृणाल बोलायला उभी राहताच संबंधित मंत्र्यांनी, ‘या प्रश्नाची माहिती आमच्याकडेही आहे. ती माहिती प्रथम मांडू द्यावी,’ असा आग्रह धरला. त्यावर खुद्द वानखेडे यांनी त्या मंत्र्यांना खडसावलं होतं. ते म्हणाले, ‘तुम्ही जमवलेली माहिती ही कार्यकर्त्यांकडून किंवा कोणाला तरी पाठवून जमवली असणार. पण मृणालताईंनी ही माहिती स्वत जाऊन गोळा केली असणार. त्यामुळे त्यांना आधी बोलू द्या.’ तिच्याबद्दलचा हा विश्वास केवळ सामान्य माणसालाच नाही, तर वानखेडेंसारख्या राजकारण्यालाही वाटायचा.
तिची एक सहकारी आणि एक मैत्रीण म्हणून मला नेहमी वाटायचं की, मृणालने एक चांगला सेक्रेटरी नेमायला हवा. त्याला तिने स्थापन केलेल्या अनेक संघटनांमधील तिच्या कार्याची नोंद ठेवता आली असती. पण मी तिला सांगूनही तिने ते तेवढं मनावर घेतलं नाही. त्याचबरोबर तिच्या व्यक्तिमत्त्वावर भाळलेल्या अनेक तरुणींना ती कायम धरून ठेवू शकली नाही किंवा त्या तिच्याबरोबर राहू शकल्या नाहीत. पण त्यामुळे दुसऱ्या फळीचं नेतृत्व तयार करणं तिला शक्य झालं नाही.
मृणालचा वाढदिवस २४ जूनला. दरवर्षी मी तिच्या वाढदिवसाला तिला न चुकता भेटते. शेवळा म्हणून एक भाजी असते. ती सीकेपी किंवा सारस्वत यांच्याकडेच चांगली बनते. तिला आमच्या सारस्वतांकडली ती भाजी खूप आवडायची. ही भाजी बनवायला खूप कठीण आणि वेळखाऊ. मग गेली अनेक वर्षे तिच्या वाढदिवसाच्या आगेमागे मी तिच्यासाठी ती बनवून घेऊन जात असे. यंदाही मी तिच्याकडे २२ जूनला शेवळ्याची भाजी घेऊन गेले. आमच्या खूप गप्पा झाल्या. त्या वेळी विधानसभेतील तिच्या गाजलेल्या भाषणांचं पुस्तक काढण्याचा मानसही मी तिला बोलून दाखवला. तिलाही तो आवडला होता. पण ते कसं जमणार, ही चिंता भेडसावत आहे. पण हे पुस्तक पूर्ण करून माझ्या या मैत्रिणीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
शब्दांकन - रोहन टिल्लू