आदर लिंगभावनेचा Print

मंगला सामंत ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खेळाडू पिंकी प्रामाणिक आणि  शांती सुंदरराजन यांना लिंगचाचणीला सामोरं जावं लागलं ते त्या स्त्री आहेत की पुरुष हे ठरवण्यासाठी. तर मध्यंतरी बिधान बरुआने लिंगबदल करून घेण्यासाठी प्रचंड मनस्ताप भोगला. यामागे नेमकं काय जैविक शास्त्र आहे. माणसाची वाढ गर्भातच कशी घडते किंवा ‘बिघडते’ हे सांगणारा हा लेख. माणसाचं लिंग कोणतं आहे, स्त्रीचं आहे की पुरुषाचं आहे? त्यापेक्षा त्या व्यक्तीची जी लिंगभावना असते, त्यानुसार जर त्याला जगायला मिळालं तर त्याच्या मानसिक समस्या तयार होत नाहीत आणि ती व्यक्ती आपल्या जगण्यावर मनापासून प्रेम करते, हे सांगणारा..
पिंकी प्रामाणिक या स्त्री खेळाडूवर बलात्काराचा आरोप आणि तिची लिंगचाचणी ही बातमी जुनी होत नाही तोर्पयंतच शांती सुंदरराजन या आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक मिळवलेल्या खेळाडूची बातमी आली. ती स्त्री नसल्याचा आरोप केला गेला आणि त्याच वेळी तिचे रौप्य पदक तर काढून घेतलेच, शिवाय भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेने तिला कोणत्याही स्पर्धेत खेळण्यापासून बंदी घातली. जगण्याचा सहाराच हरवल्यावर उदरनिर्वाहासाठी तिला एका वीटभट्टीत काम करावं लागलं आणि विरोधाभास असा की ‘पुरुष’ असल्याचा आरोप झालेल्या या शांतीला वेतन मात्र स्त्री मजुराचे दिले जात होते!
 पिंकी आणि शांतीला लिंगचाचणीला सामोरे जावे लागले. या दोघी पुरुष आहेत की स्त्री हे सिद्ध करण्यासाठी त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यात माणुसकी हरवली. या दोन घटनांपूर्र्वी बिधान बरुआची बातमी चर्चेत होती. या तरुणाने स्वत:चे लिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेची परवानगी न्यायालयाकडून घेतली व त्याचा स्त्रीकायाप्रवेश नक्की झाला.
अशा घटना बातमीरूपात अधूनमधून आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा, अशा प्रकारच्या लिंगचाचणीला सामोरं जाणं किंवा लिंगबदल करण्याचा प्रयत्न हा सर्वसामान्यत: अनाकलनीय वाटतो. समाजातला एक वर्ग आणि विशेषत: धार्मिक संस्काराखाली असणारे लोक ‘ही एक विकृती आहे’ किंवा ‘पाश्चात्त्य फॅड’ आहे, अशी एकसमान प्रतिक्रिया देतात. परंतु एखाद्या व्यक्तीचे, जिच्यावर २०-२२ वर्षे पुरुष म्हणून संस्कारातून संगोपन केले गेले आहे, त्याने स्वत:च्या लिंगबदलाच्या निर्णयापर्यंत पोहोचणं, हे तसंच मोठं कारण असल्याशिवाय, सहजसोपी बाब नाही. कारण प्रत्येक स्त्री व पुरुषाच्या जननेंद्रियाची जडणघडण ही गर्भाशयात होत असते. गर्भाशयातील पहिल्या पाच महिन्यांतच गर्भाची लिंगनिश्चिती दृश्य होणं, ही सर्वोच्च महत्त्वाची घटना म्हणावी लागते. ही इतकी महत्त्वाची असते की गर्भाशयात ती सर्वप्रथम घडावी लागते आणि त्यानंतरच तो भ्रूण विकासाची पुढची दिशा पकडतो. अगदी भ्रूणाच्या मेंदूचा विकाससुद्धा या घटनेनंतर वेग घेतो.
स्त्री व पुरुष समागमानंतर निर्माण झालेला गर्भाशयातील भ्रूण हा ७७ क्रोमोझोम धारण केलेला स्त्रीभ्रूण तरी असतो किंवा ७८  क्रोमोझोम घेऊन पुरुषभ्रूण तरी असतो. समागमाच्या वेळी लिंग निश्चित झालेलं असलं तरी पहिले सहा आठवडे, लिंगाचं स्वरूप हे मुलगा-मुलगी दोन्ही भ्रूणांत एकसारखंच असतं. त्याला इंग्रजीत गोनाड्स (gonads) म्हणतात. या गोनाड्समधून पुढे स्त्रीचं अंडकोश (ओव्हरीज) बनणार आहेत की पुरुषाच्या टेस्टीज (Testes) बनणार आहेत, हे रहस्य गर्भधारणेनंतरच्या सहाव्या आठवडय़ानंतर हळूहळू उलगडत जातं. भ्रूण मुलाचा असेल तर त्याच्या  xy पैकी y क्रोमोझोमवरील SRY  जीन हा सहा आठवडय़ांनी कार्यान्वित होतो आणि तो गोनाड्समधील सर्व पेशींच्या ‘डीएनए’ना एकत्रित करून, त्या गोनाड्सना टेस्टीजमध्ये बदलतो व अशा रीतीने भावी पुरुषाची पहिली पायाभरणी होते. शिवाय प्रत्येक गर्भामध्ये दोन सिस्टीम्स (कार्यपद्धती) सुप्तावस्थेत असतात. त्यापैकी एक  पुरुषगर्भाचा विकास करणारी असते. तिला ‘वुल्फीयन’ म्हणतात तर दुसरी सिस्टीम ही स्त्रीगर्भाचा विकास करणारी असते, तिला ‘मुलेरिन’ (दोन्ही नावे शास्त्रज्ञांवरून) म्हणतात.
या पुरुषाच्या टेस्टीज, नंतर पुरुष-हार्मोन्सचे उत्पादन सुरू करतात. या सर्व पुरुष हार्मोन्सना अँड्रोजेन म्हटलं जातं. टेस्टास्टेरॉन हे मोठय़ा प्रमाणावर टेस्टीजमधून पाझरणारे हार्मोन, या अँड्रोजेनपैकी अत्यंत महत्त्वाचे सेक्स ड्राइव्ह हार्मोन आहे. हे हार्मोन स्त्रियांमध्येसुद्धा थोडय़ा प्रमाणात असतं. टेस्टीजमधून बाहेर पडलेले टेस्टास्टेरॉन (टी-हार्मोन म्हणूया) गर्भाच्या रक्तप्रवाहात मिसळतं आणि त्याच्या टार्गेट विभागापर्यंत म्हणजे ‘वुल्फीयन’ सिस्टीम आणि गर्भाच्या मेंदूपर्यंत जातं. त्यामुळे पुरुषलिंग विकसित करणारी ‘वुल्फीयन’ सिस्टीम कार्यान्वित होते. शिवाय स्त्रीगर्भाची वाढ करणाऱ्या ‘मुलेरियन’ सिस्टीमला रोखून धरण्यासाठी टेस्टीजमधून ‘अ‍ॅण्टी-मुलेरियन हार्मोन’ रक्तप्रवाहात सोडलं जातं. त्यामुळे पुरुषगर्भ म्हणजे त्याची लिंगव्यवस्था आणि मज्जासंस्था या दोन्ही टी-हार्मोनच्या प्रभावाखाली येऊन त्या masculnize  होतात. तर दुसरे अ‍ॅण्टी-मुलेरियन हार्मोन, त्या पुरुष गर्भाला defeminised करतं. अशा रीतीने गर्भाशयात पुरुषगर्भ आकाराला येतो.
स्त्रीभ्रूणामध्ये xx क्रोमोझोम असल्यामुळे y क्रोमोझोमची अनुपस्थिती हीच स्त्रीगर्भाच्या विकासासाठी अनुकूल स्थिती असते. टी-हार्मोन नसल्यामुळे गर्भाचे गोनाड्स ओव्हरीजमध्ये बदलतात. या ओव्हरीजमधून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन हार्मोन निर्माण केली जातात आणि प्रथम स्त्रीची अंतर्गत जननेंद्रिये ओव्हरीज फेलोपिन टय़ूब्स, गर्भाशय बनून नंतर बाह्य़ जननेंद्रिये विकसित होतात आणि स्त्रीबालक तयार होतं. मात्र, पुरुषाची बाह्य़ जननेंद्रिये आणि विशेषत: लिंग (penis) तयार होण्यासाठी टी-हार्मोनचे रूपांतर डायहैड्रोटेस्टास्टेरॉन या हार्मोनमध्ये व्हायला लागतं. तरी सामान्यपणे, बहुसंख्य व्यक्तीमधील स्त्री-पुरुष लिंगफरक हा ठरलेल्या नैसर्गिक घटनाक्रमाने अतिशय सुरळीतपणे पार पडत असतो.
मात्र, काही अपवादात्मक उदाहरणामध्ये लिंगनिश्चिती स्पष्टपणाने न होता, द्विधा स्थितीत राहते. फिजियोलॉजिस्ट या स्थितीची चार कारणे मुख्यत्वे देतात. यापैकी पहिल्या प्रकाराला ‘टर्नर सिंड्रोम’ असं म्हणतात. या अवस्थेत गर्भाचा सेक्स क्रोमोझोम हा xx किंवा xy असा नसून, तो  x असा असतो.  हा आईकडून येणारा समजला जातो. म्हणजे वडिलांकडून येणारा सेक्स क्रोमोझोम मिसिंग असतो. अर्थात y नसल्यामुळे मुलेरियन सिस्टीम कार्यरत होऊन बाह्य़ जननेंद्रिये स्त्रीची घेऊन बाळ जन्माला येतं. पालकांना मुलगी झाल्याचा आनंद होतो. परंतु स्त्रीच्या अंडकोश आणि गर्भाशयासाठी दोन x ची गरज असते, त्याबाबत या मुलीमध्ये y असल्यामुळे अंडकोश, गर्भाशय विकसित होत नाहीत. ही गोष्ट मुलगी वयात आल्यावर समजते. बाकी सर्वथा ती स्त्री असते, तरी तिला मूल होऊ शकत नाही.
दुसऱ्या प्रकाराला, अँड्रोजन-इन्सेसिटिव्ह-सिंड्रोम म्हटलं जातं. या प्रकारात टी-हार्मोनला भ्रूण प्रतिसाद देत नाही अशी स्थिती निर्माण होते. भ्रूण जेव्हा मुलगी म्हणून xx असते, तेव्हा टी-हार्मोन निर्माण होण्याचा प्रश्न नसतो. पण भ्रूण जेव्हा मुलगा म्हणून xy असतो, तेव्हा पुरुष घडण्यासाठी असणारी वुल्फीयन सिस्टीम हे टी-हार्मोन स्वीकारत नाही. त्यामुळे गर्भाला पुरुष जननेंद्रिये प्राप्त होत नाहीत, तो जन्माने मुलगा असला तरी! आणि टी-हार्मोन अभावी, स्त्रीची जननेंद्रिये घेऊन घेऊन बाळ जन्माला येतं. पण इथेसुद्धा xx नसल्यामुळे या मुलीमध्ये ओव्हरीज व गर्भाशय नसते. पण स्तन वाढू लागतात. अशा रीतीने मासिक पाळी किंवा गर्भधारणा न होणारी स्त्री, पण जेनेटिकली xy धारण केलेला मुलगा अशी पर्सनॅलिटी तयार होते. पण त्या  गर्भाचा मेंदू masculnize  होत नाही, तो स्त्रीचा राहतो आणि स्त्रीलिंग भावनेमुळे ती स्त्री म्हणून आनंदाने जगू शकते.तिसऱ्या प्रकारात, पुरुष हार्मोन अँड्रोजनची पातळी गर्भामध्ये अतिरिक्त वाढते. अशा स्थितीत गर्भ मुलाचा असल्यास मोठी समस्या उभी राहात नाही. गर्भ मुलीचा असल्यास क्वचित एखादा अपवाद वगळल्यास, बहुसंख्य मुलींची लिंगस्थिती सामान्य असते. या स्त्री गर्भाचा मेंदू मात्र masculniz होऊ शकतो. त्यामुळे जन्मल्यानंतर ही मुलगी ‘टॉमबॉइश’ पद्धतीची असते. तिला मुलांसारखे वागायला, त्यांच्यात मिसळून खेळायला, धाडस करायला आणि मुलांच्या खेळात प्रावीण्य मिळवायला आवडतं. बाकी तिची प्रजोत्पादन व्यवस्था सामान्य स्त्रीप्रमाणे असते. या प्रकारामध्ये पुरुष हार्मोनची पातळी गर्भाशयातील कोणत्या कालखंडात वाढते आणि किती वाढते, यावर, जन्मणाऱ्या बालकावरचे परिणाम दिसून येतात. समजा, स्त्रीगर्भाची अंतर्गत जननेंद्रिये तयार झाली आहेत, पण बाह्य़ जननेंद्रिये तयार व्हायची आहेत, या मधल्या काळात गर्भातील पुरुष-हार्मोन प्रमाणाबाहेर वाढल्यास, त्या स्त्रीभ्रूणाच्या बाह्य़ जननेंद्रियावर परिणाम होऊ शकतो आणि स्त्रीच्या क्लिटोरी, व्हजयना ऐवजी पेनीस आणि स्क्रोटम ही पुरुषाची जननेंद्रिये दिसू लागतात आणि बाळ ‘मुलगा’ म्हणून जन्माला येतो. परंतु जेनेटिकली ती ७७ धारण करणारी मुलगी असल्यामुळे, या मुलाच्या उदरात अंडकोश, गर्भाशय तयार झालेले असतात. वयात येईपर्यंत पुरुषाच्या जननेंद्रियामुळे तो पुरुष म्हणून वाढवला जातो. पण वयात आल्यावर त्याच्या ओव्हरीज, ‘इस्ट्रोजन’ या स्त्री हार्मोनची निर्मिती सुरू करतात आणि त्या तरुणाची छाती स्त्रीसारखी वाढू लागते. शिवाय स्त्री-बीज गर्भाशयात येऊन मासिकद्रव मुलाच्या शिश्नामधून बाहेर येऊ लागतो आणि मासिक पाळी सुरू होते. अशा घटना अतिशय क्वचित अपवादात्मक असतात. निसर्ग सहसा अशी घोडचूक करीत नाही. तरी ज्या एखाद्याच्या बाबतीत त्या घडतात त्या, आतापर्यंत पुरुष म्हणून वाढवल्या गेलेल्या मुलाला प्रचंड धक्कादायक असतात. या परिस्थितीत स्त्रीसारखे स्तन आणि पुरुषासारखे लिंग अशा चमत्कारिक अवस्थेत ते व्यक्तिमत्त्व सापडतं आणि मग त्या व्यक्तीला त्यापैकी काहीतरी एक स्वीकारावं लागतं. म्हणजेच सध्याच्या काळातील संशोधनामुळे लिंगबदल करून घेता येतो किंवा हार्मोनल ट्रीटमेंटने काही प्रमाणात नियंत्रण आणता येतं. नाहीतर पूर्वीच्या काळात अशा स्थितीत अपमानास्पद जगणे किंवा जीवन संपविणे याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.
इथे मग ‘लिंगबदल’ करावयाचा ठरल्यास, या व्यक्तीला स्त्री बनायचंय की पुरुष, हा प्रश्न निर्माण होतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीच्या लिंगभावनेतून मिळतं. याबाबत मग मातेच्या गर्भाशयात असताना भ्रूणाच्या मेंदूचं पुरुषीकरण किती प्रमाणात झालेलं आहे, त्यावर ते ठरतं आणि जन्मानंतरच्या संस्कार-संगोपनावरही अवलंबून असतं. प्रत्येक माणसामध्ये, आपण स्त्री की पुरुष ही उपजत वृत्ती म्हणजे त्याचा लिंगभाव! जो व्यक्तीला विशिष्ट पद्धतीने काम करण्यास, भावना व्यक्त करण्यास, विचार मांडण्यास प्रवृत्त करतो. मेंदूची ही रचनात्मक जडणघडण स्त्री व पुरुष अशी वेगवेगळी असते, जी गर्भाशयात तयार होते आणि ती पुन्हा उलटी फिरवता येत नाही. मेंदूच्या या रचनात्मक जडणघडणीतून तयार झालेली लिंगभावना जन्मानंतरच्या संस्कारातून पक्की रुजते. अर्थात वरील घटनेतील, लिंगपेचामध्ये सापडलेल्या व्यक्तीने स्त्री म्हणून लिंगबदल करून घ्यावा की पुरुष म्हणून करून घ्यावा, याची दिशा सर्वस्वी त्या व्यक्तीचा लिंगभाव ठरवीत असतो.
लैंगिक गोंधळाची स्थिती निर्माण करणारा चौथा प्रकार म्हणजे टेस्टास्टेरॉन हे अँड्रोजन कमी प्रमाणात निर्माण होणे. इथे गर्भ मुलीचा असल्यास समस्या उद्भवत नाही. परंतु गर्भ मुलाचा असल्यास त्याची पुरुषाची जननेंद्रिये घडतात पण मेंदू masculnize  करण्यास टेस्टास्टेरॉन कमी पडतं. या ठिकाणीसुद्धा टी-हार्मोन कमी असण्याचे प्रमाण किती आहे, त्यावर जन्मलेल्या बालकावरचे परिणाम अवलंबून असतात. काही वेळेस जन्मलेल्या पुरुषाची जननेंद्रिये, टी-हार्मोन कमी पडल्यामुळे, सक्षम नसतात तर काही वेळेस जननेंद्रिये सक्षम असतात, पण टी-हार्मोन मेंदूसाठी कमी पडल्याने या पुरुषांची विचारपद्धती, भावना व्यक्त करण्याच्या पद्धती यामध्ये स्त्रीत्व दिसतं. स्त्रियांची देहबोली, स्त्रियांची आभूषणे, केस-पेहराव याचे आकर्षण इथपासून ते पुरुषाबाबत शरीरसंबंधाचं आकर्षण वाटणं, इथपर्यंत या पुरुषांमध्ये वैविध्य दिसतात, ती टी-हार्मोनच्या गर्भाशयात झालेल्या कमतरतेमुळे! असे सध्याचे संशोधक मांडतात. या शारीरिक कारणातून समलैंगिकता उद्भवते. अर्थात प्रत्येक समलैंगिक व्यक्ती शारीरिक कारणांमुळेच समलैंगिक असेल असं नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे.
थोडक्यात, काही व्यक्तींच्या शरीरामध्ये एक लिंगव्यवस्था कार्यप्रवण असते, पण त्यांची लिंगभावना जर विरुद्ध लिंगी असेल, तर त्या व्यक्तीची त्याच्या शरीरातच घुसमट होते. त्याचं व्यक्तिमत्त्व गुदमरू लागतं. आपली जी लिंगभावना आहे, त्यानुसार आपल्याला शरीर मिळावं, अशा अस्वस्थपणाने त्याच्या मनात एक टोक गाठल्यावर लिंगबदलाचा निर्णय, त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीनुसार घेतला जातो. अशा व्यक्तींना मानसिक आधार व बळ मिळणं आत्यंतिक गरजेचं असतं. अशा व्यक्तींना आपल्या अडचणींबद्दल मोकळेपणाने कुटुंबात, मित्रमंडळीत बोलता यावे असा समाजाचा दृष्टिकोन हवा. किंबहुना अशा व्यक्तींची चेष्टा किंवा तिरस्कार करणं हा गुन्हा ठरवला गेला पाहिजे. अशा व्यक्तींनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करताना, काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. ज्या लिंगाचा ती व्यक्ती, शस्त्रक्रियेनंतर स्वीकार करणार आहे, त्याप्रमाणे लिंगानुरूप लिंगभावना तिच्या मनामध्ये अत्यंत भक्कम असायला हवी. न्यायालयीन लढा देणाऱ्या बिधान बरुआमध्ये स्त्रीलिंग भावना अशीच ठाम दिसते आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना शस्त्रक्रियेनंतर जी दीर्घकाळ हार्मोनल ट्रीटमेंट घ्यावी लागते, ती त्या व्यक्तीच्या मनाच्या सुरात सूर मिळवण्यात यशस्वी होते.
प्रत्येक व्यक्तीवर स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून होणारे संस्कार व्यक्तीला मानसिक पातळीवरही घडवत असतात. तरुण वयातील पुरुषाने स्त्री म्हणून लिंगबदल केला तर स्त्री म्हणून स्वत:कडे पाहताना त्याला आपले भोवताल बदलल्यासारखं वाटणार आहे. आपल्या जबाबदाऱ्या बदलणार आहेत, आपल्याकडून कर्तव्याच्या अपेक्षा बदलणार आहेत, समाजाचे नैतिक मापदंड वेगळे असणार आहेत, हे सर्व वास्तव लिंगबदलापूर्वी त्या व्यक्तीने लक्षात घ्यायला पाहिजे. लिंगबदल करू पाहणाऱ्या व्यक्तीने विरुद्धलिंगीप्रमाणे राहण्याच्या नव्या कल्पना आधीपासून स्वीकारलेल्या नसतील तर तिच्यावरील संस्कारसुद्धा काही प्रमाणात त्या व्यक्तीला नैराश्यग्रस्त करतात.
म्हणून अखेरीस लिंगबदल शस्त्रक्रियेतून बदलणारं शरीर, त्यानंतरच्या हार्मोनल ट्रीटमेंटमधून बदलणारं मानस आणि त्यानंतर संगोपनासारखा, व्यक्तीला मागे खेचणारा मुद्दा या सर्वाना तोंड देण्यासाठी माणसाची लिंगभावना स्ट्राँग असावी लागते. खरंतर, माणसाचं लिंग कोणतं आहे, स्त्रीचं आहे की पुरुषाचं आहे? त्यापेक्षा त्या व्यक्तीची जी लिंगभावना असते, त्यानुसार जर त्याला जगायला मिळालं तर त्याच्या मानसिक समस्या तयार होत नाहीत आणि ती व्यक्ती आपल्या जगण्यावर मनापासून प्रेम करते. पुरुष असल्याचा आरोप असलेल्या शांतीसुंदर राजनमध्ये आपण स्त्री आहोत, हा लिंगभाव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकूणच पालकांनी, कुटुंबीयांनी आणि समाजाने स्त्री व पुरुषांच्या लिंगभावनेचा आदर करणं, खूप महत्त्वाचं आहे.
संदर्भ पुस्तके
ब्रेन अँड बिहेवियर - डॉ. ब्रायन कोल्ब - डॉ. इयान व्हिशॉ
बायालॉजिकल फाउंडेशन ऑफ ह्य़ुमन ब्रेन- डॉ. जोसेफाइन विल्सन
फिजिऑलॉजी ऑफ बिहेवियर- नील कार्लसन
दि ट्रूथ अबाऊट हार्मोन्स - व्हिव्हियन पेरी