कायद्याशी मैत्री Print

पूर्र्वी कमानी ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
* मी ६५ वर्षांचा असून माझी मोठी फसवणूक झाली आहे. मी सुमारे २० वर्षांपूर्वी मळवली येथे सुमारे साडेपाच एकर जमीन मूळ मालक असणाऱ्या शेतकऱ्याला पूर्ण रक्कम देऊन त्याच्या एजंटतर्फे घेतली. कलेक्टरपुढे झालेले खरेदीखत व ज्यावर शेतकरी व वारसांच्या सह्य़ा आहेत असे जमिनीच्या हक्कांसंबंधीची कागदपत्रे तेव्हा मला मिळाली. त्यानंतर जमिनीचा सातबारा काढण्यासाठी मी तलाठय़ाकडे गेलो असता त्याने मी शेतकरी नसल्याने जमीन माझ्या नावावर होणार नाही व सातबाराही मिळणार नाही असे सांगितले. नंतर वर्षभरानंतर त्या एजंटने मला नोंदणीकृत स्टँपपेपर व सातबाराचा उतारा आणून दिला, परंतु तो खोटा होता हे नंतर कळले. तरीही या कागदपत्रांपेक्षा कलेक्टरपुढील खरेदीखत माझ्याकडे असल्याने मी शांत होतो.
पण आता त्या जमिनीच्या मूळ मालकाने एजंट व वकिलाच्या मदतीने आणखीन एकादोघांना ती जमीन विकली व त्याचा सातबाराही मिळवला. नंतर मी या जागेवर बांधलेले तारेचे कुंपण मोडून या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला खुनाच्या धमक्या मिळाल्या. पोलिसांनीही मला मदत करण्यास नकार दिला व पुणे तसेच वडगांव येथील न्यायालयात खटला दाखल करण्यास सांगितले. यात आणखी काही वर्षे जातील. तसेच तीन वर्षांपूर्वी ही जमीन खासगी फॉरेस्ट म्हणून जाहीर झाली. माझ्या आयुष्याची सर्व बचत यात अडकली असल्याने मला या जमिनीचा ताबा कसा मिळवता येईल ते कळवावे. आपला सल्ला द्यावा.
- रमाकांत जोशी, दादर
उत्तर- तुमची शंभर टक्के फसवणूक झाल्याचे उघड दिसते आहे. सर्वात आधी तुम्ही स्थानिक दिवाणी न्यायालयात खटला दाखल करा व सदर जागेचे तुम्ही मालक आहात व कायदेशीर मार्गाने जमिनीचा ताबा तुमच्याकडे असल्याचे जाहीर करा. जागेच्या मालकीबाबत तिसऱ्याच व्यक्तीचा हस्तक्षेप व जमिनीच्या मालकी हक्कापासून परावृत्त करणाऱ्यांविरोधात अंतर्गत स्थगिती आणण्याची विनंती न्यायालयाला करा. तुमच्याकडे असलेला या जमिनीचा सातबाराचा उतारा जरी खोटा असला तरी सुदैवाने कलेक्टरसमोर तुम्ही केलेले खरेदीखत कागदपत्रे वैध आहेत. तुम्ही निश्चितपणे त्याचा उपयोग करून खटला दाखल करा. हे करताना निश्चितपणे वकिलाचा सल्ला घ्या व वेळ न दवडता खटला दाखल करा.
*  २००८ सालात, मी चार एकर जमिनीवर असलेली कलम बाग विकली. त्या जमिनीवर दोन हजार चौरसफुटांचा एकमजली बंगला आहे. खरेदीदाराने बंगल्याची किंमत न दिल्यामुळे बंगल्याबाबतचा उल्लेख खरेदीखतात नाही. बंगला जमिनीच्या एका बाजूला आहे. त्याची घरपट्टी मी भरीत आहे. खरेदीदाराला तो बंगला नको आहे. चार वर्षांनंतर त्याने खरेदीखताची नोंद व्हावी म्हणून तलाठय़ाकडे अर्ज केला आहे. तरी सातबाऱ्याच्या उताऱ्यात बंगला व सभोवतालची तीन गुंठे जागा माझ्या नावावर सहहिस्सेदार म्हणून नोंद करता येईल का? जमिनीची किंमत मी देण्यास तयार आहे.
- भाऊ मुंबईकर, जोगेश्वरी
उत्तर- जेव्हा तुम्ही चार एकर कलम बाग विकली त्या वेळी तुम्ही ज्या ठिकाणी बंगला आहे ती जमीनसुद्धा विकली. हा बंगला विक्री व्यवहाराचा भाग नसल्याचा कोणताही उल्लेख तुम्ही केलेला नाही. जेव्हा संपूर्ण प्लॉट विकला जातो त्या वेळी त्या जमिनीशी संबंधित सर्वच बाबी विकल्या जातात. तरीही तुम्हाला जर बंगल्याचा व बंगला उभा असलेल्या जमिनीचा ताबा हवा असेल तर तुम्हाला जमिनीची विभागणी करावी लागेल. अर्थात बागेची खरेदी करणाऱ्या मालकाने सहकार्य केले तर तुम्ही तहसीलदाराच्या मदतीने जमिनीची विभागणी करण्यासाठी अर्ज दाखल करा. यात बागेच्या ज्या जमिनीवर बंगला आहे त्या जमिनीचे तुम्ही मालक असल्याचे जाहीर करा. मात्र बहुधा ही शेतजमीन असावी. त्यामुळे तुमच्या जमिनीपैकी काही जागा शेतजमीन म्हणून राखीव ठेवण्याची काळजी घ्यावी लागेल.
*  माझे लग्न होऊन १६ वर्षे झाली. मला १५ वर्षांचा मुलगा आहे. माझ्या पतीचा माझ्याबरोबरचा दुसरा विवाह आहे. पहिला घटस्फोट झाला त्यानंतर सहा वर्षांनी दुसरे लग्न झाले. दरम्यानच्या काळात माझा असा संशय आहे की, पतीने कुटुंबाला नकळत दुसरे लग्न केले व मला फसविले. परंतु काही पुरावा उपलब्ध नाही. या लग्नापासून त्यांना एक अपत्य आहे असेही मध्यंतरी त्यांना आलेल्या एका एसएमएसवरून वाटते. विषय काढला तर ते काही बोलायला तयार नाहीत. माझे प्रश्न- १. मी नोकरी करीत नाही. त्यामुळे माझे व माझ्या मुलाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी मला काय करावे लागेल? २. कोणत्याही दस्तावेजावर नॉमिनी असणे व इच्छापत्रातील नाव यात काय फरक आहे? जर इच्छापत्रात इतर लोकांना हिस्सा दिला असेल तर कोणते कायदेशीर मानतात?
- ज्योती पेठे, मुंबई
उत्तर- तुमचा प्रश्न नॉमिनी अर्थात नामनिर्देशित व्यक्ती व इच्छापत्रातील वारसदार यांच्यात काय फरक आहे असा आहे- लक्षात घ्या, नामनिर्देशित व्यक्ती फक्त विश्वस्त असते. इच्छापत्रानुसार जर एखादी मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर केली असेल तर त्याला यात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नॉमिनीला नाही. स्वकष्टार्जित मालमत्ता आपण इच्छापत्रात नमूद करून कुणाच्याही नावे करू शकतो. ही मालमत्ता कुटुंबाच्याच नावे केली पाहिजे, असा नियम नाही. तुम्ही नोकरी करीत नसल्याने अडचणीच्या परिस्थितीत आहात. अर्थार्जनाबाबत सावध राहा. तुम्ही राहत असलेल्या घराचे सहभागीदार म्हणून नवऱ्याच्या नावासह तुमचे नाव घालून घ्या. जर तुम्ही एखाद्या गृहनिर्माण सहकारी संस्थेत राहत असाल तर शेअर सर्टिफिकेटमध्ये तुमचे नाव घालून घ्या. बँकांच्या सर्व खात्यांमध्ये सहदावेदार म्हणून नाव लावून घ्या. पतीच्या नावे एखादी विमा पॉलिसी घ्यायला लावा व लाभार्थी म्हणून मुलाचे नाव घालून घ्या. त्यातूनही जर तुम्ही स्वत: उत्पन्नाचे साधन शोधले तर तुमच्या व मुलाच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी हितकारक ठरेल.
तुमचे  कायदेविषयक  प्रश्न थोडक्यात पाठवा या पत्त्यावर - ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it