एक उलट.. एक सुलट : ‘वर्क ऑफ आर्ट’ Print

अमृता सुभाष ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘ब्यूटिफुल यंग पीपल आर अ‍ॅक्सिडंट्स ऑफ नेचर बट ब्यूटिफुल ओल्ड पीपल आर वर्क्स ऑफ आर्ट.’.. मला असं सुंदर म्हातारं व्हायचं आहे. त्यासाठी मी माझ्या डॉक्टर दिलीपमामाचं दिलखुलास हसू मनात जपून ठेवणार आहे..
माझं आजोळ रहिमतपूर. तिथे आमच्या अण्णांचा, माझ्या आईच्या वडिलांचा दवाखाना होता. तो अण्णांनंतर माझ्या मामांनी- दिलीपमामांनी चालवायला घेतला. मला एकूण तीन मामा. पैकी दिलीपमामा मधला. माझ्या या जगात येण्याला दिलीपमामाच कारणीभूत आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये!
माझी आई ज्योती आणि दिलीपमामा सातारला शिकायला एकत्र होते, तेव्हा सुभाष नावाचा दिलीपमामाचा एक लाडका मित्र होता. एकदा दिलीपमामा घरी नसताना सुभाष ऊर्फ सुब्या घरी आला. घरी दिलीपची धाकटी बहीण. अर्थात, माझी ‘वुडबी’, ‘मातोश्री’ ज्योती होती. सुब्या व ज्योती यांची ही पहिली भेट! पुढे उनकी लव्ह इस्टोरी में काय काय घडत गेलं हे माझ्यापेक्षा दिलीपमामाच जास्त चांगलं सांगू शकेल, पण थोडक्यात सांगायचं तर ज्योतीची ज्योती सुभाष झाली. आता दिलीपमामा आणि बाबांची मैत्रीच नसती तर मी या जगात आले असते का?
असं असलं तरी मला आणि आम्हा सर्व भावंडांना दिलीपमामाची लहानपणी फक्त भीती आणि भीतीच वाटलेली आहे. याला कारण त्याच्या हातातलं ते ‘इंजेक्शन’! रहिमतपूरला बाहेर दवाखाना होता. तो ओलांडला की चौकवजा अंगण आणि ते ओलांडलं की आत घर. लहानपणी घरात खेळत असताना बाहेरच्या दवाखान्यातून एखाद्या लहान पोराची आर्त, करुण किंकाळी ऐकू आली की आमचा ठोका चुकायचा. आम्ही धावत दवाखान्यात! त्या पोराला त्याच्या खेडवळ आईबापांनी आईच्या मांडीवर आडवा करून घट्ट पकडलेलं असायचं. उजवीकडच्या टेबलावर चहाच्या भांडय़ासारख्या भांडय़ात इंजेक्शन उकळायला ठेवलेलं असायचं. दिलीपमामा ते शांतपणे चिमटय़ाने धरून बाहेर काढायचा. त्याला सुई जोडायचा. त्या पोराच्या रडण्याचा आवाज वाढायला लागायचा. आमचेही प्राण डोळ्यात यायचे. ‘आपण त्याच्या ठिकाणी नाही’ एवढंच काय त्या भीषण भयनाटय़ातलं सुख! दिलीपमामा इंजेक्शनची सुई एका छोटय़ा बाटलीच्या रबरी बुचात खुपसायचा. बाटलीतलं रंगीत काहीतरी, इंजेक्शनची सीरिंज मागे जात असताना इंजेक्शनमध्ये उतरायला लागायचं. आता पोराच्या रडण्याचा आणि आमच्या छातीतल्या ठोक्यांचा आवाज शिगेला पोचायचा. दिलीपमामाला हे काहीही ऐकूच येत नसल्यासारखा तो शांत असायचा. मग राम नावाचा दिलीपमामाचा असिस्टंट त्याला कापसाला काहीतरी लावून द्यायचा. आता क्लायमॅक्स सुरू. त्या पोराची चड्डी खाली ओढली जायची. ते लाथा झाडू लागायचं. त्या सगळ्या गदारोळात दिलीपमामा अर्जुनाप्रमाणे त्याच्या हलणाऱ्या खुब्याचा वेध घ्यायचा. त्यावर कापूस चोळून मग अचूक, अलगद ती सुई त्याच्या खुब्यात! इथे पोराचा टाहोऽऽ, आई-बाप ओरडतायेत, सगळा गोंधळ! दोन क्षणांनी तितक्याच अचूक, अलगदपणे सुई बाहेर. पुन्हा कापूस चोळून चड्डी खुब्यावर आणि या इंजेक्शन नाटय़ावर पडदा! पण नाटकाचा मुख्य हीरो पडदा पडूनही रडतच असायचा. मग दिलीपमामाचा हात आमच्या आवडत्या गोष्टीकडे जायचा. डावीकडच्या औषधांच्या रॅकमध्ये एका मिकीमाऊससदृश गोड प्राण्याचं तोंड असलेली निळ्या झाकणाची बाटली होती. ती उघडली जायची. त्यातून गुलाबी रंगाच्या मंद गोड वासाच्या गोळ्या बाहेर यायच्या. दिलीपमामा त्या गोळ्या त्या रडणाऱ्या हीरोच्या आणि आम्हा घाबरलेल्या प्रेक्षकांच्या हातात ठेवायचा. आम्ही गोळी चघळत जड पावलांनी घराकडे यायला लागायचो. गोळी फारच छान असायची, पण त्या आनंदावर ‘आपल्यावर घरी इंजेक्शनची वेळ आली तर’ नावाच्या भीतीचं सावट असायचं. घरी आम्ही कुणीही जर दंगा केला, मोठय़ांचं ऐकलं नाही तर मोठी माणसं फक्त ‘ए दिलीऽऽप, इंजेक्शन घेऊन ये रेऽऽ’ असं दवाखान्याकडं बघत ओरडायची. खरं तर त्यांच्या या हाकेला दिलीपमामा दवाखान्यातून ‘ओ’सुद्धा द्यायचा नाही. तो आम्हाला कधी ओरडलाही नाही, पण तरी त्याची भीती वाटायचीच.
दिलीपमामा ओरडायचा तर नाहीच कधी, उलट लाडच करायचा. रहिमतपूर तसं खेडेगाव असूनही तिथल्या बाथरूममध्ये ‘मोती’ किंवा ‘पीअर्स’ साबण असायचा. त्याचं मला अप्रूप वाटायचं. तसं मी म्हटलं की दिलीपमामा न फोडलेला एखादा साबण मी निघताना बरोबर द्यायचा.
गुरुवारी रहिमतपूरचा बाजार असायचा. त्या दिवशी तर दवाखान्यात पेशंट्सची झुंबड असायची. दिलीपमामा सक्काळपासून दवाखान्यात उभा असायचा. त्याला जेवायला दुपारचे चार वाजायचे. जेवून थोडी विश्रांती घ्यायला म्हणून तो पडणार तोच ‘बापूऽऽ’ अशी पेशंट्सची हाक ऐकू यायची. गावात सगळे त्याला नावानं हाक न मारता ‘बापू’ का म्हणायचे कुणास ठाऊक!
दिलीपमामा सगळ्यात नंतर जेवायचा, पण सगळ्यात आधी उठायचा, पहाटे पाचला असावा. मग रेडिओ लावायचा. त्याला स्वत:लाही गायला खूप आवडतं खरं तर. खडय़ा आवाजात छान गातो. अजूनही घरातले सगळे जमले की मावशी, आई, आम्ही बहिणी, दिलीपमामाची बायको राधामामी, आम्ही सगळे गातो. तो त्या बैठकीत असतो. राधामामीचं ‘टाळ बोले चिपळीला’ मन लावून ऐकतो. मग त्याला आग्रह होतो, पण तो अजिबात बधत नाही. अगदी क्वचित गातो. खूप छान, डोळे मिटून, खडय़ा आवाजात. तेव्हा तो फार छान दिसतो. आत्मरत.. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद छान हसू असतं.
हा ‘आत्मरत’ दिलीपमामा मला दिसायला बरीच वर्षे जावी लागली. लहानपणी आम्ही आमच्यातच असायचो, नाहीतर आज्जी आजोबांमध्ये तो बडबडा नव्हता. आमच्या घरातल्या इतरांप्रमाणे जोरदार आरडाओरड करत गप्पा झाडणाराही नव्हता. लहानपणी बसून कधी त्याच्याशी गप्पा मारलेल्या आठवत नाहीत. तो शांतच असायचा. त्याला फारसे विनोद करता यायचे नाहीत. विनोद झाले तर त्याच्यावरच व्हायचे. अण्णा बाहेरच्या हॉलमध्ये बसून मोठय़ांदा तो मेडिकलला नापास झाला त्याविषयी बोलायचे तेव्हा मला कसंतरी व्हायचं. तो त्या वेळी तिथून गेला तरी हे बोलणं त्याच्याविषयी नसून दुसऱ्याच कुणाविषयी तरी असल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर असायचे. माझे बाबा त्याचे जुने मित्र. ते त्याची कुठली तरी जुनी आठवण सांगायचे. त्या सगळ्या आठवणी सर्व मित्रांनी मिळून दिलीपमामाला कसं फसवलं याच्याच असायच्या. सगळे हसायचे. दिलीपमामा काही न बोलता मंद हसायचा.
लहानपणी शांत वाटणारा दिलीपमामा आता मात्र छान गप्पा मारतो. आता तो आणि राधामामी रहिमतपूर सोडून पुण्यातच माझ्या आईच्या घराजवळ राहायला आलेत. तो रोज सकाळी फिरायला बाहेर पडतो आणि आईकडे चहाला येतो. जर कधी मी किंवा माझा नवरा संदेश असेल तर त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगतो. एकदा म्हणे रहिमतपूरला, आमच्या घरी खूप पाहुणे आले. इतर भावंडं लहान, त्यामुळे सगळी कामं दिलीपमामावरच येऊन पडायची. ‘हे आण’, ‘ते आण’ करता करता त्याला इंग्लिशच्या क्लासच्या शिक्षकांनी दिलेलं भाषांतराचं काम करायला वेळच झाला नाही. लहानगा दिलीपमामा क्लासला गेल्या गेल्या प्रामाणिकपणे म्हणाला, ‘‘सर, कालचं भाषांतर घरी पाहुणे आल्यामुळे राहिलं, पण उद्या मी कालचं आणि आजचं अशी दोन्ही भाषांतरं करून आणेन.’’ त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्या सरांनी फाडकन् त्याच्या डाव्या गालावर मुस्काटात दिली. तो रडत घरी आला. अण्णांना, त्याच्या वडिलांना म्हणाला, ‘‘मी उद्यापासून इंग्लिशच्या क्लासला जाणार नाही.’’ त्यांनी का विचारल्यावर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. अण्णा म्हणाले, ‘‘सरांनी कुठल्या गालावर ठेवून दिली?’’ तो म्हणाला, ‘‘डाव्या.’’ अण्णांनी फाड्दिशी त्याच्या उजव्या गालावर ठेवून दिली.
तसंच एकदा म्हणे एकोणिसशे सत्तावन्न साली यशवंतराव चव्हाण निवडणुकीला उभे होते. त्यांचं पोस्टर शेजारच्यांच्या भिंतीवर लावलेलं होतं. ते कुणीतरी फाडलं. तेव्हा दिलीपमामा तिथे फक्त उभा होता. अण्णांचे एक स्नेही तेव्हाच तिथून जात होते. त्यांनी अण्णांना सांगितलं, ‘‘तुमच्या दिलीपनं पोस्टर फाडलं.’’ झालं, दिलीपमामा घरी आला. अण्णा म्हणाले, ‘‘जा गोठय़ातनं ओलं चिपाड शोधून आण.’’ त्याने आणलं आणि अण्णांनी त्याला फोडून काढलं. हे सगळं सांगताना दिलीपमामा दिलखुलास हसत सांगतो, ‘‘म्हणजे बघ हं, आपणच आपल्याला मारण्यासाठी ओलं चिपाड शोधून आणायचं! वाळकं मोडेल ना, म्हणून ओलं!’’ हे सगळं ऐकून जर मी कधी म्हणाले, ‘‘काय हे अण्णांचं वागणं!’’ तर तो तितक्याच दिलखुलासपणे हसता हसता म्हणतो, ‘‘अगं पण तेव्हा काही वाटायचं नाही गं त्याचं. आमच्या मनात कधीही घर सोडून जायचे किंवा आत्महत्येचे विचार आले नाहीत.’’
  दिलीपमामाची आई लहानपणीच गेली. मग आमच्या आजोबांनी, अण्णांनी दुसरं लग्न केलं. माझी आजी, माझ्या आईची आई तो लहान असताना लग्न होऊन घरी आली. दिलीपमामाने माझ्या या आजीवर खूप प्रेम केलं. परवाच त्याचा एकाहत्तरावा वाढदिवस होता, तेव्हा तो आईला माझ्या आजीविषयी म्हणाला, ‘‘माणसं जोडणं मी आईकडून शिकलो. आईने माझ्यासाठी खूप केलं. मी सातारला शिकायला असताना कुणीही रहिमतपूरहून येणार असेल तर ती माझ्यासाठी डबा पाठवायची. मी ते कधीही विसरणार नाही.’’ त्याच दिवशी मी त्याला फोन केला तर म्हणाला, ‘‘माझ्या आयुष्यात मला नाना (त्याचे आजोबा), अण्णा असे पूर्वज तर चांगले लाभलेच, पण पुढे बकुल (त्याची मुलगी), सलील (जावई) अशी पुढची माणसंही चांगलीच भेटली. तेव्हा जाणवलं, मला बघताना याच्या आयुष्यातले काही प्रसंग कटू, कडवट दिसतात, पण त्याला ते वेगळेच दिसलेत का. आज एकाहत्तराव्या वाढदिवशी मागे वळून बघताना त्याला सगळं चांगलंच दिसतं आहे. मला वाटतं आहे आयुष्याने त्याला अजून द्यायला हवं होतं, पण तो म्हणतो आहे, ‘मला भरभरून मिळालं..’ काही असंही असेल, न मिळालेलं, हवं असलेलं.. पण त्याच्या नातवाला, सारंगला खेळवताना त्याच्या हसण्याला कडवटपणाची किंचितशी पण झालर नाही. तो आसपास असला की शांत वाटतं. तो भेटला की मला छान जवळ घेऊन त्याचं प्रेम माझ्यापर्यंत पोचवू शकतो. माझं प्रेम त्याच्या मोकळ्या हसण्याने घेऊ शकतो. तो पुण्याला येऊनही रहिमतपूरहून त्याच्या जुन्या पेशंट्सचे त्याला औषधं विचारायला फोन येत असतात. अजून काय पाहिजे. माझा नवरा संदेश त्याला म्हणतो तसं तो ‘मुरलेल्या लोणच्यासारखा’ प्रेमात मुरलेला माणूस आहे.
दिलीपमामा आमच्या फॅमिलीचा डॉक्टर. त्याचं नाव डॉ. दिलीप देशपांडे योगायोगाने मुंबईतल्या माझ्या फॅमिली डॉक्टरचं नाव पण डॉ. देशपांडेच आहे. त्यांच्या केबिनबाहेर एक वाक्य लिहिलेलं आहे, ‘ब्यूटिफुल यंग पीपल आर अ‍ॅक्सिडंट्स ऑफ नेचर बट ब्यूटिफुल ओल्ड पीपल आर वर्क्स ऑफ आर्ट.’.. मला असं सुंदर म्हातारं व्हायचं आहे. त्यासाठी दिलीपमामाचं दिलखुलास हसू मी मनात जपून ठेवणार आहे.