पालकत्वाचे प्रयोग : संवेदनशील Print

आई - बाबा तुमच्यासाठी
नीता नाग ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ईशानीला यशस्वी माणूस म्हणून घडवत असताना तिच्यातील संवेदनशील व्यक्ती अधिक संपन्न कशी होईल, याकडे आम्ही जातीने लक्ष दिलं. मेडिकलला प्रवेश घेण्याइतपत मोठी होईपर्यंत ती मोगऱ्याच्या फुललेल्या कळ्यांना गुड मॉर्निग म्हणणं आणि जखमी पोपटांना घरी आणण्याइतपत संवेदनशील झाली होतीच.
A Child gives birth to Mother!
बांद्रा रेक्लमेशनला जाताना उजव्या हाताला आई-मुलाचा एक पुतळा आहे. तिथे हे वाक्य कोरलेले आहे. पहिल्यांदा जेव्हा मी हे वाचलं, तेव्हापासूनच मी या वाक्याच्या प्रेमात पडले. आपल्याकडे म्हणतात ना, ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई!’ पालकत्वाचा अनुभव वाचला आणि ईशानीच्या जन्मापासून आतापर्यंतच्या प्रवासाचा पुन:प्रत्यय आला.
खूप प्रतीक्षेनंतर घरात आलेली ‘देवाची देणगी’ सोनपावलांनी घरात रांगू फिरू लागली. आयुष्याला लय आली. इवलेसे हात टाळ्या पिटून सगळं व्यवस्थित अनुभवू लागले.
आमच्या घरात मराठीने केला बंगाली भ्रतार! त्यामुळे जशी मराठी बालगीते, बडबडगीते यांच्या कॅसेट आल्या, तशाच सुकुमार राय (सत्यजीत रेंचे वडील) यांच्या ‘छडा’ (बालगीत) कॅसेटही आल्या. जितक्या आवडीने ‘चॉकलेटचा बंगला’ पाठ झालं, तितक्याच आवडीने ‘झमझमीये वृष्टी पडे, माथायीदय छाला’ हेसुद्धा पाठ झाले. सगळ्यांना कौतुक वाटू लागले.
बोलता यायला लागल्यापासून मी तिच्याशी मराठीत व बाबा बंगालीत बोलायचे. तिचे बाबांना, कॅनो? म्हणजे का? व एटाकी? म्हणजे हे काय? असे सतत प्रश्न असायचे. त्या प्रत्येक ‘का’चे उत्तर तिचे बाबा न कंटाळता, तिचे समाधान होईपर्यंत देत असत. त्यामुळे लहानपणापासूनच ती दोन्ही भाषा अस्खलितपणे बोलू लागली.
बाजारातून जाताना पांढरी-लाल बांगडी हातात दिसली, की मी हटकून विचारायचे, इथे कोणी गाणं शिकवणारं आहे का? श्रीमती करुणा भट्टाचरयचा पत्ता मिळाला. पण चार-साडेचार वर्षांची मुलगी लिहिणार कशी रागदारी? तिच्याबरोबर मी वही पेन घेऊन Sa, Re, Ga, Ma अशी इंग्रजीतून रागदारी लिहू लागले. पहिल्या परीक्षेचे सात राग, आलाप-तानांसकट माझे पाठ झाले. या इंग्रजी सारेगमने तिला प्रथम वर्ग मिळवून दिला. मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. बंगाली, हिंदी, मराठी सगळ्या भाषांमध्ये गाणे सुरू झाले. आम्हा दोघांनाही गाण्याची खूप आवड! खूप गाणी ऐकायचो. तिला आवडलेले गाणे इंग्रजीत लिहून वही तिच्या पुढे ठेवायचो. एकीकडे कॅसेट रिपीट करायचो. आम्ही तिघेही अगदी उत्साहात ते गाणे बसवायचो.
मग कल्याणच्या सावंत सरांमुळे खरं गाणं सुरू झालं! प्रत्येक गुरुवारी सर घरीच येत असल्याने माझ्यासाठी ती एक मैफलच असायची. मी जवळच बसून ऐकायची. पुढे श्रीकांत शुभदा दादरकरांकडे नाटय़संगीताचा डिप्लोमा पूर्ण करून आमच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसाला तिने ‘क्षण आला भाग्याचा’ हे गाणे म्हटले तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून आलाच, पण आलेल्या प्रत्येकाच्या नजरेतली पावती डोळ्यात पाणी आणून गेली. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधून पण तिने गाण्याचे गोल्ड मेडल आणले होते.
माझी आई, मराठीत एम. ए. व संस्कृतची शिक्षिका! तिच्या बोलण्यात कायम संस्कृत सुभाषितं व म्हणी असतात. त्यामुळे ती सुभाषितं व म्हणी केव्हा कुठे वापरायच्या याचे मुलीलाही अचूक भान आलं आहे. शिकवायला आहे म्हणून दहावीला संस्कृत घेऊन चांगली टक्केवारी मिळवली.
लहानपणी आजीकडे सुटीत गेलं की, स्वीमिंग, सायकलिंग शिकायचं म्हणून हट्ट करायचा! मग आजी पहाटे उठून तिला स्वीमिंगच्या क्लासला घेऊन जायची. तलावाच्या काठावर बसून आजी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायची.
आम्हाला दोघांनाही वाचनाची खूप आवड. घरी असायचो तेव्हा तिला चांगली पुस्तके वाचून दाखवायचो. तिच्या बरोबर ‘श्यामची आई’ वाचताना पुन्हा लहान होऊन रडले. वीणा गवाणकरांच्या ‘एक होता काव्‍‌र्हर’चं जाहीर वाचन सगळ्यांना स्फूर्ती देऊन जायचं! सलील कुलकर्णी व संदीप खरेंची, ‘दिवस असे की..’ आम्ही दोघींनी गळ्यात गळे घालून बाल्कनीतल्या बगीचात बसून सहनुभवली.
या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक ‘संवेदनशील माणूस’ घडवू शकलो याचं समाधान आहे आम्हाला! गॅलरीतल्या मोगऱ्याला पहिली कळी आली तरी ‘गुडमॉर्निग’ म्हणून स्वागत करायला लावलं! पक्ष्यांसाठी दाणा-पाणी ठेवता ठेवता जखमी पोपटाला घरात आणून त्याचे नाव ‘नंदी’ ठेवून त्याला उडायला शिकवले. उडून गेल्यावर परत भेटायला आला तर सारं घर आनंदानं भिरभिरलं! असे किती पाहुणे! कबुतर, कावळा, कोकीळ, खार, साळुंकी बरे झाले नी उडून गेले. मांजराची पिले तर फ्रॉकच्या ओच्यातून घरी आली की मग बाबांना घेऊन परळच्या व्हेटर्नरी हॉस्पिटलची वारी ठरलेली.
सगळ्या कॉलनीत ईशानीला पक्षिमित्र, प्राणिमित्र म्हणून ओळखतात. मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळाल्याचा नमस्कार करायला गेली तेव्हा सगळ्या काकू, दासगुप्ता, मंडल, नाईक, चौरासिया सगळ्यांना भरून आलं. म्हणाल्या, खूप भाग्यवान आहात तुम्ही! शंभरात एखादीच मुलगी अशी असते. आम्हाला तरी काय हवे होते अजून? कोणत्याही ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये भाग घेऊ दिला नाही, पण रिअ‍ॅलिटीत वागण्याची शिदोरी मात्र बरोबर दिली.