हे राष्ट्र प्रेषितांचे : ‘कर्नल’ Print

डॉ. रोहिणी गवाणकर, शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कॅप्टन लक्ष्मींना भेटायचंच हा निर्धार केलेल्या डॉ. रोहिणी गवाणकरांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना शोधून काढलंच आणि त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्धार बोलून दाखवला, तेव्हा कॅ. लक्ष्मींनी त्यांना १० दिवस त्यांच्या घरी मुक्कामीच बोलावलं. या काळात रोहिणीताईंना कॅप्टन लक्ष्मी अधिक जवळून अभ्यासता आल्या.

त्यांच्या दीदी झालेल्या कॅप्टन लक्ष्मीचं नुकतंच निधन झालं. त्यानिमित्ताने हा खास लेख. कॅप्टन ते लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचलेल्या एका स्त्रीच्या असामान्य धैर्याची, कर्तृत्वाची ही गाथा.
हिंदुस्थानच्या इतिहासात हातात तलवार घेऊन रणांगणात मर्दुमकी गाजविणाऱ्या स्त्रिया प्रसिद्ध आहेत. अकबरसारख्या प्रबळ शत्रूशी टक्कर देणारी चांदबीबी व बुंदेलखंडची राणी दुर्गावती, औरंगजेबला जेरीस आणणारी, शिवाजी महाराजांची सून ताराराणी, राणी चेन्नमा, नरगुंदकर राण्या, १८५७ मध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी राणी लक्ष्मीबाई, भीमाबाई शिंदे, बेगम हसरत महल, माता तपस्विनी अशी यादी आणखीही वाढेल. त्यांच्या काळात एकछत्री साम्राज्याची कल्पना नव्हती. त्या सगळ्या आपापल्या छोटय़ा-छोटय़ा जहागिरीवजा राज्यासाठी लढल्या. या सगळ्यात आपल्या वेगळ्या वैशिष्टय़ाने उठून दिसते ती विसाव्या शतकातील रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन - (सहेगल).
अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी हिंदुस्थानात प्रथम लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशांनी अहिंसक लढे दिले. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’, या विचारावर विश्वास असणाऱ्या सुभाषबाबू बोस यांनी जर्मनीत आझाद हिंद फौजेची स्थापना केली. साऊथ ईस्ट आशियात आल्यावर त्यांनी इंडियन नॅशनल आर्मीचे आझाद हिंद फौज हेच नामकरण केले व त्या फौजेची राणी झाशी रेजिमेंट ही महिलांची पलटण स्थापन केली. या पलटणीची प्रमुख म्हणून नेमणूक झाली ती हिंदुस्थानातून मलायामध्ये व्यवसाय करण्यासाठी गेलेल्या डॉ. लक्ष्मी स्वामिनाथनची. त्याच लक्ष्मी स्वामिनाथन म्हणजे आपल्या कॅप्टन लक्ष्मी.
कॅ. लक्ष्मींचा जन्मदिन २४ ऑक्टोबर १९१४. त्यांचे वडील बॅ. स्वामिनाथन हे चेन्नईतले प्रसिद्ध वकील. एक असे देशभक्त की ज्यांना इंग्रजांवर त्यांनीच दिलेल्या शिक्षणाने मात करायची होती. त्यामुळे आपल्या मुलींसाठी एक गव्हर्नेस व बायकोला तमीळ व इंग्रजी शिकवायला शिक्षक नेमले. मुलांना इंग्लंडला शिकायला पाठविले व लक्ष्मी व मृणालिनी यांना मिशनरी शाळेत घातले. गव्हर्नेस त्या मुलींना इंग्रजी रीतीरिवाज, खाणे-पिणे यांचे धडे देई. इंग्रजांचे राज्य हे भारताला वरदान कसे आहे हे मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करी. घरात एकमेकांशी फक्त इंग्रजीतच भाषण. आई अम्मू व स्वामिनाथन यांचे बहुतेक मित्रमंडळ इंग्रज. त्यामुळे उठणे, बसणे सर्व इंग्रज लोकांतच. पेहरावही फ्रॉक, सॉक्स-बूट, बॉबकट असा. अशा वातावरणात फरक घडवून आणला एका प्रसंगाने.
बॅ. स्वामिनाथन यांच्याकडे आली होती एका जमीनदाराच्या मुलाची केस. हा मुलगा कदंबूर (Kadambur) च्या जहागीरदाराचा अज्ञान मालक. त्याच्यासाठी कोर्टाने ‘डेल्ला’ नावाचा पालक नेमला होता. एके दिवशी जहागीरदाराच्या अज्ञान मुलाने आपल्या कोर्ट ऑफ वॉर्डवर प्राणघातक हल्ला केला व तो पालक त्या हल्ल्यामुळे मेला. मुलगा अगदीच लहान असल्यामुळे त्याचे वकीलपत्र बॅ. स्वामिनाथन यांनी घेतले व तो मुलगा निर्दोष सुटला. एका इंग्रजाच्या खुनाचे वकीलपत्र बॅरिस्टर स्वामिनाथन यांनी घेतले म्हणून या परिवाराला संबंधित सर्व इंग्रज स्त्री-पुरुषांनी बहिष्कृत केले. शाळेत लक्ष्मी व मृणालिनी यांच्याशी मुलेच काय पण शिक्षकही बोलेनात. अपवाद होता मृताची सख्खी बहीण प्राचार्य मिस डेल्ला यांचा. शेवटी दोघी मुलींना तिथून काढून मद्रास स्कूलमध्ये घातले गेले. गव्हर्नेस सोडून गेली. घरात सर्व भारतीय पद्धतीने सुरू झाले. लक्ष्मी व मृणाल दोघीजणी घेरदार मद्रासी परकर व कमरेपर्यंतचा पोलका घालू लागल्या. घरात इंग्रजीऐवजी तमीळ व आईची मल्याळी भाषा बोलली जाऊ लागली. इंग्रज राज्यकर्ते म्हणून वेगळे व मित्र म्हणून वेगळे, अशी त्यांची दोन रूपे लक्ष्मीच्या तल्लख बुद्धीतून निसटली नाहीत. त्याच वेळी महात्मा गांधीजींची असहकाराची चळवळ सुरू झाली. लक्ष्मीने आपले सर्व परदेशी कपडे व वस्तू होळीत टाकल्या. म. गांधींबद्दल तिला परम आदर वाटत होता तो अगदी शेवटपर्यंत. आई अम्मू स्वामिनाथन अखिल भारतीय महिला परिषद, मद्रास महिला संघ यात सामील झाल्या व काँग्रेसमध्येही सामील झाल्या.
१९२८ मध्ये कोलकाता काँग्रेसला लक्ष्मी आईबरोबर गेली होती. सुभाषबाबूंनी २०० स्वयंसेविकांकडून गणवेशात संचलन करून घेतले. सुभाषबाबूंची व लक्ष्मीची त्या वेळी ओळख झाली नाही, पण त्यांच्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा मात्र तिच्यावर खूप परिणाम झाला. १९३०च्या सविनय कायदेभंगाच्या मिरवणुकीत भाग घेतल्याबद्दल लक्ष्मीला अटक झाली, पण संध्याकाळी सोडले. शाळा, कॉलेजवर बहिष्कार घालून शिक्षण सोडणे ही कल्पना लक्ष्मीला पटली नाही. देशाच्या स्वातंत्र्याकरिता शिक्षण हवेच व ते त्या वयातच घेतले पाहिजे, असा तिचा ठाम विश्वास होता. मात्र या चळवळीत आपल्या अंगावरचे सर्व दागिने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या मदतीसाठी दिले.
हिंदी स्वातंत्र्याच्या इतिहासात मीरत कटाच्या प्रकरणाला फार महत्त्व आहे. कॉ. डांगे, कॉ. जोगळेकर, कॉ. मिरजकर इत्यादी त्या खटल्यातील आरोपी होते. सरोजिनी नायडूंची बहीण सुहासिनीचा संबंध या कटाशी आहे या संशयावरून तिच्यावर पहारा होता. सुहासिनी जर्मनीहून बोटीचे तिकीट न काढता घुसून मुंबईला आली होती. तिच्यावर पोलिसांचा कडक पहारा होता. चट्टोपाध्याय व स्वामिनाथन यांचे मित्रत्वाचे संबंध होते. सुहासिनीची प्रकृती खूप खालावलेली होती. तिला शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज होती, म्हणून ती मद्रासला सासूच्या घरी आली. त्यामुळे आता पहारे अम्मूच्या घरावरही बसले. सुहासिनीचे लक्ष्मीच्या आयुष्यात पदार्पण हा तिच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सुहासिनीकडूनच तिने राजकारणाचे प्राथमिक धडे घेतले. गांधी व नेहरू यांच्याकडून कधीही समग्र क्रांती होणार नाही. त्यांचे राज्य हे श्रमजीवींचे असणार नाही. जगभर श्रमिक भरडला जातोय. म्हणून समाजवादाला पर्याय नाही असे सुहासिनीने लक्ष्मीच्या मनावर ठसविले. लक्ष्मी एम.बी.बी.एस.चा अभ्यास करीत होतीच, पण त्याचबरोबर रशियन राज्यक्रांती, रशियामध्ये साम्यवादाचा उदय वगैरे जे जे साहित्य मिळेल ते वाचत असे. ‘एडगर स्नोचे Red star over China या पुस्तकाचा तिच्यावर खूपच प्रभाव पडला. जे पटेल तेच स्वीकारायचे व कितीही विरोध झाला तरी करायचे हे तिथे ध्येय होते. हे सगळे जे तिला अनुभव आले त्यातूनच ती पुढे पक्की कम्युनिस्ट बनली.
लक्ष्मी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच बी. के. एन. राव नावाच्या विमानचालकाशी परिचय होऊन तिचा विवाहही झाला. शिक्षण पुरे झाल्यावर लग्न करण्याचा आईचा सल्लाही न मानता तिने लग्न केले. लग्नानंतर लगेचच लक्ष्मीचा भ्रमनिरास झाला. राव यांना आपली सुंदर पत्नी म्हणजे एक सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारी गोष्ट वाटत होती. त्यांनी तिला कॉलेज सोडून संसार करायचा असे बजावले. लक्ष्मीने दहा वर्षांची असतानाच डॉक्टर होऊन स्त्रियांचे आरोग्य सुधारायचे ठरविले होते. आपल्या ध्येयापुढे आड येणाऱ्या प्रेमविवाह झालेल्या नवऱ्याचा कायमचा त्याग करून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे स्त्रीरोगतज्ज्ञाची पदवी घेतली आणि व्हिक्टोरिया क्रॉस हॉस्पिटलमधील विभागात नोकरी धरली. तिच्या वर्गातील एका मुलाने तिला सिंगापूरला येऊन व्यवसाय सुरू करण्याचे सुचविले. सिंगापूरला स्त्री डॉक्टर नाहीत. हिंदी लोक खूप आहेत तेव्हा तुझे इथे उत्तम चालेल. तू येच अशी गळ घातली. लक्ष्मीने नवरा सोडल्यामुळे तिला व स्वामिनाथन कुटुंबाला खूप मानसिक त्रास होत होता. अम्मू तिच्या पाठीशी होती. पण कदंबूरच्या खटल्याच्या वेळी जसा त्रास झाला तसा आताही होऊ लागला. या काळात बायका टाकल्या जात. पण नवरा टाकल्याचं व तेही आपल्या ध्येयाकरता हे लक्ष्मी एकच उदाहरण असावे असे वाटते. स्त्रीमुक्तीचा अर्थ तिने पुढच्या पिढीला शिकविला.
डॉ. लक्ष्मीने ११जून १९४०ला मद्रासचा किनारा गरीब स्त्रियांची सेवा करण्याच्या ध्येयाने सोडला. दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. जपान्यांनी १-२-१९४२ ला मलाया जिंकून घेतला. जपान हिंदुस्थानला आपला मित्र माने. युद्धपिपासू जपानी सैनिक गांधीजींबद्दल आदराने बोलतात याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. ६ फेब्रुवारीला सिंगापूरही पडले. जपान्यांनी अगदी थोडय़ाच दिवसांत सिंगापूर पूर्ववत केले. त्यांची कामाची पद्धत पाहून लक्ष्मी थक्क झाली. कॅप्टन मोहन सिंग या ब्रिटिश सेनेतील भारतीयाच्या ताब्यात ६०,००० सैनिक जपान्यांनी सुपूर्द केले. त्यांच्या साहाय्याने त्यांनी इंडियन नॅशनल आर्मी स्थापन केली. डॉ. लक्ष्मीना वाटले की, इतर भारतीयांनी व युद्धकैद्यांनीही या सेवेत सामील व्हावे. ब्रिटिशांना त्यांचा दोन्ही बाजूंनी नक्की चाप बसेल. भारत स्वतंत्र करण्याची ही मोठीच संधी आहे. डॉ. लक्ष्मीने हा प्रचारच सुरू केला. कारण क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. भारतात सुरू झालेली १९४२ ची चळवळ व युद्धभूमीवर लष्कर यांच्या कात्रीत ब्रिटिश सरकार सापडून स्वातंत्र्य जवळ येईल असे तिला वाटत होते.
सुभाषबाबूंचा आग्नेय आशियातील प्रवेश म्हणजे, ‘‘तो आला, त्याने पाहिले व त्याने मने जिंकली.’’ अशा प्रकारच्या आपल्या स्वागताला उत्तर देताना त्यांनी इंडियन नॅशनल आर्मीचे आझाद हिंद फौज असे नामकरण केले व या फौजेची राणी झाशी महिला पलटण असेल हे जाहीर केले. लोकांनी या घोषणेकडे दुर्लक्ष केले. पण डॉ. लक्ष्मीच्या आयुष्यात मात्र तिने महत्त्वाचे वळण घेतले. स्त्री डॉक्टर असल्यामुळे डॉ. लक्ष्मींना सर्व घरात प्रवेश होता. त्यामुळे समता व स्वातंत्र्य या कल्पनांपासून स्त्रिया किती दूर आहेत ते तिला माहीत होते. त्या देशासाठी सर्वस्व वाहायला तयार होतील का असा विचार लक्ष्मीच्या मनात येई.
इंडियन इंडिपेंडण्ट लीगच्या महिला शाखेने सुभाषबाबूंना लष्करी मानवंदना दिली. त्यातील १५ मुलींनी राणी झाशी रेजिमेंटमध्ये प्रवेश घेतला. सुभाषबाबूंनी लक्ष्मीला मुलाखतीला बोलावून तिला रेजिमेंटची जबाबदारी दिली. लक्ष्मीच्या घरचे वातावरण गांधीवादी आहे याचीही जाणीव करून देऊन विचार करून निर्णय घ्यायला सांगितले. लक्ष्मीचा हा निर्णय पूर्वीच झाल्यामुळे तिने लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशीपासून तिचे ऑफिस सुरू झाले. ऑफिसचे काम व मैदानावरचे लष्करी शिक्षण यात लक्ष्मी पुरी बुडाली. तिने पूर्व मलाया व सिंगापूरचा दौरा करून बायकांच्या सभा घेतल्या. आम प्रतिसाद मिळाला. ज्यांना पलटणीत येता येत नव्हते, त्यांना सैन्यासाठी कपडे शिवणे, विणणे, बँडेज तयार करणे अशी कामेही सुचविली. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला.
२१ ऑक्टोबर १९४३ ला सुभाषबाबूंनी आझाद-हिंद-सरकारची घोषणा केली व लक्ष्मीला महिला व बालकल्याण खात्याची कॅबिनेट मंत्री केले. त्यापूर्वी जगात कुठल्याही स्त्रीला हा मान मिळालेला दिसत नाही. दुसऱ्याच दिवशी महिला पलटणीचे विधिवत व आझाद-हिंद सरकारची पलटण म्हणून उद्घाटन झाले. १९४४ पर्यंत १००० महिला जवान व ५०० परिचारिका जवान अशी १५०० ची पलटण झाली. त्यातल्या आघाडीवर १०० जणींची तुकडी गेली. युद्धसमाप्तीपर्यंत कॅ. लक्ष्मी लेफ्टनंट कर्नलच्या हुद्दय़ावर पोहोचली. या हुद्यापर्यंत पोहोचणारी ती पहिलीच महिला.
आघाडीजवळच्या महिलांच्या कॅम्पवर बॉम्बहल्ला झाला. सर्व जणी खंदकात शिरल्या. तेवढय़ातच एक आजारी मुलगी कॅम्पमध्येच राहिल्याचे लक्षात आले. लक्ष्मीने खंदकातून बाहेर येऊन आजारी मुलीला घेऊन तिच्यासकट खंदकात उडी मारली. त्यामुळे तिचा जीव वाचला. लक्ष्मी ही मैदानावर मॅडम व कॅम्पमध्ये सर्वाची ताई होती. अवेळी पावसामुळे सैन्य मागे घेतले, पण लक्ष्मी डॉक्टर असल्यामुळे तिला तिथेच ठेवले. तिथेच बांबू व तट्टय़ांचा रोग्यांसाठी आडोसा करताना अचानक ती व आणखी ५/६ जवान पकडले गेले. अंगातल्या कपडय़ानिशी तीन महिने चालत ती रंगूनला पोहोचली. तीन महिन्यात आंघोळही केली नव्हती. ती एक वर्ष नजरकैदेत होती. एका एअरफोर्स ऑफिसरने तिला लपवून हिंदुस्थानात पोहोचविण्याची जबाबदारी घेतली. पण लक्ष्मीने ते नाकारले. एके दिवशी तिला चल सांगून विमानात बसवले, पण कुठे जातोय हे मात्र इंडो-बर्मा सीमापार करून विमान भारतात आले तेव्हा कळले. तिच्याबरोबर आलेल्या इंग्रज जवानाने आपण कलकत्त्यात उतरत आहात- आता स्वतंत्र आहात असे जाहीर केले. हातात एक पैसाही न देता कलकत्त्याला उतरलेल्या लक्ष्मीचे स्वागत करायलाही कोणी नव्हते. कारण ती येणार केव्हा हे जाहीर झाले नव्हते.
कॅ. लक्ष्मी ले. कर्नलपदापर्यंत पोहोचली तरी लोक तिला कॅप्टन लक्ष्मीच म्हणतात त्याचे तिला जराही वाईट वाटत नव्हते. कर्नल सहेगलशी त्यांचा प्रेमविवाह झाला. आझाद हिंद फौजेच्या कोणत्याही जवानाला भारतीय सेनेत घेतले नाही. स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शन मिळायलाही बराच काळ लागला. कर्नल सहेगलला कानपूरमध्ये नोकरी मिळाली व ते तिथेच स्थायिक झाले. डॉ. लक्ष्मींनी तिथे आपले दोन खाटांचे प्रसूतिगृह उघडले. दिवसाची फी फक्त ५ रुपये चौथ्या दिवशी त्यांना ती घरी सोडी. दवाखाना तर तिने शेवटपर्यंत चालविला व ९० नंतर ती फक्त सकाळी ११ ते १ दवाखान्यात बसे. १९७१ साली ती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली व काम पाहू लागली. १९७७ मध्ये निवडणुकीच्या प्रचाराला ती मुंबईला आली होती.
कॅ. लक्ष्मींनी तिच्या अखेरच्या पर्वात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली. अशी ही निवडणूक लढविणारीही ती पहिलीच भारतीय महिला. तिच्या पक्षाने जर दुसरे नाव सुचविण्यापूर्वीच कॅप्टन लक्ष्मीचे नाव सुचविले असते तर ती अविरोध निवडून आली असती. सर्वावर प्रेम करणारी, रोजच्या जीवनात मृदू, मुलायम बोलणारी, अत्यंत तत्त्वनिष्ठ, प्रसंगी महामायेचे रूप धारण करणारी ही अग्निशिखा अखेर निमाली. तिला महाराष्ट्राचे कोटी कोटी प्रणाम!