हे राष्ट्र प्रेषितांचे : ..आय डीड माय बेस्ट Print

संपदा वागळे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘‘चटका लावून जाणं म्हणजे काय ते मला त्या दिवशीच्या जीवघेण्या अनुभवातून समजलं. देशाच्या सेवेसाठी, सर्व प्रलोभनं बाजूला सारून अनेक वर्ष त्यासाठी तयारी करत आमचा २४ वर्षांचा मुलगा आर्मीत जातो काय आणि जेमतेम १०-११ दिवसांतच सगळा खेळ आटोपतो काय.. ती घटना घडून आता एक तप उलटलं तरी त्यावर विश्वास ठेवणं जड जातंय.’’ शहीद लेफ्टनन्ट नवांग कपाडियाची आई गीता कपाडिया यांनी आपल्या दु:खाला जगण्याचं निमित्त केलं आहे त्यातूनच त्या सैनिकांसाठी नानाविध उपक्रम राबवित आहेत.
alt
थोडं थांबून त्यांनी बोलायला सुरुवात केली.. ‘‘गिर्यारोहकाचा मुलगा असल्याने पर्वतांची ओढ त्याच्या रक्तातच होती. मी व माझे पती हरीश दोघांनाही ट्रेकिंगचं अतोनात वेड. आमचं लग्नही याच आवडीतून जुळलेलं. (मी आधीची गीता वागळे.) माझ्या दोन्ही मुलांनी सोनम आणि नवांगने तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासूनच आमचं बोट धरून सह्य़ाद्रीच्या डोंगरदऱ्या पालथ्या घालायला सुरुवात केली. शेरपांच्या सहवासात जास्त राहिल्याने दोघांची नावेही नेपाळीच. सोनम म्हणजे ज्याचे नशीब सोन्यासारखे आहे असा आणि नवांग म्हणजे नेता. (नवांग हे अर्जुनाचेही एक नाव.) गिर्यारोहणाच्या छंदामुळे शिस्त, धाडस, दुसऱ्यांच्या मदतीला धावणं.. असे गुण दोन्ही मुलांमध्ये लहान वयातच बाणले गेले.
नवांगला तर लहानपणापासून सैनिकी वर्दीचं विलक्षण आकर्षण. त्याचे शर्टही कॉलरचं बटण बंद, खांद्यावर छोटय़ा आडव्या पट्टय़ा, खाली दोन खिसे याच प्रकारचे. शूर तर इतका की, ११ वर्षांचा असताना एन. डी. ए.ची परेड पाहायला एकदा हा मुलगा मुंबईहून पुण्याला एकटा गेला होता. शिस्तीसाठी त्याला कधीच ओरडावं लागलं नाही,’’ गीताताईंच्या नजरेसमोर त्याचं लहानपण उलगडत होतं. नवांग पाच-सहा वर्षांचा असताना रस्ता मध्येच कुठेही ओलांडला की काय होतं ते मी त्याला एकदाच समजावून सांगितलं. त्यानंतर त्याने कधीही सिग्नलव्यतिरिक्त पलीकडे पाऊल ठेवलं नाही, अगदी त्याचे मित्र हसले तरीही. तसंच १८ वर्षांखाली कोणीही गाडी चालवायची नाही, हा नियम डोक्यात पक्का असल्यामुळे स्वत: तर जाऊच द्या, पण त्या वयातील एखादा मित्र जरी ड्राइव्ह करीत असेल तरी त्या गाडीत बसण्यास तो ठाम नकार देत असे.
आपलं ध्येयही त्यानं खूप आधीपासून ठरविलं होतं. म्हणूनच बी. कॉम.च्या शेवटच्या वर्षीच त्यानं मिलिटरीच्या प्रवेश चाचणीसाठी परस्पर फॉर्म भरूनही टाकला. खरं तर कपाडिया कुटुंबाचे एक उद्योजक मित्र नवांगला हव्या त्या जागेवर, मागेल त्या पगारावर नोकरी द्यायला तयारच नव्हे, तर उत्सुक होते. घरचा कापडाचा व्यवसायही त्याची वाट पाहत होता, पण त्याने निवडलेला मार्ग वेगळा होता.
मिलिटरीच्या खडतर निवडप्रक्रियेतील बारकावे गीताताई सांगू लागल्या. लेखी परीक्षेनंतर मुलाखतीच्या दिवसभर चालणाऱ्या सत्रात दर अध्र्या-पाऊण तासाने वेगवेगळे अधिकारी येऊन या इच्छुकांना तावूनसुलाखून घेतात. (३० हजारांतून तीनशे जणांत वर्णी लागायची तर अशी अग्निपरीक्षा द्यावीच लागणार.) गंमत म्हणजे तुमची निवड झाली आहे हे सांगण्याची इथली पद्धतही हटके. आपलं सामान खोलीच्या बाहेर आणून ठेवलेलं दिसलं की समजायचं ‘गुड बाय.’
हा अवघड टप्पा पार केल्यानंतर शारीरिक क्षमतेच्या फेरीत वजनाच्या निकषावर मात्र नवांगचं पाऊल अडखळलं. सहा फूट उंचीच्या या तरुणाचं वजन होतं ७२ किलो आणि लक्ष्मणरेषा होती ५८ किलोंची. त्याच्यापुढे एकच पर्याय होता तो म्हणजे १४ किलो वजन कमी करणे तेही केवळ तीन आठवडय़ांत. या जिद्दी मुलाने ते आव्हान स्वीकारलं आणि फक्त सूप आणि जीवतोड व्यायाम यांच्या जोरावर हे शिवधनुष्य पेलूनही दखविलं.
सर्व कसोटय़ा पार केल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी ‘पासिंग द लाइन’ नावाचा एक शपथविधी सोहळा असतो. त्या वेळी प्रत्येकाच्या मुखात आणि मनात हेच शब्द असतात- ‘आजपासून मी फक्त देशाचा; यापुढे माझं जगणं आणि मरणं दोन्ही माझ्या देशासाठीच. नवांगने प्रतिज्ञा घेतली तेव्हा त्याचे आई-वडील तिथे होते. ते दृश्य त्यांच्या मन:पटलावर कायमचं कोरलं गेलंय.
वाराणसीतील दीड महिन्यांचं ट्रेनिंग संपलं आणि त्याला काश्मीरच्या खोऱ्यातील कुपवारामधील रजवारच्या जंगलात पाठविण्यात आलं. ‘फोर्थ बटालियन द थर्ड गुरखा रायफल’ हे त्याच्या तुकडीचं नाव. त्याच्या डय़ुटीचा पहिला दिवस होता १ नोव्हेंबर २०००. जेमतेम १० दिवसांनीच म्हणजेच ११ नोव्हेंबरला नवांगची बटालियन जंगलात पेरलेल्या सुरुंगांचा वेध घेत होती त्या वेळी जखमी झालेल्या एका सहकाऱ्याला वाचविताना एका पाकिस्तानी अतिरेक्याच्या गोळीने डाव साधला. सदैव हसणारा आणि हसवणारा, आनंदी  स्वभावाचा, गाण्यांची-कवितांची आवड असणारा, क्रिकेटसाठी तहानभूक विसरणारा, आजी-आजोबांची मनापासून सेवा करणारा, माणसांचा भुकेला असा आपला नवांग आता या जगात नाही, हे सत्य पचविणं अशक्यप्राय गोष्ट होती.
 या वेळी सर्वात जवळचा आधार वाटला तो त्याच्या मित्रपरिवाराचा. वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळालेली ही मुलं आम्हाला दररोज सकाळी अकरा-साडेअकरा वाजता फोन करायची, म्हणायची ‘आम्ही आहोत ना!’ त्यातील चार-पाच जण तर आजही संपर्कात आहेत. नवांगची ‘गुरखा रेजिमेन्ट’ तर पहाडासारखी पाठी उभी राहिली. केवळ सैनिकच  नव्हे तर सामान्य जनताही आमच्या दु:खात सहभागी झाली. काश्मीरमधल्या शालेय विद्यार्थ्यांनी पत्रं लिहून सांत्वन केलं. गीताताईंची कोळीणही त्यांना रडताना पाहून म्हणाली, ‘तुम्ही कशाला रडता? नवांग आमचा सर्वाचा होता. तो देशासाठी अमर झाला. नुकसान तर आपलं सगळ्यांचंच झालंय.. स्टेट बँक आणि जीवन विमा (एलआयसी) यांनी केलेल्या अनमोल मदतीचाही गीताताईं कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.
हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला तरी पाकिस्तान्यांबद्दल त्यांच्या मनात कोणतीही कटुता नाही. त्या म्हणतात, ‘ज्या कोणी हे दुष्कृत्य केलं ते त्याने आपल्या देशासाठी केलं असेल. शिवाय या सगळ्यांत सर्वसामान्य पाक नागरिकांचा काय दोष?’
एकदा नवांगच्या मित्रांचा फोनवरून आग्रह चालला होता म्हणून घरातले उरलेले तिघे एकदा पिंपरी येथील लष्कराच्या पुनर्वसन केंद्रात गेले. तिथे तर १९७१ च्या युद्धापासून अपंग झालेले जवान त्यांना भेटले. नवांगच्या बॅचचे दोघे-तिघेही तिथे होते. काहींचे हात तुटलेले तर काहींचे पाय. काही जण तर कमरेखाली संवेदना नसलेले, पण एकाच्याही चेहऱ्यावर वेदनेचा, दु:खाचा मागमूस नव्हता. उलट या मंडळींचा मूड परत यावा यासाठी त्यांची सगळी धडपड चालली होती. या प्रसंगाने कपाडिया कुटुंबाला दु:ख पचवायचं मानसिक बळ दिलं.
‘‘त्यानंतर पिंपरीचं हे पुनर्वसन केंद्र माझं दुसरं घर बनलं,’’ गीताताई सांगू लागल्या, ‘‘तिथल्या जखमी सैनिकांची सरकार यथायोग्य काळजी घेतंय, पण देशबांधवांनी नुसती भेट दिली, आपुलकीचा एखादा हात पाठीवरून फिरला तरी त्यांना आपल्या दु:खाचा काही काळ विसर पडतो, हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी जमेल तेव्हा तिथे जातच राहिले.. त्यांच्याशी बोलत राहिले.. गरजेच्या वस्तू कुठून कुठून गोळा करून त्यांना देत राहिले. अर्थात मी एकटी कशी पुरी पडणार? म्हणून ग्रूप तयार केले. त्यामुळे आज कोणी ना कोणी तिथे जात आहे. या ठिकाणी ‘टाटा’ने वर्कशॉप सुरू केलंय, पण ज्या हातांना बोटं नाहीत अशांना काम मिळावं म्हणून आम्ही तिथे चहा पावडर पॅकिंग सेन्टर सुरू केलंय. हा खारीचा वाटा आहे, हे मला माहीत आहे; पण ज्योतीने ज्योत पेटते, यावर माझा विश्वास आहे.
त्याचबरोबर वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. हा मंत्र कृतीत आणण्याचा मी प्रयत्न करतेय. देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही अक्षरश: हजारो झाडं लावलीत आणि जगवलीत. फक्त भारतातच नव्हे तर जपान, स्वित्र्झलड, अमेरिका.. जिथे जिथे आमचा मित्रपरिवार आहे तिथे तिथे हा उपक्रम आकार घेतोय. शिवाय हात आणि मन दोन्ही रिकामं असेल तेव्हा मी कॅनव्हासवर हिमालय रेखाटत राहते. माझी एक पॅशनच आहे ती!
दु:खातून स्वत:ला सावरण्यासाठी कपाडिया कुटुंबातील प्रत्येकाने वेगवेगळा मार्ग अंगीकारलाय. नवांगचे वडील हरीश कपाडिया म्हणजे जणू ट्रेकिंगचा चालताबोलता ज्ञानकोशच. या विषयावरची त्यांची १६ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ते देश-विदेशात फिरत असतात. गिर्यारोहणातील संशोधनाबद्दल त्यांना राणी एलिझाबेथच्या हातून रॉयल जियोग्राफिक सोसायटीचं सुवर्णपदक मिळालंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘गेल्या १२५ वर्षांत संपूर्ण आशिया खंडात असा बहुमान त्यांच्या आधी फक्त एकालाच मिळालाय.’
नवांगची गोव्यात राहणारी आजी मंगला वागळे यांनी तर रस्त्यावरच्या अनाथ मुलांना आधार देण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतलंय. ८३ वर्षांच्या या आजीने आज तब्बल ८० मुलांना छप्पर दिलंय.
नवांगचा मोठा भाऊ सोनम नोकरीनिमित्ताने बहरीनला असतो. त्याने भावाच्या नावाने ६६६.ल्लं६ंल्लॠ.ूे ही वेबसाइट सुरू केलीय. या माध्यमातून आपल्या सीमारेषेवर घडणाऱ्या लष्करविषयक घटना तो सर्वाना कळवीत राहतो.
नवांगच्या आठवणी सांगताना त्याच्या आईला अश्रू आवरणं कठीण झालं होतं.. अभिमान, आनंद, दु:ख, एकटेपण.. या सगळ्यांचं एक हृद्य मिश्रण त्यातून प्रतीत होत होतं. एका आईची ती वेडी माया बघताना मला उपरोक्त साइटवरील दिनेश सोनी या ब्लॉगलेखकाने लिहिलेल्या चार ओळींचं स्मरण झालं..
If I die in comfort zone
Box me up and send me home
Pin my medals to my chest
Tell my mom I did my best
(गीता कपाडिया - zzwzqyxsxq)u