मी शिकविला धडा Print

शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
छोटा असो वा मोठा, अन्याय हा अन्याय असतो. त्याविरुद्ध आवाज उठविलाच पाहिजे.‘ओन्ली फॉर लेडीज’ या मेघना जोशी यांचा लेख प्रसिद्ध (७ जुलै) झाल्यानंतर ‘चतुरंग’च्या मैत्रिणींनी पाठवलेले हे काही अनुभव त्यांनी शिकवलेल्या धडय़ाचे.

‘डिसेक्शन बॉक्स’ पावला!
मी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांला असतानाची गोष्ट. सोलापूरच्या डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेजचे वसतिगृह, कॉलेजपासून साधारण दोन ते अडीच कि.मी.च्या अंतरावर होते. कधी कॉलेज बसने तर कधी स्वत:च्या गाडीवर आम्ही ये-जा करायचो. रात्रीचे साधारण ८ वाजलेले. क्लिनिक संपवून माझी मैत्रीण शिवांजली एकटीच मधल्या रस्त्याने येत होती. ती दिल्लीकडची होती. त्यामुळे वागण्या-बोलण्यात आम्हा मैत्रिणींपेक्षा धीटही होती. मुलींच्या वसतिगृहाच्या जवळ कधी कधी टवाळखोर पोरं रेंगाळलेली दिसायची. तिला एकटीला पाहून एका पोराने शिट्टी मारली, तशी तिने लुनाची गती अधिकच कमी केली. तर निर्लज्जपणाचा कळस म्हणून त्याने स्वत:चे शिस्न बाहेर काढले. ती पण जगदंबेचा अवतार होती. गाडी थांबवून तिने खांद्याच्या पिशवीतून डिसेक्शन बॉक्स बाहेर काढला व त्याला चक्क म्हणाली.. ‘‘मैं एक डॉक्टर हूँ, मुझे ऐसे दिखानेसे कुछ नही होगा। ये मेरे बॉक्स मे ना काँटनेके कुछ हत्यार है, तू यहाँ आजा, देखते हैं तेरावाला कैसे काँटा जाता हैं।’’आणि खरोखरच बॉक्स उघडून त्याच्यासमोर धरला व धिटाईने त्याच्याजवळ जाऊ लागली. आता मात्र त्याची चांगलीच तंतरली. पॅंटची चेन लावून तो जो धूम पळाला की विचारता सोय नाही. त्या प्रसंगापासून आम्ही मैत्रिणी परतायला उशीर होणार असल्यास एकमेकींना गमतीने विचारायचो, ‘डिसेक्शन बॉक्स है ना साथमें?’
- डॉ. ऋजुता अयाचित, लातूर

आईने पाठिंबा दिला
 हा लेख वाचला आणि मी थेट ५४ वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगापर्यंत जाऊन पोहोचले. माझे माहेर कऱ्हाडला. नववीची शाळा नुकतीच सुरू झाली होती. दोन मैत्रिणी व मी अशा तिघी मिळून शाळेत जात असू, पण त्या दिवशी दोघींना बरे नव्हते त्यामुळे त्या दोघी येणार नव्हत्या. सकाळी ११ ते ५ शाळेची वेळ.  निघाले. आमच्या घराजवळ एक अरुंद बोळ होता. तिथे थोडा काळोख असायचा. बोळ संपायच्या आधी कुणीतरी माझा हात धरला. मी सर्व जोर एकवटून हात सोडला व त्याला आडवा पाडला. त्या वेळी आमची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे पायात चप्पल नव्हती. म्हणून पायानेच दोनतीन लाथा मारल्या. तेवढय़ात चारपाच माणसे जमली व काय झाले विचारू लागली, पण तेवढय़ात तो पळाला. ५४ वर्षांपूर्वी एक १६ वर्षांची मुलगी हे धारिष्टय़ करते, यावर आमच्या सगळ्या सोमवार पेठेत हा चर्चेचा विषय झाला होता. वडिलांनी घरी आल्यावर मलाच खूप बदडले, पण आई माझ्या पाठीशी होती. ती म्हणाली, ‘‘बरे झाले मेल्याला मारलेस ते.’’ पण वडिलांना हे पटले नाही, कारण माझ्यासाठी स्थळे बघायला सुरुवात झाली होती. त्यांचे म्हणणे लोकांना समजले तर तुझे लग्न होणार नाही. तसे एकदोन ठिकाणी झाले, मुलीकडील लोकांना मी फार आगावू वाटले, पण नंतर १९५८ साली माझे लग्न झाले. माझ्या पाठीशी आई उभी राहिली म्हणून मी नंतरच्या आयुष्यात कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकले.
- अनामिका

आणि मी ठेवून दिल्या ..
मुलीला भेटून मी पुण्यावरून कोल्हापूरला बसने नवऱ्यासह परतत होते. वेळ रात्री नऊ-साडेनऊची. बसने वेग घेतला होता. तेवढय़ात मागच्या सीटवरचा पुरुष सीटच्या फटीतून माझ्या डाव्या दंडाला हात लावू लागला. मला वाटलं, माझी ओढणी घसरतीये. नंतर मी दंडावरून हात फिरवला तेव्हा माझ्या हाताला कुणाची तरी बोटं लागली. मी तिरीमिरीत उठून त्याच्याकडे तोंड करून उभी राहिले. दोन्ही गुडघे सीटवर ठेवून, पाय दुमडून बसले. माझ्या अति जलद आणि अनपेक्षित हालचालीने तो बावचळून मागे सरकला. मी हात उचलला, पुढं झुकले आणि बसल्या जागेवरूनच त्याच्या तोंडावर, डोक्यावर हात पडेल तिथं तीन-चार ठेवून दिल्या. काहीतरी गडबड झाल्याचे जाणवल्याने ड्रायव्हरने गाडी झटकन बाजूला घेतली आणि लाइट सुरू केले. कंडक्टर मागे आला. ‘‘काय झालं गं?’’ नवऱ्याने विचारलं. ‘‘याने माझ्या दंडाला हात लावला.’’ मी स्पष्ट आणि मुद्दाम मोठय़ांदा म्हणाले. सगळा प्रकार कंडक्टरच्या लक्षात आला. त्याने त्या माणसाला उठवलं आणि सगळ्यात शेवटच्या सीटवर बसवलं. ‘‘पिलेलाय मॅडम तो,’’ कंडक्टर समजुतीने बोलला. स्त्री विरोध करणार नाही, असं गृहीत धरूनच पुरुष तिच्या अंगचटीला येतो, पण ती अंगावर धावून गेली की तो गोंधळतो आणि स्त्री तिथेच अर्धी लढाई जिंकते. लैंगिक शोषणाविरुद्ध कुणाला मदत पाहिजे असेल तर  आमच्या संस्थेची मदत घेऊ शकतात.(शारीरबोध -९८५००४४९४१)
- राजश्री साकळे, कोल्हापूर

पाठलाग ‘त्याला’ भोवला
मी व माझी धाकटी बहीण रोज संध्याकाळी फिरायला जात असू. त्या वेळी आम्ही गिरगावात राहत होतो. एके दिवशी  आमच्या ध्यानात आले की, एक माणूस आमचा पाठलाग करतोय.  आम्ही रस्ता क्रॉस केला की, तोही रस्ता क्रॉस करी. आम्हाला भीती वाटली की, घरी परतलो तर पाठोपाठ येईल व त्याला आमचा पत्ता कळेल. ही बला कशी टाळायची याचा विचार चालू असताना ऑपेरा हाऊस चित्रपटगृहाजवळ आम्ही आलो. तिथे एक वाहतूक नियंत्रक पोलीस होता. त्याला जाऊन आम्ही सर्व सांगितले. ते बघून तो माणूस पळू लागला, पण पोलिसाने धावत जाऊन त्याला पकडले. आणि आम्ही समाधानाने परतलो.
- आरती पै, बोरिवली.

प्रतिकार नक्की करू शकेन!
संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नाशिक डेपोवरून कसाऱ्याला जाणारी बस कशीबशी पकडली. ड्रायव्हरच्या मागच्या सीट पटकावल्या. बी.एड. महाविद्यालयाचे आम्ही चार प्राध्यापक होतो. बस आता तुडुंब भरली होती. साधारण नऊचा सुमार. कसारा घाट अर्धा पार झाला आणि बस वाहनांच्या गर्दीत अडकली. तेवढय़ात आमच्या बसला काही माणसांनी घेरले. त्यांच्या हातात काठय़ा, साखळ्या, हॉकी स्टिक्स होत्या. तेवढय़ात त्यातील एकजण ड्रायव्हरजवळची खिडकी उघडून ड्रायव्हरला मारायला लागला. मी ड्रायव्हरच्या व प्रवाशांमध्ये असणाऱ्या सळ्यांमधून हात घालून त्या मारणाऱ्या माणसांचा शर्ट पकडला व ओरडले, ‘‘तुमची भांडणं नंतर सोडवा, आधी आम्हाला कसाऱ्याला सोडा. ए ,उतर खाली’’ असं म्हणून जसं जमेल तसं त्याला मारू लागले. तर तो माणूस बार ओलांडून प्रवाशांमध्ये आला आणि ड्रायव्हरला शिव्या देऊ लागला.  तेवढय़ात दारातून एक राखाडी सफारीतला माणूस ‘‘कोणी मारलं रे याला?’’ करत पुढे आला. मीही जागा सोडून मध्ये उभी राहिले. काही माणसे, माझे सहकारी ‘‘जाऊ द्या बाई, बेकार माणसं ही, सोडून द्या’’ असं मला समजवायला लागली. तोपर्यंत हा माणूस माझ्या समोर आला. पुन्हा ओरडला, ‘‘कोणी मारलं?’’ त्याबरोबर दारूचा भपकारा माझ्या नाकात गेला. मी संतापले. ‘‘सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालता, रहदारीत अडथळा निर्माण करता’’ असे म्हणून त्याचे केस पकडले आणि थोबाडीत हाणल्या. त्याच वेळी ‘‘पकडा रे त्याला, पण उतरून देऊ नका’’ अशी आरोळीही ठोकली. संपूर्ण बस आता क्रियाशील झाली होती. त्या जाणाऱ्या माणसालाही लोकांनी बदडायला सुरुवात केली.  एक बाई बाकावर उभी राहून ‘‘खा, बायकांच्या हातून मार खा. माझ्या पण वाटणीचं मार गं त्याला’’ म्हणून ओरडली. मी ड्रायव्हरला सांगितलं, ‘‘कसारा पोलीस स्टेशनवर बस न्या.’’ लोकांनी त्यांचे हात धरून त्यांना बसवून ठेवले. साधारण अकराच्या सुमारास कसारा पोलीस स्टेशनला गाडी पोहोचली. ‘शेवटची गाडी आहे’ असे म्हणत बरीच माणसे स्टेशनच्या दिशेने धावू लागली. आठदहा माणसं माझ्याबरोबर पोलीस स्टेशनवर आली. त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. मग आम्ही स्टेशनकडे निघालो. माझ्या मनात आलं, ‘‘एवढी भरलेली बस, पण फक्त आठदहा जणच शेवटपर्यंत येऊन मदत करणारे?’’ तेवढय़ात गाडीचा भोंगा ऐकू आला. गाडी आहे समजल्याने आम्ही धावलो, तर प्रत्येक दारात सातआठ माणसे उभी राहून मला बोलवत होती, ‘‘मॅडम, चढा लवकर आम्ही पुढे येऊन गाडी थांबवली आहे.’’ डब्यातले सगळे माझे कौतुक करत होते.  मी ठाण्यात टिकूजीनी वाडीजवळ राहत होते. घरी जायला बस नव्हती. घंटाळी भागात आई राहत होती. तिच्याकडे जावे असे ठरवले. रात्रीचा एक वाजला असावा. निर्मनुष्य रस्त्याने चालताना काही तासांपूर्वीची रणरागिणी झालेल्या मला आता मात्र एकाकी वाटले. माझी भूमिका योग्य असली तरी ती माणसे डूख धरून मागे तर नाही ना येणार! असे मनात येऊ लागले.  पुढचे काही दिवस ही भीती मनात होती, पण आत्मविश्वास होता, मी प्रतिकार नक्की करू शकेन!
- राजश्री जोशी (कोर्डे), ठाणे

तुरुंगात रवानगी
मला आठवतंय १९६५ सालचा तो मे महिना होता. माझं पाचवीचं वर्ष संपून शाळेला सुट्टी लागली होती. आई, वडील व आम्ही सहा भावंडं मालाडच्या गोल चाळीत राहत होतो. चाळमालकानं आमच्या घराला लागूनच लाकडी पार्टिशन टाकून एक खोली एका परप्रांतीय कुटुंबाला दिली होती. नवरा, बायको व त्यांची एक मुलगी ‘बिटिया’ असं कुटुंब होतं. एके वर्षी मे महिन्यात घरात आम्ही चौघेच होतो. म्हणजे मी व माझा सातवीतला भाऊ, नववीतली बहीण रश्मी आणि अकरावीतली सर्वात मोठी बहीण मंगल. दुपारचे ४ वाजले असतील. मी व्हरांडय़ातच माझी तीन चाकी सायकल चालवायला काढली. तेवढय़ात आमचा शेजारी ताडकन बाहेर आला व त्याने माझ्या सायकलवर जोरात लाथ मारली. मी रडायला लागलो नि मंगलला झालेला प्रकार सांगितला. ती पोलीस स्टेशनवर गेली नि परतली ती पोलिसांना घेऊनच. पोलिसांनी शेजाऱ्याला एक रात्र लॉकअपमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी त्याचे नातेवाईक येऊन त्याला पोलीस चौकीतून सोडवून घरी घेऊन आले. त्यानंतर काही दिवसांतच शेजारी आपली वळकटी व सामान घेऊन परागंदा झाला.
- किशोर साळवी, ठाणे

हक्कासाठी भांडले
एकदा हडपसरवरून सासवडला बसने निघाले. गाडीत तोबा गर्दी! तशातही वरती चढले. ‘स्त्रियांसाठी राखीव’ जागेकडे वळले. तर त्यावर पुरुष बसले होते. माझ्याबरोबर एक वृद्धा व दोन तरुणी उभ्या होत्या. त्यांना ही जागा ‘स्त्रियांसाठी राखीव’ असल्याची आठवण करून दिली तर त्यांनी उलट ‘मग आम्ही काय करू?’ ‘तू दुसऱ्या जागेवरच्यांना उठव’ अशी प्रतिउत्तरं दिली. मी सांगत होते, ‘मला राहू द्या, पण या आजींना तरी जागा द्या.’ पण त्या तिघांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. साधारण ३०-४० दरम्यानचे असतील ते.  सुशिक्षित वाटत होते, पण.. मी कंडक्टरला विनंती केली. तर कंडक्टर म्हणाला,‘ओ कशाला झिकझिक करता. नाय उठत तर आम्ही काय आता एस.टी.त क्रेन बसवू काय त्यांना उचलायला? अन् इथंच जायचंय तर कशाला तणतण करता?’ मी अक्षरश: सुन्न झाले, चक्रावून गेले.  वृद्ध आजींना धड उभंही राहता येत नव्हतं. गाडीही चालू होत नव्हती. ड्रायव्हरचा पत्ता नव्हता. मी त्यांना पुन्हा विनंती केली, पण व्यर्थ. मी पण हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. मी सरळ सांगितलं की हे जर उठत नसतील तर गाडी पुढे जाणार नाही. मी गाडी ‘पोलीस स्टेशन’ला नेणार. कंडक्टर साहेबांनाही तुमचा बॅच नंबर सांगा असे सांगितले. तेव्हा सर्वाचे धाबे दणाणले. मला थोडेफार नियम माहीत असल्याने मी हे करू शकले , पण इतर सामान्य स्त्रियांचं काय?
अंतिमत: त्या तिघांना कंडक्टरने उठवले. त्या जागी मी, आजी, दोन तरुणी अशा चौघी बसलो. समाधान झालं पण नंतर कळलं  की त्या दोन तरुणी शिपाई म्हणून पोलीस भरती झाल्या होत्या- मग त्या अशा शांत कशा राहिल्या?
- प्रज्ञा मोहिती,पुणे.

दिराची दादागिरी थांबवली
 माझे पती एका नामवंत कंपनीत अधिकारी, सासरे निवृत्त मेजर असे एकंदरीत सर्व सुशिक्षित कुटुंब! मी एका नामवंत उद्योगपतींची मुंबईत वाढलेली सुशिक्षित मुलगी. मला सुशिक्षित सासर मिळाल्याने मी खूश होते. परंतु लग्नानंतर माझ्या लक्षात आले की, माझा डॉक्टर दीर हा कोणत्याही स्त्रीची मस्करी करून तिला चारचौघांत खाली मान घालायला लावणारा होता. आणि त्याचा हा स्वभाव असल्याचे गृहीत धरून त्याला घरातून कुणी हटकतही नव्हतं. मी एकत्र कुटुंबातली असल्याने स्त्रियांशी वागण्याच्या मर्यादा व संस्कार माझ्यावर होते. दिराच्या मस्करी चेष्टेला मी दाद देत नाही असे पाहून त्याने मला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. एकदा मी पतीसह जेवत असताना तो त्याच्या मित्रासमोर आम्हाला लाज वाटेल असे अश्लील बोलला. असा तो नेहमीच विचित्र वागे. शेवटी माझ्या मोठय़ा वकील जाऊबाईच्या कानावर हा प्रकार घातला तेव्हा ‘लक्ष देऊ नकोस’ असे त्या म्हणाल्या. नंतर एकदा त्याने गावाला आमच्या जागेत आमची परवानगी न घेता दवाखाना टाकला. तेव्हा मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून मार्गदर्शन घेतले व आमच्या गावाच्या जिल्ह्य़ाच्या उपपोलीस निरीक्षकाकडे माझ्या पतीबरोबर जाऊन त्याच्या वागण्याची लेखी तक्रार केली आणि त्यांनी त्याची लगेच दखल घेऊन या डॉक्टर दिराची आमच्या कुटुंबातील दादागिरी थांबविली. ती कायमची!
-अनामिका

‘हीरो’गिरीला दिले उत्तर
मी कॉलेजमध्ये असतानाचा प्रसंग, साधारण सात- आठ वर्षांपूर्वीचा. शहरभर सर्वत्र नवरात्र उत्सवाची सांगता होत होती. जागोजागी दुर्गादेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल-ताशे यांच्या मोठय़ा आवाजाने रस्ते निनादले होते. मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाईचा उत्साह कमालीचा होता. ज्या रस्त्यावरून मिरवणूक जात होती, तेथून जाणाऱ्या गाडय़ांचा वेग थोडा कमी होता. त्या संधीचा फायदा घेत मिरवणुकीतल्या एका मुलाने दुचाकीवरून पुढे जाणाऱ्या एका मुलीच्या हाताला स्पर्श केला. काय झाले हे कळेपर्यंत ती पुढे गेली होती. पुढे जाऊन तिने तो ‘नको’ असणारा स्पर्श दुसऱ्या हाताने पुसून टाकला. मी सिग्नलजवळ उभी असल्याने या प्रसंगाची साक्षीदार झाले. त्या वेळी मी काही केले नाही तरी तो प्रसंग डोक्यात पक्का बसला.
पुढे एका सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या आम्ही दहा-बारा कार्यकर्त्यांनी स्वत:ची क्षमता अजमावण्यासाठी ‘सायकिलग’ला जायचे ठरवले. २५-३० कि.मी. चे ध्येय आम्ही ठरवले. बऱ्याच वर्षांनी सायकल चालवत होते. आमच्या गटात मुले-मुली दोन्ही होते. आम्ही सायकिलगला सुरुवात केली तशी ‘मुली दिसताहेत म्हणून टिंगल टवाळी करा’ या विचारसरणीचे बरेच तरुण दिसायला लागले. राग येत होता, पण दुर्लक्ष केलं. जसेजसे पुढे जात होतो तसे या शेरेबाजीने डोके ठणकू लागले आणि नवरात्रीचा प्रसंग मनात ताजा होताच. थोडे आणखी पुढे गेलो तेव्हा माझ्यापुढे असणाऱ्या मैत्रिणीला बघून एकाने अश्लील शेरेबाजी केली. मी आणि इतर काहीजण मागे असल्याने आम्हाला ती स्पष्टपणे ऐकू आली. माझा राग अनावर झाला आणि मी सायकल रस्त्याच्या कडेने चालवत त्या मुलाजवळ नेली. सायकलचा वेग कमी करत त्याच्या थोबाडीत दिली आणि तशीच सायकल पुढे दामटली. पुढे गेल्यावर वळून बघितले तर तो गालावर हात चोळत उभा होता. शेरेबाजी करतानाचा हीरोगिरीचा त्याचा थाट पार उतरला होता. त्या वेळी आपल्यात केवळ ३० किलोमीटर सायकलने जाण्याची शक्ती नाही तर सोबत ‘स्त्री’ म्हणून होणाऱ्या टिंगलटवाळीला उत्तर देण्याचे धर्यदेखील आहे याची जाणीव झाली.
सौ. शिल्पा गडमडे-मुळे

भामटय़ांपासून बचावले
साधारण दोन-तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी सकाळीच आठ वाजता एका मैत्रिणीकडे जात होते. ती राहते तो रस्ता चांगला वाहतुकीचा, वर्दळीचा. पण सकाळ असल्याने लोकांची ये-जा कमी होती. एवढय़ात एक माणूस माझ्याकडे आला. चांगला गोरागोमटा, कपाळाला गंध वगैरे लावलेला हिंदीतून बोलत होता, ‘‘मॅडम आपको हमारे साब बुला रहे है! आइए’’ मी गेले तर तो साब मला म्हणाला, ‘‘देखिए मॅडम, आप हमारी माँ जैसी है। हम पुलिसवाले है। यहाँ थोडे दिन पहले एक महिला की चेन खिची थी, इसके लिए हम सबकी तलाशी ले रहे हैं। आप अपने सब गहिने उतार के हमें दे दीजिए।’’ तेवढय़ात एक मुलगा तिथूनच जात होता. बहुतेक तो त्यांच्यातलाच असेल त्याला त्यांनी थांबवला आणि तसेच सांगितले. त्याने लगेच त्याच्या गळ्यातली जाडी चेन (बहुतेक खोटीच) असेल ती त्यांच्या हातात दिली. उगाचच बघितल्यासारखंच करून त्याला ती परत दिली. तो मला म्हणाला, ‘‘मॅडम, अभी आपके पुरे गहने उतारके हमें दे दो।’’ एव्हाना मी सावध झाले होते. मी आवाज चढवून त्याला म्हटले, ‘‘पहिले तुम्हारा आयडेंटी कार्ड दिखाओ ’’ तसा तो चिडला. पण मी ठाम होते. शेवटी तो मला म्हणाला, ‘‘जाइए, जाइए अपने आपको संभालिए।’’ मी त्या मैत्रिणीच्या बिल्डिंगमध्ये गेले. खालीच वॉचमन होता आणि एकदोघेपण होते. त्यांना घेऊन मी त्या ठिकाणी आले तर त्या तिघांनी तिथून पळ काढला होता.आल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले याचे आता मला खूप समाधान वाटते.             
-अनुराधा हरचेकर, गोरेगाव (पूर्व)

भित्यापोटी..
alt

नोकरीच्या निमित्तानं एका गावी जात होते. गावाकडचा रस्ता असल्याने आदळत आपटत एसटी चालली होती. मी कंडक्टरच्या मागील सीटवर बसले होते. एसटीमध्ये तशी फार गर्दी नव्हती. अचानक मला पाठीमागच्या बाजूनं काहीतरी टोचल्यासारखं, स्पर्श झाल्यासारखं जाणवत होतं. मागे काही आहे का हे बघून मी सावरून बसले. थोडय़ा वेळात परत तसंच काहीतरी जाणवलं. मागच्या सीटवरून खिडकीच्या बाजूने कुणीतरी माझ्या कमरेला चिमटा काढत होता. मला संताप आला. मी सरळ उठून मागच्या सीटवर कोण आहे, हे बघण्यासाठी उठले. तिथं एक मध्यमवयीन गृहस्थ बसले होते. मी त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी झोपेचं सोंग घेतलं. त्याने मला असा त्रास दिला असं सांगितलं असतं तर त्यावर कुणाचा विश्वासही बसला नसता. म्हणून मी तो बसला त्या सीटच्या मागील सीटवर जाऊन बसले. पर्समधील मोबाइल बाहेर काढत, एक नंबर डायल करून फोनवर बोलू लागले. बोलता बोलता मी त्या गृहस्थाचं वर्णन करून त्याची माहिती मोबाइलवरून सांगत होते. हे बोलणं त्याला ऐकू जाईल अशा आवाजात बोलत होते. त्याच्या हालचालीवरून तो जरा बावरल्यासारखा वाटला. खरं म्हणजे मी काकाशी बोलण्याचं नाटक करत होते. त्याचं ते भित्रं रूप पाहिल्यावर मला मोठी गंमत वाटली. आता मी मोबाइलवर असं बोलायला लागले, जणू मला कुणाचा तरी कॉल आला, ‘‘हो बरोबर, हाच नंबर आहे एसटीचा. तुम्ही पोचा लवकर’’ असं म्हणून मोबाइल ठेवला. आता त्या गृहस्थाची प्रतिक्रिया बघत होते, तर हे महाशय गडबडत उठत कुठल्यातरी थांब्यावर जेव्हा एसटी थांबली तेव्हा सरळ उतरले. कंडक्टर म्हणाला, ‘‘साहेब अहो, स्टॉप अजून पुढं आहे तुमचा, ?’’ ‘‘जरा काम आहे’’ असं म्हणत तो भित्रट गृहस्थ पळपुटय़ाप्रमाणं मध्येच उतरून गेले. ते का उतरले हे फक्त मला माहीत होतं!
- प्रा. स्मिता मेकवान, औरंगाबाद.

मुलींनी चांगलाच चोप दिला
आमच्या कॉलेजची वेळ सकाळची असल्याने पावणेसातपर्यंत मुली कॉलेजला पोचण्याचा प्रयत्न करायच्या. स्टेशनहून कॉलेजकडे येण्याच्या वाटेवर सकाळी तशी शांतता असे. याच रस्त्यावर थोडय़ा आडबाजूला एक तरुण मुलगा, मुली यायच्या वेळेस उभा राहून काही अश्लील चाळे करायचा. मुली घाबरून भरभर पावले उचलीत कॉलेज गाठायच्या. परंतु यातल्या काही मुलींचा घोळका जरा धीट होता. दोन-तीन दिवस त्या मुलाने सलग असे चाळे केल्यानंतर त्या पाच-सहा जणींनी मिळून त्याला पकडले. इतर मुलींचीही मदत घेतली आणि त्याला कॉलेजपर्यंत धिंड काढीत आणले. कॉलेजमध्ये आणल्यावर त्याला सर्व मुलींनी घेरले आणि चोप दिला. दरम्यान पोलीस तक्रार केल्यामुळे पोलीस आले आणि त्याला पकडून नेले. मग साध्या वेषातील पोलीस सकाळी कॉलेज भरण्याच्या वेळी गस्त घालू लागले. पण मुलींनी स्वत:च ठामपणे निर्णय घेऊन एकत्र येऊन त्या मुलाला चांगलाच धडा शिकवला.
- मीनाक्षी दादरावाला, मालाड

‘फादरली लव्ह’
आमच्या सोसायटीत एक परप्रांतीय भाजीची गाडी घेऊन यायचा. नुकत्याच वयात आलेल्या लेकीला मी त्याच्याकडून काही आणायला सांगितलं, तर तिने चक्क नकार दिला. मला आश्चर्य वाटलं. मग मी स्वत:च गेले त्या भाजीवाल्याकडे. एक मुलगी भाजी घ्यायला आली होती. भाजी घेऊन पैसे द्यायला तिने हात पुढे केला, तर तो भाजीवाला तिचा हात सोडेचना. ती बिच्चारी ‘अंकल छोडो ना!’ म्हणून ओरडत होती. ‘बाद में आना मैं तुमको चॉकलेट देता हूं’ म्हणून त्या भाजीवाल्याने तिचा हात आणखीनच घट्ट धरला. मी हा प्रकार पाहात होते. पदर खोचला नि त्याच्या थोबाडीत लगावून दिली. इतक्यात सोसायटीतल्या बायका गोळा झाल्या. सगळ्यांनीच त्याला मारले व ‘मुलींची छेड काढतो म्हणून पोलिसांत तक्रार केली.’ एका दोघा आजोबांना पण ‘फादरली लव्ह’ दाखविल्याबद्दल वेगळ्या पद्धतीने धडा शिकविला. मुली लाजाळू असतात, तर आपणच सावध राहून मुलींना विश्वासात घ्यायला हवे.
- उषा रेणके, अंधेरी (पूर्व)

तालीम आली कामी
आम्ही राहतो ते एक औद्योगिक केंद्र असून, प्रगत परिसर आहे. मात्र उच्च महाविद्यालयीन शिक्षणाची म्हणावी तशी सोय आमच्या नगरीत नाही. शहरात जाण्यासाठी रेल्वेची सोय आहे. स्वाभाविकच येथील विद्यार्थी वर्ग-नोकरदार या ट्रेनने रोज ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांची लक्षणीय गर्दी असते. आमच्या स्टेशनात गाडी आली की डब्यात चढण्यासाठी प्रचंड गर्दी व चेंगराचेंगरी होते. महिलांसाठी स्वतंत्र बोगी असली तरी त्या डब्यातही रेटारेटी- ढकलाढकली होते. सगळ्याच महिला आणि मुली स्वतंत्र डब्यात सामावू शकत नसल्याने अन्य डब्यामध्ये घुसावे लागते.
या परिस्थितीचा गैरफायदा तरुण टारगट विद्यार्थ्यांचा एक गट घेत असे. डब्यात मुद्दाम महिलांना घसटून उभे राहाणे, थोडा ब्रेक लागला की मुद्दामच मुलींच्या बाजूने झुकणे असे प्रकार होत. चालत्या गाडीत मोठमोठय़ाने गाणी म्हणणे, अश्लील हावभाव करणे, लज्जास्पद शेरेबाजी करणे तर नेहमीचेच. सुजाण प्रवाशी या प्रकाराने हैराण होत, पण उघडपणे त्यांना खडसावणे किंवा संघर्ष करण्याचे धाडस कोणी करत नसत. आपल्याला कोणीच प्रतिबंध करत नाही हे पाहून गुंड प्रवृत्तीचे हे टोळके आणखीनच चेकाळले. यामुळे काही मुलींनी कॉलेज शिक्षण सोडून दिले तर काहींनी ट्रेनऐवजी महागडय़ा व तुलनेने ज्यादा वेळ लागणाऱ्या बसने प्रवास करणे सुरू केले. स्टेशन मास्तर किंवा रेल्वे पोलीस यांच्याकडे तक्रार नोंदवूनही हा त्रास कमी होईना. उलट ज्यांनी तक्रार केली, त्यांना लक्ष्य करून अधिकच उच्छाद मांडला.
जवळच्या गावात एक नामवंत तालीम आहे. तरुण पहेलवान मंडळी तेथे नियमितपणे व्यायाम करतात. त्यांच्या कानावर मी हा संतापजनक प्रकार घातला व त्यांना भावनिक आवाहन केले. त्याचा अत्यंत अनुकूल परिणाम झाला.
दहा-वीस पहेलवान मंडळी एकत्र आली. दोन-चार वेळा त्यांनी काहीही चाहूल लागू न देता ट्रेनने प्रवास केला व परिस्थितीची नीट पाहाणी केली. पद्धतशीर नियोजन झाले.
ठरलेल्या दिवशी ही पहेलवान मंडळी हाती हॉकी स्टिक्स् आणि दांडकी घेऊन वेगवेगळ्या डब्यात चढली. पोरांना याची काहीच कल्पना नव्हती. एका निर्जनस्थळी ट्रेन आल्यावर साखळी खेचून त्यांनी गाडी थांबवली. वेचून सगळ्या गुंड पोरांना डब्यातून खाली खेचून घेतले. सगळ्यांना काहीशा अंतरावर फरफटत नेले. त्या निर्जन जागी हाती दांडके असणारे पेलवान बघून त्या पोरांनी चक्क पायावर लोटांगण घेतले. पण पेलवानांनी त्यामधील म्होरक्यांना वेगळे काढून त्यांचे अर्धे डोके भादरले. त्यानंतर सर्वाचे शर्ट-बनियन-पुस्तके-वह्य़ा-मोबाइल व चपला सगळे काढून घेण्यात आले. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये ‘‘या रेल्वेने प्रवास करणाऱ्या माझ्या माय-बहिणी आहेत, इत:पर त्यांना कसलाही त्रास देणार नाही, असे माफीपत्र लिहून द्या व मग आपले कपडे-पुस्तके घेऊन जा’’, असे सांगण्यात आले. टारगट पोरांसमोर दुसरा पर्यायच नव्हता.
अनपेक्षित प्रसंगाने भांबावलेली मूळची भेदरट पोरे उघडय़ा अंगाने अनवाणी ८-१० मैल रेल्वे रुळावरून चालत आली. त्यांनी बिनशर्थ  माफीपत्र लिहून दिले. पहेलवान मंडळींनी माफीपत्राच्या झेरॉक्स प्रती सर्व संबंधित स्टेशनवर चिकटवण्याची व्यवस्था केली आणि मग ज्याचे त्याचे साहित्य परत केले. या सत्य घटनेला आता बराच कालावधी लोटला आहे, पण या प्रसंगाच्या आठवणी तिखटमीठ लावून अजूनही प्रवासी परस्परांना सांगतात. या एकाच घटनेमुळे एवढा मोठा धाक बसला आहे की आजतागायत आमच्याकडचा रेल्वे प्रवास आता त्या अर्थाने सुरक्षित झाला आहे.
-मोहन आळतेकर, सांगली

खाड्कन मुस्कटात दिली
alt
ऐंशीच्या दशकात दिल्लीत बदलीवर गेलो असताना एकदा बसनं आम्ही जात होतो. खचाखच भरलेल्या बसमध्ये आम्ही उभे होतो. मी बसच्या मध्यावर व नवरा बराच पुढे.  माझ्या मागे उभा असलेला एक इसम हळूहळू माझ्या अगदी जवळ सरकून उभा राहिला. मी पटकन अंग चोरून उभी राहिले. नंतर त्यानं वरच्या बाजूला धरलेला हात माझ्यापर्यंत पुढे सरकवून तो माझ्या खांद्यावरच झुकला. इतका की त्याचा श्वास माझ्या मानेला जाणवत होता. आजूबाजूचे लोक बघून न बघितल्यासारखं करीत होते. शेवटी असह्य़ होऊन मी मागे वळून बेशरम कहीं के म्हणत  खाडकन त्याच्या मुस्कटात ठेवून दिली. मग मात्र तो घाबरला. आणि सिग्नलला तर त्यानं खाली उडी मारली.
-उषा महाजन,पुणे.