फुलला मनमोगरा .. Print

सुनीता सुडके - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अजयराव निवृत्त होणार हे लक्षात आलं नि शैलाताई अस्वस्थ झाल्या.. यापुढचं आयुष्य कसं जाईल ही एकच चिंता त्यांना सतावीत होती.. त्यातच अजयरावांच्या निवृत्तीनंतरची सकाळ उजाडली..
शै लाताईंनी भिंतीवरील घडय़ाळाकडे पाहिलं. सहा वाजत आले होते. ‘अगंबाई, हे येण्याची वेळ झाली.’ मार्केटमधून भाजी, दूध, आणायला हवं. या गुडघेदुखीमुळे कुठे जायला पण नको वाटतं हल्ली. वयाची साठी जवळ आली. आता सांधे कुरकुर करतात. पाठ दुखते. पटापट कामे होत नाहीत. ‘यांना’ सांगावं का ऑफिसमधून येताना भाजी घेऊन या म्हणून, पण नकोच. यांना काही आवडणार नाही भाजीसाठी मी फोन केलेला. इतके दिवस पोरी होत्या. किती उत्साहाने कामे करायच्या दोघी. माझी किती काळजी घ्यायच्या. जगावंसं वाटलं ते या पोरींमुळे. लग्न होऊन सासरी गेल्या आणि घरातलं चैतन्यच हरवलं. आता एकटेपण जाणवत राहतं सारखं. पिशवी घेऊन त्या बाहेर पडल्या, पण विचारांच्या चक्रातच..
‘आता ५-६ महिन्यांत अजयराव रिटायर होतील..’ या विचाराने शैलाताई दचकल्या. हे असं का होतंय? यांच्या घरात असण्याचं आपल्याला एवढं टेन्शन का येतंय? आपल्याला आता सोबत मिळेल, एकटेपणा दूर होईल ही सुखद भावना का मनात येत नाही? खरं तर यांच्या रागीट, करारी स्वाभावाची आपल्याला भीती वाटतेय. हेच सत्य आहे, पण इतकी वर्षे संसार केलाय की आपण. त्यांची प्रत्येक गोष्ट आपण झेलत होतो. कधी त्रागा नाही. चिडचिड नाही की, संताप व्यक्त करणं नाही. पोरी सांगत असत, ‘आई, अशी गप्प गप्प राहू नको. स्वत:ची मते, विचार मांडत जा. न पटणाऱ्या गोष्टींना नाही म्हणत जा. व्यक्त होत जा.’ कशाचं काय, स्वभाव काही बदलला नाही. आता कसं होईल? यापुढचं आपलं आयुष्य कसं असेल?
अजयराव निवृत्त झाल्याच्या निमित्ताने घरातच जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, मुली-जावई सर्वाना बोलावून एक छोटा कार्यक्रम केला गेला. शैलाताईंचं धास्तावलेपण मुलींच्या नजरेतून सुटलं नाही. ‘आई, काही काळजी करू नको. सगळं काही ठीक होईल, अशी तणावाखाली जगू नको. आम्ही आहोत ना, तू कशाला घाबरतेस?’ मुलींनी धीर दिला. सर्व पाहुणे मंडळी परतली. घर रिकामं झालं. ‘उद्यापासून निवृत्तीनंतरचं आयुष्य सुरू होईल. छे! आपल्याला कसली आलीय निवृत्ती? बायकांना निवृत्ती नसतेच. दुखणी-खुपणी बाजूला ठेवून फक्त सगळं करीत राहायचं. लग्न म्हणजे ‘सहजीवन’ असं म्हणतात, पण इथं तर फक्त यांचं ‘मी’ होतं. मी, माझी पोस्ट, माझं करिअर, सगळं माझंच. यात आपल्याला कुठेच स्थान नव्हतं. ‘मी’ पणाच्या कोशात वावरणारा हा नवरा काय सहजीवन जगणार? शैलाताईंच्या संवेदनशील मनात विचारांचं काहूर माजत होतं.
दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. शैलाताई हळूहळू कामे आवरू लागल्या. ‘अगं, मार्केटमध्ये जाऊन भाजी, दूध घेऊन येतो. आता रोज भाजी आणत जाईन मी. तेवढं फिरणं होतं.’ अजयराव निघाले.. ‘ही घे ताजी भाजी आणि तुझ्या देवासाठी फुले, हार, दुर्वा, तुळस सगळं आणलंय.’ शैलाताई अविश्वासाने पाहत राहिल्या. जवळपास एक किलोचा मोठ्ठा फ्लॉवरचा गड्डा आणि पिशवी भरून हिरव्या मिरच्या पाहून शैलाताईंना हसू आवरेना. ‘अगं, किती भाजी घ्यावी काही कळेना. आता आठवडाभर तीच भाजी खाऊ. एक दिवस तू कर. एक दिवस मी करतो..’
‘अगं, पुढील आठवडय़ात आपण शिर्डी देवस्थानला जाऊन येऊ. खूप दिवसांपासून तुझी इच्छा होती ना.’ शैलाताई मोहोरल्या. साईबाबांच्या दर्शनाचा योग आला होता. आपल्या शरीराच्या अणू-रेणूत उत्साह संचारला आहे, असं शैलाताईंना वाटायला लागलं. कधी देवापुढे हातसुद्धा न जोडणारे अजयराव किती श्रद्धेने साईबाबांपुढे नतमस्तक झाले होते. विस्मयाने शैलाताई पाहत राहिल्या. ‘यांच्यामध्ये हा एवढा बदल कसा काय झाला?’ राहून राहून त्यांच्या मनात एकच प्रश्न येत होता..
‘अगं, तुझी तब्येत बरी असेल तर पुस्तक प्रदर्शन पाहायला जायचं का? इथून जवळच आहे.’
‘अगंबाई, या करारी नवऱ्यामध्ये चांगला रसिक माणूसही दडला आहे की, इतके दिवसांत या गुणांची ओळखच झाली नव्हती.’ शैलाताई आनंदल्या.
‘अगं, तुझे ते सख्खे, चुलत, मावस भाऊ-बहिणी बऱ्याच दिवसांपासून बोलावत होते आपल्याला, आता एकेकाची अपॉइंटमेंट घे. सगळ्यांकडे जाऊन येऊ.’ कधीही, कुठेही आपल्यासोबत न येणारा नवरा आता चक्क आपल्या नातेवाईकांकडे येतोय शैलाताईंना खरंच वाटेना. सगळ्यांना भेटायला जायचं या कल्पनेनं शैलाताई सुखावल्या. मनमोगरा फुलला. आठवणींच्या सुगंधात त्या न्हाऊन निघाल्या. सगळी जिवाभावाची माणसे भेटली. मनमोकळ्या गप्पा झाल्या. हा एवढा बदल कसा काय घडून आला? हा एकच प्रश्न मनात रुंजी घालत होता.
‘आई, कशी आहेस तू?’ मुलींचे सारखे फोन येत होते. ‘अगदी मजेत आहे मी.’ खुशीत येऊन शैलाताई सांगत होत्या. बोलण्यातूनही आता आनंद ओसंडत होता. हळूच डोकावणारं वार्धक्य आता दूरदूर पळत होतं. सहजीवनाचा नवा अध्याय सुरू झाला होता. नात्याला एक नवी झळाळी आली होती. आयुष्याशी वाटचाल करताना जिवाभावाचा सोबती मिळाला होता. सुख-दु:खाच्या ऊन-पावसात आता जोडीदाराची साथ मिळाली होती. जीवनाचं सुरेल गाणं बनत होतं. जीवन सुंदर आहे, असं वाटत होतं..
‘एके दिवशी सकाळीच काही न कळविता दोन्ही मुली अचानक येऊन धडकल्या. आनंदी आईला पाहून दोन्ही मुलींनी एकमेकींना टाळी दिली आणि डोळे मिचकावले.
‘थँक यू बाबा.’ दोन्ही मुलींनी अजयरावांचे हात हातात घेतले. गोंधळून शैलाताई पाहत होत्या.
‘अगं, तुझ्या मनात सारख्या येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आता तुला मिळेल. आपला नवरा एवढा कसा बदलला तर या मुलींमुळे तो बदलला. अगं, तंबीच दिली या पोरींनी मला. खरंच इतके दिवस ‘स्व’ पलीकडे मी विचारच करीत नव्हतो. सहजीवन म्हणजे काय हेच मला समजत नव्हतं. इतके दिवस मी वाईट नवरा होतो, पण आता चांगला नवरा आणि चांगला जोडीदार आहे की नाही?’
मुलींच्या अपार प्रेमाने शैलाताईंना गहीवरून आलं. डोळे पाणावले. ‘पोरींनो, तुम्ही तर माझा आधार बनून राहिलात. माझी व्यथा, वेदना तुम्ही समजून घेतली. माझ्या ‘आईपणाचा’ आणि ‘पत्नीपदाचाही’ आज सन्मान झाला. अजून काय पाहिजे आयुष्यात!’