नाबाद ५०००! Print

मनीषा सोमण - शनिवार, २५  ऑगस्ट २०१२

दूरचित्रवाणीवरच्या विविध हिंदी, मराठी वाहिन्यांवरील कौटुंबिक मालिका या अनेकांच्या टीकेचा विषय. परंतु याच मालिका लाखो लोकांच्या अक्षरश: रोजच्या जगण्याचा भाग होताना दिसतात. त्यातल्या व्यक्तिरेखांबरोबर त्यांचेही भावबंध जुळतात. गेली पंधरा वर्षे अशा असंख्य व्यक्तिरेखांना जन्माला घालत ५० मालिकांसाठी ५००० एपिसोड लिहिणाऱ्या, ५० शीर्षक गीतं  लिहिणाऱ्या  रोहिणी निनावे यांची ही मुलाखत..
‘‘ले खन सृजनशील असतं. मी जन्माला घातलेल्या व्यक्तिरेखा जेव्हा मी स्वत: त्या क्षणी जगते तेव्हाच त्या खऱ्या वाटतात. आजही मी लिहिताना माझ्या पात्रांबरोबर हसते, रडते, चिडतेही. अनेक प्रसंग कागदावर रंगवताना माझ्याही अंगावर काटा उभा राहात असतो. मीही अस्वस्थ होते. अशा वेळी मालिकेची गरज म्हणून मला वैचारिकदृष्टय़ा न पटणारी व्यक्तिरेखा रंगवणं प्रचंड अवघड असतं. यामुळे मला अनेकदा फ्रस्ट्रेशन येऊन आजारपणही येतं. हे काय करतोय आपण? असा विचारही येतो मनात, पण मी हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे. तेव्हा माझी मतं, विचार, माझ्या कल्पना अनेकदा बाजूला ठेवून मी काम करते. सगळंच कसं आपल्याला मनासारखं मिळेल? मी तर म्हणेन आपल्याला न पटणारं काम लोकांना पटेल असं करणं जास्त आव्हानात्मक आहे.’’
   वयाची पन्नाशी गाठताना एकूण ५० मराठी आणि िहदी मालिकांसाठी तब्बल ५००० एपिसोड आणि ५० शीर्षक गीतं लिहिणारी रोहिणी निनावे स्पष्टपणे आपली भूमिका मांडते. पण त्याचबरोबर या इंडस्ट्रीनं तिला नाव, यश, खूप चांगली माणसं, पसा सगळं भरभरून दिलं याबद्दल ती कृतार्थ आहे..
 ‘‘ध्यानीमनी नसताना मी या क्षेत्राकडे वळले. खरं तर मला प्राध्यापक व्हायचं होतं. त्या दृष्टीने मी शिक्षणही घेत होते. बी.ए. झाले. दरम्यान, मंत्रालयात िहदी ‘लोकराज्य’ची संपादक म्हणून नोकरी करू लागले. त्याच वेळी म्हणजे नोकरी करत असतानाच एकीकडे िहदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये डबल एम.ए. केलं. त्यानंतर शिक्षणविषयक डिप्लोमा कोस्रेसही केले. या दरम्यान भाषांतराची कामेही करत असे. असंच एकदा अधिकारी ब्रदर्सकडे भाषांतराचं काम करताना त्यांनी मला मालिकेसाठी एखादी कथा असेल तर सुचवायला सांगितलं.’’
..आणि इथेच सुप्रसिद्ध मालिका लेखनकार रोहिणी निनावेचा जन्म झाला!
  ‘‘मी त्या वेळी मंत्रालयात काम करत असल्याने पत्रकार, मंत्री, सरकारी कर्मचारी, विविध स्तरांवरील लोक सतत आजूबाजूला बघत होते. त्यातूनच मला ‘दामिनी’चं कथानक सुचलं. भाषांतराचं काम करत असल्याने, एपिसोड लेखनाचं तंत्र माहिती होतं. गौतमजींनी आणि मरकडजींनीही माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि मी ‘दामिनी’ लिहू लागले. त्याआधी मी काही शीर्षक गीतं लिहिली होती. काही मालिकांतून कामही केलं होतं. पण ‘दामिनी’मुळे मला यश आणि लोकप्रियताही मिळाली.’’
  मालिकेचं भाषांतर करणं आणि प्रत्यक्ष मालिका लिहिणं यात फरक असतोच..
‘‘खूप फरक असतो. मालिका स्वत: लिहिताना खूप गोष्टींचं भान ठेवावं लागतं. एखादी व्यक्तिरेखा उभी करायची म्हणजे तिच्या लकबी, सवयी, हावभावांसह उभी करावी लागते. आता जसं ‘पुढचं पाऊल’मधल्या अक्कासाहेब ज्या पद्धतीने ‘कळलं!’ म्हणतात तो म्हणण्याचा लहेजा मी सुचवलेला. इतकंच काय पण बहुतेक वेळा कुठे शूटिंग होणार आहे याचाही विचार करावा लागतो. कधी स्टुडिओला खिडक्याच नसतात तर कुठे पॅसेज नसतो, कधी अंगण नसतं हा विचार करून व्यक्तिरेखांच्या हालचाली ठरवाव्या लागतात.’’
लेखिका म्हणून कारकीर्द सुरू झाल्यावर तुझा अभिनय मात्र मागे पडला ना.़?
 ‘‘मालिका लेखन म्हणजे अक्षरश: कारखाना असतो. त्यासाठी इतका वेळ द्यावा लागतो की, त्यापुढे इतर कशाचा विचारदेखील करता येत नाही. अभिनयच काय पण मला माझं खासगी आयुष्यदेखील मनाप्रमाणे जगता येत नाही.’’
 ‘दामिनी’च्या यशानंतर रोहिणीला एकापाठोपाठ एक मालिका मिळत गेल्या. ‘अवंतिका’ मालिकेला मिळालेलं यश तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पण एकीकडे ‘दामिनी’, ‘अवंतिका’सारख्या न्यायासाठी लढणाऱ्या स्त्रीविषयक मालिका लिहीत असतानाच ‘भाग्यविधाता’ किंवा ‘अधुरी एक कहाणी’सारख्या टोकाच्या काळ्या-पांढऱ्या व्यक्तिरेखा दाखविणाऱ्या मालिकाही तिने लिहिल्या.
‘‘मला स्वत:ला अग्रेसिव्ह नायिका रंगवायला आवडतात. अरे, दाखवा ना स्कूटीवर फिरणारी, जीन्स घालणारी, खंबीरपणे घर-करिअर सांभाळणारी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी नायिका. पण बाईचं असं अग्रेसिव्ह असणं नाही पटत प्रेक्षकांना! त्यामुळे सतत मार खाणारी तरीही नवऱ्याला देव मानणारी, सासरच्यांची खाली मान घालून सेवा करणारी नायिकाच बहुतेक करुन रंगवावी लागते. ‘आरे ला कारे’ म्हणणारी जर सून दाखवली तर लगेच मालिकेचा टीआरपी (टेलिव्हीजन रेटिंग पॉईंट) घसरतो आणि मालिकांचा शंभर टक्के खेळ हा टीआरपीचाच असतो. यात कोणाला एकाला दोष देण्यात अर्थ नाही कारण सरळ आहे.. जे विकतं त्याला किंमत असते!’’
 पण मग आपल्या विचारांविरुद्ध काम करण्याचा त्रास नाही होत?
‘‘होतो ना, प्रचंड होतो. मी जन्माला घातलेल्या व्यक्तिरेखा जेव्हा मी स्वत: त्या क्षणी जगते तेव्हाच त्या खऱ्या वाटतात.     (पान ५ पाहा)
(पान १ वरून)    त्यांच्या ज्या भावना असतात त्या माझ्याही असतात. अशा वेळी मलाच न पटणारी व्यक्तिरेखा रंगवणं प्रचंड अवघड असतं. ते ही प्रेक्षकांना पटेल अशी!  जेव्हा ‘क्षण एक पुरे ’ नाटक लिहीत होते त्यावेळी अक्षरश मी रडत होते. माझ्या आईच्या आजारपणाच्यावेळी आणखी एकजण तिथे अ‍ॅडमिट होते. त्यांच्या कुटुंबाकडे उपचारांसाठी पसे नाहीत म्हणून त्यांची लाईफ सपोìटग सिस्टीम बंद करायची का? असा विचार ते करत होते, ते सारखं मला नाटक लिहितांना आठवून रडू येत होतं. मनाविरूध्द पात्र तर प्रत्येक मालिकेतच असतात. जसं ‘अवघाची संसार’ मधली इतकी शिकलेली मुलगी आपल्या नवऱ्याचे इतके अत्याचार का सहन करते? हा मला न सुटणारा प्रश्न होता. म्हणूनच मी आता मनाविरूद्ध काम करायचंच नाही हे ठरवलं आहे. एकेकाळी इतक्या प्रगल्भ विषयांवरच्या मराठी मालिका अचानक कशा भरकटल्या याचच आश्चर्य वाटतं!
ही केवळ व्यवसाय म्हणून करावी लागणारी तडजोड आहे?
‘‘मी हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे हे तर खरं आहेच, त्याचबरोबर जर हे मी नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणारच आहे. तेव्हा माझी मतं, आपले विचार, माझ्या कल्पना अनेकदा बाजूला ठेवून हे काम मी करते. माझ्याच कशाला इतर व्यवसायात असणाऱ्यांना, नोकरी करणाऱ्यांनाही वेळोवेळी तडजोड करावीच लागते ना. सगळंच कसं आपल्याला आपल्या मनासारखं मिळेल?
 ही तडजोड करताना किंवा स्पर्धेला तोंड देताना कधीतरी हे क्षेत्रच सोडून द्यावं असं नाही वाटलं?
‘‘नाही. एकतर तडजोड हा शब्द इतका लवचिक आहे की, आपण त्याकडे जर सकारात्मक दृष्टीने बघितलं तर ती तडजोड राहातच नाही आणि स्पध्रेचं म्हणशील तर फ्रस्ट्रेशन यावं अशी इथे स्पर्धा नाही. पसे बुडविण्याची वृत्ती खूप दिसते. सुरुवातीला मी खूप फटकाही खाल्ला आहे. पण मग कोणावर किती विश्वास ठेवायचा हे आपोआप समजत जातं. या क्षेत्राने मला पसा आणि प्रसिद्धी दोन्ही भरभरून दिलंय. त्यामुळे हे क्षेत्र सोडून जाण्याचा विचारच येत नाही. आता इतकी र्वष झाल्यावर मी मला आवडेल ते आणि आवडेल त्या लोकांबरोबरच काम करते.’’
अशा वेळी सगळ्या कामांना सारखाच न्याय दिला जातो?
 ‘‘नाही देता आला तर लोक मालिका बघणंच बंद करतील. ‘अधुरी एक कहाणी’ लिहिताना जी टोकाची पात्रं रंगवावी लागली होती त्याचा मला प्रचंड त्रास होत असे. पण नीना कुलकर्णीसारख्या अभिनेत्रीकडून मला तिच्या व्यक्तिरेखेविषयी दाद मिळते ती कामाला न्याय देऊ शकले म्हणूनच ना! पण मला अति खुनशी, धूर्त लोकांवर लिहिणं नाही झेपत. अशा वेळी मी चक्क ती मालिका अर्धवट सोडून देते. ‘यहाँ म घरघर खेली’सारखी प्रचंड ड्रामा असणारी मालिका, ज्यात जितकी म्हणून चांगली-वाईट टोकं असतील तितकी दाखवली गेली होती. ती मी काही एपिसोडनंतर नाही लिहू शकले. ‘अवंतिका’सारख्या काही हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या मालिका असतील ज्या मी शेवटपर्यंत लिहिल्या.’’
प्रेक्षकांना हवं असतं म्हणून द्यावं लागतं असं सगळेच म्हणतात.. पण यामागची प्रेक्षकांची मानसिकता काय असते हे तू कधी समजून घेतलयंस?
 ‘‘एक तर मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग म्हणजे मध्यमवयीन, अधिकतर लहान शहरातल्या स्त्रिया. त्या प्रत्येक स्त्रीला मालिकेतल्या पात्रात स्वत:ला बघायचं असतं. बहुतांश प्रेक्षक स्त्रिया ती मालिका जगत असतात. मला घरात त्रास सहन करावा लागतो, तोच त्रास जेव्हा नायिका सहन करते तेव्हा तिला आपली परिस्थिती फारशी वेगळी नाही याचं हायसं वाटतं. हेच ती नायिका जेव्हा प्रत्युत्तर देते तेव्हा मीही कधीतरी अशी वागू शकेन, या विचाराने तिला बळ मिळतं. पण जेव्हा मुळातच एखादी नायिका अग्रेसिव्ह दाखवली जाते, तेव्हा हे असं हजारातल्या एखाद्या घरात घडत असेल किंवा हे खोटं आहे, या विचाराने स्त्री प्रेक्षक चक्क ती मालिका नाकारतात. म्हणूनच तर एखादीच ‘दामिनी’ किंवा ‘अवंतिका’सारखी मालिका येते. आणखी एक मला अनुभवायला मिळालेली गोष्ट म्हणजे जेव्हा विवाहबाह्य़ संबंधांचा ट्रॅक असतो तेव्हा पुरुष प्रेक्षकांची संख्या वाढते. आता यामागचं सरधोपट कारण नाही सांगता येणार किंवा मला सगळ्याच पुरुष प्रेक्षकांना एका तागडीतही तोलायचं नाही. पण हे सर्वसाधारण निरीक्षण आहे.’’
मराठीप्रमाणेच तू िहदी मालिकांसाठीही लेखन केलं आहेस. तिथला अनुभव कसा असतो?
‘‘लोकप्रियता आणि पशाच्या दृष्टीने बघितलं तर तिथे दोन्हीही जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर तिथे अवास्तवताही खूप आहे. ‘कुसूम’ असेल किंवा ‘दिलसे दिया वचन’ या मालिकांमध्ये जो ड्रामा असतो तो आपण आपल्या आजूबाजूला ना कुठे बघतो ना अनुभवतो. मला वाटतं, िहदी मालिकांच्या प्रेक्षकांचा िहदी राज्यांचा जो मोठा पट्टा आहे, तिथे कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती असते. जे या मालिकांतून अधिक नाटय़मय करून दाखवलं जातं.’’
असं किती वेळा होतं की, सुरुवातीला एक गोष्ट सांगितली जाते आणि पुढे ती भलत्याच वळणाला लागते?
‘‘बहुतेक सगळ्या मालिकांचं असंच होतं. म्हणून तर मालिका भरकटत जातात. मुळात ती गोष्ट दुसऱ्याच कोणी लिहिलेली असते, ती गोष्ट मी फुलवणं तसंही कठीण असतं. त्यातही टीआरपीचं गणित जमवायचं असतं. अशा वेळी पुढे पुढे मूळ कथानक बाजूलाच राहातं आणि मालिका भलतीकडेच जाते.’’
चांगल्या कथेचा सत्यानाश होताना पाहाणं नक्कीच कठीण जात असणार?
‘‘म्हणून तर कित्येकदा मध्येच मालिका सोडून द्यावी लागते. जसं ‘स्टार प्रवाह’वरची ‘दोन किनारे दोघी आपण’ या मालिकेचं मूळ कथानक माझंच होतं. पण नंतर ती मालिका इतकी भरकटत गेली की पुढे मला ती लिहिणं कठीण झालं.’’
हे असं जेव्हा तू मध्येच मालिका सोडून देतेस तेव्हा तो निर्माता आणि तुझ्यामधले संबंध नाही बिघडत?
 ‘‘नाही होत असं. मला नाही पटत म्हणून मी नाही करत, हे समोरचाही समजून घेतो. मुख्य म्हणजे माझ्या नशिबाने मला स्मिता तळवलकर, विद्याधर पाठारे, राकेश सारंग यांसारखे खूप चांगले निर्माते मिळाले. िहदीमध्ये सूरज बडजात्यांबरोबर नेहमी काम करायला आवडेल मला. ते किंवा कविताला माणसाच्या कामाची खूपच जाण आहे. मध्यंतरी सतत लिहिण्याने माझे हात सुजले होते. त्या वेळी सूरजजी स्वत: माझा लॅपटॉप उचलत. जसं पशासाठी किंवा स्पध्रेत टिकून राहण्यासाठी काम करावं लागतं ना, तसं या इतक्या चांगल्या माणसांसाठीही काम करावं लागतं. ‘यहाँ मं घर घर खेली’ ही मालिका मी केवळ सूरजजींसाठी केली किंवा आता ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘पुढच्या पाऊल’ मालिकेत जी काही कटकारस्थानं, मारामारी दाखवावी लागते ते जसं मालिकेचं टीआरपी त्यावरच आहे म्हणून करते. तसं विद्याधर पाठारेंसारखा निर्माता आहे म्हणूनही करते. हे आमचं एक्सटेंडेड कुटुंबच आहे.’’
 या कुटुंबासाठी काम करताना तू तुझ्या कुटुंबासाठी वेळ कसा काढतेस?
 ‘‘लौकिक अर्थाने म्हणावं तसं माझं कुटुंब नाही. पण कोणीही नवरा-मुलं असणारी स्त्री जसं आपल्या कुटुंबासाठी करते तसंच मी माझ्या कुटुंबासाठी केलंय. लेखन, नोकरी सांभाळून मी आईचं आजारपण काढलं आहे. माझ्या भावाचं, बहिणीचं कुटुंबही माझंच आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि त्यांना गरज असेल तेव्हा मी त्यांच्यासाठी असते.’’
मालिकांशिवाय इतर काही लिहावं असं नाही वाटतं?
 ‘‘खूप वाटतं! पण अजून तितका वेळच काढता येत नाही. तरी ‘क्षण एक पुरे’ हे नाटक लिहिलंय. माझ्या ‘लोकसत्ता’तल्या चंदना मालिकेवरचंच ‘चंदना’ हे पुस्तक प्रसिद्ध झालंय. आता मी वयाचा मधला टप्पा गाठलाय. इथपर्यंत पोहोचल्यावर स्वत:च्याच आयुष्याच्या बेरजा-वजाबाक्या कराव्याशा वाटतात. मागे वळून बघणं संपलं की, मी उद्याचा नव्याने विचार करेन.. मनात खूप काही करायचं आहे ते प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करेन ..’’
रोहिणी निनावे यांनी लिहिलेल्या मालिका
दामिनी, मानिनी, घरकुल, भाग्यविधाता, काटा रुते कुणाला, झुंज एका वादळाशी, अवंतिका, अवघाची संसार, कळत-नकळत, ऊन-पाऊस, मृण्मयी, अधुरी एक कहाणी, अनुपमा, वेग, गोष्ट एका लग्नाची, मन उधाण वाऱ्याचे, पुढचं पाऊल.
कुसुम, संजीवनी, कुछ खोया कुछ पाया, दिल से दिया वचन, तुम्हारी दिशा, यहाँ मैं घर घर खेली..
शीर्षक गीते
संस्कार, मृण्मयी, अर्थ, कुंकू, एक झुंज वादळाची, चारचौघी, पुढचं पाऊल, सुवासिनी, अवघाची संसार, कशाला उद्याची बात, स्वप्नांच्या पलीकडे, कोशिश एक आशा, घर एक मंदिर, मुझे डोर कोई खिंचे...यांसारख्या ५० लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीते.