अभ्यासाशी मैत्री : अभ्यास कसा करून घ्यायचा? Print

आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it     

माझ्याकडे एक पेशंट आले होते, ज्यांच्या मुलाला मराठी विषय खूप क्लिष्ट आणि कठीण वाटत होता. त्याच्या पुस्तकात बाबा आमटे यांच्यावर एक धडा होता, ‘बिनकाटय़ांचा गुलाब’. मी प्रथम त्या पालकांना इंटरनेटवरून बाबा आमटेंची सगळी माहिती द्यायला सांगितली. मग मुंबईच्या वडाळा भागातील महारोगी रुग्णालयाला भेट द्यायला सांगितले. हे केल्यानंतर ते म्हणाले, अशा पद्धतीने मुलाला तो धडा शिकवताना इतकी मजा आली..
अभ्यासाशी मत्री खरंच होऊ शकते का, असा प्रश्न मला काही दिवसांपूर्वी एका वाचकाने विचारला. त्यांना अगदी इतिहास-भूगोलापासून भाषा, गणित आदी सगळे विषय कसे शिकवायचे ते समजावून सांगितले.

तेच तुम्हालाही सांगते आहे. तुमचा प्रतिसाद नक्की कळवा. सुरुवातीला आपण भाषा कशी शिकवायची हे पाहू. पण एक गोष्ट लक्षात असूदे, आपण विद्यार्थी तयार करायचेत, परीक्षार्थी नाहीत. मला माहीत आहे की, तुमच्या मनात सहज शंका येईल की स्पर्धापरीक्षेत तर मार्कच मिळवायला हवेत, तर मग?  हे जरी खरं असलं तरी सुरुवातीपासूनच मुलांना घोकंपट्टी आणि ‘पुढचं पाठ आणि मागचं सपाट’ अशा परिस्थितीपासून लांब ठेवा. स्पर्धा स्वत:शीच करायला शिकवल्याने मुलं पुढील आयुष्यात यशस्वी होतात.
प्रथम एक गोष्ट  लक्षात असू दे, तुमची मुलं शिकवणीला जात असोत किंवा नसोत त्यांना थोडंबहुत तुमचं मार्गदर्शन आवश्यक आहे. आता मुख्य प्रश्न हा आहे की, वेळ काढायचा कसा? मुलाच्या शाळेच्या पुस्तकांच्या दोन प्रती विकत घ्याव्यात. एक सेकंडहँडही घेता येईल. आपण ट्रेनमध्ये, लंचटाइममध्ये एक धडा तर सहज वाचू शकतो. घरी येऊन तो गोष्टीरूपाने मुलांना सांगता येतो. दररोज एक विषय जरी केला तरी आठवडय़ाचे सहा विषय सहज होतात. हा प्रयोग जर तुम्हाला यशस्वीपणे जमला तर खात्रीने सांगते, तुमचे शिकवणीचे पसे नक्की वाचतील. तुम्हाला शिकवता शिकवता समजेल की, मुलांचा खूप वेळ वाचतो. त्यांना मजा येते. त्यामुळे शिकवणीपेक्षा गुणसुद्धा जास्त मिळतात. एकंदर ज्याला आपण विन विन सिच्युएशन म्हणतो तशी परिस्थिती निर्माण होईल. याचा अर्थ असा नव्हे की मुलांना शिकवणीतून लगेच काढा. पण प्रयोग करून पाहा आणि तुमचा निर्णय घ्या.
लहान मुलांना भाषा शिकवताना त्यांचा शब्दसंग्रह कसा वाढेल ते पाहणं सर्वात महत्त्वाचे आणि ते जे काही पुस्तकात वाचतात ते आयुष्यात प्रत्यक्षात असतं का? ती वस्तू दिसते कशी, तिचा वापर कशासाठी केला जातो हे शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इंग्रजी ही भाषा अनेक देशांत बोलली जाते. प्रत्येक देशात उच्चार बदलतात. काही वेळा शब्दश: अर्थ घेण्यात अर्थाचे अनर्थसुद्धा होतात. आज आपण इंग्रजी या भाषाविषयाबद्दल बोलू. हा विषय घेण्यामागचं कारण असं आहे की, घरात मराठी आणि शाळेत चांगलं इंग्रजी जर मुलं बोलत असतील तर त्यांच्या दोन्ही भाषा पक्क्या होतील. शिवाय मुलं तीन भाषा एकत्र शिकू शकतात. त्यामुळे मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं तरी हरकत नाही. भाषा मराठी असो किंवा इंग्रजी असो, मुलांनी जास्तीतजास्त वाचायला हवं. त्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह वाढतो, ज्यायोगे मुलं स्वत:च्या भाषेत उत्तरं लिहू शकतात. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पालकांनी लक्षात घ्यायला हवी- शाळांमधून अमुकच शब्द म्हणजे पुस्तकात दिलेलेच शब्द वापरण्याला जोर दिला जातो. मुलं निबंधसुद्धा पाठ करून जातात. या सवयीमुळे मुलांची प्रतिभा खुंटते. पण जी भाषा शिकायची ती नीट आणि सखोल शिकली तर आपण ती सराईतपणे वापरू शकतो. आता थेट पुस्तकाकडे वळू. पाठय़क्रमातील सगळे धडे मुलांना आवडतीलच असं नाही. पण जर ते पालकांनी अगोदर वाचून समजून मुलांना समजावले किंवा गोष्टीरूपाने सांगितले तर मुलांना भाषा
जड वाटणार नाहीत. धडय़ामध्ये एखाद्या जागेचं वर्णन असेल आणि त्या जागी जाणं शक्य असेल तर मुलांना घेऊन अवश्य जावे, नाहीतर त्या जागांची चित्र तरी दाखवावीत.
माझ्याकडे एक पेशंट आले होते, ज्यांच्या मुलाला मराठी विषय खूप क्लिष्ट आणि कठीण वाटत होता. त्याच्या पुस्तकात बाबा आमटे यांच्यावर एक धडा होता- ‘बिनकाटय़ांचा गुलाब’. मी प्रथम त्या पालकांना इंटरनेटवरून बाबा आमटे कोण? त्याचं कार्य काय? आदी सगळी माहिती मुलांना द्यायला सांगितली. मग मुंबईच्या वडाळा भागातील महारोगी रुग्णालयालाही भेट द्यायला सांगितले. हे ऐकताना त्या पालकांना जरा कठीण वाटलं, पण काही महिन्यांनी ते पालक अगदी खुशीत दवाखान्यात आले. त्यांना अशा पद्धतीने मुलाला तो धडा शिकवताना इतकी मजा आली की, ती दोघं म्हणाली की त्यांनासुद्धा पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ती तिघं बाबांच्या आनंदवनातसुद्धा जाणार होती. तिकिटं काढूनच आली होती. आता वाचकहो विचार करा, असा अभ्यास मुलं कधी विसरतील का?
इंग्रजीच्या पुस्तकातले धडे ज्या पुस्तकातून घेतलेले असतात त्याची माहिती पुस्तकात असते. ही पुस्तकं वाचनालयातून आणून मुलांना वाचून दाखवली तर त्यांचं कुतूहल जागृत होईल. त्यांना तो धडा वाचावासा वाटेल आणि ते पुस्तकसुद्धा. मला आठवतंय, माझ्या मुलाला ‘तोतोचान’ नावाचा एक धडा होता. ते पुस्तक मला इंग्रजीत मिळेना, पण मराठीतून मिळालं. मग मी रोज रात्री त्या पुस्तकातून एक प्रकरण त्याला वाचून दाखवत असे. त्याला तो धडा इतका सुंदर समजला की ते त्याचं लाडकं पुस्तक झालं. मुलांना लहानपणापासून सांगितलेल्या गोष्टी त्यांना निबंध लिहायला खूप उपयोगी पडतात. याचा पण अनुभव मला माझ्या मुलाला वाढवताना आला. एकदा त्याला A beggar on the street या विषयावर निबंध लिहायचा होता, तर त्याने श्रीकृष्णाच्या समोर आलेल्या कुब्जाचं मनोगत लिहिलं होतं. तेव्हा तो अवघा तिसरीत होता. त्याच्या टीचरने मला बोलावून त्याचं खूप कौतुक केलं. त्या म्हणाल्या, निबंधावरून लक्षात आलं की हा मुलगा निबंध पाठ करीत नाही. भाषा यासाठीच शिकायच्या आहेत. लेखन कौशल्य, वाचन कौशल्य वाढवण्यासाठी नाही.
तर पालकहो, आजपासूनच अशा भाषा मुलांना शिकवणार ना? प्रयोग करून मला अवश्य कळवा. ते वाटतं तितकं कठीण आणि क्लिष्ट नाही, उलट खूप मजेशीर आहे.