कायद्याशी मैत्री Print

पूर्र्वी कमानी , ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
’ माझ्या बहिणीचा दुसरा विवाह झाला असून तिला पहिल्या पतीपासून एक १४ वर्षांचा मुलगा आहे. बहीण आठ वर्षांपूर्वीच पहिल्या पतीपासून विभक्त झाली असून दुसऱ्या पतीपासून कोणतेही अपत्य नाही. तिच्या दुसऱ्या पतीने या मुलाचा कायदेशीपणे ताबा घ्यावा, असे आम्ही सुचवले आहे. मेहुण्यांनाही ते मान्य आहे व मुलाची जबाबदारी घेण्यास ते राजी आहेत. मात्र कायदेशीरपणे मुलाचा ताबा घेण्यासाठी पहिल्या पतीची परवानगी आवश्यक आहे. त्यांना संपर्क साधण्याचा आम्ही गेल्या ६-७ वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. मात्र अपयशी ठरलो. आम्ही काय करावे, ते कृपया सुचवावे. मुलाचा कायदेशीर ताबा घेण्यात कोणत्या अडचणी येतील, त्याबाबत मार्गदर्शन करावे.
- कुणाल, ई-मेलवरून
उत्तर- तुमच्या बहिणीला पहिल्या पतीपासून असलेल्या अपत्याचे वय आता १४ वर्षे पूर्ण आहे. तसेच तो मुलगा गेल्या ८ वर्षांपासून तुमच्या बहिणीच्या व तिच्या दुसऱ्या पतीसोबत राहत असल्याने त्या मुलाचा ताबा आपोआप त्यांच्याकडेच येतो. त्यामुळे मला वाटतं की तुमचा प्रश्न दुसऱ्या पतीने मुलाला दत्तक कसे घ्यावे, असा असावा. तुम्ही हिंदू असाल तर संबंधित मुलाच्या आई-वडिलांच्या परवानगीने त्याला दत्तक घेता येणे शक्य असते. मात्र तुमच्या प्रकरणात मुलाच्या वडिलांचा गेल्या ६-७ वर्षांपासून काहीही संपर्क झालेला नाही. अशा परिस्थितीत तुमच्या बहिणीचा  पहिला पती मृत असल्याचे न्यायालयाने घोषित करावे, यासाठी अर्ज केला पाहिजे. सलग सात वर्षे एखाद्याचा मागमूस लागला नाही तर ती व्यक्ती मृत असल्याचे घोषित करता येते. एकदा का हे झाले की तुमची बहीण मुलाला दुसऱ्या पतीला दत्तक देऊ शकेल. तुम्ही कुटुंब कल्याण न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचा सल्ला घ्या. यात वेळ दवडू नका. कारण मुलाचे वय १५ वर्षांच्या वर झाले की त्याला हिंदू दत्तक कायद्यातील तरतुदींनुसार दत्तक देता येणार नाही.

’  वडिलांच्या पश्चात आई व आम्ही तिघे भाऊ, एक बहीण अशी भावंडे आहोत. आमचे वडील २००१ साली गेले. त्यांनी कोणतेही इच्छापत्र केले नव्हते. आमची आईसुद्धा रेल्वेत नोकरी करीत होती. आता राहतो ते घर घेण्यापासून इतर सर्व मालमत्ता घेण्यापर्यंतच्या व्यवहारात तिचा वडिलांच्या बरोबरीने वाटा होता. आमचे घर दादर परिसरात आहे. या ठिकाणी माझा मधला भाऊ, त्याच्या पत्नीसह राहतो. आई त्याच्याकडेच राहते. मात्र वडील गेल्यानंतर आम्ही कोणत्याही वाटण्या केलेल्या नाहीत. आमच्या बहिणीचे १९९४ मध्ये लग्न झाले. आम्हाला आता आमचे हिस्से करायचे असून कुटुंबातील प्रत्येकाचा हिस्सा कसा ठरवावा? आमच्या आईला प्रॉपर्टीचा थेट अर्धा हिस्सा मिळेल काय? मात्र तिच्याकडे घरासाठी आर्थिक हातभार लावल्याचा काहीही पुरावा नाही.
- राजेश भागवत, ठाणे
उत्तर- घर तसेच इतर कौटुंबिक मालमत्ता घेण्यात तुमच्या आईने वडिलांइतकाच आर्थिक वाटा उचलल्याचे तुम्ही नमूद केले आहे. मात्र कुठेही कायदेशीरपणे वारस म्हणून तिचे नाव नसल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे कायदेशीर उत्तर म्हणजे - तुमच्या वडिलांनी इच्छापत्र केले नव्हते. त्यामुळे तुमची आई, तिघे भाऊ व बहीण यांच्यात वडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे (जे त्यांच्या नावावर होते) समान वाटप होईल. मात्र वडिलांच्या नावे असलेली मालमत्ता (घर इ.) घेण्यात आईचा समान वाटा होता, असे तुम्ही सांगितले आहे. त्यामुळे संपत्तीचा अर्धा हिस्सा आईला देऊन उरलेल्या अध्र्या हिश्शातून तुम्ही भावा-बहिणींनी समान वाटे करावेत. संपत्तीच्या वाटणीचा हाच योग्य पर्याय आहे.

’ माझ्या विवाहापूर्वी आमचे एकत्र कुटुंब होते. लग्नानंतर त्याच घरात मात्र घराच्या वरच्या मजल्यावर स्वतंत्र बिऱ्हाड थाटले. माझे आई-वडील धाकटय़ा भावाकडे म्हणजेच खालच्या मजल्यावर राहत होते. काही वर्षांनी वडिलांचे व पाठोपाठ आईचे निधन झाले. मात्र वडिलांनी निधनापूर्वी इच्छापत्र करून ठेवले होते. त्यानुसार राहत्या घराचा ताबा त्याने धाकटय़ा भावास देऊ केला. इतकेच नाही, तर मला राहते घर सोडून जाण्यास सांगितले आहे. मात्र निधनाच्या खूप वर्षे आधी माझा स्वतंत्र संसार थाटण्यासाठी वडिलांनी वरची खोली मला स्वखुशीने दिली होती. येथे मी माझा संसार थाटला. मला दोन मुली व एक मुलगा असल्याने जागा अपुरी पडेल म्हणून मी वडिलांच्या लेखी परवानगीने रितसर स्टँप पेपरवर करारनामा करून घेतला. त्यामध्ये सध्याच्या खोलीसह आणखी दोन खोल्या व त्या खोल्यांच्यावर आणखी एक खोली बांधण्याची परवानगी घेतली. वडिलांनी त्याला संमती दिली. हा लेखी पुरावा मजजवळ आहे. महत्त्वाचे म्हणजे या तीन खोल्या व आतील बांधकाम मी माझ्या स्वकष्टार्जित पैशांतून करून घेतले. मात्र या बांधकामाचा उल्लेख इच्छापत्रात करण्याचे भान बहुधा वार्धक्यामुळे वडिलांना राहिले नसेल. माझा प्रश्न असा आहे- आधी परवानगी देऊन नंतर मी बांधलेल्या तीन खोल्यांचा ताबा सोडून द्यावा असे सांगून घराची मालकी इच्छापत्राद्वारे वडील भावाला कसे देऊ शकतात? याला मी प्रथम दिवाणी न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात आव्हान दिले; मात्र काही हाती आले नाही. गेली १९ वर्षे खटला सुरू आहे.
- वि. गो. भागवत, पुणे
उत्तर- वडिलांच्या इच्छापत्रामुळे तुमच्यावर अन्याय झाल्याचे दिसते. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे दोन प्रश्न उभे राहतात. तुम्ही उल्लेख केलेल्या घराची मालकी वडिलांकडे वडिलोपार्जित मालमत्ता म्हणून आली की त्यांनी हे घर स्वकमाईने घेतले होते? जर ही स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर त्याची वाटणी कशी करायची हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार तुमच्या वडिलांना आहे. मात्र जर ही वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर आपोआप वडिलांचे इच्छापत्र अवैध ठरते. जरी वेळ लागला तरी न्यायालयातील खटला तुम्ही नक्की जिंकाल. दुसरा प्रश्न म्हणजे वडिलांनी घर स्वकष्टाने घेतले असेल तरी त्यांनी इच्छापत्र करण्यापूर्वी आहे त्या ठिकाणी वरच्या मजल्यावर बिऱ्हाड थाटण्यासाठी तुम्हाला स्वखुशीने लेखी परवानगी दिली आहे. त्यामुळे नंतर इच्छापत्रात ती नाकारणे थोडे अतार्किक वाटते. त्यामुळे इच्छापत्र तितकेसे विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे कोर्टकचेऱ्यांसाठी वेळ लागत असला तरी अखेरीस न्याय मिळतो हे नक्की. त्यामुळे या खटल्याचा अवश्य पाठपुरावा करा.
तुमचे  कायदेविषयक  प्रश्न थोडक्यात पाठवा या पत्त्यावर - ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it