पिंपळपान.. स्मृतिगान.. Print

alt

निर्मला वैद्य , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पिंपळपानाचं गारूड बालपणी मनावर कायम असतंच. पुस्तकात ते जाळीदार पान नाही, अशी मुलं क्वचितच सापडायची. या पिंपळपानावरून आमच्या वाचक ८८ वर्षीय निर्मला वैद्य यांच्या स्मृतिपटलावर अनेक घटना आठवून गेल्या, त्यांनीच शब्दांकित केलेल्या या आठवणी-
जवळजवळ २५ वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबई कॉर्पोरेशनच्या मराठी शाळेत शैक्षणिक साधनांच्या प्रदर्शनाची परीक्षक म्हणून मी गेले होते. तिथे एका छान पिंपळपानावर आपल्याच पायाचा अंगठा चोखणारा छोटा गोंडस-गुटगुटीत बाळसेदार हसरा कृष्ण दिसला. कृष्ण नि मोरपीस ही जवळीक मला माहीत होती. पण पिंपळपान नि कृष्ण! खरं तर हे चित्रही सर्वाच्याच परिचयाचं आहे. यात जगबुडीची कथा आहेसं म्हणतात. इतक्यात माझ्या मनात चक्क एक जुनं गाणं जागं झालं. हिराबाईंची रेकॉर्ड असावी. शब्द होते, ‘कान्हा पाहिला, पाहिला का कोणी सांगा.. अंतऱ्यात-’ माथा शोभे पिंपळपान। मेघवर्ण ऐसा जाण। त्याला म्हणती श्री भगवान। योगी ध्यान विश्रांती ।’ योग्यांना त्याच्या ध्यानात सतत टिकणारी आनंदाची विश्रांती देणारं हे ध्यान- नि ते पिंपळपान! असं हे पिंपळपान आमच्या मराठी शाळेतल्या मुलींच्या पुस्तकातही असायचं, ते आठवलं.. छोटी कोवळी पानं सुकायची पण वाळून त्याचे तुकडे मात्र कधीच पडायचे नाहीत. मोठय़ा पिंपळपानाला मात्र खूप छान जाळी पडायची. या जाळीदार भोकातून मी चक्कछानपैकी माझ्या भूतकाळात गेले. नाशिकच्या आमच्या घरात उंच दरडीवर एक छानसा पिंपळवृक्ष होता. रोज सकाळी त्याच्याकडे बघून आम्ही अगदी भाविकपणे आजीनं शिकवलेला श्लोक म्हणायचो. मूलत: ब्रह्मरूपाय, मध्य तो विष्णूरूपाय, अग्रत: शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नम:। एकाच वृक्षात हे तीनही महत्त्वाचे देव नांदत असतात! बरं वाटायचं. पुढे मोठय़ा शाळेत गेल्यावर गीतापठण १५वा अध्याय. यात भाग घेतल्यावर ‘ऊध्र्वमूलमध:शाखं अश्वत्थं प्राहुरव्ययम्’ इथे तो उलटा (?) पिंपळ भेटला. आजीनं तर पिंपळाला अश्वत्थ म्हटलंय. जाऊ द्या! संस्कृतातल्या गीतेतला हा उलटा पिंपळ पण वेगळाच अश्वत्थ असेल असं म्हणून अर्थ बघण्याचा नाद सोडून दिला.
आमच्या नाशिकच्या आम्ही राहत असलेल्या कानडेमारुती गल्लीतल्या मारुतीच्या मागे एक छान मोठा पिंपळ होता. मी रोज त्या मारुतीला चंवोळीत पाणी-त्यावरच्या ताटलीत गंध-कुंकू नि साखर किंवा गूळ घेऊन त्याला वाहून यायची. त्या वयात मला मारुतीला लागणारं तेल माहीत नव्हतं. तिथून जवळच आमची पालिकेची मराठी शाळा होती. शाळा सुटली की आमचा मैत्रिणींचा घोळका त्या मारुतीला अकरय म्हणजे अकरा प्रदक्षिणा घालायला न चुकता जायचो. त्याला एक खूप मोठं गमतीदार कारणही होतं. आमच्या त्या शाळेजवळ दोन दात खूप पुढे आलेली-चष्मा लावणारी एक वयस्कर आई नि तिची मुलगी विठाबाई! या दोघी जणी यायच्या. त्या भुताळणी आहेत अशी दाट वदंता होती. म्हणून आम्ही त्या दोघींना खूप घाबरायचो. एकदा त्या दोघी जणी नेमक्या आमच्या वेळी म्हणजे संध्याकाळी मारुतीला आल्या. आमच्यातली एक घाबरट तिथूनच ओरडली. ‘अेऽ पळा पळा, दोघी भुताळणी आल्यात!’ ते त्या दोघींनी ऐकलं नि एकीनं त्या किंचाळलेल्या माझ्या मैत्रिणीचा कोपरापुढचा हात अस्सा जोरात दाबला की तिचा हात खूप लाल लाल झाला होता. हे दुखणं तिला चांगलं पंधरा-वीस दिवस भोगावं लागलं. आजच्या मुलांना खरं नाही वाटणार. पण या दोघींच्या घरावरून जाताना आम्ही कायम राम राम म्हणत पळत जायचो. आमच्या नेहमीच्या प्रदक्षिणा चालूच राहिल्या, कारण भुताखेतांपासून भक्तांची सुटका फक्त मारुतीच करतो यावर आमचा विश्वास होता. रोजच्या प्रदक्षिणा घालताना ‘राम राम, राम राम, नि जय हनुमान, जय हनुमान’ हे मनात म्हणणं चालूच असायचं!
लहानपणी पिंपळावर मुंजा असतो, तो लहान मुलांना गुप्तपणे पकडतो नि खूप त्रास देतो असंही ऐकलं होतं. ज्या मुलांची मुंज झाल्यावर सोडमुंज होत नाही, अशी मुलं मेली तर ती पिंपळावर मुंजा होतात. पण या भीतीवर आमच्यातल्याच एका सखीनं छान बातमी आणली की, हा मुंजा मुलींना कधीच त्रास देत नाही. या बातमीनं आमच्या सगळ्यांचा जीव निर्धास्त झाला. भांडय़ात पडला. हे भांडं बहुधा मनात, हृदयात, मेंदूत कुठे असतं हे अजून कुणालाच कळलेलं नाही!
मारुती मंदिर नि पिंपळ हे अद्वैत खेडोपाडी नेहमीच असतं. काही दिवसांनी पिंपळपान, मोरपीस यांचे आणखीही अर्थ समजले. आयुर्वेदात मोरपिसाची जशी औषधं आहेत तशी पिंपळ, त्याची पानं, मुळं, खोड यांचीही औषध आहेत. लहानपणी मे महिन्यात बहिणीकडे गेले होते. तिच्या सासूबाई खूप हुशार, वाचन चांगलं, त्यांना खूप औषधही माहीत असायची. मी एकदा म्हटलं, माई आपल्या त्या पिंपळाची पानं कशी छोटी छोटी लाल लाल मऊ मऊ दिसतात. अगदी खावीशी वाटतात! अगं, मग खा की! तू आणि मी दोघी जणी खाऊ. त्या पानांनी खूप छान शक्ती येते म्हणतात. नि आम्ही दोघींनी पंधरा दिवस झकपणे ती कोवळी लुसलुसीत पानं खाल्ली. आता वाटतं पिंपळ हा शक्तिदाता आहे, तो मारुतीसारखी शक्ती देतो! बहुधा हाच संदेश त्या अद्वैतात असावा. जाळीदार पिंपळपानावर खूप छान रंगीत चित्रं काढलेलीही मी पाहिली आहेत. खेडेगावातून पिंपळ, वड या वृक्षांसाठी नेहमीच छान दगडीपार बांधलेले असतात. त्यातले काही पार म्हणे नवस बोलूनही बांधलेले असतात. हे पार म्हणजे अनेक उचापतींचं गावकऱ्यांचं आवडतं ठिकाण! गावगप्पा-चावडी- ग्रामसभा- अनेक गोष्टींची कधी गुपचूप तर कधी प्रकट आखणी असं बरंच काही इथे घडत असतं. मला पहिला मुलगा झाल्यावर मी प्रथमच ज्ञानरायाच्या आळंदीला गेले होते. तिथला तो डेरेदार पिंपळ, त्याला जिवेभावे प्रदक्षिणा घालणाऱ्या, आपला संन्याशी होऊन गेलेला नवरा गुरुकृपेने परत मिळवणाऱ्या- नि महाराष्ट्रालाच नाही तर भारतालाही भूषणभूत झालेल्या चार मुलांना जन्म देणाऱ्या त्या भाविक भाग्यवान रुक्मिणीबाई मला दिसल्या. पिंपळाला १०८ प्रदक्षिणा घालणाऱ्या, पुत्रप्राप्तीसाठी खडतर व्रत करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या मातोश्रीही दिसल्या. मनात आलं, आपल्याला जर दुसरा मुलगा झाला तर तोही असाच खूप हुशार व्हावा. तेव्हा आपण या पिंपळाची पानच घेऊन जाऊ नि त्यांचीच पूजा-प्रार्थना करू. तेव्हा मी तिथून ५-६ पानं घेऊन आले. त्यांची काही दिवस खरंच छान पूजा-प्रार्थनाही केली. कुणाकुणा भाविकांना दोन-तीन पानं देऊन एक पान मात्र- खरं माना वा मानू नका पण माझ्या छोटय़ा ज्ञानेश्वरीत थोडंसंही न मोडता अज्जून जसंच्या तसंच आहे! नि त्यातूनच मला पुष्कळदा तो योगिराज ज्ञानेश्वर, ते चरित्र, ती ज्ञानेश्वरी तसंच स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे नि तो मिळवणारच, हे ठाम सांगणारे, केसरीतून एकापेक्षा एक सरस अग्रलेख लिहिणारे, इंग्रजांना सळो की पळो करणारे, गीतारहस्य सांगणारे असे विविध गुणपैलूंनी नटलेले लोकमान्य टिळक दिसतात ते पिंपळ, ते पार म्हणजे त्या वेळची पर्यावरणशुद्धीची- आज जशी प्राणवायू पुरवठा केंद्रं निघाली आहेत तशीच महत्त्वाची ठिकाणं असावीत. वृक्ष हे आपल्या सर्वागांनी- सर्व गुणांनी समाजाला हितकारक असं काही ना काही सतत देत असतात. त्यांचा जन्मच मुळी देण्यासाठी असावा म्हणूनच आपले पांडुरंगशास्त्री वृक्षांना मंदिर म्हणतात! या पिंपळपानावरनं मन एकदम माझ्या आवडत्या कवीच्या गडकऱ्यांच्या ‘प्रेम आणि मरण’ या कवितेकडे अगदी हळुवार झुळकीसरशी गेलं. एका कुठल्याशा जागी देख- तो पिंपळवृक्ष सुरेख! (बहुधा तो मोठा वृक्ष पिंपळच होता, वयाने आठवणी थोडय़ा धूसर झाल्यात.) खूप मोठय़ा वृक्षाला एकदा आकाशात लखकन् चमकणारी नाचरी वीज दिसते. नि त्या वेडय़ाचं त्या बिजलीवरच कमालीचं प्रेम बसतं. त्याची तहानभूक हरपते. तो रोडावतो. भोवतालचं गवत-झाडं अशी सगळी त्याला हसतात. वेडा म्हणतात, देवदेखील समजूत घालतात. शेवटी जे व्हायचं तेच होतं. बिजलीच्या भेटीचा ध्यास घेऊन तिला कवेत घेतली-नि स्वत:जवळ गेला. ज्योती नि पतंगप्रीतीचा हा जणू नवा आविष्कार होता. या प्रीतिकथेचं तात्पर्य म्हणून कवी म्हणतो, ‘हा योग। खरा हटयोग। प्रीतीचा रोग- लागला ज्याला जगणे हे ऐसे त्याला ह्य़ा जगी।’  प्रेम विषयावर प्रेम करीत करीत मरणं हेच त्या जिवाला जीवनाचं सार्थक वाटतं, खरं तर देशावरही असंच जिवापाड प्रेम करीत संपून जाणारी वेडय़ा (?) देशभक्तांची मांदियाळीच मनात आठवतेय. पण थांबायला हवं. पाहिलंत ना केवळ एकच पिंपळपान आपल्याला आपल्या जीवनातल्या कितीतरी भावमधुर अशा हिरव्यागार मऊ मऊ आठवणींच्या पिंपळपानातून कुठे कुठे घेऊन गेलं. पण शेवटी मात्र खूप छानशा विचाराच्या महत्त्वाच्या मुक्कामावर आणलं! होय की नाही?