र.धों.कर्वेच्या निमित्ताने : तो एक फक्त अपघातच Print

alt

डॉ. मंगला आठलेकर , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ज्या मुलीवर बलात्कारासारख्या भयंकर प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येते, तिनंच आता धीट बनण्याची आवश्यकता आहे. बलात्काराकडे आयुष्यातला एक दुर्दैवी अपघात म्हणून तिनं पाहिलं पाहिजे. अपघातात हातपाय तुटतात, शरीर जखमी होतं, पण तो अपघात हे तिचं लांच्छन नसतं. अपघात झाला म्हणून खालमानेनं तिला जगावं लागत नाही. स्त्रीवर होणारा बलात्कार हा तिचा अपराध नाही हे तर तिनं समाजाला बजावून सांगायला हवंच, पण त्याचसाठी धीटपणे लढाही द्यायला हवा.
‘बलात्कार’ या विषयावरचा हा तिसरा व अंतिम लेख. बलात्कार करणाऱ्या पुरुषाला काय शिक्षा असावी, त्या शिक्षेच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी कायद्यात कोणती दुरुस्ती करता येईल तसेच कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही अधिकारात या गुन्ह्य़ाला माफी असता नये या आग्रही भूमिकेनंतर बलात्काराची जीवघेणी वेळ मुलीवर येऊच नये यासाठी काय करता येईल किंवा समजा आपल्या मुलीवर दुर्दैवानं असा प्रसंग ओढवलाच तर आपली भूमिका काय असायला हवी, याचा विचार करायला हवा.
बलात्काराच्या अनेक घटनांत आपल्याला एक साम्य दिसतं व ते म्हणजे जिच्यावर बलात्कार होतो ती लहान मुलगी असो, तरुणी असो वा प्रौढ स्त्री असो, ती बेसावध असते. आजूबाजूला इतक्या बलात्काराच्या घटना घडत असतानाही आपल्यावर अशी वेळ येऊ शकते याची किंचितशी शंकाही तिच्या मनाला शिवत नाही. आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ‘लिफ्ट मागणाऱ्या तरुणीवर बलात्कार’ अशी बातमी वाचूनही दुसऱ्या दिवशी एखादी स्त्री परत लिफ्ट मागते आणि बलात्काराचा बळी ठरते. घरातल्या नोकरमाणसांबरोबर, ड्रायव्हरबरोबर मुलींना एकटं पाठवू नये, त्यांना त्यांच्यावर सोपवून कुठे जाऊ नये, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची साक्ष देणाऱ्या घटना डोळ्यांसमोर असूनही शेजारचा, ओळखीचा किंवा नात्यातला माणूस खाऊ देण्याच्या निमित्तानं मुलीचा घात करतो हे पाहण्यात, वाचनात असूनही मुलींच्या आया आपल्या मुलींना सावध करत नाहीत आणि स्वत:ही सावध होत नाहीत.
मुलींनी तर स्वत:वर कधी बलात्कार होऊ शकतो, धोके आहेत तिथं जाणं आपण टाळलं पाहिजे असला कसला विचारच केलेला नसतो. म्हणून तर त्या पटकन ‘ओळखीचा माणूस’ म्हणून त्याच्यावर विश्वास टाकतात. आपल्या शरीराचं आकर्षण त्याला वाटतंय याची पुसटशी जाणीवही त्यांच्या मनाला झालेली नसते. किंबहुना स्वत:चं शरीर असं ओळखीतल्या पुरुषाच्या भोगाचं साधन होऊ शकतं हा विचारही त्यांच्या मनाला शिवलेला नसतो. म्हणूनच प्रत्येक आईनं मुलीला तिच्या शरीरासंबंधीची जाणीव करून दिलीच पाहिजे, नात्यातला असो वा शेजारचा असो, पुरुषावर सरसकट भरवसा टाकता कामा नये. त्याला कुठल्याही निमित्तानं आपल्या शरीराला हात लावू देता नये हे आईनं मुलीला बजावून सांगितलं पाहिजे आणि त्याच वेळेस त्यातील धोक्यांविषयीही मुलींशी स्पष्टपणे बोललं पाहिजे. लहान मुलींची स्वत:च्या शरीरासंबंशीची अनभिज्ञता त्यांना बलात्कारासारख्या जीवनातून उठवणाऱ्या अनुभवाकडे नेऊ शकते याविषयीची सावधता कशी बाळगायची हे आईनं मुलीला शिकवायला हवं. पण या गोष्टीला द्यावं तितकं महत्त्व दिलं जात नाही. बलात्काराच्या इतक्या घटना घडूनही आयांची झोप काही उडत नाही.
यानंतर प्रश्न राहतो तो पालकांनी, समाजानं आणि स्वत: त्या मुलीनं बलात्काराकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा. ‘बलात्कार’ या शब्दात सक्ती स्पष्ट आहे. मुलीच्या मनाविरुद्ध तिच्यावर केलेला हा अत्याचार आहे हे या शब्दातून स्पष्ट होतं. अशा वेळी पालक, समाज आणि कायदा साऱ्यांनीच तिच्या बाजूनं उभं राहायला हवं. पण साऱ्यांच्या नजरा तीच गुन्हेगार असल्यासारख्या तिच्याकडे वळत राहातात. पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणीनं सेमिनारसाठी कोंढव्याला पोहोचायला उशीर होतो म्हणून एका गाडीला हात केला. ती गाडीत बसल्यानंतर त्या गाडीतल्या तीन तरुणांनी तिच्या डोक्याला पिस्तुलाची नळी लावून पुणे शहरभर तिला फिरवलं, तिच्या शरीराशी असभ्य चाळे केले आणि अखेर तिच्यावर तिघांनीही बलात्कार करून तिला आडवाटेवर फेकून दिलं. काही वर्षांपूर्वी बोरिवलीतही बसस्टॉपवर उभ्या असलेल्या एका गरोदर स्त्रीला रिक्षात ओढून घेऊन रिक्षा ड्रायव्हर व त्याच्या मित्रानं तिच्यावर बलात्कार केला.
देशाची राजधानी दिल्ली ही तर बलात्काराचीही राजधानीच आहे असं म्हणावं लागेल. दिल्लीत घडणाऱ्या अशा अनेक अत्याचारांची नोंद आपल्याला नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालात पाहायला मिळते. दिल्लीतलीच काही महिन्यांपूर्वीची ही घटना- कामावरून घरी जाणारी एक स्त्री बसस्टॉपवर उभी असताना एका रिक्षा ड्रायव्हरनं तिला घरी सोडतो असं सांगून रिक्षात घेतलं. निर्जन जागी रिक्षा नेऊन रिक्षातल्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आणखी तिघे जण तिथे आले. त्या पाच जणांनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. तेवढय़ात एक ट्रक ड्रायव्हर तिथे आला. त्यानंही त्यांना दम देऊन तिला ताब्यात घेतलं व तिच्यावर बलात्कार केला. शरीर-मनाच्या चिंध्या झालेल्या अवस्थेत ही बाई पोलिसांना निर्जन जागी पडलेली आढळ्ली. ही बातमी २१ मे २०१२ च्या वर्तमानपत्रात आलेली आहे. घटनांची यादी केवढी तरी आहे. प्रश्न घटनांच्या संख्येचा तर आहेच, पण त्याहून अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे तो अशा घटनांवर समाजातल्या विविध स्तरांतून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांचा!
समाज पहिला दोष देतो तो स्त्रीला. ‘कशाला तिनं एकटं भटकावं?.. काय हौस आहे सेमिनारला वगरे जाण्याची?.. अंधार पडायच्या आत घरी यावं एवढंही तिला कळू नये काय?.. म्हणजे आजही तिला आठवण करून दिली जाते ती तिच्याभोवती घातलेल्या कुंपणाची, बाहेरच्या जगात ती सुरक्षित नसल्याची. पण बलात्कार करणाऱ्या पुरुषाला जाब विचारण्याची आवश्यकता मात्र समाजाला वाटत नाही. अशा विकृत पुरुषाची नुसती शाब्दिक निर्भर्त्सनाच नव्हे, तर भर चौकात फटके मारून िधड काढण्याची आणि एक आयुष्य बरबाद केल्याबद्दल त्याला कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता असताना समाज मात्र बौद्धिक घेतो ते स्त्रियांचं! तिच्यावर बलात्कार होणं यात तिचीच किती भयंकर चूक आहे, यापुढे कोण तिच्याकडे चांगल्या नजरेनं बघणार? कोण तिच्याशी लग्न करणार?.. अशी  दूषणं तिच्या विस्कटलेल्या भविष्याबद्दल तिला देत समाज तिच्या मनात विलक्षण अपराधी भाव निर्माण करतो. परिणामी ती स्वत:ला कोंडून घेते आणि बलात्कार करणारा पुरुष मात्र बेमुर्वतखोरपणे समाजात मोकळा फिरतो.
सामान्य माणसंच कशाला, स्त्रीवर होणाऱ्या बलात्काराबाबतची अगदी गांधीजींसारख्या महात्म्याची भूमिकाही आपल्याला बुचकळ्यात टाकणारी आहे. कधी गांधीजी ‘बलात्काराने पळवून नेलेल्या स्त्रियांनी कोणताच अपराध केलेला नाही. त्यांना कोणताही दोष लागत नाही.. बलात्कारानंतर आत्महत्या करण्याचा स्त्रीला हक्क नाही आणि आवश्यकता पण नाही. उलट प्रत्येक सत्प्रवृत्त माणसाच्या करुणेला व सक्रिय मदतीला त्या पात्र आहेत.’ असं म्हणतात, तर कधी, ‘स्त्री समजूतदार आहे ती कोणत्याही अवस्थेत स्वत:वर बलात्कार होऊ देणार नाही. तो होण्यापूर्वीच ती मरून जाईल.. शीलभ्रष्ट होण्याचा प्रसंग आला असताना स्त्रीने विष घेऊन प्राण द्यावा. पण स्वत:चे जिणे कलंकित होऊ देऊ नये.’ असंही म्हणतात.
एकंदरीत, स्त्रीवर होणाऱ्या बलात्कारानंतर स्त्रीचं जगणं कलंकित होतं या समाजाच्या धारणेपासून गांधीजीही स्वत:ला बाजूला ठेवू शकले नाहीत. हे चित्र आजचं नाही. पूर्वापार असंच होत आलंय. स्त्रीच्या अवघ्या अस्तित्वाचा केंद्रिबदू तिचं चारित्र्य आहे आणि तिच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ‘चारित्र्य’ या शब्दात दुर्दैवानं फक्त ‘योनिशुचिता’ एवढाच अर्थ सामावलेला आहे. लग्नसंबंधाखेरीज तिचा कुठल्याही पुरुषाशी शरीरसंबंध आला, मग तो स्वेच्छेनं असो वा तिच्यावर झालेला बलात्कार असो, तरी तीच चारित्र्यहीन ठरवली जाते. समाज पुरुषाकडे बोट दाखवत नाही, पण तिच्या चारित्र्याची चर्चा मात्र हिरिरीनं होत राहते.
ज्या मुलीवर बलात्कारासारख्या भयंकर प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येते, तिनंच आता धीट बनण्याची आवश्यकता आहे. बलात्काराकडे आयुष्यातला एक दुर्दैवी अपघात म्हणून तिनं पाहिलं पाहिजे. अपघातात हातपाय तुटतात, शरीर जखमी होतं, पण तो अपघात हे तिचं लांच्छन नसतं, अपघात झाला म्हणून खालमानेनं तिला जगावं लागत नाही, स्त्रीवर होणारा बलात्कार हा तिचा अपराध नाही हे तर तिनं समाजाला बजावून सांगायला हवंच, पण त्याचबरोबर आपल्या आयुष्याशी असा खेळ करणाऱ्याला शिक्षा होईपर्यंत धीटपणे लढाही द्यायला हवा. बलात्काराच्या घटनेनंतर तिच्याशी पुढे कोणी लग्न करो वा न करो, आत्मसन्मानापुढे तिला असल्या दिखाऊ सामाजिक मान्यतेची मातब्बरीच वाटता नये.  
हे सारं लिहिताना माझ्या मनात पुरुषांबद्दल अजिबात द्वेषभावना नाही. चांगले, न्यायप्रिय पुरुष समाजात आहेत. त्यांना दुखवण्याचा हेतू नाही. मात्र मनात प्रचंड चीड आहे ती विकृतीविषयी, प्रहार करावासा वाटतो तो या विकृतीवर आणि ती जोपासणाऱ्या सत्तास्थानांवर. कारण या विकृतीच्या आगीत बळी जाते ती स्त्री. रोजच्या वर्तमानपत्रातल्या बलात्काराच्या अमानुष घटना वाचताना रक्त पेटून उठतं, डोक्यात आग भडकते. कायद्याचा गरवापर, शिक्षेला विलंब.. अशा वेळी आधार वाटतो तो फक्त न्यायप्रिय पुरुषांचा. स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी अशा सगळ्या चांगल्या पुरुषांनी स्त्रीच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या विकृत पुरुषाला कठोरात कठोर शासन व्हावं म्हणून शासनकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे. भयानं थरकाप होईल असं शासन जेव्हा त्याला घडेल तेव्हाच कदाचित परत अशा पुरुषाला स्त्रीकडे वाकडय़ा नजरेनं पाहण्याचं धाडस होणार नाही.
 यासाठी फक्त एकच जाणीव समाजानं ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे स्त्रीकडे देहाबरोबरच मन आहे, भावना आहेत. आपल्या वडिलांना, भावाला, नवऱ्याला, मुलाला आणि मित्रालादेखील आपल्या मनाची, भावनांची कदर आहे, हा अनुभव तिला किती संपन्न करणारा असू शकेल!