कायद्याशी मैत्री Print

पूर्र्वी कमानी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
’आमचे एकत्रित कुटुंब शहरातील (पुणे) एका मोठय़ा वाडय़ात राहत होतो.  आता वाडा पाडला जाऊन त्या ठिकाणी टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. सदर इमारतीमध्ये माझ्या मोठय़ा भावाने त्याच्या नावे एक (१ बीएचके) फ्लॅट घेतला आहे. माझा प्रश्न असा आहे की, माझे व आईचे नाव अजुनही आमच्या जुन्या पत्त्यावर तसेच रेशनकार्डवर आहे. आम्ही सध्या दुसरीकडे राहत आहोत. आम्हाला जमेस न धरता, न विचारता भाऊ परस्पर फ्लॅट विकत घेण्याचा व्यवहार करू शकतो काय? माझ्या वृद्ध आईला व मलाही भावाकडे जाण्या-येण्यास मज्जाव आहे, तर आम्हाला आमचा हक्क वा मोबदला मिळेल काय? रेशनकार्ड व निवडणूक ओळखपत्रावर आमच्या नावासह जुना पत्ता आहे. आम्ही काय करावे?
- अजय,पुणे
उत्तर- तुमच्या कुटुंबाकडे वाडय़ाच्या भाडेतत्त्वाचा हक्क असल्याचे दिसते. आता वाडा जमीनदोस्त झाला असून त्या ठिकाणी टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. जर भाडेकरू असल्याचा पुरावा तुमच्या भावाच्या नावे असेल तर नव्या इमारतीत त्याला जो फ्लॅट देण्यात आला आहे, ते बरोबर आहे. मात्र हा पुरावा जर तुमच्या स्वर्गवासी वडिलांच्या नावे असेल तर तुमची आई व तुम्ही यांचाही या मालमत्तेवर हक्क आहे. म्हणजेच भावाला मिळालेल्या फ्लॅटमध्ये भागीदार म्हणून तुम्ही हक्क मागू शकता. मात्र हा हक्क सांगण्यासाठी भाडे भरल्याच्या पावत्या फार महत्त्वाच्या आहेत. जुन्या पावत्या व वीजबिले पुरावा म्हणून गोळा करा. जर ते पुरावे तुमच्या भावाच्या नावे असतील तर तुम्ही फार काही करू शकणार नाही. मात्र जर त्या तुमच्या वडिलांच्या नावे असतील तर तुमच्या हातात बरेच काही आहे. तुम्ही लवकरात लवकर चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या व न्यायालयात दावा दाखल करा. तुमचे रेशनकार्ड व निवडणूक ओळखपत्र तुमचे वास्तव्य वाडय़ात होते हे सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडू शकते.
* मी ६० वर्षांचा सेवानिवृत्त असून मला पाच भावंडे आहेत. माझ्या गावी माझ्या वडिलांना मुलकी फॉरेस्ट जमीन एक सालाने सरकारकडून १९५२-५३ सालापासून मिळाली होती. ती २१ एकर २४ गुंठे होती. ती जमीन सदर सालापासून  आजतागायत आम्ही कसत आहोत. परंतु १९७२-७३ साली सेलिंग आले व वडिलांना काही माहीत नसताना जमीन काढून घेतली गेली. त्यामुळे सव्‍‌र्हे नंबर ९० ऐवजी सव्‍‌र्हे नंबर ७९ मध्ये भूमिहीन शेतकरी म्हणून आमचे नाव लागले, ती पाच एकर जमीन आहे. आणि परगावच्या लष्करी सनिकाच्या बायकोच्या नावे सव्‍‌र्हे क्र.९० मधील जमीन नोंद केली. वडिलांना याची कल्पना आली नव्हती. ती जमीन सदर सैनिकाने आजपर्यंत कधीही कसली नाही. खरी लागवड आम्हीच करत आहोत. वडील दारिद्रय़रेषेखालील असल्याने जमीनधारा योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली. वडिलांचे नाव सव्‍‌र्हे क्र. ७९ मध्ये असल्याचे मामलेदाराच्या लक्षात येताच ती जमीन १९९२ मध्ये आमच्या वडिलांच्या नावे केली. वडिलांचे २००४ मध्ये निधन झाले व पुन्हा सैनिकाने २००५ मध्ये अर्ज केल्याने कलेक्टर साहेबांनी ती जमीन आमच्याकडून काढून घेतली. पण वडिलांच्या मृत्यूनंतर आम्हा भावडांची वारसदार म्हणून सव्‍‌र्हे क्र. ९० मध्ये नोंद झाली होती. तसा पुरावा आहे. आता शेतजमिनीची सव्‍‌र्हे क्र. ७९ ऐवजी ९० ची जमीन नावे होण्यासाठी काय करावे लागेल?
-महादेव सकट,कांदिवली
उत्तर-सदर जमीन महाराष्ट्राच्या हद्दीत असल्याचे गृहीत धरता, ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा लागू झाल्यापासून अर्थात १ एप्रिल १९५७ च्या आधीपासून तुम्ही जमीन कसत असल्याने या जमिनीच्या कूळसंबधीचा तुमचा हक्क सुरक्षित आहे. हा दावा तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही मामलेदाराकडे किंवा शेतजमीनसंबंधी लवादाकडे जाऊ शकता. शेतजमीन कायदा १९४८ च्या ७० व्या कलमानुसार या लवादाला संबंधित घोषणा करण्याचा अधिकार आहे. जवळच्या शेतजमिनीच्या मालकाचे प्रतिज्ञापत्र या कामी कदाचित तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. मामलेदारांकडच्या कामकाजासाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे हे प्रतिज्ञापत्र मिळण्यासाठी ताबडतोब कामाला सुरुवात करा व पुढील विलंब टाळण्यासाठी तात्काळ हा अर्ज करा.
* मी मूळचा भाडेकरी असून आता काही वर्षांपूवी आमच्या वाडीच्या जागेवर सोसायटी उभी राहिली आहे. त्यातील एका विंगच्या मागे मला एक खोली(दहा बाय दहा) कायमस्वरूपी टेनंटच्या दरात बिल्डरने ओनरशिपवर विकली असून मी ४ वर्षांपूर्वी त्याची नोंदणीही केली आहे. तरी सदरच्या जागेच्या मालमत्ता करासाठी महानगरपालिकेस सादर करण्यासाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत? समजा, बिल्डर हा कर भरत असेल तर तो आपल्या नावावर करण्यासाठी काय करता येईल. माझ्या घरात पाण्याचे स्वत:चे कनेक्शन नाही. ते घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
-केशव चंद्रकांत निमकर,ठाणे
उत्तर- तुम्ही नमूद केल्याप्रमाणे संबंधित खोलीच्या हस्तांतरणासंबंधीची रितसर नोंदणी तुमच्या बाजूने झालेली आहे. आता तुम्ही असे करा की, हे नोंदणीकृत मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा. मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत बदल सुचवणारा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मिळतो. तो भरून जमा करा. यानंतर महापालिकेच्या निदर्शनास आणण्यासाठी मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत बदल सुचवणारा अर्ज सादर करा. यासाठी हवे असल्यास बिल्डरकडून ना हरकत प्रमाणपत्रही घेऊ शकता.
पाण्याची नवी जोडणी घेण्यासाठी तुम्हाला महापालिकेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल. यासह काही कागदपत्रे ही सादर करावी लागतील. ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर यासाठी ‘एक खिडकी योजना’ संबंधित अर्ज आहे. तो डाऊनलोड करता येईल.