पालकत्व : पारख आपल्या मातीची Print

आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. विनिता गजेंद्रगडकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

प्रत्येक मूल स्वभावाचा काही भाग गुणसूत्रांनुसार जन्मत:च घेऊन येते. आपण फक्त मातीला आकार देऊ शकतो. प्रत्येक मातीची जात वेगळी! एखादी सुपीक जमीन कुंभाराची सुबक भांडी बनवू शकणार नाही कदाचित, पण उत्तम पीक घेऊ शकेल. आपली माती कोणती हे ओळखायचे काम आपले..!
काही महिन्यांपूर्वी एका बातमीने खळबळ उडविली होती. परदेशात काम करणाऱ्या भारतीय जोडप्याच्या दोन मुलांना त्या देशाच्या सरकारने ताब्यात घेतले. काही कारणाने मुलांनी आई-वडिलांबरोबर राहायचे नाही, असा देशाच्या सरकारचा निर्णय होता. प्रत्येक देशाने आपले नागरिक वाढताना/ वाढविताना काय कायदे ठेवावेत हा फार वेगळ्या पातळीवरचा विषय आहे, पण वैयक्तिक विचार करू जाता मूल आई-बाबांबरोबर वाढताना काय फायदे-तोटे असू शकतात हा विचार मनात येतो.
अर्थात पहिला विचार, मूल शक्यतोवर आई-बाबांबरोबरच असले पाहिजे, प्रश्नच नाही. मध्यंतरी, वर्तमानपत्रामध्ये ‘बोर्डिग स्कूल’मध्ये मुलांना ठेवल्याने झालेले फायदे व तोटे यांची चर्चा झाली होती. म्हणजे मुलांना आई-बाबांपासून किती दूर/किती जवळ ठेवावे हा ‘निर्णय’ आई-वडिलांचा, पर्यायाने तो त्यांचा अधिकार असला पाहिजे.
मुले मोठी होऊ लागली असताना कुठपर्यंत निर्णय आई-बाबांनी घ्यायचे आणि कुठे त्यांना घेऊ द्यायचे ही सीमारेषा फार पुसट आहे.
शेकडा ९९ टक्के मुलांबाबत आई-वडील हेच त्यांचे सर्वात चांगले शुभचिंतक असतात. त्यामुळे आई-वडील स्वत:चा स्वार्थ न बघता मुलांचा विचार करून निर्णय घेतात, पण प्रत्येक वेळेला तो निर्णय योग्य ठरेलच असे नाही. अशा वेळेला काय करावे, असा प्रश्न पडतो.
मुले वाढवताना, आई-वडिलांवर झालेले संस्कार आणि बदलत्या समाजाचे आई-वडिलांवर होणारे परिणाम, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आपण सर्वजण कळत-नकळत आपल्या आई-वडिलांनी आपल्याला कसे वाढवले, कुठला भाग चांगला, कुठल्या त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी, माझ्या मुलांना वाढवताना मी ठेवणार नाही, असे म्हणत असतो.
नीमाची आई शैला कर्तृत्ववान व्यक्ती आहे तितकीच चांगली, निमाचा अभ्यास, विकास याकडे लक्ष ठेवणारी आई आहे, पण कुठल्याही परीक्षेला बसायच्या आधी नीमा फारच घाबरते. केलेला अभ्यास विसरते. शैलाला, तिला कसे हाताळावे हे कळत नाही. अनेक उपचार चालू आहेत. फारसा उपयोग नाही.
शैलाशी बोलल्यावर काही गोष्टी जाणवतात. शैलाच्या मनात, तिच्या वडिलांनी, गरज असताना, आपल्याला भावनिक/ आर्थिक आधार दिला नाही, असा विचार कुठे तरी खोलवर रुतून आहे. वडिलांबद्दल शैलाच्या मनात अजिबात आकस नाही आणि आपल्या मनात खोल हा विचार आहे याची शैलालाही पूर्ण कल्पना नाही. म्हणूनच जेव्हा स्वत:च्या मनातील भावना/ विचार यांची कल्पना (awareness) आपल्याला नसते, तेव्हा हा विचार का व कुठून आला आणि मुख्यत: तो किती योग्य आणि किती चुकीचा आहे, ही कारणमीमांसा होत नाही.
याचा संदर्भ इथे नीमाला वाढवण्याच्या शैलाच्या पद्धतीशी लागतो. शैला नेहमी म्हणायची, ‘मला आई-वडिलांकडून भावनिक/ आर्थिक आधार कमी मिळाला, त्याचा त्रास मी भोगला, काय होते हे मी अनुभवले आहे. माझ्या मुलीला मी हा त्रास होऊ देणार नाही, तिला जेव्हा भावनिक/ आर्थिक गरज भासेल तेव्हा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नक्कीच ती पूर्ण करीन.’ याचा परिणाम काय होईल? नीमा कधीच आर्थिक/भावनिकदृष्टय़ा सक्षम/ स्वयंपूर्ण न होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कदाचित शैलाच्या वडिलांनी तिला जाणूनबुजून आधार दिला नसावा, त्यांनी जबाबदारी टाळली असेलच असे नाही. शैलाला आपल्या भावनांची कल्पना (ं६ं१ील्ली२२) नाही. त्यामुळे आपल्या वडिलांनी असे का केले असावे, हा विचार तिने केलेला नाही. आज अगदी नकळत त्याचा परिणाम नीमाच्या वाढवण्यावर होत आहे.
आज नीमा कोणत्याही परीक्षेला घाबरते. भावनिक आधाराची जास्त सवय असल्याने, जिथे हा आधार शक्य नाही तिथे एकटय़ाने जबाबदारी घेणे तिला जड जाते आहे आणि वेळीच मुळापासून ही सवय जाणीवपूर्वक कमी केली नाही तर पुढे कोठेच नीमा एकटी निर्णय घेऊ शकणार नाही. एकदा नक्की काय आणि का करायचे हे कळल्यावर पुढचा मार्ग सोपा होतो.
मग आपण मुलांबाबत घेत असलेले निर्णय योग्य आहेत की नाही हे कसे ठरवायचे?
मूल प्रत्येक वयाला, अगदी पहिल्या वर्षांपासून, त्याच्या वयानुसार सक्षम/ स्वयंपूर्ण आहे का हे तपासायला हवे. एक/दीड वर्षांचे मूल हाताने खाऊ शकते, कुठला खेळ खेळायचा हे स्वत: ठरवू शकते. शाळेतील मुले आपल्या अभ्यासात, इतर क्रियांमध्ये स्वत: निर्णय घेतात,
 मित्र-मैत्रिणींबरोबर संबंध ठीक ठेवू शकतात, त्याबाबत स्वत: निर्णय घेऊ शकतात. स्वतंत्र विचार करायची सवय लागलेली असल्याने, नोकरी/ लग्नाबाबत आपले निर्णय घेऊ शकतात आणि मुख्य म्हणजे निभावू शकतात.
या प्रत्येक टप्प्यावर माझा मुलगा/मुलगी फक्त स्वयंपूर्ण नव्हे, पण आनंदीसुद्धा आहे का हे तपासायला हवे. अगदी आदर्श, स्वत:ला हवे आहे/होते तसे आयुष्य सहसा कोणालाच मिळत नाही, पण आहे त्या परिस्थितीला परिणामकारकरीत्या हाताळून शक्य तेवढय़ा चांगल्या पद्धतीने जगणे जर माझ्या मुलाला जमत असेल, तर याचा अर्थ तो आनंदात आहे- तर मी नक्कीच योग्य आई आहे.
पण जर तो आनंदात नसेल, काहीही कारणाने- तर मात्र आई-बाबा म्हणून त्याच्या विचारांना योग्य दिशा द्यायला आपण कुठे तरी कमी पडल्याची शक्यता आहे. याचा अर्थ मी इथे आत्मपरीक्षण करायला हवे आणि त्यानुसार पावले उचलायला हवी.
पालकत्व ही कधीच न संपणारी जबाबदारी आहे. आपण सर्वजण मोठय़ा वयातसुद्धा आई-वडिलांवर भावनिकदृष्टय़ा अवलंबून असतो. त्यांनी एखादी गोष्ट चुकीची म्हटल्यावर, आजसुद्धा त्यांना परिस्थिती माहीत नाही, त्यांचे विचार जुने आहेत हे स्वत:ला सांगूनही, आपण चुकलो की काय, हा विचार आत कुठे तरी मनात राहतोच. (प्रत्येकातच नीमाची आई असते!)
प्रत्येक मूल स्वभावाचा काही भाग गुणसूत्रांनुसार जन्मत:च घेऊन येते. आपण फक्त मातीला आकार देऊ शकतो आणि प्रत्येक मातीची जात वेगळी! एखादी सुपीक जमीन, कुंभाराची सुबक भांडी बनवू शकणार नाही कदाचित, पण उत्तम पीक घेऊ शकेल. आपली माती कोणती हे ओळखायचे काम आपले..!
सुखात, आनंदात असण्यासाठी कोणालाही आणि कोणत्याही वयात तीन गोष्टींची आवश्यकता असते. १) स्वीकार - आपल्या वर्तुळात (घरात/ शाळेत/ ऑफिसमध्ये) आपला स्वीकार केला गेल्याची भावना. २) आपलेपण - संबंधित व्यक्ती (आई-बाबा, शिक्षक/मित्र-मैत्रिणी) आपल्याला समजून घेऊ शकतात. आपल्याबद्दल चांगलाच विचार करतात, ही भावना आणि ३) काही मिळविणे - चांगले मार्क, एखादा कलागुण/ खेळ, कामातली कार्यक्षमता; ज्यामुळे तो वाखाणला   जाईल, ज्यामुळे काही मिळविल्याचा आनंद मिळेल.
आता प्रत्येक वेळेला या तिन्ही गोष्टी मिळत राहतील, असे नाही, पण कुठे काही खटकत असेल, तर का, कशामुळे आणि यातील कोणती गोष्ट न मिळाल्याने, याची कारणे या मीमांसेमुळे शोधणे सोपे जाते. मग मुलाची विचारपद्धत चुकते आहे, की परिस्थितीच वेगळी आहे हे समजून घेऊन, मुलाला हाताळायचे आहे, की पर्याय शोधायचे आहेत याचा निर्णय घेता येतो. त्यानुसार आपल्या मुलाला कसे वाढवायचे आहे याची नक्की दिशा ठरविता येते.
..शेवटी पालक म्हणून, आपल्या मुलांनी एक स्वयंपूर्ण जबाबदार आणि आनंदी आयुष्य जगावे यापलीकडे आपल्याला तरी आणखी काय हवे असते?