प्रवाहाविरुध्द पोहणं Print

शैलजा दांडेकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२

रूढी-परंपरा चालत आल्या आहेत म्हणून पटत नसल्या तरी स्वीकारायच्या का? काही तरुणींनी या प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींच्याही पचनी ते पडत नाहीए. खरंच त्यांच्या विचारांची दिशा चुकीची आहे, असं म्हणायचं का?
रुढी आणि परंपरा त्या त्या काळातील परिस्थितीला अनुसरून अस्तित्वात येतात, पण जनमानसावर त्यांची इतकी घट्ट पकड असते की काळ बदलला, परिस्थिती बदलली तरी त्या रूढी, परंपरा सोडायला माणसे, समाज तयार नसतात. त्या मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला समाजाचा आणि विशेषत: घरच्यांचा विरोध, रोष पत्करावा लागतो आणि हे नवे विचार मांडणारी स्त्री असेल तर हा विरोध जास्तच तीव्र असतो. पण सर्व बाजूंनी साकल्याने विचार केला तर असं वाटतं, ‘खरंच तिचं चुकलं का?’
श्वेता आणि शैलेशचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. लग्नाच्याही आणाभाका झाल्या आहेत, पण अजून लग्नाला मुहूर्त मिळत नाही त्याचं कारण श्वेताची अट.
 श्वेता आई-वडिलांची एकुलती एक लेक. नवसा-सायासांनी लग्नानंतर खूप वर्षांनी झालेली. आई-वडील मध्यम परिस्थितीतले. श्वेताचा जन्म झाल्यावर त्यांनी दुसरं मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. श्वेतालाच छान  वाढवायचं असं ठरवलं आणि खरंच खूप लाडाकोडात तिच्या आवडी जपत तिला वाढवलं. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन तिचं शिक्षण केलं. तिला पायावर उभं केलं. श्वेता हे सर्व जाणून आहे आणि म्हणूनच तिने शैलेशला अट घातली आहे की, लग्न झाल्यावर मी तुझ्याकडे राहायलं येण्याऐवजी तूच माझ्याकडे राहायला यायचं.
तुझ्या घरी तुझा मोठा भाऊ, भावजय, लहान भाऊ आहे. ते सर्वजण तुझ्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकतात; पण माझं लग्न झाल्यावर माझ्या उतारवयाला लागलेल्या आई-बाबांची काळजी कोण घेणार? आता ते शरीराने थकायला लागले आहेत. सांपत्तिक स्थितीही खूप गडगंज नाही. अशा वेळी माझं आयुष्य उभं करणाऱ्या आई-बाबांना माझाच आधार आहे.
लग्न झाल्यावर मुलीनेच आपलं घर, आई-वडील सोडून मुलाकडे का जायचं? गरज असेल तर मुलाने घर सोडून मुलीकडे राहायला का येऊ नये?
पण शैलेशला घरजावई होणं कमीपणाचं वाटतंय. शैलेशची आई तर प्रत्येकाजवळ डोळ्यांतून पाणी काढून सांगतेय, ‘‘आमच्या मुलाला आमच्यापासून तोडण्याचा हा डाव आहे.’’
श्वेताला कळत नाही लग्न झाल्यावर मुलगी माहेरचे घर सोडतेच ना! मग विशिष्ट परिस्थितीत मुलाला ते सोडावे लागले तर त्यात गैर काय?
इथे राहूनही तो आई-बाबांची काळजी घेऊ शकतो. त्यांना आधार देऊ शकतो. मग या तडजोडीला सर्वाचाच विरोध का असावा?
श्वेताचे आई-वडीलही तिलाच समजावताहेत, ‘‘अगं! अशी उलटी गंगा कशी वाहील? समाज काय म्हणेल?’’
पण श्वेता तिच्या मतावर ठाम आहे.
खरंच तिचं काही चुकतंय का?
० नीता खूप शिकलेली आहे. स्वत:च्या हुशारीवर खूप वरच्या पदावर काम करते आहे. खूप जबाबदारीने निर्णय घ्यावे लागतात. पगारही चांगला आहे. सकाळी ७ वाजता घराबाहेर पडते ती संध्याकाळी सात-साडेसात वाजता परत येते. दिवसभर खूप धावपळ झालेली असते. विश्रांतीची जरूर असते, पण सासूबाईंना वाटते, दिवसभर मी घर आणि मुलं सांभाळते. आता संध्याकाळी तरी नीताने साग्रसंगीत स्वयंपाक करावा. रात्रीचं सर्वाना निवांतपणे एकत्र जेवण घेता येतं. पण नीताच्या अंगात त्राणच नसतो. मुलांनाही आई हवी असते.
यावर तोडगा म्हणून नीताने सुचविले, आपण दोन्ही वेळचा डबा चालू करूया. खूप ठिकाणी हल्ली अगदी घरगुती डबा मिळतो. आम्ही दोघं कमावतो त्यामुळे आपल्याला ते परवडेल.
पण सासू-सासऱ्यांचा याला पूर्ण विरोध आहे. ज्या घरात स्वयंपाक होत नाही ते घर कसलं? आपण काय हॉस्टेलमध्ये राहतो आहोत का? स्वयंपाकघरातला बाईचा वावरच घराला घरपण देतो. त्यापेक्षा स्वयंपाकाला बाई ठेव, पण नीताला तेही शक्य    
नाही. काय स्वयंपाक करायचा ते ठरवणं. त्यासाठी वाणसामान, भाजी आणून ठेवणे, तिला पूर्वतयारी करून देणे हे सर्व सासूबाईंनाच करायला लागेल. त्यांना ते झेपणारे नाही आणि मला यासाठी वेळच नाही.
एक रविवार मिळतो तो घराची स्वच्छता, मुलांचे अभ्यास, त्यांच्या शाळेची तयारी. आला-गेला, समारंभ यांत कापरासारखा उडून जातो. मिळेल तो वेळ नवऱ्याला, मुलांना, तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे का स्वयंपाकात घालवणं महत्त्वाचं आहे?
सासू-सासऱ्यांना कसं पटवून द्यायचं हेच तिला समजत नाही.
तिची विचारांची दिशा चुकतेय का?
० अरुणा शिकलेली आहे. चांगली नोकरी आहे. अशाच मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये प्रशांतशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करायचे ठरविले. प्रशांत एम.डी. करीत होता. दोन्ही घरांना ते अनुरूप वाटले आणि पसंती मिळाली. लग्नाची बैठक सुरू झाली आणि अचानक प्रशांतच्या बाबांनी एक एक मागण्या करायला सुरुवात केली. ते हुंडा असं म्हणत नव्हते, पण सोनं, गाडी या स्वरूपात प्रचंड मागण्या करीत होते. अरुणाच्या वडिलांना काय करावे सुचत नव्हते. मागण्या डोईजड होत्या, पण चांगल्या स्थळाचे प्रलोभन होते. त्यांचा कल होकाराकडे वळणार असे दिसताच अरुणाच पुढे झाली आणि तिने या मागण्यांना पूर्ण विरोध केला.
प्रशांतच्या आईचं म्हणणं होतं, आम्ही त्याला एम.डी. केला. तुम्हाला माहीत आहे, हल्ली मेडिकलला किती खर्च येतो. पुढे तो खोऱ्याने पैसा ओढेल, पण त्याचं सुख त्याच्या बायको-मुलांना मिळेल. आज आमचा झालेला खर्च कसा भरून निघेल? म्हणूनच मुलीचं पुढचं सुख बघून तुम्ही या मागण्यांचा विचार करायला हवा.
आई-वडील हतबल झालेले दिसताच अरुणाच पुढे सरसावली. आम्ही तिघी बहिणी, त्यात मी सर्वात मोठी. मला शिकवताना आई-बाबांचाही खूप खर्च झाला आहे. आता माझ्या लग्नावर एवढा खर्च केला तर पाठच्या बहिणी कशा शिकतील? त्यांच्या लग्नाचा खर्च बाबा कसा करतील?
मला चांगली नोकरी आहे. चांगला पगार आहे, पण बाबांना त्याचा काय उपयोग?
प्रशांतला मिळणारा पैसा तुमच्याच घरात राहणार आहे आणि माझाही पगार तुमच्याच घरात येणार आहे. तेव्हा तुम्हीच त्यांना हुंडा द्या. नाहीतर पाठची बहीण मिळवती होईपर्यंत माझा पगार बाबांना द्यायची परवानगी द्या.
डॉक्टर असलेला, अरुणाच्या प्रेमात पडलेला प्रशांत एक शब्द बोलत नाही. अरुणाच्या प्रस्तावाने सासरचे लोक तर नाराज झाले, पण अरुणाचे आई-वडीलही नाराज झाले.
घरी आल्यावर वडील म्हणाले, ‘‘अगं, आपण थोडं कर्ज काढू. पण डॉक्टर असलेल्या प्रशांतचं स्थळ तू नाकारू नकोस. चार लोकांत याची चर्चा होईल आणि पुढे तुझं लग्न जमणं जड जाईल.’’
पण अरुणा तिच्या मतावर ठाम होती. तिने स्वच्छ सांगितलं, ‘‘माझ्या सुखासाठी मी माझं माहेर उद्ध्वस्त होऊ देणार नाही. नाही झालं लग्न तर मी तशीच राहीन, पण मुलीकडची बाजू म्हणून हा अन्याय मी सहन करणार नाही.’’
तिचं मत चुकीचं आहे का?
० सीमा दिसायला देखणी. त्यामुळे पदवीधर झाल्या झाल्या रोहितने तिला मागणी घातली. तिलाही रोहित आवडला, पण बैठकीच्या आधी सीमा सासरच्या माणसांना भेटायला गेली. मला वडील नाहीत आणि आईला माझी मतं पटणार नाहीत म्हणून स्वत:च काही गोष्टी स्पष्ट करायला आले आहे.
आमचे लग्न रजिस्टर पद्धतीने व्हावे असे मला वाटते, पण तुम्हाला जर ते धार्मिक पद्धतीने करायचे असेल तर माझी त्याला हरकत नाही. पण लग्नातले सर्व धार्मिक विधी माझी आईच पार पाडेल.
मी आणि भाऊ खूप लहान असताना आमचे वडील अपघातात वारले. जवळ पुरेसा पैसा नसताना, शिक्षण जास्त नसताना आई खंबीरपणे उभी राहिली. रात्रंदिवस शिवणकाम करून तिने आम्हाला वाढविले, वडिलांची उणीव भासू दिली नाही. आई-बाबांच्या दोघांच्या भूमिका तिने यशस्वीपणे पार पाडल्या. आम्हाला काही कमी पडू दिले नाही. त्या काळात कोणीही नातेवाईक मदतीला आले नाहीत. आईनेच सर्व निभावून नेले. त्यामुळे माझ्या लग्नाचे विधी तिने दुरून पाहावे, तो मान तिला मिळू नये हे मला पटत नाही. सर्व विधी करण्याचा मान तिलाच मिळाला पाहिजे, असं मला वाटतं.
आणखीही दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. माझी आई जावयाचे पाय धुणार नाही. तिच्या मुलाच्याच वयाच्या जावयाचे पाय तिने हाताने पुसावेत हे मला पटत नाही. लग्नात दोन्हीही पक्ष सारखेच महत्त्वाचे नाहीत का?
आणि शेवटी लग्नात कन्यादानाचा विधी होणार नाही. दान करायला आणि दान घ्यायला मी कोणाच्याच मालकीची वस्तू नाही. माझं दान करून आईचं माझ्याशी असलेलं प्रेमाचं नातं मी परकं होऊ देणार नाही.
मला माहिती आहे, माझी ही मते तुम्हाला आगाऊपणाची वाटत असतील, पण मी अतिशय विचारपूर्वक आणि नम्रपणे तुमच्यापुढे स्पष्टपणे मते मांडते आहे. मला आशा आहे, तुम्हीही ती समजून घ्याल. माझी मतं तुम्ही पटवून घेऊन होकार दिलात तर माझ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात अतिशय आनंदात होईल.
सीमा घरी आली तर आईनेच रुद्रावतार धारण केला. ‘‘काय अगोचर मुलगी आहेस तू. नवरा नसलेली बाई कधी धार्मिक कार्यात चालते का? विधवा बाई सवाष्णींचे मानपान, ओटय़ा भरणं करू शकेल का? लोक तोंडात शेण घालतील.’’
सीमा उसळून म्हणाली, ‘‘ते शेण घालणारे लोक तुझ्या मदतीला आले होते का? मग त्यांना आपल्या खासगी गोष्टीत बोलण्याचा काय अधिकार? आई तूच स्वत:ला कमी का लेखतेस? नवरा गेला हा तुझा दोष अथवा चूक आहे का? मग तू या जाचक रूढी, परंपरा सोडून का देत नाहीस?
तिचे विचार फारच पुढारलेले आहेत का ?
० या तरुण मुलींनी आपली मतं स्पष्टपणे मांडली, पण नवीन पिढीत किती मुले-मुली प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस करतात? फारच थोडे. या उलट आम्हालाही हे पटत नव्हते, पण आई-बाबांना दुखवायचे नाही म्हणून मान्य केले, अशी पळवाट काढणारेच खूप. परिस्थितीनुसार नव्या पिढीने रूढी-परंपरा बदलल्या तर.
तिचे विचार चूक आहेत का?