स्मृती ९/११ च्या Print

- डॉ. सुवर्णा दिवेकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२

पुन्हा एकदा मी ११ सप्टेंबरलाच अमेरिकेला निघालेय.. उद्ध्वस्त वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दुखऱ्या खुणा आजही तिथल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. म्हणूनच दरवर्षी या दिवशी अश्रू ढाळले जातात.
अमेरिकेला जाण्याचं आमचं तिकीट निघालं, ती तारीख ठरली आहे ११/९ २०१२ ची. तो अगदी योगायोगच! ९/११ तारखेचे भयावह पडसाद बऱ्यापैकी स्मृतिआड गेलेले. तरीही पुण्यातले बॉम्बस्फोट किंवा अमेरिकेतल्या गुरुद्वारातली सूडहत्या असे नवीन भयावह वास्तव दहशत घालतच होते. आता प्रवासाची तयारी सुरू झाली, तो प्रवासही न्यूयॉर्कलाच संपणार आहे. ९/११ ची तारीख न्यूयॉर्कवासीयांच्या जीवनात काळीकुट्ट होती. आम्ही बरोबर चार वर्षांपूर्वी याच तारखेला न्यूयॉर्कमध्ये होतो. ११ सप्टेंबरचा दु:खभरा दिन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या परिसरात कशा तऱ्हेचा असेल, हे प्रत्यक्ष अनुभवण्याची इच्छा होती. म्हणून त्या संध्याकाळी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या परिसरात आवर्जून गेलो. संध्याकाळचे सहा वाजलेले होते. गगनचुंबी इमारतींच्या माथ्यावर मावळत्या उन्हाची गुलाबी आभा रेंगाळत होती. मॅनहॅटनपासून थोडय़ा अंतरावर वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत होती, तिथे आता मोकळे मैदान होते. कडेने फेन्सिंग घातलेले होते. फेन्सिंगवरती पूर्वीच्या इमारतीचे भव्य फोटो लावले होते. तशी अंतर्गत रचनाही दाखविणारे फोटो होते. रिकामे मैदान इतके मोठे होते, त्यावरून मूळ इमारतीच्या भव्यतेची कल्पना येत होती. भुयारी रेल्वेची ऐकू येणारी धडधड, एवढाच काय तो आवाज. बाकी नि:स्तब्ध शांतता होती. एखाद्या पवित्र स्थळी जसे वातावरण असावे, तसे नि:शब्द, भारावलेले वातावरण.. कार पार्क मुद्दाम त्या दिवसापुरते खूप दूर ठेवले होते. वाहने, गर्दी आणि विक्रेते, खाद्यपदार्थवाले   (आपल्याकडे कुठल्याही स्थळी, प्रसंगी असे मार्केटिंग होतेच. तीर्थस्थळी प्रसादाच्या नावे खाद्यजत्रा आणि मोमेंटोज म्हणून माळा- तसबिरी) यांचे अस्तित्वही नव्हते. त्या दिवसाची ‘सॅंटीटी’ सहजपणे जपलेली होती. उत्स्फूर्तपणे, कोणी पोलिसांनी हटकले अथवा सरकारी फतवा म्हणून नाही. नागरिकांच्या मनाचा कौल म्हणून.
या भारावलेल्या वातावरणाचा आम्ही आता एक भाग झालो होतो. ‘अदर दॅन अमेरिकन्स’ खूपजण होते, पण कोणी ‘टूरिस्ट स्पॉट’ पाहणे एवढय़ा वरवरच्या उद्देशाने आले नव्हते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विनम्र, शांत भाव होता. खरं तर तो न्यूयॉर्कमधला ‘समर सीझन’ होता. एरवी त्या सीझनमध्ये सर्व स्त्री-पुरुष, मुलेबाळे, शॉर्ट्स-टॉप आणि शूज-सॉक्समध्ये वावरतात, पण त्या दिवशी सर्वानी शोकदर्शक काळा पेहराव (स्त्रियांनी डोक्याला काळा स्कार्फ) केला होता. लहान मुलांनाही त्यांच्या पालकांनी या दिवसाबद्दल त्यांना कळेल अशा शब्दात माहिती दिल्याने, ती मुलेही शांतपणे वावरत होती. (मुळातच तिथली मुले कुठेही कलकलाट, गोंधळ, आवाज करीतच नाहीत.) एका बाजूला फुले आणि पुष्पचक्रे विकणारे सेल्समन/सेल्सगर्लही मालाची जाहिरात न करता, शांतपणे काळ्या कपडय़ात उभे होते. प्राइज टॅग पाहून येणारे नागरिक नेमके डॉलर्स देऊन, पुष्पचक्रे विकत घेत आणि फेन्सिंगला अडकवून, ज्ञात-अज्ञात मृतांना खाली गुडघे टेकून श्रद्धांजली वाहत. क्षणभर शांत उभे रहात आणि निघून जात.
वास्तविक ही घटना कशातून घडली? कोणी? का घडवली? त्याचे ज्ञात सूत्रधार कोण? सूड, धर्माधता यातून घडलेले निष्पापांचे हत्याकांड, या सर्वच गोष्टी सर्वज्ञात होत्या.. तरीही! कुठेही म्हणजे कुठेही निषेधाचे, हटाओ, मुर्दाबाद पद्धतीचे सूर नव्हते. तसेच ‘विजयी भव, चिरायू होवोत’ असे गौरवी सूरही नव्हते. फक्त शांतता आणि सभ्यता (अमेरिकनांचा स्थायीभाव) एवढय़ाच भावना परावतिर्त होत होत्या.
परंतु ती माणसे संवेदनाशून्य होती का? नाही!  अनेक स्त्रियांचे अश्रूंनी भरलेले डोळे टिपं गाळीत होते. अश्रू थोपवण्याचा प्रयत्न नव्हता, कारण त्या काळ्या दिवशी त्यांची ‘रक्ताची नाती’ मृत्युमुखी पडली होती. कुणाचा मुलगा, कुणाची पत्नी, कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाची मित्र-मैत्रीण-प्रेयसी-प्रियकर.. या घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांची छायाचित्रे त्यांच्या आप्त सुहृदांनी फेन्सिंगवरती आणून लावली होती. (पौर्वात्य देशात श्राद्धाला लावतात तशी) त्या फोटोलो पुष्पचक्र वाहिलेले किंवा समोर मेणबत्ती ठेवलेली. आमेन! चे पुटपुटते स्वर, रडण्यात मिसळून गेलेले होते. काही काही ठिकाणी जमिनीवरती छोटे ‘मॅट’ घालून ‘बायबल’ वाचणारे धर्मगुरूही दिसत होते.
अमेरिकेत ‘झंडा ऊँचा रहे हमारा’ला फारच महत्त्व आहे. हॉटेल, मॉटेल, बंगले, स्टेशन, एअरपोर्ट, गार्डन, डोंगरदऱ्या सर्वत्र झेंडा लहरतच असतो. ९/११ ला सर्व फेन्सिंगवरती छोटे झेंडे लहरत होते, पण ते अध्र्यावरती उतरून, हुतात्मा झालेल्यांना ‘सॅल्यूट’ करीत होते.
आम्ही उभे होतो, त्या जागेसमोर एक प्रचंड मोठा बोर्ड होता. ९/११ ला लोकांचे प्राण वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या शिपाई आणि फायर ब्रिगेडस्ची नावे होती. अमेरिकेत या दोन्ही क्षेत्रांतल्या लोकांना प्रतिष्ठा आहे. (शिपुर्डे किंवा पांडू हवालदार अशी चेष्टा नाही.) हे सारं पाहून मी भारावून गेले. कोणत्याही देशातल्या मानवी भावना समांतर असतात, याचा प्रत्यय आला. आणि ‘वुई प्रे फॉर द पीस’ लिहिलेल्या प्रचंड कागदी तावावर मीही अभावितपणे नाव लिहिले- सुवर्णा दिवेकर- पुणे- इंडिया- हजारो सह्य़ांपैकी एक पण माझ्या मनाला मात्र एका भावनोत्कट प्रसंगाला साक्षी राहण्याचे समाधान मिळाले.
आता मी अमेरिकेला जाईन, त्या दिवशी ९/११ची संध्याकाळ सरलेली असेल. तरीही मी त्या दिवशी वेळ मिळाला की तिथे नक्कीच जाईन, कारण आता तिथे रिकामे मैदान असणार नाही. भव्य वास्तू आकाराला आली असेल. ९/११ च्या जखमा आता तितक्या तीव्र नसतील. मुख्य म्हणजे ‘विध्वंसातून विकास’ हे अमेरिकन ड्रीम तिथे प्रत्यक्षात आले असेल. आणि तिथले झेंडे आता अध्र्यावर उतरलेले नसतील, तर विजयाची ग्वाही देत डौलात फडफडत असतील, आमेन!