एक सुलट..एक उलट : अवचिता परिमळू.. Print

अमृता सुभाष ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्वित्र्झलडमधली ती संध्याकाळ.. माऊंट तितलीस ते चर्च.. नजरेसमोर साकार झालं होतं एक सुंदर अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य!.. कॅमेरात, डोळ्यांत, हृदयात साठवूनही उतू जाणारं हे सगळं.. त्या सगळ्यांनी एका क्षणात झपक्न मलाच माझ्यातून काढून घेतलं.. आणि मी त्या उतू जाण्यात विरघळून गेले..
मी एंगलबर्गला पोहोचले तेव्हा संध्याकाळचे पाच-साडेपाच झाले असावेत.. एक फार सुंदर घाट चढून बस ‘माऊंट तितलीस’ या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ‘एंगलबर्ग’ नावाच्या स्वित्र्झलडमधल्या एका खेडय़ात पोहोचली. एंगलबर्ग खेडं असावं असं मला वाटलं, याचं कारण तिथली नीरव शांतता! कमी माणसं राहणाऱ्या, शांत असलेल्या, सुंदर हवा असणाऱ्या, वाहनं नसणाऱ्या, हिरव्यागार जागेला ‘खेडं’ म्हणतात या व्याख्येनुसार बघताक्षणी ‘एंगलबर्ग’ खेडं म्हणता येईल, असं होतं. पण अर्थातच युरोपमधलं खेडं.. स्वच्छ निर्जन रस्ते.. त्या रस्त्यांच्या दुतर्फा छोटे-छोटे कॅफेज् असलेलं खेडं.
बसमधून खाली उतरले तेव्हा मी खाली हिरव्या आणि वर पांढऱ्या होत गेलेल्या कपाच्या तळाशी उभी आहे, असं वाटलं. चारी बाजूंनी माऊंट तितलीसची शिखरं वर चढत गेलेली आणि त्या शिखरांच्या बेचक्यात, पायथ्याशी हे एंगलबर्ग म्हणजे ‘बर्ड आय व्ह्य़ू’ घेतला तर अर्धी हिरवळ आणि अर्धा बर्फ अशा भिंती असलेल्या कापाच्या तळाशी असलेला हिरवाईचा ठिपका म्हणजे एंगलबर्ग. वर आभाळाकडे पाहिलं तर ते चक्क दोन रंगांचं होतं. त्याचा अर्धा भाग ढगाळलेला होता- राखाडी रंगाचा आणि अर्धा भाग निरभ्र होता- कोवळ्या उन्हाचा, निळाशार! राखाडी आभाळाखालची माऊंट तितलीसची बर्फाळ शिखरं अंधारलेली होती आणि निळ्या आभाळाखालची उन्हामुळे सोनेरी चमकत होती. आमच्या स्वागतासाठी श्रावणाचा हा खास परफॉर्मन्स!
आमचं छोटंसं हॉटेल एका निर्जन रस्त्यावर. माझ्या खोलीत शिरले तर कुठल्या तरी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट जुन्या इंग्रजी सिनेमातच मी शिरते आहे, असं वाटलं. जुनं, ब्लॅक वूडचं शाही कपाट. त्याला लहानपणच्या गोष्टीच्या पुस्तकातल्या जादूच्या खजिन्याची वाटावी अशी जाड पितळी किल्ली! थोडा वेळ त्या किल्लीने कपाट उघडणे आणि बंद करणे यातच गेला. मग शेजारी-शेजारी दोन बेसिन्स. पांढरी शुभ्र. त्यामध्ये शाही कोरीव नळ.. जुन्या वळणाचे.. ते सगळं इतकं वेगळ्या काळातलं वाटत होतं की, त्या नळांना पाणीच येत नसावं असंच वाटलं. सोडला तर आलं की पाणी! मला मी एका म्युझियममध्ये राहते आहे, असं वाटायला लागलं. तो सगळा शाहीपणा पाहून मी अमृता नसून क्लिओपात्रा असावे, असं वाटायला लागलं. मात्र इतक्या शाही वस्तू असलेली ती खोली आपली छोटीशीच होती आकारानं. त्यामुळे कुणाच्या तरी घरीच राहायला आल्याचा घरगुतीपणा पण वाटत होता. सगळ्या भिंतींवर जर्मनमध्ये काहीतरी सूचना लिहिलेल्या होत्या. एकदम कॉलेज आठवलं. तेव्हा शिकलेल्या जर्मनपैकी आता इश लीब दी (आय लव्ह यू) आणि आऊफविडरझेन (बाय बाय) एवढंच आठवतं. तेव्हा अजून थोडं लक्ष दिलं असतं तर या समोरच्या सूचनांचा अर्थ अजून सटकन कळला असता. पण बेधडक वाचत गेल्यावर काहीतरी कळल्यासारखं वाटत होतं.
अचानक.. त्या नीरव, आनंदी शांततेत.. कुठूनसा घंटांचा आवाज यायला लागला.. डाव्या बाजूने कुठूनतरी.. हॉटेलच्या डाव्या बाजूला चर्च असावं. खोलीचा शाही पडदा बाजूला सारला तर समोर एक छोटीशीच गॅलरी. गॅलरीत एकच छोटीशी खुर्ची. गॅलरीत आले तर समोर माऊंट तितलीस पसरलेलं आणि कानात घंटानाद! त्या दऱ्याखोऱ्यांच्या पायथ्याशी ऐकू येणारा तो घंटानाद. काही घंटा एका सुरात. त्यात दुसऱ्या काही घंटा दुसऱ्या सुरात. हळूहळू अजून काही घंटा तिसऱ्या सुरात. वाजता वाजता.. अचानक ऑर्गनचे मंद सूर.. त्या त्रिसूर घंटांमध्ये हळूहळू चढत जाणारे.. सगळंच भारल्यासारखं वाटायला लागलं. एका कुठल्यातरी ओढीनं मी गॅलरीतून खोलीत, खोलीतून हॉटेलबाहेर, हॉटेलबाहेरून डावीकडच्या बाजूला- आवाजाच्या दिशेने चालायला लागले. घंटांमध्ये अजून घंटा मिसळत मिसळत चाललेल्या.. मी त्या आवाजाच्या दिशेने जात चाललेली.. अचानक एक किंकाळी ऐकू आली! दचकून बघितलं तर रस्त्याच्या डाव्या हाताला एक बाग होती. तिथे सोनेरी केसांच्या काही गोड मुली खिदळत, किंचाळत असलेल्या. त्यांना मागे टाकून मी माझी मोडलेली तंद्री पुन्हा जोडत घंटानादाच्या दिशेने.. आता रस्ता वर चढत चाललेला. घंटानाद जवळ येत चाललेला. एका मोठय़ा इमारतीच्या लाकडी मोठय़ा दारापाशी माझी पावलं थांबली. आवाज आतून येतो आहे.. आत जावं का.. एकदम मागे फिरले. दहा पावलं परत उतारावरून चाललेय तोच एक म्हाताऱ्या ‘स्वीस’ आजी, पॅन्ट-शर्ट घातलेल्या, सोनेरी बॉबकट असलेल्या, उशीर झाल्यासारख्या झपझप माझ्या शेजारून त्या दाराच्या दिशेने गेल्या आणि सहज ते दार उघडून आत शिरल्या. मी पण लगेच झपझप त्यांच्या मागे धावले आणि त्या दाराची पितळी मूठ गोल फिरवून दार आत ढकललं.. थांबलेच.. समोर व्हरांडा. त्यात येशूच्या एका छोटय़ा काचेतल्या फोटोसमोर लाल रंगाच्या दहा-बारा मेणबत्त्या. शांत तेवणाऱ्या. त्या शेजारी एक पुरुषभर उंचीची दरवाजावजा चौकट. तिथून आत पाहिलं तर गोव्यात, सिनेमात, चित्रात आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्या चर्चपेक्षा खूपच मोठं, भव्य, सुंदर चर्च! मी त्या चौकटीतून चर्चमध्ये पाऊल टाकताच सिनेमात नायिका पडद्यावर अवतरताच संगीत बदलतात तसं घंटानाद थांबून अचानक ऑर्गनच्या सुरात काही पुरुष आणि स्त्रियांचे सूर मिसळले.. लांब समोरच मध्यभागी येशूची मूर्ती. त्यासमोर असंख्य दिवे आणि त्यांच्या असंख्य ज्योती, शांत तेवणाऱ्या. बाजूच्या भिंतीवर, छतावर, अप्रतिम चित्रं. मी वर बघत बघत आत शिरले. दुतर्फा ओळीने उभे असलेले शांत लाकडी बेंच. मी धरून आठ-दहाच माणसं. ऑर्गनबरोबर गाणाऱ्या माणसांचे सूर वाढत चाललेले. माझ्या आसपासची माणसं तर शांत होती. ही गाणारी माणसं दिसतंच नव्हती. त्यांना शोधण्यासाठी मी धीर करून पुढे पुढे गेले. डावीकडच्या बेंचवरचे एक आजोबा गाणाऱ्या माणसांच्या सुरात सूर मिसळून गात होते. त्यांच्या हातात एक निळं पुस्तक होतं. त्यांचा सूर उत्तम लागत होता. डावीकडच्या सगळ्यात पुढच्या बेंचवर एक सहा फुटी स्वीस पुरुष. त्याच्या शेजारी सोनेरी केसांच्या दोन वेण्या घातलेली, गोरीपान, गोबरी, अपऱ्या नाकाची, शॉट्स आणि टी-शर्ट घातलेली, चार वर्षांची एक स्वीस मुलगी. मला ती आवडली. मी त्या दोघांच्या मागच्या बेंचवर जाऊन बसले. तिथून वाकून पाहिलं की उजव्या कोपऱ्यात ऑर्गनच्या मागे बसून खाली एका पुस्तकात बघून गाणारी माणसं दिसत होती. त्यांचे गाणारे ओठ सोडता बाकी ती माणसं इतकी निश्चल होती की खोटीच वाटत होती. त्यांच्या आसपास चर्चमधली निश्चल चित्रं होती.. वेगळ्या वेशातल्या निश्चल माणसांची चित्रं. त्या चित्रांच्या आरासीमुळे, ती गाणारी निश्चल माणसंसुद्धा चर्चमधलं एक चित्रंच वाटत होती. फक्त ओठ हलणारं चित्रं. कधी कधी सिनेमात एखाद्या गाण्यात दाखवतात ना, एक पात्र निश्चल. दुसरं हलताना. तसं मला वाटलं. आता काही वेळाने त्या आसपासच्या निर्जीव चित्रांचे ओठ हलायला लागतील आणि त्यातली माणसं गायला लागतील आणि आत्ता गाणारी सजीव माणसं चित्रांमधल्या त्या निर्जीव माणसांसारखी स्तब्ध होऊन जातील. मीसुद्धा त्या चित्राचाच भाग आहे, असं वाटायला लागलं. आत्ता मीसुद्धा हलता कामा नये, आत्ता त्या सगळ्या निश्चल स्तब्धतेत फक्त गाणाऱ्या ओठांनी हलायचं होतं. एक स्त्री आणि चार पुरुषांच्या त्या गाणाऱ्या ओठांनी.
मी बसले होते त्या बेंचखाली कप्पा. शाळेतल्या आपल्या बाकाखाली असतो तसा. तिथे इतर सगळ्यांच्या हातात असलेलं निळं पुस्तक ठेवलेलं होतं. मी ते हळूच उघडलं. त्यात जर्मनमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. परत ठेवून दिलं आणि नुसतीच बसले. सुरावटी बदलत होत्या. चित्र निश्चल होतं.
माझ्या पुढच्या बेंचवरची ती छोटी स्वीस मुलगी आता कंटाळायला लागली होती. ती त्या सगळ्या निश्चल, भारलेल्या, प्रार्थनामय वातावरणात, अचानक बेंचवर उताणी आडवी पडली आणि पाय अर्धे हवेत, अर्धे खाली असे झाडायला लागली. तिच्यामुळे मी आणि माझ्या आसपासची निश्चल माणसं चित्रातली नसून खरी आहेत हे सिद्ध झालं. तिच्या बरोबरच्या स्वीस पुरुषाने झटकन हातातलं निळं पुस्तक बाजूला ठेवलं. तिला आडव्याचं उभं केलं. त्याच्या शेजारी बसवलं आणि तोंडावर बोट ठेवून ‘गप्प राहा’ अर्थाचं जर्मन भाषेत तो कुजबुजला. तो तिचा बापच असावा. त्याचं बोलणं ऐकून तिने मोठा आळस दिला आणि मागे वळून पाहिलं तेव्हा तिला मी दिसले. मी हसले. ती तिचे मोठे निळे निळे डोळे अजिबात न हलवता ढिम्मपणे माझ्याकडे पाहात राहिली. हसली नाही. मग थोडा वेळ समोर बघत पाय हलवत राहिली. पुन्हा माझ्याकडे पाहिलं. मग जांभई दिली. तिच्या बापाने तिला इथे का आणावं? थोडय़ा वेळाने गाणारी माणसं आणि ऑर्गन शांतावत गेला. पूर्ण शांत झाला. मग मध्यभागी ठेवलेल्या डायसवर फादर आले. काहीतरी वाचलं. निघून गेले. पुन्हा ऑर्गन आणि माणसं थोडं गायली आणि सगळं शांत झालं..
लाकडी बेंचवरची सगळी माणसं हातातली निळी पुस्तकं बेंचखालच्या कप्प्यात ठेवून बाहेर निघाली. उजवीकडून गाणारी माणसंही बाहेरच्या दिशेने जायला लागली. ती छोटी शाळा सुटल्यासारखी पळत सुटली आणि गाणाऱ्या माणसांमधल्या उभ्या चेहऱ्याच्या, सोनेरी केसांच्या उंच बाईला जाऊन लगडली. तिचा बापही तिच्या मागून तिथे गेला. ते व्हरांडय़ात पोहोचले तोवर ते स्वीस छोटं आईबरोबर चिवचिवायला लागलं होतं.
त्यांच्यातल्या कुणीही मी ‘नवीन’, ‘वेगळी’ म्हणून माझ्याकडे एकदाही वेगळं पाहिलं नाही. पण म्हणून मला परकंही वाटलं नाही. मी रोजच त्यांच्यात असल्यासारखा सहजपणा वाटत होता. चर्चमधून बाहेर पडून १५-२० पावलांवर असलेल्या माझ्या छोटय़ाशा हॉटेलच्या सुंदरशा खोलीकडे चालायला लागले तेव्हा रस्त्यावर श्रावणातला, उन्हातला पाऊस पडत होता.
खोलीत आल्या आल्या पुन्हा तडक गॅलरीतच गेले. समोरचं माऊंट तितलीस पाहून अधाशासारखं होत होतं. गपागप त्याला डोळ्यांनी खाऊन टाकावं, असं वाटत होतं. थोडय़ा दिवसांत इथून जावं लागणार म्हणून हताशाच आली. त्यावर फुंकर मारण्यासाठी उगीचच मोबाइलच्या छोटय़ाशा स्क्रीनवर माऊंट तितलीसचे फोटो काढायला लागले. पूर्वी जेव्हा जेव्हा आयुष्यात फार सुंदर असं काही बघायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा रडायला यायचं. माझ्या सगळ्या प्रिय माणसांची जोरात आठवण यायची. ती माणसं आत्ता माझ्याबरोबर इथं का नाहीत, असं असोशीनं वाटत राहायचं. नायगारा धबधबा, डिस्ने लॅण्डमधली रात्रीची आतिशबाजी या सगळ्या गोष्टी मी डोळे पुसत पाहिल्यात. आता रडत नाही, पण वाईट वाटून त्या माणसांसाठी फोटो काढत राहते. तसेच माऊंट तितलीसचे काढायला लागले. उजवीकडच्या शिखरांचे फोटो काढता काढता डावीकडे वळले आणि थांबलेच. मोबाइल खाली घेतला. समोर मगाशी घंटा वाजवणारं लाकडी चर्च. त्याच्यामागे माऊंट तितलीस आणि चर्च ते माऊंट तितलीस असं अर्धवर्तुळाकार सुंदर इंद्रधनुष्य! आता काय करावं? हे सगळं उतू जात आहे, असं वाटायला लागलं. कॅमेऱ्यात, डोळ्यांत, हृदयात साठवूनही उतू जाणारं हे सगळं. त्या सगळ्याने एका क्षणात झपक्न मलाच माझ्यातून काढून घेतलं आहे, असं वाटलं. म्हणजे काय होतं.. कधी कधी एखाद्या प्रयोगातल्या एखाद्या प्रसंगात एखादा सूर असा काही लागून जातो, एखादी जागा अशी काही सापडून जाते, एखादा अप्रतिम सिनेमा पाहताना समोरचा एखादा मोठा नट पडद्यावर असं काही करून जातो, एखाद्या पुस्तकातली एखादी ओळ असा काही वर्मी घाव घालते, घरासमोरचा तोच तो पिंपळ एखाद्या मध्यरात्रीच्या नीरव शांततेत असा काही दिसून जातो, देशोदेशीच्या अनेक विमानांत बसून त्या विमानांची असंख्य उड्डाणं खिडकीला डोळे चिकटवून पाहिलेली असतात, पण एका उड्डाणाच्या वेळी रात्र असते आणि नेमकी पौर्णिमाच असते.. आणि उड्डाण घेता घेता विमानाशेजारचा टपोरा चंद्र असा काही समोर येतो.. खाली तेव्हा नेमकं पाणी असतं.. नेमकं.. आणि त्या खिडकीसमोरच्या चंद्राचं चांदीचं प्रतिबिंब त्या खालच्या पाण्यात असं काही दिसतं.. मग परत खाली जमीन येते.. आणि ते चांदीचं प्रतिबिंब लुप्त होऊन जातं. मग परत पाणी.. परत जमीन.. परत पाणी.. परत जमीन असं खाली येत असताना चांदीचा तुकडा.. अंधार.. परत चांदीचा तुकडा आणि अंधार असा जो काही खेळ दिसत जातो. एखाद्या रात्री आपल्या जोडीदाराचा हात आपल्या त्याच शरीरावरून असा काही फिरतो की आपण आपल्यातून बाहेर पडतो.  हे सगळं.. उतू जाणारं.. आपल्यामध्ये न मावणारं.. आपल्याला आपल्यातून काढून घेतं आणि त्या त्या उतू जाण्यात.. विरघळवून टाकतं. त्या काही क्षणांपुरतं.. आपण आपलं असणं सोडतो आणि त्या उतू जाण्यात विरघळून जातो.
‘त्या’ श्रावणातल्या ‘त्या’ संध्याकाळी ‘त्या’ इंद्रधनुष्यानं ‘त्या’ काही क्षणांपुरतं मला.. ‘एंगलबर्ग’ आणि ‘माऊंट तितलीस’मध्ये विरघळवून टाकलं होतं!