प्रेग्नन्सीचा आधुनिक फंडा Print

डॉ. लीली जोशी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजच्या जमान्यात फक्त मुलगी प्रेग्नंट नसते, दोघंही असतात.‘वी आर प्रेग्नंट’.. ई-मेलवरून विजयी घोषणा सर्वदूर पसरवली जाते.. पुढच्या सगळ्या गोष्टी नवरा-बायको दोघं मिळून करतात.. आजच्या काळातल्या या हाय-फाय प्रेग्नन्सीचा हा आँखो देखा ‘हाल’..
वेळ पहाटे तीन. ट्रिंग.. ट्रिंग..
‘‘हॅलो..’’ झोपाळलेला आवाज.
‘‘माझी मेल चेक कर आणि फोन कर..’’
डोळे चोळत घाईघाईनं मेल चेक होते.
‘‘अगं, तू लिहायला विसरलीयस का मजकूर? नुसत्या दोन काळसर रेघा दिसतायत.’’
‘‘मॅग्निफाय कर.’’ घाबरट उत्सुक आवाज.
ओ होऽ दोन रेषा म्हणजे दोन पट्टय़ा आहेत. एकीवर दाखवतंय येस, एकीवर नो. हे यू.पी.टी. आहे का काय?’’
‘‘काय गं, पाळी चुकली का?’’ मुद्दय़ाचा प्रश्न.
‘‘नाही गं, तशी उद्याला डय़ू आहे. पण आम्हाला वाटत होतं चान्सेस हाय आहेत म्हणून..’’
‘‘असं? मग शांत बसा आता. कमीतकमी दहा-बारा दिवस. असेल तर कळेलच. नसेल तरी कळणार.’’ व्यवहारी सल्ला.
छे.. पण शांत बसणं या लोकांना माहीतच नाही. शिवाय त्यांना चान्सेस हाय वाटतात हे काही नुसतं विशफुल थिंकिंग नाही त्यांनी भरपूर विचार केलाय, निर्णय घेतलाय. मग रिसर्च केलाय प्रेग्नन्सीचा? सगळी फिजिऑलॉजी शिकून घेतलीय. रक्त-तपासण्या केल्यात. व्हिटॅमिन सप्लिमेंट घेतायत.
आता त्यांनी ओव्ह्य़ुलेशन ट्रॅकर आणलाय. आपल्या ओव्ह्य़ुलेशनचा दिवस हुडकून काढलाय. त्या मुहूर्तावर जरूर त्या गोष्टी पार पाडल्यात. मग का नाही वाटणार त्यांना ‘चान्सेस हाय’?
बरेचदा त्यांना अशा प्रयत्नात फळही मिळतं. पण समजा नाहीच मिळालं तर त्यांना खूप सारे पर्यायही ठाऊक आहेत. आयुर्वेद, होमिओपॅथी, हर्बल मेडिसीन, नेचरोपॅथी, योगा आणि मेडिटेशन- झेन बुद्धिस्ट, चायनीज, जॅपनीज, ट्रॅन्सेन्डेन्ट, ट्रॅन्सॅक्शनल अशा विविध पद्धती हे सगळं सगळं त्यांना माहीत आहे आणि त्यासाठी वेळ काढण्याची मानसिकतासुद्धा, कारण त्यांची निर्णयप्रक्रिया हा एक इन्फॉम्र्ड डिसीजन असतो. त्यापासून मागे हटणं त्यांना पटणार नाही.
प्रेग्नन्सी हा एक प्रोजेक्ट आहे, कधी फार फार सोपा तर कधी टफ आणि चॅलेंजिंग आणि तो पार पाडायचाय दोघांनी मिळून- हे अगदी पक्कं! त्यासाठीच नाही का योग्य वेळ येण्याची त्यांनी वाट पाहिली? याचं प्रोजेक्ट, तिची असाइनमेंट, याचं ऑन शोअर, तिचं ऑफ शोअर यातून सगळं जुळून येणं ही चेष्टा नाहीय महाराजा! यासाठी त्यांनी वीक-एंड मॅरेज पत्करलं, तर कधी जॉब बदलला. ‘मूव्ह’ कोणी व्हायचं ते आपसात ठरवलं, या लोकांनी घर घेतलंय तेसुद्धा ‘स्कूल डिस्ट्रिक्ट’मध्ये. त्यासाठी जबरदस्त भाडं द्यायला मागेपुढे पाहिलं नाही. मग प्रेग्नन्सी ही कळत-नकळत, सहजासहजी, आपोआप घडणारी गोष्ट आहे की काय? अगदी जाणीवपूर्वक उचललेलं ते जोडपाऊल आहे.
तर मग सुरुवातीला वर्णन केलेल्या या जोडप्याची यू.पी.टी. (युरीन प्रेग्नन्सी टेस्ट) दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पुन्हा केली जाते. पाठोपाठ रक्ततपासणी बीटा एचसीजीसाठी. मग त्यांना मेल येते लॅबमधून. एका ओळीचा रिपोर्ट अभिनंदनासहित आणि उरलेलं पानभर या टेस्टमधल्या त्रुटींबद्दल माहिती.
लगेच ही बातमी दोघांच्या ‘निअर फॅमिली’ला कळवली जाते. बाकीच्या जगाला मात्र नाही हं. त्यासाठी थांबायचं तीन महिने. तोपर्यंत चांगल्या डॉक्टरांचा शोध घ्यायचा- म्हणजे आधीच घेतला नसेल तर. चांगली कसून चौकशी करायची. डॉक्टर क्वालिफाइड तर पाहिजेच. पण त्यांच्या पेशंट्सनी त्यांच्याबद्दल चांगलं लिहिलेलं असावं. मग त्यांची अपॉइंटमेंट, सोनोग्राफी, ‘ऑल इज वेल’ असं त्यांचं सर्टिफिकेट! यानंतर सुरू होतं इ-हायवेवरचं दळणवळण. ‘वी आर प्रेग्नंट’ अशी विजयी घोषणा केली जाते. आजच्या जमान्यात फक्त मुलगी प्रेग्नंट नसते, तर ते दोघंही असतात आणि पुढच्या सगळ्या गोष्टी दोघे मिळून करत असतात.
ताबडतोब अभिनंदनाचा पाऊस पडतो.. सर्वानाच ही बातमी ‘ग्रेट’, ‘ऑसम’, ‘फॅन्टॅस्टिक’ वाटलेली असते. अनुभवी मित्रमंडळींना असंख्य प्रश्न विचारले जातात. त्यांची त्वरित उत्तर येतात. याशिवाय ‘व्हॉट टु एक्सपेक्ट व्हेन यू आर एक्सपेक्टिंग’ किंवा ‘युवर प्रेग्नन्सी वीक बाय वीक.’ अशा असंख्य पुस्तकांचं वाचन-मनन केलं जातं. बहुतेकांच्या स्मार्ट फोनवर विशिष्ट ‘अ‍ॅप’ घेतले जातात. रोज सकाळी उठल्यानंतर या अ‍ॅपमधून ‘आज तुम्ही प्रेग्नन्सीच्या या टप्प्यावर आहात- त्यात अमुकतमुक होऊ शकतं’ अशी माहिती दिली जाते.
माहितीच्या या महासागरात हेलकावे खात तरंगताना वारंवार तपासण्याही केल्या जातात. नर्सेस गोड बोलतात, बीपी घेतात. वजन घेतात. बाळाच्या छातीचे ठोके मोजतात. डॉक्टर पेशंटपेक्षा कॉम्प्युटर स्क्रीनकडे बघत बघत कमीत कमी शब्दात आणि वेळाने तुकडा पाडतात, मात्र त्यांना ई-मेल करून प्रश्न विचारले की त्वरित उत्तर देतात.
अशा पद्धतीनं प्रेग्नन्सी पुढे चाललेली असतानाच प्रीनेटल क्लासेसची वेळ येते. प्रेग्नंट मुलीला खास योगासनं आणि इतर व्यायाम शिकवले जातात. जोडीजोडीनं दर शनिवारी क्लासेस अटेंड करायचे असतात. बराच अभ्यास असतो. नॉर्मल डिलिव्हरी, फोर्सेप्स, सी-सेक्शन, ब्रेस्ट फीडिंग असले विषय समजावले जातात. गोष्टी कुठे घडू-बिघडू शकतात, त्यासाठी काय काय करायचं अशी सगळी माहिती असते. ‘स्टेम सेल’ आणि जन्मजात दोष तपासण्या याविषयी स्वतंत्र व्याख्याने होतात.
बघता बघता इकडे बेबी शॉवर, अर्थात डोहाळ जेवण, तर तिकडे हॉस्पिटल टुअर्सची वेळ येते. बेबी शॉवरमध्ये मित्रमंडळींचा जोरदार सहभाग असतो. भारतात नाही तरी इतरत्र बाळाचं लिंग माहीत असल्यास त्यानुसार विशिष्ट थीम ठरवून सजावट केली जाते. गमतीजमतीचे खेळ खेळले जातात. एक्सपेक्टंट/ नूतन आई-बाबांमध्ये बाहुलीला डायपर बांधणे/सोडणे, वासावरून आत काय हे ओळखणे अशा मजेदार स्पर्धा घेतल्या जातात. एकंदर धमाल कार्यक्रम होतो. ‘बेबी रजिस्ट्री’मध्ये सुचवल्यानुसार भेटवस्तू दिल्या जातात.
इकडे अनेक जोडप्यांची एकत्रितपणे हॉस्पिटल सहल ठरवली जाते. स्वागत कक्षापासून लेबर रूम, ऑपरेशन थिएटर, आई-बाळ विभागापर्यंत सगळं काही दाखवलं जातं. डिलिव्हरीची प्रक्रिया सुरू झाली हे कसं ओळखायचं हे पुन: पुन्हा सांगितलं जातं. दुग्धपानाचे व्हिडीओ दाखवले जातात. त्याविषयी समुपदेशिका व्याख्यान देते.
इकडे तोपर्यंत घरच्या वडील मंडळींचं आगमन झालेलं असतं. आपल्या तरुण पिढीची या विषयातली अगाध विद्वत्ता आणि पारंगतता पाहून ते थक्क होतात. बरंचसं कौतुक, काहीसा हेवा, किंचितसा निषेध अशा संमिश्र भावनातून ते जात असतानाच दिवस पूर्ण भरल्याची ‘अ‍ॅप’मधून घोषणा होते. ‘घरच्या घरी प्रसूती वेदना सुरू करण्याचे २९ उपाय’ तरुण मंडळी नेटवर वाचू लागतात आणि अशीच अचानक हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येते.
लेबर रूममध्ये पेशंटबरोबर तिचा पार्टनर आणि तिला हवी असलेली इतर कोणीही व्यक्त हजर असते. तिथे ही भावी आई कळा देत असते तर भावी बाबा कळा झेलत असतो. दोन कळांच्या मध्ये आईला धीर देणं, पाणी पाजणं, तळपायांना/कमरेला मसाज करणं अशी कामं तो उत्साहानं करीत असतो. दोघेही कळांच्या स्वरूपाकडे, बाळाच्या छातीच्या ठोक्यांकडे लक्ष ठेवून असतात. हा प्रकार आईची आई किंवा सासू हतबुद्ध होऊन पाहात असते आणि अशातच घटका भरते, बाळाच्या आगमनाबरोबरच आजच्या बदलत्या प्रेग्नन्सीची सांगता होते अन् सुरुवात होते एका सुबुद्ध, डोळस, जबाबदार पालकत्वाची! शाबास, आजच्या तरुण मातापित्यांनो, तुमच्या कमिटमेंटबद्दल मनापासून अभिनंदन!