संयमाचाच कडेलोट! Print

डॉ. अनुराधा सोवनी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

लहानपणापासून शिकवलेला संयमाचा मंत्र आपण सतत जपत राहतो. भावनांचा निचरा कधी होऊच देत नाही. संयम याचा अर्थ जपून वागणे. तारतम्य ठेवणे. तोल राखणे. पण तो कधीतरी जातोच. आपल्या माणसांशी बातचीत करून तो परत सांभाळायचा असतो. थोडी विश्रांती घेऊन बिघडलेली लय परत सावरायची असते. पण आपण स्वत:ला तोल सांभाळायला वाव देतो का? का आधीच थकलेल्या मनाला झोडपत राहतो? मग एक दिवस त्या संयमाचा अतिरेक होणारच..
‘‘घा ईघाईने गाडी चालवत कोठे तरी चाललो होतो; समोर स्कूटरवाला आडवा आला. माझ्या नवीन गाडीवर चरे ओढून पुढे चालला होता. माझ्या डोक्यात तिडीक गेली. खाली उतरलो, असा चोपून काढला त्याला! जन्मभर विसरणार नाही!..’’
‘‘आधीच कंटाळले आहे मी. रोज घरातली कामे उरका, कुटुंबातल्या हजार कटकटी आहेतच. मग ट्रेनमध्ये धक्के खात कामावर जा.. कधी गाडी लेट, तर कधी इतकी गर्दी की वाटते, पुढचा श्वास घेता येतो की नाही! मग ऑफिसमध्ये वरिष्ठांची दादागिरी. परत तसेच लोंबकळत, फरपटत घरी यायचे. आज घरी पोचले, तर रोहनचं रिपोर्ट कार्ड टेबलवर पडलं होतं. तो खेळायला गायब. लाल रंगात पाय बुडवून कोंबडी नाचावी, असं दिसत होतं ते कार्ड.. नापास. नापास. नापास. अनुत्तीर्ण. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. लाटणं हातात घेऊन, पदर खोचून सरळ खाली गेले, त्याला कान धरून वर आणलं, ते मारत मारतच. तो काही तरी ओरडत होता, पण मला काही ऐकू येत नव्हतं.. फक्त दिसत होते ते शब्द.. नापास. नापास. नापास. रोहन रडत झोपला, न जेवताच. रात्री मीदेखील रडले त्याच्या पलंगाजवळ बसून..’’
हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ मुलांना तपासतात. एखाद्या चिमुरडीच्या बाबतीत शंका येते, ‘या जखमा झाल्याच कशा?’ ‘जिन्यावरून पडली.’ आईवडील सांगतात, पण सिगरेटने चटके दिल्यासारखे डाग? मोडलेली हाडे? चेहऱ्यावर सूज? अशा कोणत्या अमानुष भावनेच्या आहारी जाऊन माता-पिता पोटच्या पोरीला अशी शिक्षा करतील? ..
रस्त्यात भांडण झाले म्हणून जी बाई आपल्याशी रागाने बोलली, तिला इतके बेदम मारतील की ती बेशुद्ध पडेल, तिच्या पोटातले बाळ गतप्राण होईल? त्या कृत्याबद्दल नंतर थोडी तरी हळहळ वाटेल का? कदाचित, पण हातून हिंसा घडत असताना हे तारतम्य कोठे जाते?..
आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की संयम राखायचा. उगीच भांडण करायचे नाही, वाद वाढवायचा नाही. मारले तर दुसरा गाल पुढे करण्याइतके आपण संत प्रवृत्तीचे नसलो, तरी निदान शांत राहायचा प्रयत्न करायचा.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले, तर मनुष्यस्वभावाचा तीन पातळ्यांवर अभ्यास करता येईल : वर्तन, भावना आणि विचार.
लहानाचे मोठे होत असतो तेव्हापासून आपल्या वर्तनावर र्निबध घातले जात असतात. असे बोलू नये, तसे वागू नये, कोणाला इजा होईल असे काही करू नये.. हळूहळू त्या सगळ्या ‘सूचना’ आपल्या अंतर्मनात घर करून बसतात. त्यामागची कारणमीमांसा नाहीशी होते.. बस्स्.. असं वागायचं एवढीच खूणगाठ बांधली जाते. आपण सतत संयमी राहायचा प्रयत्न करतो. भावनांचा ज्वालामुखी फुटायच्या मार्गावर असतो. रागाचा पारा चढतच जातो, पण त्या भावनांचा निचरा व्हायला कोठेच वाट नसते.
कुकरमध्ये वाफ जमत राहिली, शिट्टीच झाली नाही, तर एक क्षण असा येईल की, वाफ झाकण फोडून बाहेर पडेल. दुधाखालचा विस्तव तसाच जळत राहिला, तर दूध उतू जाईल. रबर ताणून ताणून एक दिवस तुटून जाईल. या सगळ्या उपमा, तणाव व्यक्त करणाऱ्या प्रतिमा आपल्याला आता सुपरिचित आहेत, पण त्या चपखल बसतात का? कुकर फुटला, रबर तुटले, दूध उतू गेले की संपले सारे.. एकदा घटना घडली की घडली, पण आपल्या संयमाची ही सत्त्वपरीक्षा नित्यनियमाने सारखीच होत असते. वाफ जिरायला, रबरला ढील द्यायला, दूध निवू द्यायला आपण थांबतो का कधी?
निसर्गाची अनेक चक्रे नित्यनियमाने चालत असतात. उन्हाळा, हिवाळा, पुन्हा पावसाळा. संध्याकाळ, रात्र, पहाट, दिवस सरतो की परत संधिप्रकाश येतो. जेवण पचते, पुन्हा भूक लागते. झोप मिळाली की शरीर विसावते, परत आपण कामाला सामोरे जातो, जागे राहायला सज्ज होतो, पण मानवी मनाला आपल्या हुकमाप्रमाणे चालवणारे आपले विचार मात्र अशी सारी चक्रे जुमानत नाहीत. ते आपली अरेरावी गाजवतच राहतात. ‘माझ्या हातून असे घडताच कामा नये’, ‘असे बोलणे अयोग्य आहे’, असे हुकूम सोडून, आपले मन आपल्या वर्तनाला बांधून घालते.
‘एवढा राग येतोच कसा?’ ‘इतके भिऊन कसे चालेल?’ असे वाटायला सोपे, पण वास्तविक महाकठीण प्रश्न स्वत:ला व इतरांना विचारून भावना व्यक्त करण्याच्या सर्व वाटा बंद करून टाकते.
निसर्गातली इतर चक्रे अनिवार्य असतात. उन्हाळा-पावसाळा, जीवन-मरण, दिवस-रात्र या चक्रांमधून सुटका नसते. मन कोठे धावेल, कोणता पर्याय निवडेल हे मात्र आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. भावना मनाचा संपूर्ण ताबा घेतात, म्हणून आपल्याला ही गोष्ट जाणवत नाही. ‘असह्य़’ भावना परिस्थिती केव्हा हाताबाहेर घेऊन जातात तेच कळत नाही. पण अतीव तणावानंतर थोडे शिथिल राहण्याचा, थोडे ‘रिलॅक्स’ होण्याचा पर्याय आपण आधीच निवडून ठेवला असेल, तर मात्र काहीच कठीण वाटणार नाही आणि असे ‘कुकर फुटल्या’सारखे परिणामदेखील जाणवणार नाहीत.
एका कुमारवयीन मुलाला स्पर्धापरीक्षा द्यायची होती. लाडका, हुशार मुलगा- आईवडिलांनी सर्व तऱ्हेने आधार दिला, प्रोत्साहन दिले. प्रयत्नांची, अभ्यासाची शिकस्त केली. मात्र तिघांनी मिळून आधीच ठरवले होते की, परीक्षा झाली रे झाली की, लगेच सुट्टी सुरू! प्रवास करायचा, निसर्गरम्य ठिकाणी मन शांत करायचे, थकलेल्या मनाला आणि शरीराला पूर्ववत होऊ द्यायचे. ‘चांगल्या रिझल्ट’ नंतरचे बक्षीस नव्हे, तर ‘भरपूर प्रयत्नांनंतरची ‘कमावलेली सुट्टी’, आरामासाठी अवसर होता. नापास झालो तर मनाला हुरहुर लागणारच, पण पहाड कोसळणार नाही, हे भान गरजेचं आहे.
नैसर्गिक चक्राकार प्रक्रियेचे आपण अट्टहासाने सरळ रेषेत रूपांतर करतो. संयमाचा एकच मंत्र जपत राहतो. भावनांचा निचरा कधी होऊच देत नाही. व्यायाम, मैदानी खेळ हे मार्ग उपलब्ध असूनदेखील साचलेल्या ऊर्जेला कधी वाट करून देत नाही. जिवाभावाच्या माणसांजवळ मन मोकळे करून, मनात साचलेले मळभ कधी दूर करीत नाही.
विचारांची पुटे मात्र थकलेल्या मनावर चढतच असतात! ‘याने तरी असे वागायला नको’, ‘तिने तरी मला समजावून घ्यायला हवे होते’, ‘या वेळेला तरी पास व्हायला हवे होते.’ ‘आता तरी नोकरी लागायलाच हवी.’.. या विचारांत निराधारपणाची, एकटेपणाची भावना वाढत राहते. आपल्यावर अन्याय होतो आहे, असा भास होतो. हा ‘तरी’ हा शब्द फार भयंकर आहे. इंग्रजीमधील ‘अ‍ॅट लिस्ट’देखील तसाच!
हा शब्द उच्चारताच आपण ‘चांगले’ वागण्याची, ‘योग्य’ ते करण्याची सर्व जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर टाकून देतो आणि हात झटकून मोकळे होतो. ‘एवढे तरी करायलाच हवे त्याने..’ हा ‘च’देखील महाभयंकर, भावनिक समस्यांची हमी देणारा. ‘हे होताच कामा नाही.’ ‘मलाच मिळायला हवे.’ ‘मला हे कधी जमणेच शक्य नाही.’
ही स्वगत वाक्ये आपण कधी तपासून का बघत नाही? वास्तविक तसे केले, तर त्यांच्यात दडलेली वैचारिक चूक लगेच लक्षात येईल! जमणेच शक्य नाही? कधी करून पाहिलेय? होताच कामा नाही? काहीतरीच काय? हे तर घडून गेले आहे. आपल्याला फक्त परिस्थिती हाताळायची आहे, जमेल तशी, जमेल तेवढी.
आपण रस्त्याने चाललो होतो. आधीच दिवस वाईट गेला होता. त्यात कोणीतरी रस्त्यात आडवे आले. वादावादी केली. पण म्हणून काय एखाद्या माणसाला जिवे मारायचे?
‘संयम सोडायचाच नाही’ हा कुठला अट्टहास? संयम याचा अर्थ जपून वागणे. तारतम्य ठेवणे. तोल राखणे. तो कधीतरी जातोच! आपल्या माणसांशी बातचीत करून तो परत सांभाळायचा असतो. थोडी विश्रांती घेऊन बिघडलेली लय परत सावरायची असते.
आपण स्वत:ला तोल सांभाळायला वाव देतो का? का आधीच थकलेल्या घोडय़ाला चाबूक मारून हाकत राहिल्यासारखे, थकलेल्या मनाला झोडपत राहतो? दौडवत राहतो? आणि मग एक दिवस तोच घोडा बेलगाम उधळतो. संयमाचाच जणू कडेलोट होतो. संयम राखून थकलेले मन हात टेकते. मनात उकळत राहतात ती मगाशी सांगितलेली स्वगत वाक्ये.. तेच धोकादायक शब्द.. ‘होताच कामा नये’, ‘आता तरी’, ‘तिने/त्याने तरी’, ‘मलाच का’, ‘काय हक्कआहे?’ ‘सहनशक्ती संपली’..
असा कडेलोट टाळायचा असेल तर
धोक्याच्या निशाणांकडे लक्ष ठेवायला हवे! नैसर्गिक चक्राप्रमाणे आपले मन ताणलेले, मग शिथिल, असे राहते का आलटून-पालटून? यावर नजर ठेवायला हवी. जिवलग दोस्त भेटून किती दिवस झाले? भेट पुढे ढकलता ढकलता एकमेकांचा विसर तर नाही पडला? मुलांकडून फक्त अपेक्षाच करतो आपण, की कधी कधी गोडपण बोलतो? त्या गोड बोलण्याने फक्त मुलांनाच बरे वाटते, की आपल्यालादेखील?
अनेक मुलांच्या चिमखडय़ा बोलांवरून ओळखू येते, त्यांचे पालक किती तणावग्रस्त आहेत ते! एका छोटय़ाने मला सांगितले,
 ‘मला रिझल्ट हातात मिळाला की, मी लगेच आईला नेऊन देतो. ती हसली, तर चांगला असणार. कपाळावर आठी दिसली तर मी तिथून पळून जातो!’ म्हणजे तो रिझल्टचे कार्ड नव्हे, तर आईचा चेहरा ‘वाचतो!’
दुसऱ्याने मला सांगितले, ‘माझ्या बाबांनी मित्र बदलायला सांगितलेत’, ‘म्हणजे रे काय?’ मी विचारले, ‘म्हणजे बाबा म्हणाले, ‘वर्गात जो मुलगा पहिला नाहीतर दुसरा येतो, त्यांच्याशीच दोस्ती करायची. इतर मित्र नकोत आपल्याला.’ वडिलांच्या मनात चांगलेच असेल, आपल्या लेकाला वाईट संगत लागू नये, अभ्यासात मदत व्हावी, गटात स्पर्धेचे वातावरण राहावे.. पण हा मुलगा कधी जिवाभावाची दोस्ती करेल का? की सूर जुळण्याऐवजी मार्क जुळतील अशाच लोकांशी जवळीक करीत राहील?
डोळ्यांसमोर एकच लक्ष्य ठेवून काम करीत राहणे, संयम राखून, डावी-उजवीकडे न पाहता, विचलित न होता, नाकासमोर चालत राहण्याचे फायदे नक्कीच आहेत. पण त्या मार्गात आयुष्याचा आनंद नाही मिळत. जवळचे नातेसंबंध नाही जुळत. कौटुंबिक नाती, सुखदु:खात जवळ येणारी माणसे कधी सापडत नाहीत आणि सापडली तरी हरवतात!
अधूनमधून थोडी मस्ती, थोडी सुस्ती, माफ आहे का आपल्याला? की बांधून घेतले आहे आपण स्वत:लाच घाण्याच्या बैलासारखे?
संयम नक्कीच चांगला, पण तो अनैसर्गिक प्रमाणात राखला तर त्याचा कडेलोटच होणार. परदेशातल्या काही पद्धती जागतिकीकरणाबरोबर आल्या असतील आपल्याकडे. जपून हसायचे, माफक बोलायचे, परवानगी मागितल्याशिवाय कोणत्याही विषयाला हात नाही घालायचा. दरवाजावर टकटक केल्याशिवाय मुलांच्या खोलीतदेखील जायचे नाही. कोणाला ‘पर्सनल से सवाल’ विचारायचे नाहीत. ट्रेन, बसमध्ये, लिफ्टमध्ये, अनोळखी माणूस भेटला तर थोडे उभ्याचे आडवे करून किंचित स्मित द्यायचे, मग मात्र गप्प बसायचे. उगीचच फालतू, अगोचर, अघळपघळ गप्पा मारायच्या नाहीत.
परक्या व्यक्तीच्या कडेवर बसलेले परके बाळ (!) कितीही गोड असले, तरी त्याच्या गालाला हात लावायचा नाही.. किती संयम!
पण आपण तर भारतीय आहोत. मनातले गुज दोस्तापाशी  बोलणारे, वरीलपैकी सर्व काही अघळपघळ व्यवहारात आनंद मानणारे, रडणाऱ्या बाळाला आपल्या पर्समधले बिस्किट काढून देणारे- विनोद आवडला तर सात मजली हसणारे! ट्रेनमध्ये समोर बसलेल्या नववधूला मोगऱ्याचा गजरा देणारे. ट्रॅजिक पिक्चर बघताना रडणारे, आवडत्या गाण्याला शिटी देणारे! लावणी ऐकून पागोटे उडवणारे.. मनातले भाव पद्याऐवजी कवितेत मांडणारे, चिडून लहानपणच्या दोस्ताला पानभर खरमरीत पत्र खरडणारे, त्याचा फोटो फाडून टाकून, पण परत हळुवार जोडून चिकटवून ठेवणारे..
भारतात ‘सोशल नेटवर्क’ने पदार्पण केले आणि दोस्तीची परिमाणेच बदलली. ‘कसे’ मित्र आहेत, याऐवजी ‘किती’ आहेत, याची मोजमापे सुरू झाली. या साइट्सनी खूप काही चांगले आपल्यापर्यंत आणले, त्यातल्या अनेक गोष्टी आकर्षक असतात, रंजक असतात.. पण कधी कधी फसवेदेखील असतात. त्यांच्या धोक्यांविषयी आपल्याला येथे चर्चा नाही करायची. पण आपण जी स्वत:चीच फसवणूक करत राहतो, त्याबद्दल धोक्याचा इशारा द्यायला हवा. आपण दिवसभर सतत फोन, एसएमएस. या माध्यमांद्वारे बातचीत करतो. ई-मेलवरून सगळ्यांना खूप माहिती पुरवतो, विचारांची देवाणघेवाण करतो. मग ‘रिलॅक्स’ होण्यासाठी सोशल नेटवर्कचा वापर करतो. मघाशी सतत संयम राखण्याबद्दल बोललो- त्या पद्धतीने तोदेखील सोडून हसतो, एकमेकांना फोटो पाठवतो, बातम्या ‘शेअर’ करतो.
पण कोठे तरी मनात ही जाणीव असते की, यातले काही ‘दोस्त’ खरे असतील किंवा नसतील देखील! अशा ‘ठोक भावात’ मन मोकळे करायला कधी कधी बरे नाही वाटणार. थोडेच, पण खरे मित्र हवे वाटतील. तिथेही संयम राखावासा वाटेल! कारण ‘खऱ्या’ नात्यांबरोबरच आपण भावनांचे पूर्ण इंद्रधनुष्य उपभोगू शकतो. राग लोभ व्यक्त केला, तरी परिणामांचीदेखील भीती नसते आणि मनदेखील मोकळे होते. पण ते मात्र नक्की करा!
राग आला तर आवाज चढवून समोरच्या माणसाला चार शब्द सुनावून, मग जास्त बोललो, माफ करा, म्हणून जर पुढला हिंसाचार टळणार असेल, तर त्या बिचाऱ्या संयमाचा कडेलोट कशाला करायचा!.. ?..
(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)