हरवणे एक अनुभव.. Print

प्रिया वैद्य ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एकांताविषयी सांगायचे तर, आपल्या सारख्या सामान्य माणसांनासुद्धा, पाऊस पडत असताना खिडकीतून बघणे, एकटीने गाणी ऐकणे हे सर्व खूपदा मनापासून करायला आवडते.. कदाचित याच वेळी एकांताशी गप्पा होत असाव्यात..
अलीकडेच एक पुस्तक वाचनात आले, शांताबाई शेळके यांच्या ललित लेखांचे ‘रंग-रेषा’. त्यांची फारच कमी गद्य पुस्तके माझ्याकडे आहेत, पण जी आहेत ती खूप सुंदर आणि मार्मिक आहेत. त्यातला एक अत्यंत वाचनिय लेख वाचला.. आणि खूप दिवस मनात घोळत राहिला..
या लेखात त्यांनी काही कवींचा आणि कवितांचा उल्लेख केला होता. त्यात त्यांना आवडलेल्या एका चिनी कवीचा आणि त्याच्या कवितेचाही उल्लेख होता आणि या कवीच्या तीनच कविता (अनुवादित स्वरूपात) वाचनात आल्याची खंतही होती. मला त्यांचा लेख तर खूपच आवडला, हे सांगायलाच नको, पण त्यांची नमूद केलेल्या त्या ‘ली तीई पो’ या चिनी कवीच्या कवितेच्या चार ओळी सतत आठवत राहिल्या.. न राहून शेवटी ‘गुगल’च्या मदतीने या कवीच्या मिळतील तेवढय़ा सर्व कविता वाचल्या, अर्थात इंग्लिश भाषेमधले त्यांचे अनुवाद. शांताबाई शेळके यांच्या लेखामुळे प्रेरित होऊन पहिल्यांदाच एका चिनी कवीच्या कवितांचा मी मनमुराद आस्वाद घेतला..
 एक कलंदर, एकटा, काहीसा दु:खी, चंद्राला सखा मानणारा एक रसिक, असा कुणी तरी डोळ्यासमोर उभा राहिला. एखाद्याच्या लिखाणातून त्याला कसे समजावून घ्यायचे याचा प्रत्यय आला. मग मी स्वत:लाच समजावले, त्याचे लिखाण भिडले यात शंका नाही, पण त्यावरून मी जे चित्र उभे करते आहे त्यात माझ्या मनाच्या प्रतिबिंबाचाही मोठा वाटा आहे. खरे तर शांताबाईंनी त्याच्या तीनच कविता, त्याही अनुवादित वाचूनसुद्धा त्याच्यावर खूप अभ्यास केला. त्याच्यासारखेच मर्म असलेल्या इतर कविता शोधून काढून एकांतात रमणारे कवी आणि त्याच्या सोबतीला असणाऱ्या काही निवडक गोष्टी यांची सुरेख मांडणी करणारा तो लेख लिहिला. शांताबाईंइतकी प्रतिभा व साहित्याचा अभ्यास माझ्याकडे नाही, परंतु एक वाचक आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यामधला विचार ‘एकांत आणि एकांतातील सवंगडी’ हा विषयच खूप भावला आणि जवळचा वाटला..  कवी ‘ली तीई पो’ची मला सापडलेली एक अनुवादित कविता, जिच्यात तो डोंगराबरोबर असतो एकटा..
All the birds have flown
up and gone;
A lonely cloud floats leisurely by
We never tired of looking at each  other
Only the mountain and I.
पक्षी नभीचे उडून गेले
मेघही निघाला थकून उषेला
आपणच उरलो एकमेकांसाठी
माझी उशी डोंगरमाथ्याला
माझा त्या इंग्रजीचे मराठी अनुवादन करण्याचा छोटासा प्रयत्न. मुख्यत: कवींना चंद्र, डोंगर, मदिरा, पाऊस, डोंगर, तारे, वारे या सर्व गोष्टींबरोबर एकांत व्यतीत करायला आवड हवी यात दुमत नाही. या एकांताविषयी सांगायचे तर आपणा सामान्य माणसांनासुद्धा, पाऊस पडत असताना खिडकीतून बघणे, एकटीने गाणी ऐकणे, नुसतेच पहाडीवर बसून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे बघणे, हे सर्व खूपदा मनापासून करायला आवडते.. कदाचित याच वेळी एकांताशी गप्पा होत असाव्यात. बऱ्याच लोकांना मदिरा ही एकांताची साथी वाटते, मी त्याचा अनुभव कधी घेतला नाही म्हणून बोलू शकत नाही, असेलसुद्धा, परंतु मला स्वत:ला अगदी नजीकच्या काळात एक वेगळाच अनुभव आला.
 स्वत:त बुडून एकांत अनुभवायला मिळाला. मत्रिणीने खूप आग्रह केला म्हणून गेले खरी, कधी केले नव्हते नृत्य, त्यामुळे मनात दडपण होते, पण अनुभव वेगळाच आला. खरं तर खूप आनंदित आणि हलकी होऊन घरी परत आले. गेलो तिथे खूप जल्लोष होता, जोरात गाण्याचे सूर कानावर येत होते, जनता टिपऱ्या घेऊन नाचत होती, शांत किवा एकांत शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती होती. आधी आपला काय यांच्यात निभाव लागणार, असे वाटलेसुद्धा.. परंतु वाहत्या पाण्यात आज शिरायचे ठरवले होते. कोणी हसेल का पाहील याची पर्वा ना करता त्याच गोंगाटात नाचून घेतले आणि ‘स्वत:ला हरवणे’ गवसून आले. म्हणतात ना, कधी कधी पतंगाचा मांजा सल सोडवा आणि उडत राहावे त्याच्याबरोबर तसाच काहीसा अनुभव आला आणि ‘ली ताई पो’सारखी डोंगरावर नाही तरी स्वत:च्या लयीत स्वत:ला हरवून घेतले.  
आपणच घालतो आपल्याभोवती
अनेक बंधनांचे कुंपण
कधी करावी सल बेडी
अनुभवावे स्वप्नांचे स्पंदन
थोडक्यात काय, रुचकर वाचन, त्यावर थोडा विचार आणि कधी कधी स्वत:ला हरवून काही तरी केल्याचे समाधान खूप काही मिळवून देते..