र.धों.च्या निमित्ताने : मुली- चांगल्या आणि वाईट घरातल्या? Print

डॉ. मंगला आठलेकर ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
alt

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या मते वेश्येची समाजाला आवश्यकता आहे, विकृत पुरुषाच्या वासनेला वाट मिळाली नाही तर समाजात अनाचार घडू शकतो, चांगल्या घरातल्या मुलीबाळी वासनांध पुरुषाचं भक्ष्य ठरू शकतात. आणि त्यांचं रक्षण करायचं असेल तर वेश्या आवश्यक आहे. मुळात ‘चांगल्या घरातल्या मुली’ आणि ‘वाईट घरातल्या मुली’ अशी मुलींची विभागणी कुणी करूच कसं शकतं? आणि ‘वाईट घरातील’ मुलींची अब्रू पणाला लावून ‘चांगल्या घरातील’ मुलींची अब्रू वाचवण्याचा हक्क समाजाला कोणी दिला?
‘बलात्कार’ हा स्त्रीला आयुष्यातून उठवणारा एक अत्यंत दुर्दैवी असा अपघात आहेच, पण तितकीच किंवा त्याहूनही भयंकर अशी तिच्या आयुष्याला फुटणारी वाट म्हणजे तिचं वेश्यामार्गावर ढकललं जाणं. लहान वयात तिचं हरवणं, तिला पळवून नेणं, कुठल्या तरी आमिषाला बळी पडून तिनं घर सोडणं.. हे सगळे रस्ते तिला देहविक्रयाच्या अशा धंद्यात नेऊन सोडतात, की जिथून माघारी फिरण्याची शक्यता संपलेली असते. आयुष्यात नको असलेल्या सगळ्या गोष्टी टाकता येतात, पण वेश्यावस्तीत पोहोचलेल्या स्त्रीची शरीराला चिकटलेल्या वेश्यापणातून मरेपर्यंत मुक्तता होत नाही.
 देहविक्रय करून पसा मिळवणारी स्त्री म्हणजे वेश्या. काही जणी देवाला वाहिलेल्या म्हणून, काही फसवून सक्तीनं तर काही उदरनिर्वाहासाठी नाइलाजानं या धंद्यात आलेल्या असतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये प्रामुख्यानं देवदासी, मुरळी, भावीण, जोगीण अशा देवाला वाहिलेल्या स्त्रिया दिसतात. अगदी लहान वयात देवाशी लग्न लागल्यानंतर या मुली जेव्हा पुढे वयात येतात तेव्हा त्यांना कुणी पसेवाला, जमीनदार, श्रीमंत माणूस विकत घेतो. काही काळ तिला उपभोगल्यानंतर कंटाळा आला की तिला दुसऱ्याला विकलं जातं, त्यानंतर तिसऱ्याला.. मग चौथ्याला.. तिचं तारुण्य आहे तोपर्यंत तिची अशी विक्री होत राहते. शरीर थकल्यावर कुठे तरी देवळाच्या दारात त्या आसरा शोधतात. त्या म्हाताऱ्या देहाचाही उपभोग घेणारे लंपट त्यांना भेटतात. त्यांना मुली असल्या तर त्याही पुढे हेच काम करतात. देवाच्या नावानं स्त्रीचा उपभोग घेण्याचा लबाड पुरुषांचा हा धंदा शतकानुशतकं बिनबोभाटपणे चालू आहे.
ज्या मुली वेश्यावस्तीतच राजरोसपणे हा धंदा करताना दिसतात त्यामागे बऱ्याचदा त्यांचा नाइलाज असतो. त्या मुळात फसवून तिथं नेलेल्या स्त्रिया असतात. कधी सिनेमा-नाटकात काम मिळवून देतो म्हणून, कधी लग्नाचं आमिष दाखवून, तर कधी मामा, चुलता अशा तिच्या जवळच्या नातेवाईकांनी अथवा दारिद्रय़ानं गांजलेल्या बापानं पशासाठी दलालाला केलेली तिची विक्री.. अशा अनेक कारणांनी मुली या धंद्यात ढकलल्या जातात. या मुली बऱ्याचदा गरीब घरातल्या असतात, मागासवर्गातल्या असतात. त्यांना कोणी वाली नसतो म्हणूनच अशा अत्याचाराच्या त्या बळी ठरतात.
फसवून वेश्यावस्तीत आणल्या गेलेल्या स्त्रीसाठी अर्थातच परतीची वाट नसते. वेश्यावस्तीतून निसटण्यासाठी ती जिवाच्या आकांतानं धडपडते. पण अखेरीस पंख कापलेल्या पक्ष्यासारखी असहायपणे तडफडत वेश्यावस्तीतच कधी तरी प्राण सोडते. वेश्या हा समाजातला सर्वात तिरस्करणीय घटक. समाज तिच्याकडे घृणेनंच बघतो. वेश्या होणं ही कुठल्याच बाईसाठी अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाही. साहजिकच स्वेच्छेनं आणि आनंदानं वेश्यामार्गाला जाणारी स्त्री अपवादानंही सापडणार नाही. तरीही तसा आरोप वेश्यांवर केला जातो खरा.
हा आरोप त्यांच्यावर होण्याचं कारण म्हणजे मोठय़ा शहरांतून स्वेच्छेनं ‘कॉलगर्ल’ म्हणून काम करणाऱ्या मुली. या मुली कित्येकदा उच्च मध्यमवर्गातल्या असतात. स्वेच्छेनं या धंद्यात येतात. त्यांचे स्वत:चे फ्लॅट्स असतात. महागडय़ा हॉटेल्समधून खोल्या बुक करून त्या या मार्गानं पसा मिळवतात. त्यांना गिऱ्हाईकं पुरवणारे एस्कॉर्ट एजन्ट्सही असतात. पण या कॉलगर्ल्सवर त्यासाठी सक्ती होत नसते. त्यांचे व्यवहार त्यांच्या मर्जीनुसार चालतात. वेश्यावस्तीतल्या वेश्येवर आणि तिच्या पशांवर जसा कोठीवालीचा मालकी हक्क असतो, तिथून तिनं पळण्याचा प्रयत्न केला तर तिनं नेमलेले गुंड जसे तिला परत त्याच कुंटणखान्यात आणून सोडतात, तसं कॉलगर्लच्या बाबतीत घडत नाही. कमी कष्टात, चनीचं आयुष्य जगण्यासाठी पशांच्या बदल्यात स्वत:च्या देहाचा उपभोग पुरुषाला घेऊ देणाऱ्या या कॉलगर्ल्स आणि वेश्यावस्तीत डांबल्या गेलेल्या वेश्या यात हाच मोठा फरक आहे. या अर्थानं कॉलगर्ल्स स्वत:च्या मर्जीनं देहविक्रयाचं काम निवडतात असं म्हणता येईल. हे प्रमाण सक्तीनं वेश्या बनवल्या गेलेल्या मुलींच्या तुलनेत नगण्य असतं. पण चंगळवादी वृत्तीतून पशांसाठी काहीही करायला तयार असलेल्या या कॉलगर्ल्समुळे वेश्यांवरही ‘वेश्या होणं ही त्यांची निवड!’ असा आरोप कित्येकदा होताना दिसतो.
हा आरोप खोडून काढताना तस्लिमा नसरीन म्हणते, ‘‘ज्या पुरुषांना असं वाटतं की, वेश्या होणं ही स्त्रीची निवड असते, त्यांपकी किती पुरुष त्यांच्या लाडक्या मुलींना हा धंदा निवडायला प्रोत्साहन देतात? खुद्द वेश्येलाही वाटत नाही की, आपल्या मुलीनं वेश्या व्हावं. तिला शिक्षण देण्यासाठी, तिथून बाहेर काढण्यासाठी ती धडपडत असते.’’
पण वेश्यांचं दुर्दैव हे की, त्या एकदा ज्या खातेऱ्यात पडतात त्यातून त्यांची, त्यांच्या मुलींची सुटका होणं ही केवळ अशक्य गोष्ट असते. वेश्येच्या आयुष्यात असं कोणतंच आमिष नसतं, की ज्यासाठी तिनं स्वेच्छेनं वेश्या व्हावं!
विवाह संस्थेचा आणि त्यात स्त्रीच्या वाटय़ाला येणाऱ्या घुसमटीचा समाचार घेताना र.धों.नी, ‘‘विवाहितेपेक्षा वेश्येला अधिक स्वातंत्र्य असतं, तिला विवाहितेसारखं ढोंग करीत जगावं लागत नाही. विवाहित स्त्रीपेक्षा वेश्या अधिक मानानं जगते. कारण विवाहितेवर नवऱ्याकडून समागमाची सक्ती होते, याउलट वेश्येला ‘नाही’ म्हणण्याचं स्वातंत्र्य असतं.’’ असं जरी म्हटलेलं असलं तरी अशा विधानातून लग्न संस्थेत अंतर्भूत असलेल्या स्त्री-शरीरावरील पुरुषाच्या मालकी हक्काचा उपहास र.धों.ना करायचा होता, हे उघड आहे. विवाहितेपेक्षा वेश्येचं जीवन अधिक सुखी आणि सुरक्षित, असं र.धों.ना अर्थातच अभिप्रेत नाही.
 कोणताही संवेदनशील, न्यायप्रिय माणूस समाजाच्या स्वास्थ्यासाठी वेश्या आवश्यक असते असं म्हणणार नाही. कारण तसं म्हणणं म्हणजे स्त्रीला न्याय नाकारणं, तिला पुरुषाच्या सुखाचं साधन मानत तिची गणती निर्जीव वस्तूत करणं, शिवाय अशी मतं बाळगणारी व्यक्ती समाजाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपल्या स्वत:च्या मुलीची, बहिणीची उदार मनानं वेश्यावस्तीत पाठवणी करील काय?
पुरुषप्रधान समाजव्यवस्था मात्र आजवर समाजाच्या हितचिंतकाचा आव आणीत ही ठाम भूमिका घेत आली आहे की, वेश्येची समाजाला आवश्यकता आहे, विकृत पुरुषाच्या वासनेला वाट मिळाली नाही तर समाजात अनाचार घडू शकतो, चांगल्या घरातल्या मुलीबाळी वासनांध पुरुषाचं भक्ष्य ठरू शकतात. आणि त्यांचं रक्षण करायचं असेल तर वेश्या आवश्यक आहे. मुळात ‘चांगल्या घरातल्या मुली’ आणि ‘वाईट घरातल्या मुली’ अशी मुलींची विभागणी कुणी करूच कसं शकतं? आणि ‘वाईट घरातील’ मुलींची अब्रू पणाला लावून ‘चांगल्या घरातील’ मुलींची अब्रू वाचवण्याचा हक्क समाजाला कोणी दिला? एखाद्या घरात अठराविश्व्ो दारिद्रय़ आहे, शिक्षण नाही, प्रतिष्ठा नाही, त्या घरातल्या मुली मोलमजुरी करतात, कुणी तरी त्या मुलींचा गरफायदा घेतं, नंतर त्यांची रवानगी वेश्यावस्तीत करतं, म्हणून त्या घरातल्या मुली ही समाजाची मालमत्ता ठरते? आणि वर उघडपणे त्यांचा वापर ‘चांगल्या घरातल्या’ मुलींच्या रक्षणासाठी, अशी कबुली? स्वार्थापोटी आंधळ्या झालेल्या या प्रवृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडाच!  
 पृथ्वीतलावरचा नरकवास असं ज्याचं वर्णन करता येईल अशी जागा म्हणजे वेश्यावस्ती. ‘वेश्या असणं’ हे त्या वेश्येसाठी नुसतं सामाजिक लांच्छनच नाही, त्याबरोबरच तिच्या वाटय़ाला मारहाण आहे, मानसिक छळ आहे, सक्तीचा बलात्कार आहे, उपासमार आहे, अंधारकोठडी आहे, सततच्या संभोगानं होणारे नाना तऱ्हेचे रोग आहेत, गिऱ्हाईकाबरोबरच दलालांकडून होणारं शारीरिक शोषण आहे आणि एक दिवस लूत भरलेल्या कुत्र्यासारखं कुठं तरी पडून मरून जाणं आहे. तिथली स्त्री याहून काही वेगळं अनुभवत नसते. तिथल्या प्रत्येक स्त्रीचं भविष्य हेच असतं. अशा मार्गावरून कोणती स्त्री हौसेनं वाटचाल करील?
वेश्या म्हणजे फक्त एक ‘शरीर’. त्या शरीराचीच तर खरेदी-विक्री होत असते. तिच्या देहाच्या मांडलेल्या या बाजारात तिच्या मनाला जागा नसते. कधी कधी एका दिवसात पंधरा-वीस गिऱ्हाईकांची भूक शमवण्याचं कामही तिला करावं लागतं. देहाचा पुरता पाचोळा होऊन जातो. नकार दिल्यास नुसत्या मारहाणीवरच भागत नाही तर त्यांना या वेश्यावस्तीत आणून सोडणारे जे दलाल असतात तेच प्रथम त्यांच्यावर अमानुष बलात्कार करून त्यांचा विरोध मोडून काढतात. त्यानंतर त्यांना मुकाटपणे देहविक्रय करण्याशिवाय गत्यंतर नसतं. एका दलालानं तर कोठीवर आणलेली नवी मुलगी धंद्याला नकार देते म्हटल्यावर तिला चार दिवस एका खोलीत नग्नावस्थेत बंद केलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिच्या योनिमार्गात लाल तिखटाची पूड भरली. स्त्रीसाठी याहून अधिक क्रूर, राक्षसी, भयप्रद अनुभव कोणता असू शकतो?
नाइलाजानं वेश्यावस्तीत राहून शरीरविक्रय करणाऱ्या या मुली तिथून सुटका व्हावी असं स्वप्न बघत नसतील? संधी मिळेल तेव्हा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत नसतील? मुळात लाखोंच्या संख्येनं या धंद्यात मुली येतात कुठून? जगभरात चालणाऱ्या स्त्रीदेहाच्या या व्यापाराबद्दल पुढील लेखात..!