गाथा अ‍ॅगाथा Print

वीणा गवाणकर ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अ‍ॅगाथा ख्रिस्ती गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या लोकप्रिय रहस्यकथाकार, ९४ पुस्तके लिहिणाऱ्या या लेखिकेने कधी  शाळेत जाऊन रीतसर शिक्षण घेतले नाही, पण त्यांच्या पुस्तकांची जगभरच्या भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात साठ वर्षे पूर्ण करणारं त्याचं ‘माऊस ट्रॅप’ हे नाटक आजही रंगभूमी गाजवत आहे. आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने या लेखिकेच्या काही विलक्षण आणि रहस्यमय गोष्टींविषयी..
सर विल्यम कॉलिन्स यांना गेले काही दिवस चिंता पडली होती. गेली ५० र्वष अखंडपणे चालू असलेली प्रथा आता या वर्षी मोडावी लागते की काय, अशी त्यांना भीती वाटत होती. १९२५ सालापासून ते अ‍ॅगाथा ख्रिस्तींचं एक नवं पुस्तक दर ख्रिसमसला प्रकाशित करीत आले होते. ‘ख्रिस्ती फॉर ख्रिसमस’ अशी त्यांची जाहिरातच होती. अ‍ॅगाथाही न चुकता आपलं हस्तलिखित मार्च महिन्यात प्रकाशकाच्या हाती सोपवत आणि लगेचच पुढच्या पुस्तकाच्या तयारीला लागत. असं गेली ५० र्वष चालू होतं.
पण आता १९७५ साल चालू होतं. अ‍ॅगाथांचं वय झालं होतं पंच्याऐंशी. या वयात त्यांच्याकडून नवीन पुस्तकाची अपेक्षा कशी ठेवायची! म्हणून सर विल्यम त्यांना सुचवत होते, ‘‘युद्धकाळात लिहिलेली दोन हस्तलिखितं बँकेच्या सुरक्षा कक्षात पडून आहेत. त्यातलं एक ‘कर्टन’ या वर्षी काढू या.’’ अ‍ॅगाथा त्यासाठी होकार देत नव्हत्या. त्यांनी १९२० साली आपल्या पहिल्या रहस्यकथेसाठी- ‘द मिस्टिरियस अफेयर अ‍ॅट स्टाइल्स’साठी जन्माला घातलेला डिटेक्टिव हक्युल पेरॉ या ‘कर्टन’मध्ये मृत्यू पावत होता. तर दुसऱ्या ‘स्लिपिंग मर्डर’मध्ये त्यांनी निर्माण केलेलं दुसरं पात्र ‘जेन मार्पल’ हिचा अंत होत होता. आपल्या आजवरच्या रहस्यकथांतून वावरलेल्या या पात्रांचा अंत दाखविणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या मृत्यूनंतर व्हावं, अशी त्यांची इच्छा.
सर विल्यमनी त्यांची समजूत घातली. म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या हातांनीच संपवा. तुमच्यानंतर ती जिवंत राहिली आणि दुसऱ्या कोणी लेखकानं त्यांना आपल्या मर्जीनुसार वापरलं, काही वेगळंच वागायला लावलं तर त्यावर नियंत्रण कसं घालणार?’’ तेही गेली ५० र्वष अ‍ॅगाथांचे प्रकाशक होते. अ‍ॅगाथांच्या पात्रांबद्दल त्यांची चिंता रास्तच होती. अ‍ॅगाथांनी रुकार दिला आणि तसं पाहिलं तर हा पेरॉ कधी तरी मरायलाच हवा होता.
बेल्जियममधून निर्वासित म्हणून आलेला हा पेरॉ अ‍ॅगाथांनी जन्माला घातला तेव्हाच तो साठीचा. पोलीस खात्यातून वर्षभरापूर्वी निवृत्त झालेला. पुढे ५६ र्वष त्यांच्या रहस्यकथांतून वावरलेला. कागदी हिशेबानं त्याचं वय ११७ भरत होतं.. शिवाय त्या स्वत:ही त्याच्या वर्तनाला, स्वभावाला कंटाळलेल्या. त्यांनी त्याला १९४३ मध्येच संपविलेलं, पण ते हस्तलिखित त्यांनी बाजूला ठेवलेलं. अखेरीस १९७५ मध्ये ‘कर्टन’ प्रकाशित करून पेरॉला त्यांनी साहित्य विश्वातून मुक्त केलं. विशेष म्हणजे, त्या वेळी न्यूयॉर्क टाइम्सनं पेरॉवर मृत्युलेख छापला.
डिटेक्टिव पेरॉचं हे पात्र रंगभूमीवर, पडद्यावर अनेक नामवंत अभिनेत्यांनी सादर केलं. ब्रिटिश टेलिव्हिजनवर ‘अ‍ॅगाथा ख्रितीज पेरॉ’ म्हणून मालिका सादर झाली. जपानमध्येही तिथल्या टेलिव्हिजन अ‍ॅगाथांच्या ‘पेरॉ’ आणि ‘मार्पल’ असणाऱ्या निवडक कथा सादर केल्या. एवढंच नव्हे तर पुढे अ‍ॅगाथांच्या साहित्यातून शोध घेऊन या दोघांची स्वतंत्र चरित्रही लिहिली गेली. आपल्या पात्रांची चरित्रं लिहिली जाण्याचं भाग्य किती साहित्यिकांना लाभत असेल!
अ‍ॅगाथा ख्रिस्तींची ग्रंथसंपदा प्रचंड मोठी आहे. त्यांनी एकूण ९४ पुस्तकं लिहिली. त्यात रहस्यकथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, नाटके, स्मरणगाथा, आत्मचरित्र यांचा समावेश आहे. एवढं लिखाण करणाऱ्या या लेखिकेनं मात्र कधीच कोणत्या शाळेत पाऊल टाकलेलं नव्हतं.
अ‍ॅगाथा मिलर यांचा जन्म चांगला श्रीमंत घरात झालेला. त्यांचे आई-वडील न्यूयॉर्कमधून येऊन इंग्लंडच्या डेवन कौंटीतल्या टॉर्केमध्ये स्थायिक झालेले. दोन एकरांची बाग असणाऱ्या, घरात कायम चार नोकर असणाऱ्या, शे-सव्वाशे लोकांना नृत्याचा, मेजवानीचा आनंद घेता येईल एवढा ऐसपैस डायनिंग हॉल असणाऱ्या व्हिलात त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या भावंडात त्या तिसऱ्या. सर्वात धाकटय़ा, मोठी भावंडं शाळेत जायच्या वयात रीतसर शाळेत गेलेली. पण अ‍ॅगाथाचं शाळेत जायचं वय झालं तोपर्यंत त्यांच्या आईचं मत बदललेलं होतं. शिक्षणाने मुलांच्या दृष्टीवर आणि मेंदूवर अनिष्ट परिणाम होतो- म्हणून आठ वर्षांची होईपर्यंत अ‍ॅगाथाला शाळेत घालायचं नाही, असं तिने ठरविलं.
अ‍ॅगाथांच्या आईला वाचनाची प्रचंड आवड. घरात मोठा ग्रंथसंग्रह. अ‍ॅगाथांना सांभाळणारी नॅनी त्यांना गोष्टी वाचून दाखवे आणि अ‍ॅगाथा पाच वर्षांच्या असताना नॅनीच्या लक्षात आलं की, ही चिमुरडी कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:च वाचायला शिकलीय. मग आईने या लेकीसाठी स्वतंत्र शिकवणी लावली, पिआनोवादन, नृत्य, संगीत यांचे धडे घ्यायला लावले. गणितासाठी खास शिकवणी ठेवली. वयाच्या सोळाव्या वर्षी तिला दोन वर्षांकरिता पॅरिसच्या ‘फिनिशिंग स्कूल’मध्ये ठेवलं.
अ‍ॅगाथांना बालपणापासून वाचनाची आवड असली आणि ‘शेरलॉक होम्स’ त्यांचा आवडता असला तरी त्यांचं लेखक होण्याचं स्वप्न कधी नव्हतं. त्या लेखनाकडे वळल्या त्या अपघातानेच!
रॉयल फ्लाइंग कॉर्प्समधील ले. आर्चिबाल्ड ख्रिस्ती यांच्याशी अ‍ॅगाथा मिलर यांचा १९१४ च्या ख्रिसमसमध्ये विवाह झाला आणि अल्पावधीतच पहिल्या जागतिक युद्धाला सुरुवात झाली. आर्चिबाल्डना तातडीने कामावर हजर व्हावे लागले. त्यांचे पोस्टिंग परदेशात झाले. दोन र्वष ते अ‍ॅगाथापासून दूर होते. त्या काळात अ‍ॅगाथांनी एका रुग्णालयात नर्सचे काम स्वीकारले. युद्धभूमीवरून येणाऱ्या जखमी सैनिकांची सेवा करू लागल्या. तिथल्या विविध विभागांत काम केले. औषध विभागही त्यांनी सांभाळला. या काळात विविध विषारी औषधांची रसायनांची त्यांना माहिती मिळाली, त्यांची हाताळणीही केली.
या काळात मिळालेल्या सुट्टीच्या दिवसांत अ‍ॅगाथा त्यांच्या थोरल्या बहिणीच्या घरी होत्या. तिलाही ‘शेरलॉक होम्स’च्या कथांचं वेड. गप्पांच्या ओघात बहीण म्हणाली, ‘‘मी शेवट ओळखू शकणार नाही, अशी रहस्यकथा तू लिहूच शकणार नाहीस.’’
‘‘थांब, बघ, मी लिहूनच दाखवते, अशी रहस्यकथा’’ आणि मग जवळच्याच एका हॉटेलातल्या खोलीत अ‍ॅगाथांनी स्वत:ला कोंडून घेतलं. तीन आठवडय़ांत ‘द मिस्टिरियस अफेयर स्टाइल्स’ ही रहस्यकथा जन्माला घातली.
हे हस्तलिखित पुढे चार र्वष पाच-सात प्रकाशकांच्या हातून नाकारून घेत शेवटी द बॉडली हेड प्रकाशनाकडे आलं. तिथे ते १८ महिने पडून होतं. तेवढय़ात अ‍ॅगाथांचं दुसरं एक पुस्तक लिहून तयार झालेलं होतं.
आपल्या पहिल्याच रहस्यमय कादंबरीत अ‍ॅगाथांनी विषासंबंधीच्या आपल्या माहितीचा बिनचूक उपयोग करून घेतला होता. घटनास्थळ म्हणून आपल्या व्हिलाच्या रचनेलाच पाश्र्वभूमी म्हणून वापरले होते. त्याचं ‘स्टाइल्स’ नामकरण करून त्याचा नकाशाही बारकाईनं वापरला होता. वाचकांना चकवा देणारे फसवे तुकडेही कथानकात पेरले होते.. आणि शेवटी आश्चर्यदायक शेवट करून वाचकांना चकित केलं होतं. शेवटापर्यंत वाचकांना गुंतवून ठेवणाऱ्या या रहस्यकथेचं चांगलंच स्वागत झालं. परीक्षणंही उत्साहवर्धक होती. एका रहस्यकथा लेखिकेचा जन्म झाला होता आणि मग १९२२ सालापासून दरवर्षी एक नवीन रहस्यमय कादंबरी तिच्या नावावर झळकू लागली. त्या काळात म्हणजे १९२६ साली खळबळ माजवली ती तिच्या ‘द मर्डर ऑफ रॉजर अक्रॉयड’ या कादंबरीने आणि तिला उच्चस्थानी नेऊन ‘क्वीन ऑफ क्राइम’ हा किताब दिला तो याच रहस्यकथेने.
अ‍ॅगाथा ख्रिस्तींनी या कादंबरीत रहस्यकथा- लेखनातला एक पायंडा मोडला होता. रहस्यकथा लेखकांच्या अलिखित नियमांचं उल्लंघन केलं होतं. इथे कथा सांगणारा निवेदकच खुनी होता आणि तो निवेदक एक डॉक्टर होता. त्यामुळे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी कथा सादर करून एका ‘नोबल’ पेशाचा अवमान केला असा डॉक्टर मंडळींचा आक्षेप होता. वाचकांनी मात्र ही कादंबरी डोक्यावर घेतली. तिचा खपही चांगलाच झाला. तेव्हापासून कॉलीन प्रकाशनाशी अ‍ॅगाथां ख्रिस्तींच्या पुस्तकांची सांगड बसली ती शेवटपर्यंत.
गंमत म्हणजे लॉर्ड माऊंटबॅटन यांनी या कथेचा गाभा अ‍ॅगाथांना १९२४ साली पत्र पाठवून सुचविलेला होता. त्या काळात ते टोपण नावानं रहस्यकथा लिहीत. एक कथा त्यांना सुचली; परंतु तिची रचना, मांडणी अ‍ॅगाथा समर्थपणे करतील, या विश्वासानं त्यांनी ती आपल्या टोपण नावानंच त्यांना सुचविली. पुढे १९६९ साली आपल्या कन्येला- पामेलाला ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा तिचा विश्वास बसेना. म्हणून मग लॉर्ड साहेबांनी सरळ अ‍ॅगाथांना पत्र लिहिले. आपल्या टोपण नावाचा खुलासा केला. त्या वेळी अ‍ॅगाथा ८० वर्षांच्या होत्या. स्वहस्ते पत्र लिहून अ‍ॅगाथांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांचे श्रेय मान्य केले. एवढेच नव्हे तर त्या पुस्तकाच्या एका प्रतीवर लॉर्ड माऊंटबॅटन यांना त्या कथेच्या मूळ संकल्पनेचे श्रेय देणारा मजकूर लिहून ती प्रत पाठविली. माऊंटबॅटननी मग त्या पुस्तकाच्या अनेक प्रती खरीदल्या. त्या प्रत्येकीवर अ‍ॅगाथांच्या त्या मजकुराची फोटो प्रत चिकटविली आणि आपल्या मुलींना, स्नेह्य़ांना भेट दिल्या. स्वत: माऊंटबॅटन, त्यांची आई, मावशी, मुली.. सगळेच त्यांचे फॅन!
कथा-कादंबऱ्या लिहिता लिहिता अ‍ॅगाथा नाटय़लेखनाकडे वळल्या त्या त्यांच्या याच कादंबरीमुळे. बर्टी मेयर या निर्मात्यानं ‘द मर्डर ऑफ रॉजर अक्रॉयड’वरून तयार केलं गेलेलं नाटक ‘अ‍ॅलिबी’ रंगमंचावर आणलं. नावारूपाला येत असलेल्या चार्ल्स लॉटनने त्यात पेरॉची भूमिका केली. लंडनने ते नाटक डोक्यावर घेतलं, पण मूळ लेखिका मात्र असमाधानी होती. ‘आपली पात्रं अशी कधी वागतील अशी कल्पनाही केली नसेल,’ अशी वागता-बोलताना पाहून ती नाराज झाली.
अ‍ॅगाथांनी तोवर आपल्या काही कथा-कादंबऱ्यांवरून नाटय़संहिता लिहिल्या होत्या, पण त्यांचं सादरीकरण त्यांच्या मनास येत नव्हतं. मग त्यांनी आपलीच एक कादंबरी ‘टेन लिटील निग्गर्स’ निवडली. अत्यंत बारकाईनं नाटय़संहिता तयार केली. हे नाटक खूप चाललं. अमेरिकेतही ते ‘देन देअर वेअर नन’ नावानं चाललं. उदंड प्रतिसाद मिळाला. आपण उत्कृष्ट नाटय़लेखन करू शकतो, ‘अ‍ॅगाथाच्या व्यक्तिरेखा कागदी असतात- त्यांना सजीव वठवता येत नाही’ हा आक्षेप विफल ठरवू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले.
आपल्या अगदी पहिल्या पुस्तकापासूनच बाई आपल्या निर्मितीबाबत सावध, दक्ष होत्या. पुस्तकातील मुद्रणदोष, पुस्तकाचे कव्हर, मिळणारी रॉयल्टी वगैरेंबाबत त्या रोखठोक असत. इतक्या की, नंतरच्या काळातच त्यांच्या कादंबऱ्यांवरून चित्रपट तयार झाले तेव्हा त्यांचा शो अ‍ॅगाथाबाईंना दाखविताना तिथे कोणी वार्ताहर नसतील, याची खबरदारी घेतली जाई. न जाणो, बाईंना सादरीकरण पटले नाही, असे त्यांनी फटकळपणे बोलून दाखविले तर काय घ्या!
अ‍ॅगाथा ख्रिस्तींच्या चाहत्यांत इंग्लंडची राणी मेरीही होती. तिचा ऐंशीवा वाढदिवस ३० मे १९४७ रोजी कसा साजरा केलेला आवडेल, अशी विचारणा बीबीसीने तिच्याकडे केली. तेव्हा तिने आपल्या आवडत्या अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं एखादं नवं नाटक रेडिओवरून ऐकायला मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली. आठवडाभरात अ‍ॅगाथांनी ‘थ्री ब्लाईंड माइस’ लिहून पूर्ण केलं. बीबीसीकडे सोपविलं. ३० मिनिटांचं ते नाटक राणी मेरी आणि तिच्या परिवारानं ‘मार्लबरो’त बसून ऐकलं. आनंद व्यक्त केला.
पुढे पाच र्वष ते हस्तलिखित ख्रिस्तींच्या कपाटात पडून होतं. मग त्यांनी त्याचं तीन अंकी नाटक तयार केलं. नव्यानं संपर्कात आलेल्या आणि त्यांना भावलेल्या पीटर साँडर्स या नाटय़निर्मात्याला भोजनाचं निमंत्रण दिलं. गप्पागोष्टी, भोजन संपवून पीटर साँडर्स जायला निघाला. त्या वेळी त्याच्या हाती गुलाबी रिबिनीत बांधलेल्या कागदांचं पार्सल देत अ‍ॅगाथा म्हणाल्या, ‘ही छोटी भेट तुझ्यासाठी. ऑफिसमध्ये गेल्यावर हे उघड, तोवर नाही. यातून तुला धनप्राप्ती होईल, अशी आशा आहे.’
१९५१ च्या डिसेंबरमध्ये अ‍ॅगाथांनी पीटर साँडर्सना दिलेले कागद म्हणजे ‘माऊस ट्रॅप’ या विक्रमी नाटकाचे हस्तलिखित. ६ ऑक्टोबर १९५२ रोजी त्याचा पहिला प्रयोग लंडनमध्ये झाला. आधी या नाटकाचं नाव ‘थ्री ब्लाइंड माइस’ असंच होतं, पण ते नाव आधीच वापरलं गेलं असल्याने ‘माऊस ट्रॅप’ हे नवं शीर्षक त्याला दिलं गेलं.
या नाटकानं तर इतिहास घडविला. लंडनमध्ये गेली ६० वर्षे त्याचे सातत्यानं प्रयोग होताहेत. आजमितीस तिथे त्याचे २५ हजारांच्या आसपास प्रयोग झालेत आणि अजूनही ते चालूच आहेत. शिवाय जगात अन्यत्र होताहेत ते वेगळेच.
स्वत: लेखिकेला वाटलं होतं, हे नाटक फार तर आठ महिने चालेल. तर निर्मात्याला वाटलं होतं, नाही! चांगलं १४ महिने तरी चालेल!!
रिचर्ड अ‍ॅटनबरो (लॉर्ड अ‍ॅटनबरो) या तरुण, नावारूपाला येत असलेल्या अभिनेत्यानं त्यात डिटेक्टिव्ह ट्रॉटरची भूमिका केली होती.
नाटकाचे सातत्याने होत असलेले प्रयोग लक्षात घेऊन दरवर्षी नट-संच बदलण्याचे धोरण पीटर साँडर्सनी अवलंबिले. काही नट तर काही काळाच्या गैरहजेरीनंतर पुन्हा आपल्या भूमिकेसाठी रुजू होत. अजूनही तसेच घडते.
नव्या नट-नटय़ांची त्यांच्या भूमिकांसाठी निवड करते वेळी बऱ्याचदा अ‍ॅगाथा हजर असत. त्यातल्या मॉली राल्स्टनच्या भूमिकेची निवड ती नटी पडदा उघडल्याबरोबर किती दीर्घ आणि किती कर्कश्श्य किंकाळी मारू शकते यावर अवलंबून असे. कारण ती किंकाळी म्हणजे त्या नाटकाची सिग्नेचर टय़ून!
या नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे सुरुवातीच्या प्रयोगापासूनच एक परंपरा पाळली जाते. प्रयोगाच्या शेवटी प्रेक्षकांना विनंती केली जाते की, या नाटकाचा शेवट सांगून, यातल्या खुन्याची ओळख उघड करू नका. भावी प्रेक्षकांना त्या रहस्यापासून वंचित करू नका. विशेष म्हणजे, या नाटकाचे प्रेक्षक, चाहते प्रामाणिकपणे ते गुपित राखत आलेत. विकिपीडियानं ते रहस्य उघड केलं तेव्हा तिचे चाहते नाराज झाले.
हे रहस्य कोण कसं पाळत होतं याचं एक उदाहरण - एकदा एका स्कॉटिश प्रवाशानं ‘माऊस ट्रॅप’ चालू असलेल्या थिएटरच्या दाराशी टॅक्सीतून उतरताना त्या टॅक्सी ड्रायव्हरला पुरेशी बक्षिसी दिली नाही. तेव्हा तो ड्रायव्हर त्या स्कॉटिशाला म्हणाला, ‘कंजूष माणसा, त्या xxx ने खून केलाय!’
‘माऊस ट्रॅप’च्या विक्रमी प्रयोगांनी, त्यांच्या नाटकांनी, नाटकावरून झालेल्या चित्रपटांनी त्यांना उदंड कीर्ती आणि पैसा दिला. एवढी कीर्ती मिळूनही त्यांनी कधी सभासंमेलनं गाजविली नाहीत की स्वत:वर प्रसिद्धीचा झोत ओढवून घेतला नाही. ‘माऊस ट्रॅप’ची १० र्वष पूर्ण झाली तेव्हाची एक घटना -
निर्मात्याने मोठी पार्टी आयोजिली होती. मान्यवर टीव्ही चॅनेलवाले, वार्ताहर, चित्रपट-रंगभूमीवरचे अभिनेते, छायाचित्रकार साऱ्यांसाठी जंगी मेजवानी होती. निर्मात्यानं बाईंना कार्यक्रमाआधी अर्धा तास यायला सांगितलं. नंतरच्या गर्दीत त्यांचं फोटोसेशन राहून जाऊ नये म्हणून त्याने खबरदारी घेतली. बाईंना हा बेत एवढा जंगी असेल याची कल्पना नव्हती. त्या अर्धा तास आधी त्या स्थळी पोहोचल्या. एकटय़ाच गाडी चालवीत गेलेल्या. ‘कार्यक्रमाला अजून अर्धा तास बाकी आहे’ म्हणून रखवालदार त्यांना आत जाऊ देई ना. बाई काही ‘मीच ती अ‍ॅगाथा ख्रिस्ती’ म्हणायला धजावेनात. तेवढय़ात त्यांना ओळखत असलेली एक स्त्री आतून बाहेर आली आणि अ‍ॅगाथा आत पोहोचल्या. बाई प्रसिद्धिपराङ्मुख होत्या म्हणूनच त्या हे पचवू शकल्या. ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’, ‘विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन’ या त्यांच्या साहित्यकृतींवर निघालेल्या चित्रपटांनी त्यांच्या कीर्तीत भर घातली. यावर ‘मला फार समाधान वाटलं,’ एवढीच त्यांची प्रतिक्रिया.
अ‍ॅगाथांना त्यांच्या साहित्यकृतींनी अमाप धन मिळवून दिले. आपल्या हयातीतच बाईंनी त्या धनाची नीट गुंतवणूक केली. ‘अ‍ॅगाथा ख्रिस्ती लि.’ स्थापून त्यात पैशाचा ओघ रिचवला. एकुलती एक मुलगी आणि एकुलता एक नातू यांच्या नावे काही ‘रॉयल्टी’ वळविली. नातू नऊ वर्षांचा असताना बाईंनी ‘माऊस ट्रॅप’ची रॉयल्टी त्याच्या नावे केली. (त्यावर तो पुढे गडगंज श्रीमंत झाला.) काही सामाजिक संस्थांनाही त्यांनी आपल्या मानधनाचा लाभ होऊ दिला. त्यांनी अशी गुंतवणूक करून ठेवलेली असल्याने त्यांच्या बँक खात्यांवर कमी पैसा दिसे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नेमक्या संपत्तीचा अंदाज कोणी करू शकेना तो त्यामुळेच. बाईंच्या मृत्यूनंतर सात-एक दिवसांनी लंडनच्या फायनान्शियल टाइम्सनं सहा कॉलमची हेडलाइन दिली होती- ‘दि मिस्टरी ऑफ द ख्रिस्ती फॉच्र्युन.’
अ‍ॅगाथांनी १९३० साली पुरातत्त्ववेत्ते मॅक्स मेलॉवन यांच्याशी विवाह केला. मॅक्स अ‍ॅगाथापेक्षा चौदा वर्षांनी लहान होते. या विवाहाने दोघांनाही सुख समाधान दिलं. ब्रिटिश राजघराण्यानं या दोघांनाही सन्माननीय किताब दिले.
अ‍ॅगाथा पतीसमवेत उत्खनन मोहिमेवर जात. प्रत्यक्ष कार्यात भाग घेत. नोंदी ठेवत. पुढे त्या साऱ्या अनुभवाचा कथा-कादंबऱ्यात अचूक वापर करीत. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, विविध अनुभव, जगप्रवास या साऱ्यांचा उपयोग त्यांनी सक्षमपणे आपल्या लेखनात केला. त्यांना विषयाची कमतरता कधीच भासली नाही.
त्यांच्या डोक्यात सतत नवीन विषय घोळत असत. एखादा विषय पक्का झाला की, त्यांची पात्रं जन्म घेऊ लागत. ‘‘तुमची पात्रं तुम्हाला सापडत नाहीत तोवर तुम्ही काही करू शकत नाही. ती खरी आहेत, जिवंत आहेत हे तुम्हाला जाणवावं लागतं’’ आणि एकदा जाणवलं की बाईंच्या त्यांच्या बागेतल्या येरझारा वाढत.. त्यांचे पुटपुटणे सुरू होई.. त्यांच्या पात्रांचे संवाद सुरू झालेले असत.. प्रसंग घडू लागलेले असत. मात्र हे सारे आपल्या तीन बोटांचा वापर करून टाइप करणे त्यांना कंटाळवाणे वाटे आणि तरीही-
एकदा त्यांना निकोलस ब्लेक नावाचा रहस्यकथाकार, म्हणाला की, ‘‘असं पाहा तुम्ही काय मी काय, आता काही पुन्हा तरुण होणार नाही. तुमच्याकडे १७ कथांचे विषय आहेत, असे ऐकतो. काही विषय मला विकत द्या..’’. ‘‘अजिबात नाही. मीच त्या सगळ्या कथा लिहिणार आहे.’’
त्यांच्या टीकाकारांनी त्यांना कधी अभिजात लेखिका म्हटलं नाही. त्यांनी स्वत:ही कधी तसा दावा केला नाही. मात्र रहस्यकथा लेखनाचा एक नवा पायंडा त्यांनी पाडला. त्यांच्या कथानकात हिंसा डोकावायची, पण ती बीभत्स विकृत स्वरूपात नसे. एरवीच्या सामान्य जीवनात ती घटना घडून गेलेली असे. ती कोणी कशी का केली याचा खुलासा झाला की जग पूर्ववत चालू राही. खुन्याचा, खुनाचा शोध घेताना लेखिकेने विखुरलेले धाग्या-दोऱ्यांचे तुकडे एकत्र झाले की कोडे सुटे.. सामान्य वाचकांना हा रहस्यशोध आवडे आणि वाचकांना जे आवडतं ते द्यायला आपण समर्थ आहोत, तर का न द्या? अ‍ॅगाथा लिहीत राहिल्या. त्यांच्या रहस्यकथांतून त्या सापडत नाहीत, पण त्यांनी ‘मेरी वेस्ट मॅकॉट’ या टोपणनावाने लिहिलेल्या सहा कादंबऱ्यांतून त्यांच्या आई, आजीविषयी समजू शकते आणि थोडेफार त्यांच्या स्वत:विषयीही. त्यांचे आत्मचरित्र मात्र त्यामानाने फारच रटाळ वाटावे असेच आहेत.
 अ‍ॅगाथाच्या पुस्तकांच्या विक्रीनं उच्चांक मोडायला सुरुवात केली ती दुसऱ्या जागतिक युद्धकाळात. याकाळात वाचकांचा कल हलकंफुलकं वाचण्याकडे होता. लंडनवासी ब्लॅक आऊटच्या काळात रात्रीच्या वेळी भुयारांचा, खंदकांचा आसरा घेत. संध्याकाळ झाली की, सोबत सॅण्डविचेस, थर्मासफ्लास्क, पांघरुणं आणि अ‍ॅगाथाचं एखादं पेपरबॅक पुस्तक घेऊन ते भुयारांत आसरा घेत.. हजारोंच्या संख्येने एकटय़ा लंडनमध्ये अ‍ॅगाथांची पेपरबॅक पुस्तक खपत होती. जनमानसात त्यांचं स्थान पक्कं होत गेलं.
त्यांच्या नाटकांबाबतही तसंच घडलं. त्यांच्या नाटकांबद्दल कितीही टीकात्मक बोललं गेलं तरी सामान्य वाचकांच्या मनावर त्या नाटकांनी गारुड केलं. त्यांना हवं होतं ते लेखिकेनं भरभरून दिलं.
लिहिण्यासाठी आवश्यक ती शांती, खासगीपणा मिळावा म्हणून अ‍ॅगाथांनी ग्रीन वे हाऊस नावाची जार्जियन गढी विकत घेतली. सर वॉल्टर रॅली यांची ही गढी ४० एकरांची बाग असलेली. अ‍ॅगाथांनी आयुष्यभरात आठेक घरं विकत घेतलेली.
अ‍ॅगाथांच्या साहित्य कृतींनी त्यांना भरभरून दिलं तसं त्यांच्या प्रकाशकांना, निर्मात्यांनाही दिलं. पेनग्वीन बुक्स लि. कंपनीचंही भलं झालं.
१५ सप्टेंबर १८९० रोजी जन्मलेली ही लेखिका अखेपर्यंत (मृत्यू १२ जाने. १९७६) लिहिती होती. आणि आजही तिच्यावर, तिने निर्माण केलेल्या पात्रांवर लिहिलं जात आहे. तिच्या नावाने कोडी, क्लब, खेळ निघत आहेत..
‘डचेस ऑफ डेथ’, ‘क्वीन ऑफ क्राइम’, ‘डेम अ‍ॅगाथा ख्रिस्ती’ यांच्या जीवनातील एका रहस्याचा मात्र आजवर नीट खुलासा झालेला नाही..
अ‍ॅगाथा ख्रिस्तींचे पहिले पती आर्चीबाल्ड ख्रिस्ती यांनी घटस्फोट घ्यायचा इरादा बोलून दाखवला. ते आता दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात गुंतले होते. ते तिला भेटण्यासाठी (४ डिसें. १९२६ रोजी) जात आहेत हे अ‍ॅगाथांना समजले. आदल्या दिवशी ३ डिसेंबरला त्यांनी आपल्या मुलीला तिच्या आजीकडे ठेवले आणि त्या गायबच झाल्या. त्यांनी आपली मोटार एका तलावाच्या जवळ सोडून दिलेली. मोटारीत त्यांचे कपडे, पैसे सापडले. त्यामुळे रहस्य निर्माण झाले. ५ डिसेंबरला सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर त्यांच्या गायब होण्याची बातमी झळकली. ११ दिवस त्या बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेण्यासाठी नाना स्तरांतून ना ना प्रयत्न झाले. छोटी विमानं वापरली गेली, बक्षिसं जाहीर केली गेली, पंधरा हजार स्वयंसेवक या मोहिमेत उतरले.. बरीच धमाल उडाली.. तर्क-वितर्क वर्तवले गेले. सगळ्यांना खुलासे, उत्तरं देऊन आर्चीवाल्ड बेजार झाले. चांगलीच कोंडी झाली त्यांची. (कदाचित अ‍ॅगाथांना तीच अपेक्षित असावी.) अखेरीस एका ‘स्पा’मध्ये त्यांचा शोध लागला.. त्यावरही वृत्तपत्रांनी भरभरून लिहिले. काही काळापुरता झालेला स्मृतिभ्रंश वगैरेस कारण देऊन वेळ मारून नेली गेली. पण ते कारण खरं नव्हे म्हणून खरं कारण शोधण्यासाठी पुस्तकं लिहिली गेली. (‘अ‍ॅगाथां’नावाचा चित्रपटही नंतर निघाला.)
अ‍ॅगाथा याविषयी कधीच कुणाशी काही बोलल्या नाहीत की कसला खुलासा केला नाही. अगदी आत्मचरित्रातही तो भाग वगळला.
बघा या रहस्याचा उलगडा करता आला तर!