अभ्यासाशी मैत्री : इतिहासाची सैर Print

आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

इतिहास या विषयाची गोडी मुलांना लावायची असेल तर तो इतिहास जिथे जिथे घडला तिथे तिथे शक्य असेल तर मुलांना घेऊन जायला हवे. पुस्तकातली ठिकाणं प्रत्यक्ष भेटी देण्याने इतिहास, भूगोलाचा अभ्यासही होईलच, शिवाय तो अनुभव लिहिण्यातून भाषेचाही अभ्यास होईल.
मा गच्या लेखात (२५ ऑगस्ट) आपण भाषा कशा शिकवायच्या ते पाहिलं. एका शिक्षकाचं पत्र आलं की, सगळेच विषय जर मुलांना असेच शिकविले तर किती छान होईल. फक्त गणित, विज्ञानच महत्त्वाचे विषय आहेत, असं जे मानतात ते मोठी चूकच करत असतात. इतिहास, भूगोल हेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. ज्यांच्याकडे फक्त तारखांची मांडणी या दृष्टीनेच बघितलं जातं. माझा स्वत:चा अभ्यासाचा विषय जरी विज्ञान असला तरी इतिहास हा माझा सगळ्यात लाडका विषय होता आणि अजूनही आहे. त्याचमुळे तो माझ्या मुलाचासुद्धा लाडका विषय झाला. कारण मी तो त्याला गोष्टीरूपाने शिकविला.              
माझ्या मुलाला मी एकदा शाळेतून घ्यायला गेले होते. तो चौथीत होता. त्याच्या वर्गातल्या एका मुलाची आई मला भेटली. साहजिकच अभ्यासाचा विषय निघाला. मी जेव्हा तिला म्हटलं की, या वर्षीचा इतिहास विषय मस्तच आहे (शिवाजी महाराजांचा इतिहास असतो चौथीला अगदी माझ्या लहानपणापासूनच). तर तिची रिअ‍ॅक्शन बघून माझ्या डोळ्यांत पाणीच आलं. ती म्हणाली, ‘‘इतिहास! कोणी या विषयाचा शोध लावलाय आणि मुलांना तो शाळेत आहे तरी कशाला कळत नाही. डोकंफोड करतात नुसत्या तारखा!’’ मी ऐकतच राहिले. त्याचं कारण असं आहे की, पालकांनी नीट लक्ष देऊन पेपर बघितले तर तारखा फक्त कालानुक्रम, एतिहासीक माहितीसाठी लक्षात ठेवायच्या असतात; अकबर, औरंगजेबाअगोदर होता हे जाणण्यासाठी. पण सगळेच पालक तारखांवरच एवढा भर आणि जोर देतात की, मूळ विषय बाजूलाच राहतो. इतिहास हा शाळेच्या वर्गाच्या बंदिस्त वातावरणापेक्षा- संग्रहालयामध्ये, गडांवरती शिकवला गेला तर तो का नाही कोणाला आवडणार? बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं वर्णन करणाऱ्या कॅसेट, सीडी बाजारात उपलब्ध आहेत. त्या मुलांना ऐकवाव्यात. आपल्या महाराष्ट्रात अजिंठा, वेरूळ, दौलताबादचा किल्ला, एलिफंटा लेणी, कार्ला लेणी, भाजे लेणी आणि असंख्य गड आणि असंख्य वस्तुसंग्रहालये आहेत.
मुंबईच्या राणीच्या बागेच्या बाहेरच भाऊ दाजी संग्रहालय आहे. छोटंसं, पण माहितीपूर्ण. त्याची इमारतसुद्धा इतकी सुंदर आहे. ती मुलांना दाखवावी. त्याची माहिती आपण तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला विचारली तर ते आनंदाने सांगतील. पुण्याला ‘राजा केळकर’ संग्रहालय आहे. एका माणसाने उभ्या आयुष्यात गोळा केलेल्या वस्तू तिथे आहेत. प्रत्येक वस्तूच्या खाली त्याची सखोल माहिती आहे.
पालकहो, आज गरज खरंच इतिहास आणि समाजशास्त्र शिकवायची आहे. ज्याला आपण सिव्हिक सेन्स (नागरिक भावना)म्हणतो, तो लोकांमध्ये इतका कमी होत चालला आहे त्यामुळे आपली शहरं, गावं घाणेरडी, गलिच्छ आणि बकाल होत चालली आहेत. स्वातंत्र्याबरोबर जी जबाबदारी यायला हवी ती मुलांमध्ये येत नाहीए. कारण ती सगळीकडे, आजूबाजूला बेजबाबदार नागरिक बघत असतात. बरं कोणा एकाने जबाबदार नागरिक होऊन चालत नाही. समाजाची घडी जर नीट राहायला हवी असेल तर कर्तव्यदक्षता  ही प्रत्येकाने पाळली पाहिजे. एक बेजबाबदारपणे वागतो म्हणून दुसरापण वागतो. म्हणून तिसरापण वागतो आणि मग आपण जबाबदारीने वागणाऱ्याचं कौतुक करतो. जो सामाजिक बांधीलकीने वाहतो तो खरा कर्तव्यदक्ष नागरिक आहे. त्यात त्याचं कौतुक करण्यासारखं काही नाही. पण तो इतका विरळा झालाय म्हणून त्याचं कौतुक होतं. अरे पण, जे बांधीलकी पाळत नाहीत त्या इतरांचं काय? हे सगळं का? तर समाजशास्त्र, नागरिकशास्त्र हे फक्त पुस्तकातच राहिलंय. जर तुम्हाला मुलांना खरं व्यावहारिक समाजशास्त्र शिकवायचं असेल तर त्यांना पोलीस कसं काम करतात ते दाखवायला पोलीस स्टेशन, फिरत्या बीटमध्ये घेऊन जा. पोस्टमन पत्र कशी विभागणी करतात ते दाखवायला पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन जा. जलाचं निस्सारण करणारी उदंचन केंद्रे असतात. तुम्ही गावात राहत असाल तर ग्रामपंचायत, स्वच्छता राखणारी घंटागाडी, एखादं धरण असेल तर त्याच्यामुळे निर्माण झालेला तलाव, या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांनी पाहिल्या तर नागरिकशास्त्र हा विषय खऱ्या अर्थाने जगला जाईल. त्याचा उपयोग रोजच्या आयुष्यात कसा होतो, हे पाहिलं की तो विषय पाठ करायला किंवा समजायला अत्यंत सोपा जाईल.
इतिहास शिकविताना तुम्ही समजा मुलांना एखाद्या गडावर घेऊन गेलात आणि जाताना त्यांनी जे काही खाल्लं त्याचा कचरा गडावर कुठेही फेकू नये, आपल्या पाठीवरच्या बॅगेत ठेवून खाली उतरल्यावर कचरा कुंडीत टाकायला शिकविणं, हे समाजशास्त्राचं ज्ञान आणि खाली आल्यावर किंवा तिथे वरती बसूनच त्या गडाचं चित्र काढणं, त्याची विशेषता, त्या गडाच्या परिघात काय काय वस्तू आहे, हे भूगोलचं ज्ञान मिळविलं तर याने काय साध्य झालं? पालकहो, पिकनिकची पिकनिक आणि अभ्याससुद्धा झाला नाही का? आणि त्या अभ्यासाचं टेन्शन आलं का? पण वस्तुस्थिती अशी आहे की, नुसतं पुस्तकातलं पाठ केलं जातं. त्याचा उपयोग जीवनात कसा केला जाईल, याचा विचार कोणीच करीत नाही. आणखी एक असं बघा, हा गड जो तुम्ही मुलांना दाखवायला घेऊन गेलात त्या सबंध सफरीचं वर्णन त्यांना लिहायला सांगितलंत तर झाला ना भाषेचासुद्धा अभ्यास? थोडक्यात, पालकहो, तुमची अभ्यासाची संकल्पनाच बदलायला हवी. त्यासाठी शाळांनी छोटय़ा छोटय़ा सहली काढाव्यात. हा पर्याय चांगला असला तरी त्यावर विसंबून न राहता तुम्ही तुमच्या पाल्यापासून सुरुवात करा.
नशिबाने आपल्या देशात ऐतिहासिक स्थळांची कमी नाही. राजस्थानात जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, जयपूर, उदयपूर, दीग अशी कितीतरी ठिकाणं आहेत. सगळीकडे गाईड मिळतात, पण चित्तौडगड पाहताना तुम्ही राणी पद्मिनीचं स्नानगृह किंवा तिला अल्लाउद्दिन खिलजीला आरशातून दाखविण्यासाठी कुठे उभी केली होती. मीराबाईंचं देऊळ हे सगळं नीट बघायला हवं ना की कुठल्या पिक्चरचं शूटिंग कुठे झालंय! जैसलमेरच्या हवेल्या पाहतानासुद्धा मुलांना असा विचार करायला सांगावा की, त्या काळची लोकं कलाकुसरीत किती तरबेज होती आणि या हवेल्यामध्ये ती कशी, कुठे कुठे राहत असतील, त्यांचं आयुष्य कसं असेल याची कल्पना करायला सांगायची. मथुरेपासून जवळच दीग नावाच्या राजाच्या राजवाडय़ाच्या परिसरात तीन हजार कारंजी आहेत, ती आजही कार्यरत आहेत.
जसं राजस्थान तसंच मध्य प्रदेश, दिल्ली, काश्मीर, केरळ. प्रत्येक राज्यात वास्तुतत्त्व विभागाची संग्रहालये आहेत. गुजरातमध्ये लोथल नावाच्या ठिकाणी तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या वेळच्या गोष्टी सापडलेल्या आहेत.
मुलांना इतिहास शिकविताना, भूगोल शिकविताना आणि समाजशास्त्र शिकविताना हे विषय पाठय़पुस्तकातून बाहेर काढून शिकवा. त्याच्या गोष्टी बनवा आणि नाटकं रचा. घरातल्या घरात प्रात्यक्षिक होईल. या सगळ्यांबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इतिहासाचं वाचन. त्याची सुरुवात मुलं अगदी लहान असल्यापासून तुम्ही वाचून दाखवून करता येईल. या गोष्टी वाचत असताना आवाजात बदल करणे, चेहऱ्याचे हावभाव करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलं जशी स्वत: वाचू लागतील तसं ‘अमर चित्रकथा’ त्यांच्यासाठी अवश्य आणाव्यात. तशा त्या लायब्ररींमधूनसुद्धा मिळतात, पण मुलांना वाचनाची गोडी लागली की त्या सारख्या-सारख्या वाचाव्याशा वाटतात तेव्हा संग्रहीसुद्धा ठेवता येतील.
लहान-मोठय़ा माणसांचा मान, देशाचा मान, आपल्या शहराचा मान राखणे, आपले शहर स्वच्छ, गुन्हेमुक्त ठेवणारे, आपत्कालीन सुरक्षितता देणारे या सगळ्यांबद्दल मुलांच्या मनात आदर निर्माण करताना आपली सामाजिक बांधीलकी काय आहे, याची जाणीवसुद्धा त्यांना होण्यासाठी पालकांनी स्वयंसेवी सामाजिक संस्थांमध्ये आठवडय़ातून एकदा तरी जाण्याचे करावे. मुलांना बरोबर घेऊन जाता आलं तर सोन्याहून पिवळं. तुम्ही जरा आजूबाजूला बघितलंत तर तुमच्या जवळपास एखादं अंध विद्यालय, कर्णबधिर विद्यालय किंवा अपंग पुनर्वसन केंद्र तुम्हाला मिळेलच. तिकडे जाऊन चौकशी करावी. त्या संस्थांना मदतीच्या हातांची गरज असतेच. मुलंसुद्धा तुमच्याबरोबर आली तर समाजातील घटक कसे कसे आहेत ते त्यांना दिसेल, त्याची जाणीव होईल आणि खऱ्या अर्थाने समाजशास्त्र शिकून होईल.
पालकहो, हे असं करणं तुम्हाला सहज शक्य होईल. जर त्या दिशेने तुम्ही विचार चालू केलेत तर या अशा शिक्षणाने मुलांचा सर्वागीण विकास तर होईलच, पण पालक-बालक संबंध दृढ होतील. जवळीक निर्माण होईल.