गौरी तनयाय धीमही Print

मेधा चुरी , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

गणेश स्थापना करणाऱ्या, पौरोहित्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मीलन कुलकर्णी त्याकडे अर्थाजनाचा एक पर्याय म्हणून बघतात परंतु त्याहीपेक्षा सामाजिक कार्य म्हणूनही..
‘सु खकर्ता-दु:खहर्ता वार्ताविघ्नाची..’ शेजारच्या घरात आरती सुरु होती.. आणि त्याचं पौरोहित्य करत होत्या मीलन कुलकर्णी.
त्यांचे शब्दोच्चार, पूजेची मांडणी, पूजा सांगण्याची कला यामुळे त्यांच्याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले. आज ६२व्या वषीर्ही त्या पूर्वीच्याच जोमाने या क्षेत्रात कार्यरत  आहेत. यंदा गणपती स्थापनेची त्यांना दहा आमंत्रण होती. आणि त्या उत्साहाने, समरसून त्या पार पाडत होत्या..
मीलनताई मूळच्या बडोद्याच्या, परंतु आजी-आजोबांकडून संस्कृतचे शिक्षण मिळाले. दिवेलावणीच्या वेळी म्हटलेले मनाचे श्लोक, प्रार्थना याचा पूजा सांगताना त्यांना फारच फायदा झाला. लग्नानंतर त्या वसई तालुक्यात आल्या. मुंबई शहराच्या नजीकतेमुळे या पंचक्रोशीतील गावांचे शहरातरूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होती. वाढत्या लोकसंख्येला, नागरीकरणाला धार्मिक कार्यासाठी गुरुजी, ब्राह्मण वर्गाची गरज भासू लागली आणि पौरोहित्याची नवीन पिढी या व्यवसायात येऊ लागली. अशा वेळी स्त्री-पौरोहित्य संकल्पना चांगलीच स्थिरावली.
बाईने पौरोहित्याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण केले ते वयाच्या ५५ व्या वर्षी. सुरुवातीला जम बसेपर्यंत नातेवाईक, परिचित यांच्याकडे जाऊन कार्याची सुरुवात केली. त्या सांगतात, ‘‘नवीन क्षेत्र असल्यामुळे दडपण येत असे. एकदा माझ्या भाच्याकडे पूजा सांगताना जमलेली मंडळी बघून बावरले, पण लगेच भूमिकेत शिरले, स्वत:ला सावरून घेतले व उत्तम पूजेची दाद मिळवली.’’
मीलनताई पूजा सांगायला जातात तेव्हा ती सांगण्यापुरतच आपलं काम मर्यादित ठेवत नाहीत. केळीचे खांब बांधण्यास, प्रसाद करण्यास, फुलांचे हार, वेण्या, रांगोळी काढण्यास त्यांची मदत होतेच. यजमानांना पूजेच्या साहित्याची यादी दिलेली असतेच पण गरज भासल्यास खरेदीलाही जातात. ग्रामीण भागात कार्याची आखणी करण्यासाठी त्या दोन-तीन वेळा त्या घरी भेट देतात. ग्रामीण भागातील एक अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘एकदा एका घरी गणेशमूर्तीची स्थापना करायला गेले होते तेव्हा त्या घरातल्या वयस्कर माणसांना स्त्री पौरोहित्य करते हे पटतच नव्हतं पण नंतर जेव्हा त्यांनी माझी पूजा बघितली तेव्हा श्लोकांच्या, मंत्राच्या मंगलमय वातावरणात त्यांचा विरोध मावळून गेला. आणि पुढच्या वर्षीच्या गणपती पूजनाचं निमंत्रण मलाच मिळालं. असं अनेक घरी होतं. एका गावातल्या घरी तर संस्कृत श्लोकांचा अर्थ न समजल्यामुळे चक्क मराठीत अर्थ स्पष्ट करून पूजा सांगितली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने मला पूजा सांगण्याचे समाधान मिळाले.
माझ्या मैत्रिणी नीलिमा, प्राजक्ता, शिल्पा याही आता पौरोहित्य करतात. त्यांनीही आळीपाळीने जाऊन गावातल्या बऱ्याच जणींना आरत्या शिकविल्या आहेत. त्यामुळे दणदणीत आवाजात सर्वच भगिनी आरत्या गातात..’’
‘‘अर्थात पूजा असेल तेव्हाच काम, असं या क्षेत्रात नाही. यासाठी नियमित सरावाची गरज आहे. आम्ही सकाळी लवकर उठून श्लोक, मंत्र, आरत्या यांचा रियाझ करतो. वाचन, चिंतन, पाठांतर या क्षेत्रात आवश्यक आहे. नियमित सरावामुळे शब्दोच्चार स्पष्ट होतात. कामात धीटपणा आत्मविश्वास येतो. आपल्या कामात सुसूत्रता असली म्हणजे जमलेले भाविक लक्ष देऊन ऐकतात. पूजाविधीचे कार्यही व्यवस्थित होते. कामाचे समाधान आम्हाला मिळते.
‘‘सध्याच्या काळात पौरोहित्य क्षेत्रात कोणते बदल व्हायला हवेत म्हणून गुरुजींसोबत आमची चर्चा होते. नवीन कुठेही प्रशिक्षण असेल तर तेथे जाण्याचीही आमची तयारी असते. कुठल्या परीक्षा द्याव्या लागल्या तरीही आम्ही देतो.’’
अलीकडेच सज्जनगडावरील दासबोधाच्या तीन परीक्षा मीलनताई उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. स्थानिक साईधाम कार्यशाळेतील परीक्षाही त्यांनी दिल्या आहेत. त्यांना दक्षिणेच्या संदर्भात विचारले तेव्हा कुलकर्णीबाई लागलीच म्हणाल्या, ‘‘भाविकांकडून, यजमानांकडून जे स्वखुशीने देतील ते मी आनंदान स्वीकारते. हे एक सामाजिक कार्य म्हणूनच मी त्याच्याकडे पाहते. त्याच वेळी स्त्रीचा हा अर्थार्जनाचा मार्ग किंबहुना पर्याय आहे. या कार्यात वयाची मर्यादा नसते, उलट वयोमानानुसार आपण या क्षेत्रात जास्तच अधिकारी होतो.’’