कडाडतो ताशा.. Print

रसिका मुळ्ये , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
alt

कोथरूड येथील अंधशाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीमपथक तयार केले आहे. अगदी सर्वाच्या बरोबरीने हे पथक मिरवणूक करते अगदी स्वतंत्रपणे! या पथकाचे श्रेय त्यातल्या वादक मुलींइतकेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा पुजारी यांचेही आहे.
मोठा अवजड ढोल कमरेला बांधून तो वाजवत तीन-चार तासांची मिरवणूक करणारी पुण्यातील ढोलपथके हा अवघ्या महाराष्ट्रासाठीच उत्सुकतेचा आणि कौतुकाचा विषय! आता तर पुण्यातील कोथरूड येथील अंधशाळेच्या विद्यार्थिनींनीही आपले पथक तयार केले आहे. अगदी सर्वाच्या बरोबरीने हे पथक मिरवणूक करते अगदी स्वतंत्रपणे!
पुण्यातील अंधशाळेच्या विद्यार्थिनींनीही आपले ढोलपथक तयार केले आहे. तोच उत्साह, तसाच जोश, पण तरीही हे पथक काकणभर सरसच! ते फक्त आपल्यातील कमतरतेवर मात करून अंध मुलींनी हे पाऊल उचलले म्हणून नाही, तर या मुलींतील आत्मविश्वासामुळे! या मुलींचा आत्मविश्वास हा कुणीही सलाम करावा असाच आहे. या मुलींचा उत्साह, काहीतरी करून दाखवण्याची खदखदणारी ऊर्मी, जबरदस्त जिगर हीच त्यांची शक्तिस्थाने आहेत.
तीन वर्षांपूर्वी गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अवघे पंधरा दिवस राहिलेले असताना हे पथक सुरू झाले. गणेशोत्सवासाठी सर्व पथके किमान दोन महिने तरी सराव करत असतात, मात्र कमालीच्या जिद्दीने या मुलींनी फक्त पंधरा दिवसांमध्ये सर्व प्राथमिक हात शिकून मिरवणुकीसाठी उभे राहण्याची तयारी दाखवली. दिसत नसल्यामुळे फक्त आपल्या एकटय़ाच्या क्षमतेवर या मुली ढोल-ताशा वाजवायला शिकल्या आहेत. एकीकडे प्रसिद्धी मिळवण्यासाठी, कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी ढोलपथकांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलीही आहेत, तर दुसरीकडे कुणाची सहानुभूती मिळवणे तर दूरच, पण कुणीतरी आपले कौतुक करावे, आपल्यासाठी काही करावे, अशी मुळी या मुलींची अपेक्षाच नाही. अगदी त्या खऱ्या खऱ्या कौतुकाला पात्र असूनही! त्या स्वत:च्या आनंदासाठी, उत्सवातील झिंग अनुभवण्यासाठी वादन करतात. ढोलांचा गजर होऊन वादन सुरू झाले, की वादनाला हळूहळू रंग चढायला लागतो आणि ‘येस, आम्ही करून दाखवले’ असेच काहीसे भाव आणि बेभान वाजणाऱ्या ढोलाइतकाच बेफाम आनंद या मुलींच्या चेहऱ्यावर दिसतो.
पुण्यातली शंभरांहून अधिक पथकांच्या गर्दीत या मुलींनी स्वतंत्रपणे आपले स्थान निर्माण केले आहे. साधारण ३० ते ४० मुलींचा सहभाग असलेले हे ढोल, ताशा आणि झांजपथक आहे. ढोलावर वाजवल्या जाणाऱ्या पारंपरिक ठेक्यांबरोबरच काही नवे ठेकेही या पथकाने तयार केले आहेत. गणेश मंडळांकडूनही या पथकाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पथकाचे श्रेय त्यातल्या वादक मुलींइतकेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा पुजारी यांचेही आहे. त्यांच्याच संकल्पनेतून आणि मेहनतीतून हे पथक उभे राहिले आहे. त्या सांगतात, ‘‘माझ्या मुलींचा संगीताशी खूप जवळचा संबंध आहे. मी गेली अनेक वर्षे मिरवणुकीमध्ये विविध ढोल पथके पाहात होते. आपल्या मुलीही करू शकतात, असे मला नेहमी वाटायचे. त्यातूनच एक दिवस हे पथक उभे करण्याचे ठरवले. माझ्या मुली खूप छान लेझीम खेळतात. त्यामुळे ढोलाचे ताल शिकून घेणे त्यांना फार कठीण गेले नाही. काही अडचणी नक्कीच आल्या, पण त्यावर या मुलींनी जिद्दीने मात केली. हे पथक उभे करण्यासाठी पुण्यातील समर्थ प्रतिष्ठानने आम्हाला खूप सहकार्य केले. आता मात्र आमच्या पथकाने स्वतंत्रपणे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.’’अगदी तीन तासांची मिरवणूकही या विद्यार्थिनी अगदी सहजतेने करतात. कमालीची शिस्तबद्धता हे या पथकाचे आणखी एक वैशिष्टय़! याच शिस्तबद्धतेमुळे या मुली अंध आहेत, हे केवळ माहीत असल्यामुळे विश्वास बसतो. एक प्रकारे गणेशोत्सवाला चांगले वळण लावण्याचे कामही हे पथक करत आहे. त्यांची शिस्त मंडळांच्या कार्यकर्त्यांवरही नकळत छाप पाडून जाते. या मुली सांगतात, ‘‘जेव्हा आमच्या पथकाचा ताशा कडाडतो किंवा ढोलावर एखादी खणखणीत थाप पडते, दमदार ठोका पडतो, त्या वेळी आमचे वादन ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आमच्यापर्यंत पोहोचतो आणि आम्हीही वादनात समरसून जातो. या उत्सवाचा खऱ्या अर्थाने एक भाग होतो. ढोल-ताशा वादनातून आम्हालाही एनर्जी मिळते अगदी पुढच्या गणेशोत्सवापर्यंत पुरणारी!’’ ‘कोण म्हणतं, आम्हाला जमणार नाही?. का? आम्हाला दिसत नाही म्हणून, पण आम्हीही पाहू शकतो. जे तुम्हाला दिसते त्याच्याही पलीकडचे! हाच बाणा या मुलींमध्ये दिसून येतो.