देखाव्यांमागचा आवाज! Print

रसिका मुळ्ये , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
alt

सार्वजनिक गणेश उत्सवातील एक आकर्षण म्हणजे हलते बोलते देखावे. फक्त दहा दिवसाचं आयुष्य असणाऱ्या या देखाव्यांच्या माध्यमातून विविध विषयावर  संदेश दिले जातात. आवाजाच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या वृषाली पटवर्धन यांच्याविषयी..
वृषाली पटवर्धन.. आपल्यापैकी प्रत्येकाला, त्या कधीतरी भेटल्या आहेत. आपण प्रत्यक्ष त्यांना ओळखत नसूही, मात्र त्यांचा आवाज आपल्या सर्वाच्याच ओळखीचा आहे, आकाशवाणीवरील बातम्यांच्या माध्यमातून किंवा रेल्वे स्टेशनवरच्या अनाऊन्समेंटच्या माध्यमातून! मात्र, पुणेकरांची त्यांच्याशी अजून एक ओळख आहे, ती म्हणजे देखाव्यांमागचा आवाज!
देखावे. हे गणपती उत्सवातील एक मोठे आकर्षण! हलत्या-बोलत्या मूर्ती लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानाच भावणाऱ्या.! मात्र, या देखाव्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात ते या देखाव्यांचे बोलविते धनी. रस्ताने जाताना एखादा देखावा दिसतो. आपण तो पाहतो आणि पुढे सरकतो. मात्र, त्याच वेळी मधाळ आवाज आपल्या कानावर पडतो आणि नकळत आपल्याला त्या देखाव्याबद्दल आकर्षण वाटू लागते. आणि देखावा संपेपर्यंत आपण तो पाहातो. त्याचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो. देखाव्यांच्या लोकप्रियतेमध्ये देखाव्याची संहिता, रचना, मूर्तीची सुबकता यांबरोबरच देखाव्यांना आवाज देणाऱ्यांचेही मोठे श्रेय असते.
वृषाली पटवर्धन या गेली तीस वर्षे गणपतीपुढील देखाव्यांसाठी आवाज देत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवात पन्नास टक्क्य़ांपेक्षा जास्त देखाव्यांमध्ये वृषाली पटवर्धनांचा आवाज ऐकायला मिळतो. एकाच वर्षी गणेशोत्सवात पार्वती, लक्ष्मी, महाराणी जिजाऊ, सावित्रीबाई फुले, नदी, खाष्ट सासू, छळ सहन करणारी सून तर कधी अगदी लहान मुलगीही. अशा विविध स्वरूपात त्यांचा आवाज ऐकायला मिळतो. मात्र, मागच्या चौकात ऐकलेल्या महाराणी जिजाऊंचा कणखर आवाज आणि पुढच्या चौकातील हुंडाबळी ठरलेल्या सुनेचा आर्त आवाज हा एकाच व्यक्तीचा आहे, यावर मात्र ऐकणाऱ्यांचा विश्वास बसत नाही.
साधारण तीस वर्षांपूर्वी हलते देखावे ही संकल्पना नुकतीच रुजत होती. त्या वेळी सुधीर गाडगीळ यांना एका देखाव्यासाठी आवाज देण्याबाबत विचारले, त्यानिमित्ताने या नव्या माध्यमात वृषाली पटवर्धन यांनी प्रवेश केला. पुण्यातील लोखंडे तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी तो देखावा तयार करण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी त्या मंडळाच्या देखाव्यासाठी त्या आवर्जून आवाज देत आहेत. मंडळांकडूनही वृषाली पटवर्धन यांच्या आवाजाला गेली अनेक वर्षे पसंती मिळते आहे. त्यांच्या आवाजातील आश्वासकता प्रेक्षकांना गेली अनेक वर्षे देखावा पाहण्यासाठी खिळवून ठेवत आहे. देखाव्यांऐवजी दाखवण्यात येणारे लघुपट ते अगदी सध्याच्या जिवंत देखाव्यांमागेही वृषाली पटवर्धन यांचा आवाज आहे. अनेक वेळा एकाच संहितेमध्ये दोन किंवा तीन पात्रांनाही त्यांनी आवाज दिला आहे. शिस्तबद्ध वृत्तनिवेदन एकीकडे आणि अगदी आयत्या वेळी हातात येणाऱ्या नाटय़पूर्ण संहिता एकीकडे. या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी असूनही आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिकेची आपली नोकरी सांभाळून, निवेदनाचे कार्यक्रम सांभाळून त्यांनी देखाव्यांसाठी आवाज दिला आहे. त्या सांगतात,‘‘देखाव्यांसाठी आवाज देणे हे एक आव्हानच आहे. अगदी पाच ते दहा मिनिटांच्या देखाव्यामध्ये प्रेक्षकांपर्यंत फक्त वाचनाच्या, आपल्या आवाजाच्या माध्यमातून पोहोचवायच्या असतात. कमी वेळात मोठा विषय मांडायचा असल्यामुळे अनेक वेळा संहितेत निर्माण होणाऱ्या त्रुटी सफाईदारपणे लपवण्याची जबाबदारीही आवाज देणाऱ्याची असते. अगदी आयत्या वेळी हातात संहिता येते आणि लगेच त्याचे ध्वनिमुद्रण करायचे असते. काही वेळा तर एकाच दिवसांत, विविध विषयांवरील, विविध संहितांचे ध्वनिमुद्रण करावे लागते. या देखाव्यांचे आयुष्य अवघ्या १० दिवसांचे असले, तरी लोकांपर्यंत पोहोचण्याचे ते एक प्रभावी माध्यम आहे. गणपतीच्या दहा दिवसांमध्ये अनेक विषयांचे, चांगल्या गोष्टींचे संस्कार हे देखावे नकळतपणे करत असतात. देखाव्यांच्या माध्यमातून प्रभावी संस्कार करणाऱ्यांमध्ये देखाव्यांचा आवाज हा महत्त्वाची भूमिका निभावत असतो. ’’
आपल्या आवाजातून रंगवलेल्या देखाव्यांमधील पात्रांच्या अनेक आठवणी वृषाली पटवर्धन सांगतात. परंतु जळगावच्या स्कॅंडलनंतर एका मंडळासाठी राहुल सोलापूरकर यांच्याबरोबर ध्वनिमुद्रित केलेली एक संहिता त्यांना आजपर्यंतच्या संहितांमध्ये विशेष आवडल्याचे त्या आवर्जून सांगतात. पारंपरिक कथा, ऐतिहासिक प्रसंग यांबरोबरच पर्यावरण, प्रदूषण, पाणी वाचवा, हुंडाबळी ते सध्याच्या गणेशोत्सवामध्ये प्राधान्य दिला जाणारा स्त्रीभ्रूण हत्या अशा विविध विषयांवरील देखाव्यांमागे आजही असलेला वृषाली पटवर्धनांचा आवाज अनेकांना भावतो आहे. काळानुसार देखाव्यांचे स्वरूप बदलत गेले, त्यातील ट्रेंड्स बदलत गेले, काळानुरूप विषय बदलले, लोकांच्या आवडी बदलल्या.. मात्र त्यामागचा वृषाली पटवर्धन यांचा आवाज अजूनही टिकून आहे.