चौघडा वाजतो गं .. Print

रसिका मुळ्ये , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

निकिता लोणकरने वयाच्या दहाव्या वर्षी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पूर्णवेळ म्हणजे किमान पाच तास  तुळशीबागेच्या गणपतीसमोर सलग चौघडा वाजवला होता. चौघडय़ाबरोबरच गणपती उत्सवामध्येही विविध मंडळांमध्ये निकिता नगाराही वाजवते.नगारा.. हा शब्द ऐकला तरी एखादा दणकट माणूस मोठं वाद्य जोरजोरात वाजवतो आहे असं काहीतरी डोळय़ांसमोर येतं. नगाऱ्याची ओळखही रणवाद्य म्हणूनच आहे. त्यामुळे ते वाजवण्याची धुरा एखाद्या स्त्रीनं उचलणं कल्पनातीत. पण निकिता मात्र आपल्या या सगळय़ा रंजक कल्पनांना फाटा देते. नगारा आणि चौघडा ही पुरुषांची मक्तेदारी समजली जाणारी दोन्ही वाद्यं निकिता वाजवते. पुण्यातील मानाचा चौथ्या तुळशीबाग गणपतीची विसर्जन मिरवणूक गेली काही वर्षे आकर्षणाचा विषय ठरत आहे. यामागे आरास, सजावट याहीपेक्षा एक मोठं कारण आहे, ते म्हणजे विसर्जन मिरवणुकीमध्ये वाजवला जाणारा चौघडा आणि तो वाजवणारी निकिता!

निकिता लोणकर ही मुलगी गेली काही र्वष आपल्या घरच्यांबरोबर दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये चौघडा वाजवत आहे. निकिताच्या घरात चौघडा आणि नगारावादनाची अनेक वर्षांची परंपरा आहे. लहानपणापासून ऐकूनच निकिता ही वाद्यं शिकली. नुसतंच गंमत म्हणून वाजवण्यापलीकडेही निकिताची आवड काही वेगळी आहे, हे तिचे काका सुरेश लोणकर यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी निकिताला शास्त्रशुद्ध पद्धतीनं ही दोन्ही वाद्यं वाजवण्याचं शिक्षण दिलं. वयाच्या दहाव्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत पूर्णवेळ म्हणजे किमान पाच तास निकितानं तुळशीबागेच्या गणपतीसमोर सलग चौघडा वाजवला. चौघडय़ाबरोबरच गणपती उत्सवामध्येही विविध मंडळांमध्ये निकिता नगाराही वाजवते. मी काही वेगळं करते आहे, याची निकिताला पूर्ण जाणीव आहे. मात्र, त्याबाबत कोणताही अभिनिवेष नाही. आपण केवळ मुलगी आहोत म्हणून काही गोष्टी आपल्याला जमणार नाहीत किंवा काही गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, असा कोणताही समज तिच्या खिजगणतीतही नाही.
सध्या निकिता अकरावीला आहे. आपल्याप्रमाणेच अनेक मुलींनी ही वाद्यं वाजवून पाहावीत, त्यातून मिळणारा उत्साह आणि आनंद त्यांनी अनुभवून पाहावा यासाठी निकिता प्रयत्न करत असते. निकिता सांगते, ‘या वाद्यांना एक नाद आहे. ती वाजवताना आपल्यातल्या ऊर्जेची आपल्यालाच नव्यानं ओळख होते. मात्र अजूनही खूप मुली ही वाद्यं वाजवत नाहीत.’ आपल्या मैत्रिणींनीही ही वाद्यं शिकावीत यासाठी निकिता त्यांना या वाद्यांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि यासाठी गणेशोत्सव ही तर निकिताला पर्वणीच वाटते. गणेशोत्सवाच्या काळातही आपलं कॉलेज, क्लासेस सांभाळून ती विविध मंडळांमध्ये वादन करत असते. निकिता सांगते, ‘गणेशोत्सवात वादनाची संधी मिळाली, तर मी ती शक्यतो सोडत नाही. या निमित्तानंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. त्यांना या वाद्यांचं महत्त्व, त्याचं वैशिष्टय़ सांगता येतं. एका मुलीला ही वाद्यं वाजवताना पाहिलं, की अनेक मुलींनाही आपोआप या वाद्यांबद्दल आकर्षण निर्माण होतं.’
ढोल पथक हा पुण्याच्या गणेशोत्सवातील अविभाज्य घटक आहे. मात्र, याच ढोलाबरोबर आपली परंपरा जपणारा चौघडा मात्र काळाच्या ओघात थोडा दुर्लक्षित झाला आहे. नगारा आणि चौघडय़ाला मर्यादा आहेत, मात्र तरीही वाद्यांच्या रचनेमध्ये खूप काही करण्यासारखं आहे. या वाद्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्याची निकिताची इच्छा आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीनं वाजवण्यात येणाऱ्या तालांबरोबर, अनेक नवीन ठेके, ताल तयार करण्यासाठी निकिता प्रयत्न करत असते. ‘नगारा काय किंवा चौघडा काय, ही दोन्ही वाद्यं श्रवणीय आहेत आणि त्यांच्या वादनामध्ये अनेक प्रकारचं नावीन्य आणणं शक्य आहे, असं निकिताचं म्हणणं आहे. तिच्या या छंदामध्ये तिच्या घरच्यांचं प्रोत्साहन खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निकिताचे काकाही या वाद्यांच्या प्रसारासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमध्येही निकिता उत्साहानं सहभागी असते. निकिताच्या चौघडा आणि नगारावादनाचाएक व्हिडिओ अल्बम तयार करण्याचा तिच्या काकांचा मानस आहे. जेणेकरून निकिताप्रमाणेच अनेक मुलींनाही या वाद्यांचं आकर्षण वाटावं.
निकिताला पुढे सी.ए. करायचं आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत आपला छंद सांभाळूनच. अभ्यासासाठी म्हणून वादन बंद करणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं तिला मंजूरच नाही. ‘मला आवडतं, मी करणार आणि इतरांनाही आवडावं, यासाठी प्रयत्न करणार हे यामागचं निकिताचं खरं तत्त्व आहे.