ओंकार प्रधान रूप गणेशाचे.. Print

भारती भावसार , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

ऑस्ट्रेलियन धाटणीच्या अ‍ॅबओरिजिनल शैलीत साकारलेला गणपती हे वैशिष्टय़ जोपासत शुभांगी सामंत यांनी अनेक गणपती साकारले आहेत. गणपतीची विविध रूपं त्यांच्यातल्या सृजनशीलतेला आव्हान देत राहतात आणि त्यातूनच आकारतो ओंकार गणेश.
‘‘गणपती मला भावतो तो त्याच्यातल्या ग्रेसमुळे.. एक वेगळाच डौल आहे त्यांच्यात. त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव घ्या त्याचे कान, त्याची सोंड, त्यांचे लंबोदर या साऱ्याच गोष्टी एक चित्रकार म्हणून मला खुणावतात. एखाद दिवशी अचानक वीज चमकावी तशी गणपतीची एक पुसट रेखाकृती मनात आकार घेते आणि हातातला कुंचला कॅनव्हासवर तो आकार चितारूलागतो.  कल्पनेला रंगांच्या सामर्थ्यांवर ‘मूर्त’ रूप देईपर्यंतचा प्रवास खूपच विलक्षण असतो. एका निर्मितीच्या सोहळ्याचा तो अनुभव तृप्त करणारा असतो..’’  निराकार गणेशाला कुंचल्याच्या साहाय्याने साकार रूपात रेखाटणाऱ्या शुभांगी सामंत आपला अनुभव सांगतात.
गेली २४ हून अधिक वर्षे गणेशाची विविध रूपे आपल्या कलाकृतीतून त्या सादर करीत आहेत. आपले लाडके दैवत असणाऱ्या गणरायाला या अनोख्या पद्धतीने त्या अभिवादन करतात. त्यांच्या चित्रांमधून वेटोळी सोंड पोटाशी घेतलेला गणेश, उभ्या आकारातला रत्नजडित टिळाधारी गणेश तसेच पहुडलेला हाती मोदक असणारा गणेश अशा अनेक चित्राकृती पाहायला मिळाल्या. त्या सांगतात, ‘‘गणेशाची ही सारीच रूपे, वर्णने लोभसवाणी वाटतात म्हणूनच चित्रातून ती साकारण्यात वेगळेच समाधान मिळते. गणपतीच्या शरीराकृतीतल्या एका जरी  वैशिष्टय़ावर प्रकाश टाकला तरी स्वतंत्र कलाकृती जन्माला येते. आणि त्यातूनच प्रत्येक वेळी वेगवेगळी कलाकृती जन्माला येते.’’
 गेल्या २५ वर्षांपासून त्या विविध संकल्पना निश्चित करून वर्षांला एखादे तरी प्रदर्शन त्या भरवतात. गणरायाच्या वर्षांला एखादे तरी प्रदर्शन पौराणिक संकल्पना समकालीन फॉर्ममध्ये मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. ‘‘मला गणपतीचे देहविशेष दर्शवणारी उदा.-लंबोदर, एकदंत, भालचंद्र, गजवक्र ही गणपतीची नामावली मला खूप भावते. त्यातून गणेशाचे नवे रूप मला साद घालते. मग नव्या रंगसंगतीत, नव्या ढंगात मी ते टिपण्याचा प्रयत्न करते. त्यातून गणेशाची नानाविध रूपे कॅनव्हासवर अवतरतात आणि वेगळ्या वैशिष्टय़ांसह पुन:पुन्हा नवी कलाकृती साकारत जाते. पण या सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो भाव. आपण विशुद्ध भावनेने गणरायाकडे पाहिलं की तो एका नव्या रूपात जाणवतो. हीच आतापर्यंतच्या प्रवासाची दिशा,’’ असे शुभांगी सांगतात.
प्रयोगशीलतेसह दरवेळी कलेतून नावीन्य जपण्याचा प्रयत्न शुभांगी यांनी केला आहे. जाणीवपूर्वक त्यांनी चित्रांसाठी प्रक्रिया केलेला कागद वापरला आहे. जुन्या वृत्तपत्रांचा लगदा करून तो साधारण दोन ते तीन दिवस सुकवल्यानंतर जाडसर कागद तयार होतो. या कागदाचे आयुर्मान अधिक असते. याच कागदाचा कॅनव्हास म्हणून वापर करून शुभांगी यांनी एकाहून एक सरस गणपती साकारले आहेत. विशेष म्हणजे रिसायकल्ड कागद हा चौकोनी, आयताकृती अशा नियमित आकारात तयार होत नाही. मग या विविध आकारातून गणपतीचा फॉर्म शोधत त्या बाप्पाला कॅनव्हासवर अक्षरश ‘प्रकट’ करतात. त्यासाठी आकर्षक रंगसंगती व मिक्स मीडियाचा वापर करून गणेशाच्या अनेक कलाकृती त्यांनी रेखाटल्या आहेत. ‘तानापिहिनिपाजा’ या संकल्पनेवरचे त्यांनी काढलेले गणपती पाहता तर अप्रतिम अशी प्रतिक्रियाच नकळत आपल्याकडून बाहेर पडते.
शुभांगी यांना ‘मायथोलॉजी’ अर्थात पौराणिक संदर्भातील प्रसंग, चित्रे, देव-देवता साकारण्यात विशेष रस आहे. त्यांनी गणपतीची साकारलेली चित्रे ऑस्ट्रेलियन धाटणीच्या अ‍ॅबओरिजिनल शैलीतील आहेत. यात रंगांच्या ब्रशच्या साहाय्याने एकेक ठिपका काढत पूर्णाकृती साकारायची असते. त्यामुळे लांबून बघितल्यास चित्राला थर्मोकॉलच्या पृष्ठभागासारखा फील येतो. पण हे काम फार जिकिरीचे असून वेळखाऊ आहे. मात्र निश्चितच त्यामुळे चित्राला वेगळा उठाव येतो. इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर गणपतीसाठी हा फॉर्म विकसित केल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अगदी कोकिलाबेन अंबानी यांनीही त्यांचं कौतुक केलंय. अनेक चित्रे परदेशात पोहोचली आहेत. जाणकारांची थाप तर वेळोवेळी मिळतेच. पण घरातल्यांचे सहकार्य व हिंमत याशिवाय हा प्रवास अवघड होता, असे त्या म्हणतात.
१९८६ पासून चहा उत्पादक कंपनी, हसमुखराय लि. यांच्या दिनदर्शिकेवरील गणपती शुभांगी यांच्या कुंचल्याचा सुखद आविष्कार आहे. वारली शैलीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी रेखाटलेला गणपती पारंपरिक व मॉडर्न आर्ट यांचे बेमालूम मिश्रण वाटते.
आतापर्यंत शुभांगी यांची मोठी अशी आठ ते दहा प्रदर्शने मुंबईत झाली आहेत. योगायोगाने शुभांगी यांचं पहिलं प्रदर्शन होतं बजाज आर्ट गॅलरीला, तेही गणपती याच संकल्पनेवर आधारित. पण दुर्दैवाने प्रदर्शनाच्या काही दिवस आधी त्यांच्या मोठय़ा भावाचे निधन झाले. दु:खद मन:स्थितीतच त्यांनी चित्रं काढली. पण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पहिलंच चित्रं विकलं गेलं- ते शुभांगी यांचं.. त्यानंतर त्यांचा चित्रप्रवास सुरू झाला तो आजही अखंडपणे सुरूआहे..
मनाच्या विचारांच्या प्रवाहाप्रमाणे रंग सोडायचे, आपला भाव प्रामाणिक असला की ओजस्वी कलाकृती साकारतेच, अशा विश्वास त्या व्यक्त करतात. पौराणिक काळाचे नमुने चित्रांत उद्धृत करताना संदर्भासाठी मी अनेक ग्रंथांचा अभ्यास करते. त्यातून खूप महत्त्वपूर्ण बाबी कळतात. मग त्या कलाकृतीतून मांडते, असं शुभांगी सांगतात.
‘कलेतून गणेशाची उपासना करणाऱ्या शुभांगी यांची ही चित्रं म्हणूनच स्फूर्तिदायक ठरतात.