रंगात रंग तो धूम्रवर्ण… Print

धरित्री जोशी , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

११८ वर्षे पूर्ण झालेल्या पुण्यातील अखिल मंडई मंडळाच्या गणपतीला रंगात रंगवण्याचं काम गेली १५ वर्षे संगीता वेदपाठक करत आहेत. गणपतीच्या वस्त्रांची आणि शारदेच्या साडीची रंगसंगती साधण्याच्या औत्सुक्यपूर्ण कामाविषयी ..
पुण्यातील सुप्रसिद्ध अखिल मंडई मंडळाच्या गणपतीस नुकतीच म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी ११८ वर्षे पूर्ण झाली. शारदा-गजानन विराजमान असलेली पुण्यातील ही वैशिष्टय़पूर्ण मूर्ती. या गणरायाचे वैशिष्टय़ म्हणजे ही मूर्ती ‘इको फ्रेंडली’ आहे. गणपती उत्सव जवळ आला की खास आधीपासून या मूर्तीच्या सजावटीला सुरुवात होते. विशेष बाब म्हणजे गेली १५ वर्षे या शारदा-गजाननाच्या मूर्तीला रंगरंगोटी देण्याचे, सजावटीचे काम करीत आहेत संगीता वेदपाठक. वडिलांकडून आलेली ही कला, गणेशभक्ती संगीताताई अगदी श्रद्धेने जोपासतात.
पुण्यातील सुप्रसिद्ध मंडई गणपती मंडळाचे जुने कार्यकर्ते गणेशभक्त शंकरराव पालकर यांनी या मूर्तीच्या सजावटीचे, रंगरंगोटीचे काम थोडेथोडके नाही तर जवळपास ५० वर्षे अत्यंत भक्तिभावाने केले. वयोमानपरत्वे शरीर थकले, हात थकले.. आपल्या गणेशसेवेचे हे व्रत पुढे कोण चालवणार, हा प्रश्न सतत छळत राहायचा. त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना घरीच सापडलं ते त्यांची  कन्या संगीता वेदपाठक हिच्या रूपात.
‘‘ गेली १५ वर्षे.. ‘शाळेत असल्यापासूनच मी व माझी बहीण वडिलांबरोबर ‘श्री’ची सजावट बघायला जात होतो. त्या वेळेस नकळत आमच्या मनावर हे संस्कार आणि या शिक्षणाचे धडे गिरवले गेले..’  संगीताताई सांगत होत्या. मंडईच्या गणपतीची ही मूळ मूर्ती ११८ वर्षांची जुनी आहे. हा गणपती अत्यंत जागृत, नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मूर्तीचे कामही तितक्याच सोवळ्याओवळ्यात करावे लागते. दरवर्षी ‘श्रीं’च्या सोवळ्यामध्ये व त्याला मॅचिंग शारदेच्या शालूमध्ये रंगसंगती, त्यात वैविध्य देण्याचे काम संगीताताई कलात्मकतेने करतात. शारदेच्या शालूच्या रंगांप्रमाणे ‘श्रीं’ च्या सोवळ्याचे रंग कधी लाल, कधी पिवळा, केशरी तर कधी नारंगी, डाळिंबी साकारले जातात. या रंगसंगतीला पूरक अशा रंगांमध्ये गणरायाच्या सोंडेवर डिझाइन काढले जाते. यंदाच्या वर्षी ‘श्रीं’ना जांभळ्या रंगाचे सोवळे तर शारदेला अबोली रंगाचा शालू साकारला आहे. या शालूला उठावदार असे काठ, पदर लावण्याचे काम संगीताताई सध्या करीत आहेत.
प्रतिवर्षी नव्या शालूचे काठ, पदर काढून ते या मूर्तीला लावले जातात, असे संगीताताई आवर्जून सांगतात. ‘श्री च्या सोंडेवरचे नक्षीकाम जितके नाजूक तितकेच शारदेला संपूर्ण सजावण्याचे काम हे ‘विशेष’ असते. असेही त्या सांगतात. शारदेच्या ब्लाऊजची विविध डिझाइन्स, तिची आभूषणे रंगवणे, तिला रंगसंगतीतून साकारण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या वेण्या यातून शारदेच्या रूपाला आणखीनच झळाळी येते. शारदेला कधी गुलाबाची वेणी, कधी जाई-जुईची वेणी, कधी अबोलीची, तर कधी शेवंतीची वेणी साकारली जाते. तिच्या शालूला पूरक अशा फुलांची रंगसंगती तिच्या वेणीत असते. शारदेला चंद्रकोर, गोंदण काढल्यावर तर तिचे रूप आणखीनच लोभस दिसते.’’ या
पेंटिंगचा शेवटचा टप्पा म्हणजे गणपतीचं ‘जानवं’ रंगवणं. एकदा जानवं रंगवून झालं की मग आम्ही कोणीच मूर्तीला हात लावत नाही, त्या सांगतात.  स्वत: सरकारी नोकरीत जबाबदारीचे काम पार पाडत असतानाच रोज संध्याकाळी संगीताताई या कामी स्वत:ला वाहून घेतात. ‘या सेवेतून मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा आहे.. वर्षभरातील चिंता, दु:ख या काळात अक्षरश: धुवून जातात. आणि पुढच्या वर्षीसाठीचे आनंदाचे, प्रेमाचे भांडार या बाप्पाच्या सहवासातून मी माझ्याबरोबर घेऊन जाते..’ असे सांगतानाच संगीताताई बाप्पाच्या सेवेची ही मोठी संधी वडिलांना व त्यांना प्राप्त करून दिल्याबद्दल मंडळाचे शतश: आभार मानतात!