या चिमण्यांनो परत फिरा रे ! Print

alt

माधुरी ताम्हणे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
काल रात्री तू आत बसलेल्या विमानाला टाटा केलं आणि जड पावलांनी मी माघारी फिरले. एकटीच. हो, एकटीच. तसे होते बरेचजण सोबतीली तरीही आतून एकाकी, एकटी. त्या अजस्र विमानाने मी टाटा करताच क्षणात पंख पसरले आणि अवकाशात झेप घेतली. अगदी तुझ्यासारखीच. आत्ता जमिनीवर आहे म्हणता म्हणता झेपावलं की त्या अथांग आकाशात आणि पाहता पाहता नजरेआड झालंसुद्धा. अगदी तुझ्यासारखंच. त्या विमानाचे लुकलुकणारे दोन तांबडे दिवे मी पाहात राहिले डोळे ताणून आणि पापण्यांवर पाण्याचा पातळ पडदाच आला. त्या पातळ पडद्याआडून दिसले ते तुझे लुकलुकणारे दोन डोळे. आत्ता त्या अथांग आकाशात तुला शोधतायत ना अगदी तस्सेच ते दोन चिमुकले डोळे. मला शोधणारे. भिरभिरणारे.

त्या वेळी भिंतीआडून तुला पाहणाऱ्या मला तुझ्या पापण्यांवरचा तो पातळ पडदा अगदी दुरूनही लख्ख दिसला. तुझी नजर बराच वेळ भिरभिरली आणि मग तुझ्याही नकळत तू टीचरचं बोट पकडलंस आणि वर्गात गेलास. माझ्याकडे पाठ फिरवून. आत्ता गेलास ना अगदी तस्साच! दुसऱ्या दिवशी मी तुझी तीच नजर शोधत होते. भिरभिरणारी. मला शोधणारी. पण ती नजर हरवूनच गेली त्या दिवशी. कारण त्या दिवसानंतर मला दिसला तो आनंदाने मला निरोप देणारा तुझा चिमुकला हात आणि क्षणात घोळक्यात मिसळून जाणारी तुझी वर्गाकडे जाणारी छोटी छोटी पावलं..
माझ्या हळव्या काळजाची घट्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
परवा कोणी तरी तुला विचारत होतं. मग पुढचा विचार काय? शिक्षण पुरं झाल्यावर तिथेच राहणारे की..
‘‘मी आईसाठी परत येणार.’’ तू विचारणाऱ्याचं वाक्य पुरं केलंस. आत मी हसले. बाहेर विचारणारा हसला आणि कदाचित मनातल्या मनात तूसुद्धा! माझ्याही नकळत मला तुझी घोळक्यातली छोटी छोटी पावलं आठवली. वडिलांची चप्पल पायात येण्याइतकी मोठी झाली होती ती आणि त्या पावलांना आता स्वतंत्र वाटेचे वेध लागले होते.
या वाटेवर भूक लागली तर असावे म्हणून तहानलाडू भूकलाडू बांधून देत होते. परवा. बॅगेच्या वजनाची काळजी करत मायेच्या सायसाखरेत घोळलेले लाडू दिले खरे, पण वाटलं किती दिवस पुरेल ही एवढीशी शिदोरी याला? नकळत त्या लाडवांच्या जागी तुझ्या चिमुकल्या मुठीतल्या मूठभर भुईमुगाच्या शेंगाच दिसायला लागल्या. मी भाजी घेत असताना माझी आणि भाजीवालीची नजर चुकवून उचललेल्या आणि मग तो कोवळ्या हातावरचा फटका, बाजाराकडे परत वळलेली दोघांची वरात आणि भाजीवालीचा मला रागे भरणारा उंच स्वर! ‘‘घेऊ द्याच्या की चार शेंगा लेकराला! कशापायी उन्हात फरपटत आणलंस त्येला?’’
उचलेगिरीची फोलपटं वाऱ्यावर भिरकावून आतला सच्चाईचा हिरवाकंच दाणा त्या चिमुकल्या मुठीत ठेवताना झालेला अपार आनंद आजही आठवला आणि वाटलं माझ्यापासून तुला दूर दूर नेणाऱ्या त्या वाटेवर चालताना तुझ्या हातातली शिदोरी पुरेशी आहे. शाबूत आहे. नक्की!
तुझ्या परतीची आश्वस्त जाणीव पोकळ आहे हे जाणवत होतं. तुला आणि मलाही पक्कं ठाऊक होतं. आतल्या आत की ही वाट दूर दूर जातेय त्या अज्ञात प्रदेशात.. त्या गुहेत जिथे फक्त आत जाणाऱ्याची पावलं दिसतात. दोन थकलेले वृद्ध डोळे त्या गुहेकडे चातकासारखी नजर लावून बसले तरी ती पावलं मागे वळत नाहीत. आपली होत नाहीत. दूरस्थ, परकी आणि पाहुणी  होतात ती पावलं!
कधीमधी परततात चार दिवस घरटय़ाकडे.. पण घरटय़ाला पावलांची ओढ असते म्हणून नवे तर श्रांत, दमलेल्या पावलांना हक्काचा विसावा हवा असतो म्हणून! अज्ञात प्रदेशातल्या मुसाफिरीत हक्काची, मयेची उब शाबूत आहे, रुजलेल्या मातीतली मुळं अजूनही जिवंत आहेत त्या आश्वस्त जाणिवेसाठी! एरव्ही वैराण घरटय़ातल्या श्रांत नजरांना सुखावतो तो निर्जीव आल्बममधल्या फोटोंचा आणि त्या प्रत्येक फोटोमागच्या कथित घटनांचा ओला शिडकावा.. मृगजळासारखा!
पाच चिमुकल्या बोटांच्या चिमटीत घट्ट धरलेलं बोट सोडून दुडूदुडू धावत पुढे गेलेलं आणि क्षणभर थांबून ‘पकड मला’ म्हणणारं ते अवखळ बाल्य कधीच.. कधीच पकडता येणार नाही.. तो वेग आणि ती गती कधीच गाठता येणार नाही त्या जाणिवेतली हताश अगतिकता मग धावणाऱ्या पावलांच्या कौतुकात दडवून टाकण्याची केविलवाणी धडपड सुरू होते. आपल्यापासून दूर पळवून नेलेल्या लेकराला सापडलेलं कांचनमृग किती शंभर नंबरी आहे, किती झळझळीत आहे त्याचं वर्णन करताना शब्द थिटे पडू लागतात. आपल्या अगतिक पोरकेपणावर वैभवाची जडजवाहीर जडवलेल्या पांघरूणाचे थिटेपण जाणवलं तरी कौतुकभरल्या शब्दांची कमतरता नसतेच. पण त्या शब्दांची फोलपटं वाऱ्यावर इतस्तत: उधळली की, आतली गाभ्यातली आर्त हाक स्पष्ट कानी येते. शेवटचे श्वास मोजणाऱ्या कुडीतले प्राण वाचावे म्हणून कदाचित डॉक्टरची झोळी सोन्याच्या नाण्यांनी भरणाऱ्या हातांना कान फुटले तर स्पष्ट ऐकू येतील एवढेच शब्द,
‘‘या चिमण्यांनो परत फिरा रेऽ
घराकडे अपुल्या..
जाहल्या तिन्हीसांजा..’’