र. धों.च्या निमित्ताने : हा व्यवसाय कसा? Print

alt

डॉ. मंगला आठलेकर , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सक्तीनं वेश्या बनवलेल्या स्त्रियांच्या कामाला ‘व्यवसाय’ हे नाव कोणी दिलं? ज्याचा कुणाचा हा व्यवसाय असेल तो ‘इथं कामासाठी मुली हव्या आहेत’ अशी कधी जाहिरात देतो का? मुलींना त्यासाठी अर्ज करणं, इंटरव्ह्यू देणं हे करावं लागतं का? जिथं देह हेच क्वालिफिकेशन आहे, जिथं मुलगी जितकी लहान आणि कुमारी तितकी तिला अधिक मागणी आहे, जिथं तिनं कामाला नकार दिला तर तिला दहशत बसावी म्हणून तिच्या देहावर अनन्वित अत्याचार करून तिला वठणीवर आणलं जातं आणि सुटकेच्या सगळ्या आशा मावळल्यावर मेलेल्या मनानं जी आपलं शरीर समोर येईल त्याच्या हाती सोपवते, त्या कामाला ‘व्यवसाय’ कसं म्हणायचं?
र. धों.नी म्हटलं होतं की, प्रत्येकाला सुखानं जगण्याचा आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपली वाट शोधण्याचा अधिकार आहे. जगण्याच्या हक्काबद्दल बोलताना अर्थातच र.धों.नी स्त्री आणि पुरुष हा फरक केला नाही. त्यांनी जो नियम पुरुषासाठी, तोच नियम स्त्रीसाठी असला पाहिजे, निर्णयाची जी संधी पुरुषाला मिळते तीच संधी स्त्रीलाही मिळाली पाहिजे, या विचारांचा पाठपुरावा आयुष्यभर केला. स्त्रीवरची जाचक बंधनं, तिच्याकडून केल्या जाणाऱ्या त्यागाच्या आणि सेवेच्या अपेक्षा आणि तुलनेत पुरुषाला मिळणारं अर्निबध स्वातंत्र्य यावरचा राग व्यक्त करताना स्त्री-वेश्येप्रमाणेच पुरुष-वेश्येची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली.
 स्त्री आणि पुरुष या िलगभावापलीकडे जाऊन प्रत्येकाला सुखी कसं होता येईल याचा विचार करणाऱ्या, पुरुषाच्या लंगिक सुखाची सोय म्हणून स्त्री-वेश्या उपलब्ध असते तसंच स्त्रीच्या लंगिक सुखाची सोय म्हणून पुरुष-वेश्या उपलब्ध का असू नये, असा प्रश्न करणाऱ्या र.धों.ना वेश्या व्यवसायाचा पुरस्कार निश्चितच करायचा नव्हता.   
आणि खरंच, कुठल्याही समाजाला मुळात वेश्येची आवश्यकता का भासावी? त्यातूनही ‘कामवासनेच्या तृप्तीची सोय’ हे कारण जर कोणी पुढे करणार असेल तर वेश्यांच्या आरोग्याची, त्यांच्या भविष्याची काळजी घेणं हे जबाबदारी समाजानं कधी आपली मानली का? सक्तीनं वेश्या बनवलेल्या स्त्रियांच्या कामाला ‘व्यवसाय’ हे नाव कोणी दिलं? ‘वेश्या व्यवसाय’ हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. हा व्यवसाय कसा? ज्याचा कुणाचा हा व्यवसाय असेल तो  ‘इथं कामासाठी मुली हव्या आहेत’ अशी कधी जाहिरात देतो का? मुलींना त्यासाठी अर्ज करणं, इन्टरव्ह्यू देणं हे करावं लागतं का? कामाचे दिवस, पगार याची निश्चिती करणारं पत्र त्यांना मिळतं का? आणि मुख्य म्हणजे काम संपल्यानंतर त्यांना त्यांचं स्वतंत्र, निवृत्त आयुष्य त्यांच्या मनासारखं जगता येतं का? हा व्यवसाय असता आणि त्याची निवड मुलींना स्वेच्छेनं करता आली असती तर त्यांचं आयुष्य त्यातून उभं राहिलं नसतं का? त्यांनी मिळवलेल्या पशांनी त्यांची मुलं भरपूर शिकली नसती का? पण तसं तर होत नाहीच, उलट अनेकदा कंगाल अवस्थेत असंख्य रोगांनी ग्रासलेल्या या स्त्रियांच्या नशिबात एक दिवस बेवारश्यासारखं मरून जाणंच लिहिलेलं असतं. कुठल्या व्यवसायामधल्या सगळ्याच्या सगळ्या मुली अशा रोगग्रस्त होऊन मरून जातात?
  जिथं देह हेच क्वालिफिकेशन आहे, जिथं मुलगी जितकी लहान आणि कुमारी तितकी तिला अधिक मागणी आहे, जिथं तिनं कामाला नकार दिला तर तिला दहशत बसावी म्हणून तिच्या देहावर अनन्वित अत्याचार करून तिला वठणीवर आणलं जातं आणि सुटकेच्या सगळ्या आशा मावळल्यावर मेलेल्या मनानं जी आपलं शरीर समोर येईल त्याच्या हाती सोपवते, त्या कामाला ‘व्यवसाय’ कसं म्हणायचं?
पुरुषप्रधान व्यवस्थेनं फार जुन्या काळीच स्वत:च्या शरीरसुखाची सोय लावण्यासाठी हा धंदा करायला स्त्रियांना भाग पाडलं आणि स्वत:च्या वासनापूर्तीसाठी स्त्रीच्या चालवलेल्या या शोषणाला ‘व्यवसाय’ हे गोंडस नाव दिलं. आज तर हा ‘व्यवसाय’ प्रचंड फोफावला आहे. वेश्यावस्तीत हजारोंच्या संख्येनं होणारी मुलींची भरती हा मनाला विषण्ण करणारा विषय आहे. जगभर स्त्री देहाची आयात-निर्यात राजरोसपणे चालते. स्त्री देहाच्या व्यापाराचा अगदी निकटचा संबंध गुन्हेगारीच्या जगाशी आहे. गुन्हेगारीच्या जगात देहविक्रय करणाऱ्या मुली मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्या जगाचा सध्या सर्वात मोठा फायदा करून देणारा अणि अगदी विनाआडकाठी तेजीत चालणारा असा हा धंदा आहे. फळफळावळ, धान्य, भाज्या, मासळी जशी टनावारी या देशातून त्या देशात निर्यात केली जावी तशी लाखो  स्त्रियांची निर्यात राजरोसपणे दरिद्री देशातून श्रीमंत देशात होत असते.
भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांतून या धंद्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मुलींचा पुरवठा केला जातो. कोल्हापूर, बेळगाव आणि विजापूरमधून मुंबईसारख्या शहरात प्रथम मुलींची आयात केली जाते आणि नंतर तिथून देशाबाहेर त्यांची पाठवणी केली जाते. भारत, थायलंड, नेपाळ, फिलिपाइन्स आणि बांगलादेशातून मध्यपूर्व देशात स्त्रियांची विक्री सर्रास होते. कधी घरकामासाठी म्हणून, तर कधी वेश्याकामासाठी म्हणूनच पाठवलेल्या या मुलींसाठी तिथं सगळं अनोळखी आणि सगळं तितकंच भयप्रद असतं. आयुष्यभर तिथं सडण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय त्या मुलींसमोर शिल्लकच नसतो.
बरेचदा अन्नपाण्याची ददात असलेल्या घरातून, वसतिगृहातून, अनाथ बालिकाश्रमातून, तुरुंगातून या मुली उचलल्या जातात. लहान मुलींना भाव जास्त असल्यानं आठ-नऊ वर्षांपासूनच्या मुली या धंद्यात आणल्या जातात. मुलींचे लिलाव होतात. अरब देशातल्या पुरुषांची अशी श्रद्धा आहे की, कौमार्यभंग न झालेल्या मुलीबरोबर झोपल्यानं काही विशिष्ट आजार बरे होतात. त्यामुळे त्या देशात कुमारी मुलींना खूप मागणी असते. पन्नास ते साठ हजार रुपयांपर्यंत अशा मुलींची बोली लावली जाते. इतकं होऊनही घासभर अन्नासाठी मालकाच्या मेहेरबानीची वाट त्यांना पाहावी लागते आणि दलाल मात्र मालामाल होतात.
भारतात शरीरविक्रयासाठी मोठय़ा संख्येनं मुली आणल्या जातात त्या नेपाळ आणि बांगलादेशामधून. मुंबई आणि कोलकात्यामधल्या वेश्यागारात लाखो नेपाळी मुली आहेत. दर वर्षी एकटय़ा नेपाळमधून वीस हजारांहून अधिक मुली आयात केल्या जातात. दहा वर्षांपूर्वी आणल्या गेलेल्या मुलींचं सरासरी वय चौदा-पंधरा असे. आज मात्र ते नऊ-दहा इतकं खाली आलेलं आहे. या मुलींना इथं आणताना कधी लग्नाचं खोटं आमिष दाखवलं जातं, कधी नोकरी मिळवून देतो, असं सांगितलं जातं, तर कधी दारिद्रय़ाला वैतागलेले आईबापच आपल्या मुलींची विक्री दलालांना करतात. सुरुवातीला देहविक्रयाला नकार देणाऱ्या या मुली नंतर मारहाण, उपास, सिगारेटचे चटके या साऱ्याला सामोरं जात अखेर सराईत वेश्या बनतात. परिणामी दोन ते तीन वर्षांत त्यातल्या कित्येक जणी एच.आय. व्ही. पॉझिटिव्ह होतात आणि वयाच्या विशीतच त्या मृत्युमुखी पडतात.
प्रश्न आहे तो हा, की भारत-नेपाळच्या सीमेवर स्त्री देहाचा हा जो खरेदी-विक्रीचा व्यापार चालतो तो मुळात बिनधोकपणे चालूच कसा शकतो? देशाची सीमा ओलांडताना कुठल्याही चेकपोस्टला त्यांना अडवलं कसं जात नाही? हरवलेली मुलं म्हणून दरवर्षी पंचेचाळीस हजारांचा आकडा भारतात पार केला जातो. ती मुलंही या व्यापारातच ओढली जातात. ठिकठिकाणची पोलीस स्टेशन्स, सरकारी कार्यालयं यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडत नाही? की ज्या दोन देशांत हा व्यवहार घडतो त्या दोन्ही देशांतले पोलीस खात्यातले अधिकारी, सरकारी अधिकारी या रॅकेटमध्ये सामील असतात? आतून त्यांची मदतच त्यांना होत असते? अन्यथा एवढय़ा मोठय़ा संख्येनं केली जाणारी मुलींची निर्यात कुणाच्या नजरेतून सुटेल कशी? चेकपोस्टवरून बिनबोभाट पुढे जाऊ दिल्याबद्दल या अधिकारी वर्गाला त्यांचा हप्ता पोहोचवण्याचं काम दलाल मंडळी मोठय़ा खुशीनं करत असली पाहिजेत, कारण त्या हप्त्याच्या रकमेच्या कित्येक पटीनं पुढे कमवणं त्यांना शक्य होणार असतं. म्हणूनच मुलींचा व्यापार करणाऱ्या या धंद्यात दलालांइतकेच, किंबहुना त्याहून खरे गुन्हेगार  ठरतात ते त्यांना मदत करणारे पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी!
आपल्या देशांतर्गत स्त्रियांच्या विक्रीचा जो धंदा चालतो त्यात प्रामुख्यानं आघाडीवर आहेत ते उत्तर भारतातले देगंगा, हारवा, बशीरहटसारखे मागास भाग. वेश्येच्या धंद्याला लावलेल्या बहुतांश मुली लग्नाच्या खोटय़ा आशा दाखवून तिथून बिहार, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये आणल्या जातात आणि त्यानंतर केवळ अडीच हजार ते दहा हजारांपर्यंत विकल्या जातात. त्यांना आणणारे दलाल त्यांच्या घरी अधूनमधून खोटय़ा पत्त्यावरून पत्र लिहून सारं काही खुशाल असल्याचं कळवत राहतात आणि इकडे त्या मुली बिचाऱ्या सर्वार्थानं लुबाडल्या जातात.
विशेष म्हणजे वेश्या व्यवसायाला कायद्यानं मान्यता हवी, असं म्हणणारे लोकही आहेत; पण तसं तर अजिबातच होता कामा नये, कारण कायद्यानं अशी मान्यता देणं म्हणजे स्त्री देहाच्या बाजाराला, आयात-निर्यातीला मान्यता देणं. कायद्याची मान्यता म्हणजे स्त्रीची स्वेच्छा नव्हे. उलट कायद्याच्या मान्यतेमुळे हा धंदा कधीच बंद होणार नाही, मध्यस्थांचं भरपूर फावेल आणि वेश्यांच्या शोषणाला अंत राहणार नाही.
साधं हे पहा की, वेश्यावस्तीवर धाड पडते तेव्हा काय घडतं? त्या मुलीच पकडल्या जातात. आता त्या मुक्या जनावरांना पकडायचं की कोठी चालवणाऱ्या मालकिणींना, त्यांना मुली पुरवणाऱ्या दलालांना पकडायचं? शिवाय वेश्यांची सुटका केल्यावर त्यांना उदरनिर्वाहाचं कोणतं साधन सरकार उपलब्ध करून देतं? सुटकेनंतर त्यांना परत तिथंच जावं लागतं, कारण जगण्यासाठी पसा लागतो आणि एकदा ‘वेश्या’ म्हणून समाजानं बहिष्कृत केल्यानंतर त्यांच्यासमोर कमाईचा दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नसतो. अशा वेळी ‘या मुली असल्याच..’ अशी टिप्पणी करणाऱ्यांनी सुटका झालेल्या वेश्यांनी कुठं जायचं याचा विचार तरी केलेला असतो का? पुनर्वसन केंद्रात त्यांची पाठवणी केली तर त्यांचा तिथला अनुभव अनेकदा वेश्यावस्तीतल्या अनुभवाहून काही वेगळा नसतो.
एकदाच, फक्त एकदाच, ‘आपली मुलगी या दलदलीत फसली गेली आहे’ अशी कल्पना प्रत्येकानं करून पाहावी आणि मगच हा विषय घृणेचा, तिरस्काराचा आहे की अनुकंपेनं विचार करण्याचा आहे याचा निर्णय करावा.