पालकत्वाचे प्रयोग : हसत खेळत अभ्यास Print

 

alt

आई - बाबा तुमच्यासाठी
उषा गिंडे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपली मुलं संस्कारक्षम व्हायला हवी असतील तर आपल्या रोजच्या घाईतून थोडा वेळ मुलांसाठी काढणं अत्यंत गरजेचंच आहे. त्यासाठी खूप काही वेगळं करण्यापेक्षा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचा वापर करता येऊ शकेल.
आ जच्या तरुण-तरुणींना स्वत:च्या करिअरमुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे जरी काही प्रमाणात खरे असले तरी आपली मुलं संस्कारक्षम व्हायला हवी असतील तर थोडा वेळ मुलांसाठी काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचा वापर करता येऊ शकेल.


मुलांसाठी ही तरुण मंडळी हमखास चॉकलेट्स, पेपरमिंट आणतात. खाण्याबरोबर जर मुलांना गणिताची गोडी लावायची असेल तर  छोटय़ा मुलांना कॅडबरीच्या किती वडय़ा एका पॅकमध्ये आहेत, हे मोजायला मुलांना शिकवणं सहज शक्य आहे. कॅडबरीच्या शुगर कोटेड रंगीबेरंगी गोळ्या पाकिटातून येतात. त्या मोजणं, त्यांचे रंग ओळखणं हे सहज जाता जाता शिकवणं अवघड का आहे? पण त्यासाठी थोडा वेळ नि पेशन्स हवा. तू चार गोळ्या खाल्ल्यास, किती उरल्या? चॉकलेट्स नि गोळ्या मिळून किती झाल्या ही वजाबाकी-बेरीज मुलांना शिकवली तर निश्चित शिकतील.
गोष्टी ऐकायला आवडत नाहीत अशी मुलं विरळा.  रोज रात्री झोपताना नवनवीन कथा सांगितल्या तर मुलांशी जवळीक साधली जाईल नि मुलांच्या ज्ञानात भर पडेल. वयाप्रमाणे गोष्टीही बदलत जातात. लहान मुलांना चिऊकाऊच्या तर तिसरी-चौथीतील मुलांना शिवाजी महाराजांच्या कथा सांगितल्यास त्यांचा इतिहास पक्का होईल. कथा स्वरूपात ऐकलेल्या शिवाजीच्या कथा नंतर सनावळीसहित शाळेत इतिहास शिकणं सोपं जातं हा माझा अनुभव आहे. नातू क्षितिज पाचवी-सहावीत असताना त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याचा वेळ घरी कसा जाणार म्हणून त्याच्याच इतिहासाच्या पुस्तकातील क्रांतिकारकांच्या कथा थोडय़ा रंगवून सांगितल्या. तो मला म्हणाला, ‘‘आजी, या कथा तर किती छान आहेत. खरं तर हाच इतिहास शिकवायला हवा, पण हा धडा ऑप्शनला आहे. आम्हाला फक्त गांधी, नेहरूंचा इतिहास शिकवितात.’’ खरे तर सगळेच क्रांतिकारक ऑप्शनला हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मुलं देशभक्त होण्यासाठी क्रांतिकारकांचा इतिहास महत्त्वाचा नाही? नेहरू, गांधींच्या इतिहासाबरोबर हा इतिहास शिकवल्याने नुकसान काय होणार आहे? एका आंतरराष्ट्रीय शाळेत जाणाऱ्या मैत्रिणीच्या मुलाने मला विचारले, ‘‘शिवाजी, शिवाजी असा काय मोठा होता? आमच्या शाळेत काही शिकवत नाहीत.’’ त्याला मी म्हटले, ‘‘शिवाजीची थोरवी एका वाक्यात सांगायची तर तू आज हिंदू आहेस याचं कारण शिवाजी आहे.’’ त्यावर त्या मुलाने मला उत्तर दिले, ‘‘त्यात काय एवढं, मी मुसलमान म्हणून जगलो असतो..’’ फक्त परीक्षार्थी नि पोटार्थी ही पिढी आहे का हा मला पडलेला प्रश्न आहे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी परदेशात कशी मिळविता येईल एवढंच ध्येय या मुलांचं आहे. यांना ‘देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती’ याचं महत्त्व कसं पटवायचं या विचाराने मी हतबुद्ध झाले. म्हणून आजच्या तरुण पिढीने मुलांचा सर्वागीण विकास होण्यासाठी आई-वडिलांवर आणि देशावर, धर्मावर प्रेम करणारी पिढी तयार करण्यासाठी जागरूक नको का व्हायला? भारताला महासत्ता बनवण्यासाठी याच पिढीचे हात लागणार आहेत हे विसरून कसं चालेल? आजच्या तरुण पिढीला हे जमत नसेल तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कॅसेट्स तरी ऐकवा. मुलांचे कान व मन तृप्त होऊ द्या. विजिगिषुवृत्ती निर्माण होऊ द्या. इतिहासाची गोडी मुलांना आपोआप लागेल. इतिहास हा कंटाळवाणा विषय नसून, सुरस कथा त्यात असतात, हा समज मुलांचा झाला की इतिहासाच्या वाचनात मुले रंगून जातील. अभ्यास व्यक्तिमत्त्वाला पूरक व्हायला हवा. नुसत्या घोकंपट्टीने मुले कंटाळतीलच. मुले शाळेत असताना भारताचा नकाशा भिंतीवर टांगून ठेवावा. जाता-येता नुसता तो पाहण्याने त्यांच्या ज्ञानात भर पडेल. नकाशा वाचनात वेळ असेल तेव्हा आपणही मदत करू शकतो. नकाशाच्या वाचनाने भूगोलातील घोकंपट्टीही फारशी करावी लागणार नाही.
भाषा विषयांची आवड मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी त्यांना संस्कारक्षम उत्तमोत्तम कथा सांगण्यात नवयुग वाचनमालेत दिनूचे बिल, सुखी माणसाचा सदरा, प्राण्यांवर दया करा असे उत्तम धडे होते. या गोष्टी या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आमचेच नाही का? भाषांतील शब्द भांडार वाढविण्यासाठी आम्हीच वेगवेगळे शब्द वापरायला हवेत. क्षितिज लहान असताना पाण्याचे भांडे पडेल, सांडेल, लवंडेल असे वेगवेगळे शब्द आम्ही वापरीत असू. बोलण्यात म्हणी, वाक्प्रचारांचा उपयोग केल्यास मुलांचे मराठी आपोआप सुधारेल, नाहीतर ही इंग्रजी माध्यमातील मुलं काळा शुभ्र नि पांढरा कुट्ट असंही म्हणताना ऐकलंय मी. तसेच इलेक्ट्रिकच्या बटणांना हात पोचत नाही, असं म्हणण्याऐवजी ‘हात रीच’ होत नाही, असं म्हणून इंग्रजी नि मराठी भाषेचा खून पडतो. तेव्हा आपली मायबोली जपण्याचे, वाढविण्याचे काम आपलेच नाही का? जगाची भाषा इंग्रजी ती शिकायला हवीच. भाषा अवांतर वाचनानेच समृद्ध होतात, शब्दसंपत्तीही वाढते.
गणितासारखे संस्कृत विषयात मार्क्‍स मिळविता येतात म्हणून नातींना संस्कृत घेण्यास मी उद्युक्त केले. जाता येता संस्कृत सुभाषिते मी त्यांच्या कानाशी म्हणत असे. त्याचा फायदा पल्लवीला झाला. अभ्यासक्रमाबाहेरील सुभाषित परीक्षेत येताच ती एकटीच त्या सुभाषिताचा अर्थ लिहू शकली, त्यामुळे भलतीच खूशही झाली. खरे तर घरात भिंतीवर, टेबलावर मोठय़ा अक्षरांत लिहून ठेवावीत. बघून बघून मुलांची पाठ होतात नि उत्तमोत्तम संस्कारही होतात. पाठांतर वाढते, साहित्याची जाण येते, गोडी लागते ती वेगळीच. सुभाषिते ही संस्कृत भाषेची अमूल्य रत्ने आहेत. निबंधासाठी तर यांचा फारच उपयोग होतो. संस्कृत १०वीला घेतल्याचे चीज नातींनी केले. पल्लवीने १०वीत संस्कृतमध्ये ९८/१०० मिळविले नि वल्लरीने ९९/१००. थोडीशी मेहनत घेतल्याचे हे फळ.
मुले जरी क्लासला जात असली तरी हसत खेळत फावल्या वेळात आपण जमेल तेवढी मदत केल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढतो. व्यक्तिमत्त्वही उजळते यात शंका नाही, हा माझा मुला-नातवंडांबरोबरचा अनुभव आहे. संस्कारक्षम कथा ऐकून उत्तरासह चारी नातवंडे उत्तेजित झाली. अधूनमधून वेगवेगळ्या भाषेतील उत्तम वचने त्यांच्या कानावर पडतील तर भाषा समृद्धीला कितीसा वेळ लागेल?
मुलांना आपण शिकवत असताना आपल्याला आनंद होतोच, पण आपल्यालाही मुलं शिकवतात. आरती अडीच-तीन वर्षांची असताना पाटी आणली त्यावर मी मोठा अ काढला. तिला मी म्हणाले, याला ‘ए’ म्हणायचं तर ती मला म्हणाली (या मधल्या दांडीवर हात ठेवून) ‘‘यावर पाय ठेवून वर चढून गणपत पंखा पुसतो ते हे आहे.’’ तिला स्टूल म्हणायचे होते, पण अडीच वर्षांच्या मुलीला तो शब्द माहीत नव्हता. नंतर मी  इ काढला. तिला म्हणाले, याला ‘बी’ म्हणायचे तेव्हा ती माझ्याकडे पाहत राहिली नि म्हणाली, ‘‘आजोबांचा बंद केलेला चष्मा आहे. तुला माहीत नाही का?’’ मला हसूच आले. पाटी पुसून मी उ काढला नि मी तिला म्हणाले, याला ‘सी’ म्हणायचं तेव्हा ती पटकन म्हणाली, अगं आई हा आकाशातला मोडका चांदोबा आहे. चंद्रकोर हा शब्द अडीच वर्षांच्या मुलीला माहीत नसल्याने तिने मोडका चांदोबा असे म्हटले होते. ‘टाइम्स’मध्ये टीची मोठी जाहिरात होती. तो मोठा ळ दाखवून तिला म्हणाले, याला ‘टी’ म्हणायचे. आईला काही कळत नाही अशा आविर्भावात माझ्याकडे पाहून ती मला म्हणाली,  बाबा दाढी करतात ते हे आहे. रेझर शब्दही तिला त्या वेळी माहीत नव्हता, पण या अक्षरातील साधम्र्य असणाऱ्या वस्तू मला तिने अचूक सांगितल्या.
घरोघरी हँड शॉवर त्या वेळी झाले नव्हते. तीन वर्षांचा क्षितिज मावशीकडे जाऊन हँड शॉवरशी मनसोक्त खेळून आला होता. दुसरे दिवशी अंघोळीच्या वेळी मला म्हणाला, आजी मला टेलिफोनचा पाऊस दे. मला काही केल्या कळेना. सुनेला विचारले तेव्हा ती म्हणाली, अहो, त्याला हँड शॉवर हवाय. आपण मुलांना शिकवतो, पण तीही आपल्याला बरंच काही शिकवतात. फुकट मस्तपैकी करमणूक करतात. उत्तराला पिकलेला बटाटा हवा होता. मी चक्रावून गेले. मला उकडलेला बटाटा माहीत, पण तिने मला चिकूच्या टोपलीकडे नेले नि मला म्हणाली, हे पिकलेले बटाटे मला खायचे आहेत.
अशा कितीतरी गमतीजमतींना या करिअरिस्ट तरुणी मुकत आहेत याचंच मला वाईट वाटतं. तरुणींनो थोडा वेळ काढा नि हा शिकण्यातला नि शिकवण्यातला आनंद लुटा.