एक उलट..एक सुलट : ‘जाणं’ Print

अमृता सुभाष ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मृत्यूचा विचार करत असताना मला जाणवतं, माझ्या जिवाभावाच्या एकाही माणसाच्या ‘जाण्याच्या’ क्षणापाशी मी शरीराने असेन, पण मनाने खरोखर होते का? असू शकले आहे का? आता प्रत्येक ‘त्या’ माणसाचा जाण्याचा ‘तो’ दिवस आठवतो तेव्हा माझ्या वागण्यातलं एक साम्य दिसतं मला.. मी कधीही ‘त्या’ मृत्यूच्या दिवशी रडू शकलेली नाही. माझ्यापर्यंत ते सगळं खरंच पोहोचतं आहे का? मी पोहोचू दिलं आहे?
मला हे बदलायचं आहे.. या अवघड धडय़ासमोर शांतपणे उभं राहायचं आहे..
ते माझे फार जिवाभावाचे होते. फार जवळच्या नात्यातले होते. डॉक्टर होते. एका छोटय़ाशा गावातले डॉक्टर. ज्याचं इंजेक्शन ‘कधी दिलं कळत नाही’ अशा हलक्या हातानं दिलं जाणारं! गावात आणि गावाच्या आसपासच्या गावांमध्येही त्यांचं खूप नाव. सायकलवरून दिवसरात्र गावातल्या, गावाबाहेरच्या लोकांसाठी वणवण फिरणारे. रात्री एक-एक, दोन-दोन वाजता गावाबाहेरच्या रुग्णांच्या ‘व्हिजिट्स’ आटोपून सायकल मारत घरी परतणारे आणि पहाटे पुन्हा घराबाहेरच्या दवाखान्यात हजर असणारे. त्यांचं रोगाचं निदान कधी चुकलं नाही. त्यांच्या हाताला हमखास गुण! लांब-लांबच्या गावातनं आलेल्या कितीतरी मातीतल्या माणसांच्या दुखऱ्या शरीरांना त्यांनी समजून घेतलं. किती किती शरीरांना.. शरीराशी त्यांचं सामंजस्याचं नातं होतं. त्यांना शरीराची भाषा कळायची इतरांच्या, तशीच स्वत:च्याही.. साठ-सत्तर वर्षांचे झाल्यानंतर हळूहळू दवाखान्यातलं काम थांबलं, पण त्यांनी शरीराची हालचाल थांबू दिली नाही. त्यांना माहीत होतं, शरीर जितकं हलतं-फिरतं, तितकं आनंदी. सकाळी न चुकता फिरायला जायचं. ऐंशी-नवव्दीपर्यंत निरोगी जगले. नेहमी उत्साहात असायचे.. नव्वदीच्या नंतर काही वर्षांनी एके दिवशी त्यांनी शांतपणे ठरवलं, आता बास! झालं माझं छान जगून. त्या दिवशी गुरुवार होता. ते त्यांच्या मुलाला म्हणाले, ‘‘उद्यापासून मी काही एक खाणार नाही.’’
त्यापुढचं सगळं शिस्तबद्ध होतं. दिवसभरात सकाळी दोन चमचे पाणी, मग दुपारी दोन चमचे चहा, संध्याकाळी परत दोन चमचे चहा, रात्री पुन्हा दोन चमचे पाणी. असे दिवसाचे आठ चमचे द्रव पोटात जाणार फक्त. मात्र रोज एकच बी.पी.ची गोळी तेवढी चालू ठेवायची. कारण बी.पी. वाढलं तर अर्धागवायूचा झटका येऊ शकतो, जसा डॉक्टरांच्या वडिलांना आला होता त्यांच्या शेवटच्या दिवसांत. तसा स्वत:ला येऊ नये, आपल्या प्रेमाच्या माणसांना आपलं करावं लागू नये म्हणून ती एक गोळी शेवटपर्यंत चालू. हळूहळू वजन कमी व्हायला लागलं, पण चेहरा हसरा होता. एके दिवशी मुलीला म्हणाले, ‘‘मला बाथरूममध्ये घेऊन चल.’’ ती म्हणाली, ‘‘आता शक्य नाही बाबा, तुमच्यात शक्ती नाही ना..’’ पॅन दिला. त्या दिवशी चहाचा चमचा घेऊन पुढे आलेला मुलीचा हात त्यांनी थांबवला. तिचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘‘आता मला कसलाही आग्रह करायचा नाही. आता मला बाथरूममध्ये जाता येत नाही ना. आजपासून चहाही बंद. हा शेवटचा चहा.’’ रडणाऱ्या मुलीच्या हातावर प्रेमाने थोपटलं. त्यांना चहा खूप आवडायचा. खूपच. इतक्या शांतपणे तो त्यांनी थांबवला. शेवटी उरलं फक्त गोळीपुरतं घ्यायचं घोटभर पाणी. गोळी गिळली गेली की ते हात वर करायचे. ‘आता अजून पाणी नको’ म्हणून. कुणी न राहवून स्फुंदत ‘एक चमचा तरी घ्या’ म्हटलं, तर शांत निग्रहानं ओठ मिटायचे. शरीर कृश होत चाललं, पण चेहऱ्यावर शांत हसू होतं. हळूहळू कुणाला ओळखेनासे झाले. मलाही ओळखलं नाही. मी हे सैरभैर होऊन माझ्या एका ज्येष्ठ लेखकमित्रांना सांगितलं, तेव्हा ते म्हणाले, ‘‘जाणाऱ्याला जावे लागते, जाताना दार लावून घ्यायचे असते.’’ अखेर माझे ते ‘जाणारे’, जिवाभावाचे पुढल्या गुरुवारी, म्हणजे त्यांच्या जाण्याच्या निर्णयानंतर केवळ आठच दिवसांत, शांतपणे गेले. कुठल्याही वेदनेशिवाय. दिवा विझत जावा.. आस्ते आस्ते. तितक्या मूक सहजपणे..
‘ती’ही माझ्या जिवाभावाचीच. आयुष्यभर फक्त नवऱ्यासाठीच जगल्यासारखं जगली, पण त्यात तिची काही तक्रार नव्हती. तिला तेच येत होतं. तेच करायचं होतं. तेच तिने आनंदाने केलं. फार छान, हसरं आयुष्य जगली. मुलं, मुली छान वाढवली. ती सगळी चांगल्या घरात पडली. हुशार, सुंदर नातवंडं, नातवंडांची लग्नं, पतवंडं. सगळं पाहिलं. लोण्यासारखी मऊ, प्रेमळ आजी झाली. तिची ‘जायची’ वेळ कर्करोगाच्या आजाराने एका इस्पितळात आली. सगळे तिच्या आसपास. सगळ्यांची लाडकीच होती ती. आयुष्यभर हातात हात घालून चाललेला तिचा नवरा तिच्या उशाशी. तिचा लोण्याचा हात आपल्या हातात घेऊन ‘जाऊ नको गं..’ म्हणत छोटय़ा बाळासारखा स्फुंदत रडणारा. ती त्याला म्हणाली, ‘‘आता रडायचं नाही. छान संसार केला की आपण. मुलं-बाळं, नातवंडं-पतवंडं, सगळं भरभरून मिळालं की आपल्याला. आता मला छान निरोप द्यायचा. तो बघा, मला पांढरा, तेजस्वी प्रकाश दिसतो आहे. खूप छान आहे हो तिथे. आता मला जाऊ दे.’’ ती गेली. तिच्या जाण्यातला शांतपणा माझ्यासाठी अप्रूपाचा आणि माझ्या त्या वेळच्या समजुतीच्या पूर्ण आवाक्याबाहेरचा होता.
त्या बाईंची आणि माझी फक्त एकदाच भेट झाली. तीच पहिली आणि शेवटची. ‘श्वास’ चित्रपटातली ‘मेडिकल सोशल वर्कर’ची भूमिका करायची म्हणून अभ्यासासाठी एका समाजसेविकेला भेटायला गेले होते. ती मला त्यांच्याकडे घेऊन गेली होती. जायच्या आधीच म्हणाली होती ती, ‘‘कर्करोगाची शेवटची स्टेज आहे. आता फार थोडे दिवस..’’ त्यांचं घर छोटंसं होतं. एकच खोली, पण खूप स्वच्छ ठेवलेली. त्यांचं हसू फार सुंदर होतं. त्यांनी खूप सुंदर दिसणाऱ्या फुलांची झाडं लावली होती. त्या जाता जाता सहज म्हणून गेल्या, ‘‘नंतर या झाडांची काळजी ‘ही’ घेणार आहे.’’ समाजसेविकेनं मंद हसून होकाराची मान हलवली. ‘‘थोडय़ा वेळाने मुलगी येणार आहे,’’ म्हणाल्या. खूप बारीक झाल्या होत्या. अंगातला गाऊन ढगळ होत होता. निघताना त्या अचानक म्हणाल्या, ‘‘चांगला होऊ दे सिनेमा. तेव्हा मी नसेन मात्र बघायला..’’ त्या शांत वाक्याने मी खूप घाबरून गेले होते..
या सिनेमाने, अशा अनेक प्रसंगांनी, ‘मृत्यू’ दाखवला. नुसता ‘मृत्यू’च नाही तर तो समोर दिसत असताना त्याच्यासमोर आपापल्या आवाक्यानं, पण ‘ठाम’ उभी असणारी माणसं दाखवली.
याच भूमिकेची तयारी म्हणून एका समाजसेविकेबरोबर एका इस्पितळात गेले. बाकी सर्व वॉर्ड्स मन घट्ट करून पाहिले. ऑपरेशनसुद्धा पाहिलं, पण लहान बाळांच्या ‘आयसीयू’त धीर खचला. एक तीन-चार वर्षांचं पिटुकलं.. फार गोड होतं. त्याच्या सगळ्या शरीरभर नळ्या  लावलेल्या होत्या. त्या नळ्यांच्या जाळ्यात असलेल्या त्या मरणासन्न बछडय़ाजवळ त्याची माऊली बसली होती. तिच्या हातात एक खेळण्यातलं माकड होतं. ती अर्धवट शुद्धीतल्या तिच्या पिल्लाला, ‘‘हे बघ.. हे बघ..’’ असं ते दाखविण्याचा प्रयत्न करीत खेळवत होती आणि एका क्षणी, त्या सर्व नळ्यांच्या जंजाळातून ते इटुकलं त्या माकडाकडे बघून मंद हसलं. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जे उमटलं ते शब्दांपलीकडचं. ती अर्धवट उठली, पुन्हा बसली.. आय.सी.यू.च्या दाराच्या दिशेने बघून अस्फुट, पण ओरडल्यासारखं म्हणाली, ‘‘अहो हसला.. हसतोय.. अहो..’’ मी अचानक त्या समाजसेविकेला ‘‘सॉरी,’’ म्हणून तिथून बाहेर आले. बाहेरच्या बाकावर बसले. ती बाहेर आली माझ्यामागे, तर मी अचानक तिला ‘‘मी घरी जाते,’’ असं सांगून रिक्षात बसले.
मला तिथून पळून जाता आलं; पण सगळीकडून नाही येत असं पळून जाता, हे आता पुढच्या आयुष्यात शिकते आहे. जिवा -भावाच्या, आतडय़ात रुतलेल्या माणसांचे मृत्यू मला हे ‘न पळणं’ शिकवत आहेत.
मला पूर्वी नेहमी एक  स्वप्नं पडायचं. माझ्या आवडत्या सगळ्या माणसांच्या बाबतीत ते स्वप्न मला पडलेलं आहे. स्वप्नात माझ्या ‘त्या’ आवडत्या माणसाचा मृत्यू होतो. मग नंतरची माझी जीवघेणी अवस्था. मला या स्वप्नांची खूप भीती वाटायची. मी जागी झाल्यावर स्वत:ची समजूत घालायचे. ते स्वप्नच होतं म्हणून हायसं वाटायचं. स्वप्नात ज्या माणसाचा मृत्यू दिसतो तो माणूस दीर्घायुषी होतो, असा धोशा मी स्वप्नानंतरचा पूर्ण दिवस मनातल्या मनात लावायचे. नंतर नंतर तो माझ्या आवडीचा निकषच बनून गेला होता. त्या गोष्टीचा एक विनोदच होऊन गेला होता. अमूक व्यक्तीचा मी स्वप्नात मृत्यू पाहिला त्या अर्थी ती माझी जिवाभावाची झाली असणार, असं मी माझ्या नवऱ्याला म्हणायचे. हे सगळं तोपर्यंत घडत होतं जोपर्यंत माझी ती ‘स्वप्नातली’ जिवाभावाची सगळी माणसं प्रत्यक्षात होती. म्हणजे आता त्यातली काही माणसं जेव्हा खरंच नाहीत.. तेव्हापासून ती स्वप्नंही पडणं थांबलं आहे. पूर्ण. आता ज्या स्वप्नांकडे बघताना मला वाटतं, ती स्वप्नं म्हणजे माझ्या घाबरलेल्या मनाने स्वत:ची करून घेतलेली तयारी होती. म्हणजे अतिरेक्यांच्या खऱ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयारी म्हणून कधी कधी नाही का लुटुपुटीचे हल्ले करवून सुरक्षा यंत्रणेची तयारी केली जाते.. तशी मनाची तयारी. प्रत्यक्ष मृत्यू आधी स्वप्नात पाहिलेला असेल तर कदाचित तो खरा घडल्यावर कमी भीती वाटेल, ही भाबडी समजूत. पण आता जेव्हा प्रत्यक्षात जिवाभावाच्या माणसांच्या जाण्यासाठी ‘जाणाऱ्याला जावे लागते, जाताना दार लावून घ्यावे लागते,’ या न्यायाने दारं लावण्याची वेळ खरोखर येत गेलेली आहे, तेव्हा लक्षात आलं आहे या ‘स्वप्न’ तयारीला काहीच अर्थ नाही. आपण कुणाच्याच जाण्यासाठी आधी मनाची तयारी करू शकत नाही. आपल्या जिवाभावाचं कुणीसं वर्षांनुर्वष मरणासन्न असतं. ते माणूस गेलं तरच त्याची सुटका होईल, हे कळत असतं. मनाला पटत असतं. त्यामुळे वाटतं, झाली आहे आता आपल्या मनाची तयारी आणि ते माणूस जातं. तत्क्षणी कळतं, काहीच झाली नव्हती आपली तयारी. इतकं सगळं ढळढळीत समोर दिसत घडल्यावरही आपण पुन्हा आपले बेसावध आणि हतबलच! हा धडा खूप अवघड आहे आयुष्याचा आणि ऑप्शनलाही टाकता येत नाही.
ऑप्शनला टाकायचा प्रयत्न करून पाहिला. म्हणजे माझा एक अगदी जवळचा मला सोडून गेला तेव्हा मी काय केलं.. खूप काम घेतलं अंगावर. कामात बुडवून टाकलं स्वत:ला. विचार करायलाही वेळ मिळू नये इतकं काम केलं.. पण अवकाशाच्या एका निमिषातसुद्धा तो मृत्यू आसपास जाणवत होताच.
या सगळ्यांचा विचार करताना आता जाणवतं, माझ्या जिवाभावाच्या एकाही माणसाच्या ‘जाण्याच्या’ क्षणापाशी मी शरीराने असेन, पण मनाने खरोखर होते का? असू शकले आहे का? आता प्रत्येक ‘त्या’ माणसाचा जाण्याचा ‘तो’ दिवस आठवतो तेव्हा माझ्या वागण्यातलं एक साम्य दिसतं मला.. मी कधीही ‘त्या’ मृत्यूच्या दिवशी रडू शकलेली नाही. माझ्यापर्यंत ते सगळं खरंच पोहोचतं आहे का? मी पोहोचू दिलं आहे?
मला हे बदलायचं आहे.. या अवघड धडय़ासमोर शांतपणे उभं राहायचं आहे..
गिरीश कर्नाडांचं एक नाटक आहे ‘अग्निजल’ नावाचं. त्यात नित्तीलाई नावाच्या पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे. ‘‘फुलांना जर माहीत असतं ती कोमेजणार आहेत तर ती इतक्या आनंदाने उमलली असती का?’’
म्हणूनच मला माझ्या, माझ्या आसपासच्या कोमेजण्याकडे डोळे उघडून बघायचं आहे.. कारण मला नित्तीलाईच्या फुलासारखं दररोज, आनंदानं उमलायचं आहे!