धुळे पार्लर ते आंतरराष्ट्रीय स्पा Print

शची मराठे ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

इंग्रजीचा गंधही नसलेल्या रेखा चौधरी नंदुरबारमध्ये वाढल्या, शिकल्या. लग्नानंतर धुळ्यात, शिरपूरला आल्यावर त्यांनी तिथं पार्लर सुरू केलं आणि तिथंच त्यांच्यातल्या उद्योजिकेचा जन्म झाला. आज जागतिक स्तरावरच्या पंचवीस ब्रॅण्डस्ची जबाबदारी स्वीकारलेल्या रेखा चौधरींनी ‘नोव्हेल रोप मसाज', ‘जीईओ-थर्मो मसाज' आणि ‘हॅंड अ‍ॅंड फुट स्पा' या स्पासाठीच्या ट्रीटमेंटचं पेटंट मिळवलं आहे. ‘करेसा’ ही स्पा चेन सुरू केलीय. गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या रेखा चौधरी या उद्योजिकेचा हा खणखणीत प्रवास..
रेखा चौधरी, वेलनेस स्पा जगतातील एक नावाजलेलं नाव. आज भारतात येणाऱ्या अनेक विदेशी कंपन्या केवळ रेखा चौधरी या एका नावावर विश्वास ठेवून कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक भारतात करतात. झोया, लावा, सोतेज, रसुल हमाम, बाबर, रेमिलोअर अशा एक-दोन नव्हे तर जवळपास पंचवीस ब्रॅण्डस्ची जबाबदारी रेखा चौधरी त्यांच्या जेसीकेआरसी (खउङफउ) या कंपनीच्या माध्यमातून सांभाळत आहेत. त्यांची ‘करेसा’ हे स्पा चेन देशा-विदेशात उभी राह्य़ली आहे, रहाते आहे.
यासर्वामागे रेखा चौधरी यांची या क्षेत्रातली गेली वीस वर्षांची मेहनत आहे. स्पा आणि ब्युटी क्षेत्रातील कोणत्याही शिक्षणाशिवाय आणि    एमबीएच्या कोणत्याही पदवीशिवाय त्यांनी हे यश कमावलंय. मात्र या आंतरराष्ट्रीय यशामागच्या गाथेची सुरुवात होते ती महाराष्ट्रातील नंदुरबारपासून. रेखा चौधरी यांचा जन्म, शिक्षण सगळं नंदुरबारचं. वडील हॉटेलच्या व्यवसायात आणि आई घर सांभाळून दुधाचा उद्योग करायची. चार भावंडांमधली रेखा एकच बहीण, त्यामुळे लहानपणापासूनच लाडाकोडात वाढलेली. नूतन कन्या शाळेत शिकलेली रेखा अभ्यासात हुशार होतीच, पण खेळातही अव्वल होती. भालाफेक, उंच उडी, धावणे आणि बास्केट बॉलमध्ये तर त्यांच्या कप्तानपदाखाली शाळेनं पार जिल्हा पातळीपर्यंत मजल मारली होती.
त्या सांगतात, ‘‘मी अत्यंत बेधडक स्वभावाची. गावात बिनधास्त बाइक चालवायचे. घरी आईला स्वयंपाकात मदत करायचे. एखादी गोष्ट आवडली की करायची म्हणजे करायचीच, ती गोष्ट कशी करतात त्याचं निरीक्षण करायचं, त्याचं तंत्र जाणून घ्यायचं आणि मग करायचं, ही माझ्या कामाची पद्धत. माझ्या आईला पुरणपोळ्या नीट जमायच्या नाहीत. माझ्या आजीच्या तेराव्याला पुरणपोळ्या करायच्या होत्या. आई नेहमीप्रमाणे शेजारच्या स्त्रियांच्या मदतीनं पुरणपोळ्या करीत होती, मला काही ते आवडलं नाही.. मी इतरांचं बराच वेळ निरीक्षण करीत होते. ठरवलं, आज पुरणपोळ्या आपण करायच्याच.. बसले, भराभरा पुरणपोळ्या केल्या. जमलेल्या बायकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. निरीक्षणातून शिकण्याच्या याच गुणामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलेय.’’
‘‘वयाच्या चौदाव्या वर्षी मी गावातल्या एका नवऱ्या मुलीचा मेक-अप केला होता. तेव्हा मोठय़ा शहरातसुद्धा ब्युटीपार्लर यायला नुकतीच कुठं सुरुवात झाली होती. आमच्या गावाकडे तर तसं काहीच नव्हतं.. भुवया कोरायला असंच शिकले. अनेकदा ते करताना दोरा कसा धरायचा हे कळायचं नाही. मग अर्धी भुवई माझ्या हातून उडायची.. मग तिथं मी काजळ पेन्सिल लावायचे. अशा अनेक प्रसंगांतून मी शिकत गेले.
  बारावी झाल्यावर वयाच्या अठराव्या वर्षी माझं लग्न होऊन मी शिरपूरला (धुळे) आले. नवऱ्याचा पेट्रोल पंपाचा व्यवसाय होता. तो त्याच्या व्यवसायात व्यस्त असायचा. माझी नावीन्याची हौस मला स्वस्थ बसू देईना. मग मी पेंटिग्जचे, गरब्याचे क्लासेस घेऊ लागले. हळूहळू बी.कॉमपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.. आमच्याकडे नवरात्रीचा उत्सव जोरात असायचा. मी लहान मुलांचे गरबे बसवायचे. मोठं पटांगण भाडय़ानं घ्यायचे, लाइव्ह संगीताच्या तालावर गरबे इतके रंगायचे की ते पाहायला आजूबाजूच्या गावांतले लोक  जमायचे. त्यातली निम्मे लोक मी बाइक कशी चालवते ते पाहायला जमलेली असायची. खेळदेखील एकीकडे चालू होता.. नवरा, सासूबाईंना हे सगळं व्यवस्थित पटवून देऊन मी करायचे.. म्हणजे पटांगणावर खेळायला जायचे, दुपारी घरी पापड-लोणची घालायचे, संध्याकाळी गरबा, पाककलेचे वर्ग घ्यायचे. जेव्हा मुलगी झाली तेव्हा मात्र खेळ मागे पडला. १९८७ मध्ये ब्युटीपार्लरचा अभ्यासक्रम पूर्ण केला, तेव्हा तिथं व्हॅिक्सग, आयब्रो, मसाज या गोष्टी मला आधीपासूनच येत होत्या. एक वर्षांचा कोर्स मी अडीच महिन्यात पूर्ण केला आणि माझं पहिलं ब्युटीपार्लर सुरू केलं, ‘एंजल ब्युटीपार्लर’. माझी अपॉइंमेन्ट घेऊन स्त्रिया माझ्याकडे यायच्या. तेव्हा सुद्धा मी फेशियलसाठी हजार-दीड हजार रुपये घ्यायचे. शेवटची ग्राहक सहा वाजेपर्यंत संपवायची आणि बाइक घेऊन मुलींना शाळेत आणायला जायचे.. दिवसभर सगळे व्याप करून दिवेलागणीपर्यंत मी घरी हजर असायचे. त्यामुळे मला आवडलेल्या गोष्टी करण्याची मुभा होती. मुली जसजशा मोठय़ा व्हायला लागल्या तसतसं त्यांच्या शिक्षणाची काळजी वाटू लागली. मला इंग्लिशचा गंधही नव्हता. मुलींना इंग्लिश माध्यमांमध्ये घातलेलं. त्यांच्या पुस्तकांची मराठीतील कॉपी आणायचे. त्या एक वाक्य इंग्लिशमध्ये वाचायच्या आणि मी मराठीतून, असा आमचा अभ्यास चालायचा. पण त्यातून काही निष्पन्न होत नव्हतं. चांगलं शिक्षण देण्यात आपण कमी पडतोय ही बोच मनाला सलत होती. आणि मग मुंबई गाठायचं ठरवलं. खूप विरोध झाला. मुलींच्या शिक्षणासाठी इतकं कशाला करायला हवं, मुलगा असता तर ठीक होतं, असेही युक्तिवाद केले गेले, पण त्या सगळ्यांना न जुमानता मी नवी मुंबईत आले. मुंबईच्या गर्दी, गोंगाटापेक्षा मला नवी मुंबई आवडली. मुलींच्या शिक्षणाबरोबरीनचं माझं इंग्लिश भाषेचं शिक्षण सुरू झालं. मी इंटरनेट शिकून घेतलं, त्यावर मी दिवस-रात्र वेगवेगळे शब्दांचे अर्थ शोधायचे. वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्यांची नावं, स्पा म्हणजे काय, खूपदा तर स्पेिलगदेखील चुकीचं असायचं. पण मी प्रयत्न सुरू ठेवले. शेजारच्या मुलांशी तोडक्या-मोडक्या इंग्लिशमधून बोलायचे. ते खूप हसायचे. म्हणायचे, ‘लीव्ह इट, यू कॅन नेव्हर स्पीक इंग्लिश.’ मला खूप वाईट वाटायचं. घरापासून दूर राहत होते. एकटेपणा जाणवायचा. शनिवार-रविवार गावाला जायचं, बाकी दिवस मुंबईत. खूप तणावाचा काळ होता तो. मग जवळच एका उत्पादन कंपनीचं वितरणाचं काम करायला घेतलं, त्यांची लेक्चर्स इंग्लिशमधून असायची. शिक्षिका इंग्लिशमध्ये बोलायची आणि मी वहीची पानंच्या पानं त्या जे इंग्लिशमध्ये बोलतील ते मराठीत उतरवून काढायचे. असा प्रवास सुरु होता..
 एकदा मुंबईत नेहरू सेंटरला ‘रेमिल्युअर’ कंपनीचं सेमिनार भरलं होतं. मुंबईतल्या अनेक ब्युटीशिअन्स, लहान मोठय़ा पार्लर्सच्या मुली-स्त्रिया, सगळ्या होत्या. तिथं मी अर्धवट इंग्लिशमधून माझ्याबद्दल सांगितलं आणि ‘रेमिल्युअर’ कंपनीचं अख्ख्या भारतासाठीचं वितरण मिळवलं आणि तोच माझ्या आयुष्यातील टìनग पॉइंट ठरला. त्याच ट्रेिनगकरिता २००४ मध्ये फ्रान्सला गेले. मी लहानपणापासूनच ठरवलं होतं, की परदेश प्रवास करीन तर कामाच्या निमित्तानंचं, फिरण्याकरिता नाही. माझा प्रवास सुरू झाला.. माझे कपडे, गावातल्या उच्चारातलं बोलणं पाहून मोठे क्लायंटस्, फाइव्ह स्टार हॉटेल्स मला फक्त पाच मिनिटं वेळ द्यायचे, त्या  ५ मिनिटांत माझी त्या उत्पादनाविषयीची संकल्पना सांगणं अपेक्षित असायचं, पण ते सांगता सांगता ही पाच मिनिटं एक तासात रूपांतरित व्हायची, माझ्यासाठी चहा-कॉफीची ऑर्डर जायची. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढला.’’
आणि एका मागोमाग एक परदेशी ब्रॅंडस् त्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले.. त्या कामाबद्दल त्या सांगतात,‘‘जेव्हा एखादा ब्रॅण्ड आमच्याकडे येतो तेव्हा त्या कंपनीकडे भारतातील बाजारपेठेचं सव्र्हेक्षण असतं आणि त्यावरून त्यांचं उत्पादन विकलं जाईल का, त्याचा खप किती असेल याचे काही निष्कर्ष त्यांनी बांधलेले असतात. उत्पादन आमच्याकडे आल्यावर आम्ही ते नुसते विकत नाही तर त्याबरोबर सेवादेखील देतो. एखाद्या सलोन किंवा स्पा सेंटरमध्ये हे उत्पादन वापरायचं कसं, त्याबाबत तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतो. त्यामुळे मी म्हणते की, आम्ही उत्पादन नाही विकत, आम्ही एक संकल्पना, एक थीम विकतो. एखादं उत्पादन बाजारात उतरवण्यापासून ते स्थिरस्थावर होईपर्यंतची जबाबदारी आम्ही घेतो. मात्र कोणताही व्यवहार करण्याआधी संबंधित कंपनीच्या उत्पादनाचा तांत्रिक दर्जा आम्ही तपासतो, उत्पादन बनवताना त्यांनी वापरलेले घटक, त्यामुळे भारतीय लोकांच्या त्वचेवर होणारे परिणाम आणि अर्थातच त्या कंपनीचा इतिहास आणि कामाची पद्धत आदी सगळं आमच्या मनासारखं असेल तरच आम्ही पुढे जातो.’’
‘‘प्रवास आता जोरात सुरूच झाला होता..  त्याच दरम्यान ‘ब्युटीक’च्या मायाताई परांजपे यांच्याशी भेट झाली. त्या म्हणाल्या, तुला या क्षेत्रातलं ज्ञान आहे, फक्त एका पदवीची कमी आहे. त्यांच्याच सांगण्यावरून ब्युटीशिअनसाठी आवश्यक ‘सिडेस्को’ परीक्षा दिली.’’
‘‘एकीकडे माझे फेस मसाज, बॉडी मसाज यामधले प्रयोग चालू होते. तेव्हा ‘स्पा’ ही संकल्पना नवीन होती, फक्त काही बडय़ा हॉटेल्समध्ये ‘स्पा’ची सेवा पुरवली जायची. खरं तर ‘स्पा’ ही संकल्पना आपल्याकडेही पूर्वीपासूनच होती. आपल्याकडे राजघराण्यात राजा-राणी यांना उटणं, विविध लेप, सुगंधी तेलं लावून न्हाऊ-माखू घालण्याची पद्धत होती. दिवाळीच्या पहिल्या दिवसाचं अभ्यंगस्नान हे आपल्या सगळ्यांना माहीती आहेच. माझी आई मी बाळंत झाल्यानंतर कमरेला, पोटाला शेक द्यायची, तेव्हा खूप बरं वाटायचं, दुखणं कमी व्हायचं. तेव्हाच ठरवलं की हे सगळं शोधून काढायचं.. आपल्या देशातील विविध जाती-जमातीतही स्वत:च्या अशा पारंपरिक उपचार पद्धती आहेतच की. मला हे सगळं जतन करायचंय. परदेशातून आलं की ते चांगलं, ही संकल्पना आता बदलली पाहिजे. या सगळ्याचा अभ्यास करून मी ‘नोव्हेलरोप मसाज', ‘जीईओ-थर्मो मसाज’ आणि ‘हॅंड अॅंड फुट स्पा' या स्पासाठीच्या ट्रीटमेंट तयार केल्या आणि त्याचं पेटंट घेतलं. आपलं ज्ञान, आपलं संशोधन आपल्याकडेचं राहिलं पाहिजे हाच यामागचा हेतू आहे. आणि त्याचसाठी ‘करेसा’ ही स्पा चेन सुरू केली. फ्रेंच भाषेत करेसाचा अर्थ होतो ‘प्रेमळ स्पर्श’. ‘करेसा’च्या भारतात सहा शाखा आहेतच, शिवाय आणखी चार भारतातच, तर दोन परदेशात सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या लावण्यांमध्ये सोळा शृंगारांचा उल्लेख आहे. हे सगळं पूर्वीही होतं तेव्हा फक्त ते उच्चवर्गीयांसाठी होतं, आता मला ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आजच्या धकाधकीच्या दिवसांत माणूस अनंत कटकटींनी वैतागला आहे. स्वत:ची ऊर्जा, चतन्य हरवून बसला आहे. ‘स्पा डेस्टिनेशन’ ही अशी जागा आहे, जिथं शरीराला ही ऊर्जा पुन्हा मिळवून दिली जाते.’’ त्या सांगतात. स्वत:चा स्पा उघडण्याबरोबर रेखाताई इतरांना एखाद्या स्पाची रचना, त्यांची बांधणी, उत्पादन संकल्पना, तेथील कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण तसेच स्पाची उपकरणं कशी वापरायची या सगळ्याची माहिती करून देतात. आणि त्यासाठी त्यांचे भारतभर दौरे चालू असतात.
रेखाताईच्या संकल्पनेतून आकार घेणारं जगातलं सर्वात मोठं स्पा डेस्टिनेशन रशियात तयार होतंय.. एकूण सहा कि.मी. परिसरात पसरलेल्या या स्पाच्या एक भागीदार असणारेत रेखा चौधरी. स्पा वेलनेसच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येतच असतं आणि त्यासाठी दरवर्षी ‘ग्लोबल स्पा अॅण्ड वेलनेस समीट’ भरते. २०१० मध्ये तुर्कस्तानात भरलेल्या या परिषदेत आमंत्रण मिळालेल्या रेखा चौधरी या पहिल्या भारतीय व्यक्ती होत्या.
त्यांच्या नोव्हेल रोप मसाजला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह स्पा ट्रीटमेंट २०१०’ , ‘एशियन स्पा’ पुरस्कार मिळालाय. तसेच ‘महाराष्ट्र उद्योगिनी’अशा अनेक या पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलंय..
स्पाबद्दल त्या सांगतात, ‘‘स्पाविषयी एक मोठा गरसमज आहे की, ही मसाज पार्लर्स आहेत. परंतु स्पा म्हणजे नुसती मसाज सेंटर नव्हेत, तुमच्या शरीर-मनावरचा ताण घालवून तुम्हाला नव्याने ताजंतवानं करणारी ‘हेल्थ सेंटर्स’ आहेत. आज  फाइव्ह स्टार स्पा मॅनेजरचा पगार तीस हजार असतो, चांगला स्पा थेरपिस्ट बारा हजार रुपये पगारापासून सुरुवात करतो; परंतु आपल्याकडे हे शिक्षण नाही. म्हणूनच मला या क्षेत्राला एक प्रतिष्ठा मिळवून द्यायचीय. लवकरच आम्ही स्पा थेरपिस्ट, एखादं स्पा सेट अप आणि व्यवस्थापन कसं करायचं, त्वचातज्ज्ञ याचे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहोत. फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठीदेखील हे एक उत्तम करिअर ठरू शकतं.’’  
‘‘माझ्या तीनही मुली माझ्याबरोबर काम करतात. फायनान्स, फिजिओथेरपी आणि फार्मसीतील शिक्षण त्यांनी पूर्ण केली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा मलाही फायदा होईलच की. भारतात वेलनेस स्पाबरोबरीनचं ‘मेडि-स्पा’ म्हणजे मेडिकल स्पादेखील भविष्यात सुरू होईल. विविध आजारांवर उपचारांबरोबरीनं स्पादेखील एक उपचार पद्धत म्हणून नावारूपाला येईल. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.’’
‘‘ माझा प्रवास खूप मोठा आहे. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, त्या तर येतच असतात. मी मात्र संकटांकडे सतत एक संधी म्हणून पाहत आलेय. ज्या ज्या वेळी अडचणी आल्या त्या त्या वेळी माझ्या परीनं मार्ग शोधला. वाटेत जी माणसं भेटली चांगली-वाईट त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी शिकून घेतल्या. उपलब्ध साधनसामग्रीमध्ये उत्तम काम कसं करता येईल याचा विचार केला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जे जे समोर येत गेलं ते ते मनापासून आणि आनंदानं केलं. मी आनंदी आहे पण पूर्ण समाधानी नाही. कारण आज स्पा म्हटलं की थायलंड किंवा बाली (इंडोनेशिया)कडे पाहिलं जातं, भविष्यात भारत एक उत्तम वेलनेस स्पा डेस्टिनेशन होऊ शकतो, याची मला खात्री आहे आणि ते करणं हे माझं स्वप्न आहे.’’