सण गोंबे हब्बा Print

सविता नाबर, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
alt

कर्नाटक राज्यात दसऱ्याशी निगडित उत्सवपरंपरेची मोठय़ा भक्तिभावाने जपणूक झाली आहे. राजधानी बंगळुरूमध्ये आणि म्हैसूरमध्ये ‘गोंबे हब्बा’ हा सण मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. घरामध्ये सुख, समृद्धी नांदावी यासाठी वर्षभरातील हा मोठा सण साजरा केला जातो. त्याविषयी..
अठरापगड जातींच्या भारत देशात प्रत्येक जातीधर्माने आपापला सांस्कृतिक वारसा जतन केला आहे. कर्नाटक राज्यातही दसऱ्याशी निगडित उत्सवपरंपरेची मोठय़ा भक्तीभावाने जपणूक झाली आहे. कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये आणि विशेषकरून म्हैसूर भागात ‘गोंबे हब्बा’ हा सण मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो हे कळलं आणि कुतूहल दाटून आलं, त्यातून मनोरंजक माहिती मिळाली.
सिलिकॉन सिटी अशी ख्याती असलेल्या बंगळुरूमध्ये बसवनगुडी या मध्यवर्ती ठिकाणी आमचं वास्तव्य होतं. त्यामुळे कर्नाटकवासीयांचे सणसमारंभ, चालीरीती, परंपरा फार जवळून पाहता आल्या. वर्षभराच्या सर्व सणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साजरा होणारा कन्नडीगांचा सण म्हणजे गोंबे हब्बा. आपल्याकडे ज्याप्रमाणे दसरा दारावर तोरण व सोन्याची पाने लुटून साजरा केला जातो, तसाच दसरा साजरीकरणातही कर्नाटकनेही आपली परंपरा जपली आहे.
विजयनगर साम्राज्याच्या कृष्णदेवरायच्या काळापासून या गोंबे हब्बाची प्रथा चालू झाली असे समजते. गोंबे किंवा बोंबे याचा अर्थ बाहुल्या. या दहा दिवसांमध्ये या बाहुल्यांनी सजवलेले, आरास केलेले देखावे घरोघरी पाहावयास मिळतात.
गोंबे हब्बासाठी त्या बनवणाऱ्या त्यातील तज्ज्ञ श्रीमती लीलावती दयाकुमार यांना त्यांच्या ‘गोंबे मने’मध्ये भेटले. त्या १९५९ सालापासून कापडाचे गोंबे बनवतात. पहिल्यांदा त्यांनी  कापसाचे गोंबे बनवले. तारेच्या सांगाडय़ावर कापूस आणि बँडेज कपडा गुंडाळून बनवलेल्या बहुल्यांना त्यांनी वेगवेगळे पोषाख चढवले. कधी गणपती, कधी लक्ष्मी, तर कधी सरस्वती यांची रूपं त्यांना दिली आणि हे अधिक आकर्षक होण्यासाठी रामायण महाभारतातले अनेक प्रसंग त्यांनी चितारले. रामायणातील गुहासख्य, द्रौपदीचे अक्षयपात्र, संत गोरा कुंभार, ध्रुव नारायण, सती अनसुया, भक्त मरकडेय, कृष्ण सुदामा भेट, कृष्णाचा तुलाभार गोकुळातील कृष्ण, शेषशायी विष्णू, सत्यवान-सावित्री, मीराबाई, भक्त पुंडलिक, राणी लक्ष्मीबाई अशी अनेक व्यक्तिरेखा गोंब्यांच्या माध्यमातून साक्षात उभी करुन त्या लोकांसमोर आणतात. पूर्वी त्या शीतपेयाच्या स्ट्रॉवर कपडा गुंडाळून बाहुल्या बनवत. आता त्या तारेचा सांगाडा बनवतात आणि त्यावर कपडा गुंडाळून गोंबे बनवतात.
alt
अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध अशी शरीररचना, प्रसंगोचित नेत्रसुखद रंगसंगती, सुबक मांडणी आणि नेटके देखणे अलंकार हे लीलावतींच्या बाहुल्यांचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अंगी उपजतच कलागुण असलेल्या लीलावतींनी १९७१ मध्ये म्हैसूरला दसरा सोहळ्यांच्या वेळी आपल्या बाहुल्यांचे प्रदर्शन भरवले होते. त्यामध्ये त्यांनी िहदू विवाह विधीमधील सर्व सोपस्कारांचे टप्प्याटप्प्याने देखावे मांडले होते. अगदी नवरी मुलगी पाहणे इथपासून तिची सासरी पाठवणी होईपर्यंत सर्व विधी त्यामध्ये होते. भटजी, नवरानवरी, सर्व वऱ्हाडी मंडळी, त्यांना लाकडी चेहरे लावले होते.
 गोंबे हब्बाची पाश्र्वभूमी जाणून घेण्याची मला फार उत्सुकता होती. घरामध्ये सुख, समृद्धी नांदावी यासाठी वर्षभरातील हा मोठा सण साजरा केला जातो. मुलीची सासरी पाठवणी करताना तिच्याबरोबर गोंब्यांची एक जोडी दिली जाते. त्याला ‘पट्टद गोंबे ’ म्हणतात. बाकी सर्व बहुल्यांमध्ये ‘पट्टद गोंबे ’ मुख्य समजले जातात. हे पूर्वी चंदनी असत. आता ते साध्या लाकडाचेही असतात. त्याला ‘चक्केगोंबे म्हणतात. कधीकधी ते मातीचेही असतात. पट्टद म्हणजे त्या त्या शहराचे राजाराणी समजले जातात आणि त्यांचा दरबार म्हणजे बाकीचा देखावा असतो. कधी तिरुपतीचा, तर कधी मसूर महाराजांचा दरबार, तर कधीकधी दशावतारी गोंबे असतात. कधी गजलक्ष्मी, धनलक्ष्मी, धर्यलक्ष्मी आदी अष्टलक्ष्मींचे देखावे असतात. तर कधी दुर्गा, शक्ती, चामुंडेश्वरी अशा महालक्ष्मीच्या अनेक रूपांमध्ये असतात. देखाव्यात तलाव, बाग दाखवतात. बाजूला माती टाकून त्यात नाचणी टाकतात. दहाव्या दिवसापर्यंत त्याची नाजूक नाजूक रोपं उगवून येतात.
नगराचा अधिपती महाराज, त्यांची हत्तीच्या अंबारीत बसलेली प्रतिमा (आनेसवारी), घोडय़ावर स्वार झालेली (कुदरेसवारी) अशा प्रतिकृती मिळतात. ज्यांच्या घराण्यात परंपरागत कलशपद्धती आहे, असे लोक पट्टद गोंबेसमोर कलश ठेवतात. तो ठेवणे म्हणजे शुभ असे मानतात. श्रीमती पद्मा श्रीनिवास यांच्या एकत्र कुटुंबामध्ये पट्टद गोंबेच्या बारा जोडय़ा आहेत. त्या आजच्या घडीलाही नवरात्रात दिमाखात रेशमी वस्त्रे आणि अलंकार लेवून उभ्या असलेल्या दिसतात. रोज सकाळी व संध्याकाळी पट्टद गोंबेसमोर आरती करून प्रसाद वाटला जातो. विशेषत: लहान मुलांच्या आवडीचा खाऊ वाटण्यासाठी या प्रसादाचा बहाणा असतो. काही जणांकडे हा ‘गोंबे हब्बा’ दहा दिवस असतो, तर काही जणांकडे मूळ नक्षत्रापासून पुढे तीन किंवा पाच दिवस हा हब्बा असतो. अष्टमीला पाच कन्या आणि पाच सुवासिनींची पूजा करून त्यांना जेवायला वाढतात.
दहाव्या दिवशी रात्री पट्टद गोंबेना झोपवतात. लहान मुलांनी खेळायला घेऊ नये म्हणून ते रेशमी कापडात गुंडाळून सुरक्षित ठेवतात. मातीचे असल्यास जास्त सांभाळावे लागतात. या गोंबेंसाठी दरवर्षी कुणी नवी वस्त्रे शिवतात. अलंकार बदलतात. काही गोंबे कील गोंबे असतात. म्हणजे अवयव वेगवेगळे काढून त्यानुसार वेगवेगळी चित्रे तयार करता येतात. खिळे कढून त्या-त्या प्रतिमेनुसार वस्त्रालंकारांनी त्यांना सजवतात. उदाहरणार्थ सरस्वती असेल तर हाती वीणा, लक्ष्मी असेल तर तिला कमळाच्या कटाऊटमध्ये बसवतात. गोंबे ठेवण्यासाठी पायऱ्यांचे स्टँडही असते. मंडयाजवळील चेनपटना येथील लाकडी गोंबेही प्रसिद्ध आहेत. दररोज रांगोळी काढून, अगरबत्ती लावून, नवेद्य दाखवून गोंब्यांची पूजा होते. कर्नाटकनाडूचा हा नाडहब्बा ‘गोंबे हब्बा’ म्हणून प्रसिद्ध पावला आहे.