लढा स्त्री एचआयव्हीग्रस्तांच्या अधिकारांसाठी : होय, मी आहे एचआयव्हीग्रस्त.. - कौसल्या पेरीयास्वामी Print

अभय जोशी ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अनेक निरपराध स्त्रियांना त्यांच्याही नकळत त्यांच्या पतींकडून एड्सची लागण होते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य काटेरी होऊन जातं. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचाच काय त्यांच्या कुटुंबीयांचाही दृष्टिकोन बदलून जातो आणि त्यांच्या नशिबी येतं ते निष्कासित जिणं. अशा स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करून सुमारे २० हजार स्त्रियांना त्याचा फायदा देणाऱ्या तामिळनाडूच्या कौसल्या पेरीयास्वामी यांचा हा लढा..
 ‘होय, मला एचआयव्ही आहे, मी एड्सबाधित आहे’, या दुर्धर आजारानं विळखा घातलेली कोणतीही भारतीय व्यक्ती आजही अशा आजाराचा जाहीररित्या उच्चार करू शकणार नाही. परंतु असा उच्चार करण्याचं हे धाडस केलंय कौसल्या पेरीयास्वामी या अत्यंत सामान्य कुटुंबातल्या एका स्त्रीनं, तेही तब्बल दीड दशकांपूर्वी..! आणि इतकं बोलूनच त्या थांबलेल्या नाहीत तर त्या विरोधात ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करून सुमारे २० हजार स्त्रियांना त्याचा फायदा मिळवून दिला आहे. एचआयव्हीबाधित असलेल्या महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत न्याय्य वाटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं हे या संस्थेचं एक मुख्य ध्येय आहे. एचआयव्ही व एड्सग्रस्त स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी सुरू केलेला लढा आता सर्वदूर पसरला आहे..
 ‘एचआयव्ही’ ‘एड्स’ हे शब्द जरी कानावर पडले तरी आजही कोणाचंही मन कमालीचं धास्तावून जातं. या आजाराचा प्रादुर्भाव म्हणजे आयुष्याचा शेवट, अशा मानसिकतेनं माणूस वेढला जातो. कौसल्या पेरीयास्वामी मात्र याला अपवाद ठरल्या. ‘‘मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात आल्यानंतर सुरुवातीची माझीही अवस्था भीषण होती. मला आयुष्याचा अंतच दिसू लागला,’’ कौसल्या सांगत होत्या. साधारण १९९५ मध्ये त्यांच्या दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. नशीब आपल्या हाती नसलं तरी त्याला योग्य दिशा देणं आपल्याच हाताचे आहे, हे लक्षात घेऊन कौसल्या यांनी निराशा झटकली आणि आता अशा रुग्णांच्या सेवेसाठीच आपलं उर्वरित आयुष्य त्या वेचत आहेत..
 भारताच्या अनेक राज्यांमधील लाखो लोकांना या आजारानं वेढलेलं आहे. मात्र इतर आजारी लोकांप्रमाणे या रुग्णांकडे सहानुभूतीनं बघितलं जात नाही, त्यांना जवळजवळ वाळीत टाकलं जातं. म्हणूनच अशा व्यक्तींना दिलासा देऊन त्यांना पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठीच कौसल्या पेरीयास्वामी यांनी १९९८ मध्ये चेन्नई इथं ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या १४ वर्षांत २० हजारांहून अधिक ‘एचआयव्ही’ पीडित महिलांना कायदेशीर तसंच काही प्रमाणात आर्थिक स्तरावरही सहाय्य केलं आहे. एचआयव्हीबाधित असलेल्या महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत न्याय्य वाटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं हे या संस्थेचं एक मुख्य ध्येय ठरलं. कायदेतज्ज्ञांनी याकामी विनामूल्य सहाय्य करावं, म्हणून त्यांना संस्थेमार्फत विनंती केली जाते. पुढचे कायदेशीर सोपस्कार त्यांच्याच मदतीनं पूर्ण होतात. त्याचबरोबर समाजात या रोगाबद्दल असलेलं अज्ञान, भीती आणि गैरसमज दूर करणं हे कामही संस्थेतर्फे केलं जातं. कारण आजही एड्सग्रस्त व्यक्ती पुढच्या सल्लामसलतीसाठी पुढे येत नाही. त्यांच्यातलं अज्ञान आणि भीती घालवणं हेच त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे.  या कार्याकडे त्या कशा वळल्या हे विचारलं असता, त्यांनी आपली कहाणीच सांगितली. ‘‘घरातली संपत्ती बाहेर जाऊ नये म्हणून कौसल्या यांचा विवाह त्यांच्याच चुलत भावाशी करून देण्यात आला. मात्र पतीला एड्स असल्याचं अवघ्या दीड महिन्यांतच लक्षात आलं. विवाहानंतर अवघ्या सात महिन्यांनी याच आजारानं त्याचा बळीही घेतला, आणि मागे राहिल्या त्या एकाकी कौसल्या. आपल्यावर झालेल्या या अन्यायामुळे त्यांना अशा असंख्य स्त्रियांवरच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.
तामिळनाडूतील नमक्कल या लहानशा गावातलं पेरीयास्वामी हे कुटुंब. कौसल्या यांनाही या आजारानं ग्रासल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडे, त्यांच्या कुटुंबाकडे बघण्याची शेजाऱ्यांची, समाजाचीही नजर बदलली. त्यांना वाळीतच टाकण्यात आलं. परंतु नकाराला होकारात बदलण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि कौसल्या त्याला धीरानं सामोऱ्या गेल्या. सुरुवातीला स्वत:वर उपचार, त्यासाठी लागतील ते कष्ट उचलण्याची तयारी आणि कमालीची सहनशीलता अंगी बाळगत आणि त्याच वेळी स्वत:ला दोषी न मानता त्यांनी या आजाराविरोधात लढा देण्याचा निश्चय केला. आपल्याला या आजारानं वेढलं असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर सांगण्याचं धाडसही त्यांनी केलं आहे. सामाजिक, काही प्रमाणात कौटुंबिक आणि आर्थिक प्रतिकूलतेला सामोरे जात कौसल्या यांनी नेटानं पुढची वाटचाल सुरू केली, कारण त्यांच्या लक्षात आलं खुद्द त्यांच्याच गावातल्या अनेक स्त्रिया या आजाराने त्रस्त आहेत. स्त्रियांबद्दलची एकूणच अनास्था, त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा काहीसा प्रतिगामी दृष्टिकोन, पुरुषी अरेरावी वृत्ती,  शिक्षणाचा अभाव, स्वत:चे आजार, स्वत:च्या समस्यांकडे बघण्याचा त्यांचा काहीसा उदासीन दृष्टिकोन या कारणांमुळे अशा आजारांना त्या शरण जातात आणि अशा आजारांवर कसे उपचार करायचे, याबद्दलच्या माहितीचा अभाव आणि या आजाराबद्दल समाजाची असलेली घृणास्पद भूमिकाही स्त्रियांचा त्रास वाढविण्यास कारणीभूत ठरते, कौसल्या यांनी गेल्या १४ वर्षांतले स्वानुभवाचे बोल सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘एचआयव्हीचा विळखा प्रामुख्यानं विवाहित तरुणींना बसतो. याला मुख्य कारण त्यांच्या पतीला तो झालेला असतो आणि विवाहानंतर हा रोग त्यांच्या पत्नीकडे संक्रमित होतो. म्हणून विवाहापूर्वी प्रत्येक तरुण-तरुणीनं आपली योग्य ती वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी.’’
कौसल्या यांनी आपल्या संस्थेमार्फत अनेक कामांना वळण दिलं आहे. ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’द्वारे एचआयव्हीबाधित व्यक्ती, महिलांना मार्गदर्शन करण्यात येतं. त्यांच्यासाठी वेगवेगळी चर्चासत्रं आखण्यात येतात. एचआयव्ही हा आजार तसा दुर्धर असला, त्याला पूर्णपणे बरा करणं कठीण असलं, तरी तो योग्य उपचारांनी नियंत्रित करता येतो, आदी मुद्दे या रुग्णांपर्यंत नीट पोहोचावेत यासाठीचे प्रयत्न या संस्थेकडून केले जातात आणि त्यास सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. या संस्थेचे आज पाच हजारांहून अधिक सदस्य आहेत. हा रोग उद्भवून नंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा त्याचा प्रादुर्भावच होऊ नये यासाठी काय करावं, यासाठी ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’ अथक प्रयत्न करत असतं. चर्चासत्रं, कार्यशाळा सतत सुरू असतात. स्त्रियांमध्ये जागृती करून त्यांना त्यांचे अधिकार, हक्क यांची जाणीव करून देण्याचं मुख्य ध्येय आमच्या संस्थेसमोर आहे, असं कौसल्या नमूद करतात.
 आपल्याकडे अद्यापही योग्य प्रकारे लैंगिक शिक्षण दिलं जात नाही. लहान मुलं, पौंगडावस्थेतली मुलं यांना त्यांच्या शारीरिक अवयवांसंबंधी योग्य माहिती दिली जात नाही. शिक्षकवर्गाचा संकोच, भारतीय संस्कृतीचे संस्कार त्यास कारणीभूत असावेत. परंतु त्यामुळेच युवा पिढी आणखी भरकटण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच आई-वडिलांची जबाबदारी घेऊन त्यांना या सगळ्यांची माहिती दिली पाहिजे त्यांना अधिक सजग केलं पाहिजे, यावर कौसल्या यांनी भर दिला. नवविवाहित जोडप्यांमधलं वैवाहिक संबंधांचं अज्ञान, चुकीच्या समजुती, त्यामधून निर्माण होणाऱ्या समस्या, आदींबद्दल मुला-मुलींना योग्य वयात योग्य माहिती दिल्यास या आजारास अटकाव करता येऊ शकतो, असंही त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’चे कार्यकर्ते सातत्याने स्थानिक पातळीवरच्या महाविद्यालयांमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. ‘एचआयव्ही’चा आजार, त्यामधून निर्माण होणाऱ्या समस्या, त्याचे अन्य दुष्परिणाम याबद्दल जागृती करतात. एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतानाच तुमचं जीवन अधिक सकारात्मक कशा प्रकारे घडवता येईल, याचेही धडे या कार्यकर्त्यांकडून दिले जातात.
आज महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्त्री-भ्रूण हत्यांचं प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत एचआयव्हीसारख्या आजाराला महिलाही बळी पडत राहिल्या तर आधीच कमी होत असलेलं महिलांचं प्रमाण आणखी कमी होईल, असा धोक्याचा कंदील त्यांनी दाखवला आहे.
 ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’च्या कामात २४ तास गढलेल्या कौसल्या या विषयावर कमालीच्या संवेदनाक्षम आहेत. आज लक्षावधी महिलांचं स्वत:च्या आयुष्यावर नियंत्रण नसतं. वडील, पती, पुत्र, भाऊ आदींच्या तालावर नाचणाऱ्या असंख्य महिलांना स्वत:ची मतं नसतात, दुर्दैवानं एचआयव्हीची लागण होऊन पुढे मुलांनाही प्रादुर्भाव झाला तर त्याबद्दलही या महिलांवरच ठपका ठेवण्यात येतो. यामागचा खरा आरोपी दूर पळतो, ही बाब कौसल्या यांना छळते. या रोगाबद्दल महिलांना माहितीच नसते. काहीवेळा हा रोग त्यांच्यात सुप्तावस्थेत असतो. यामधून या महिलांना बाहेर काढण्यासाठीच तर ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’चं प्रयोजन..’’ कौसल्या पेरीयास्वामी आपल्या म्हणण्याचा समारोप करतात.    
संपर्कासाठी- ई-मेल : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it , This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दूरध्वनी-०४४  २८१७२१२६