लढा पत्रकारितेच्या माध्यमातून : लेखणीची ताकद - तेरेसा रहमान Print

स्वानंद ओक ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

वस्तीत शौचालयच नसणे असो की मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी घडवलेलं बनावट हत्याकांड असो, त्याला पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून जगभरात खळबळ माजवणारी आसाममधील तेरेसा रहमान पूर्वाचलांतील लोकांबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनक्षम आहे. पूर्वाचलाबाबत देशातील लोकांमध्ये असलेले गैरसमज धुऊन काढण्यासाठी आणि त्याच वेळी पूर्वाचलालाही अन्य देशांची ओळख करून देण्यासाठी लेखणीच्या ताकदीने लढणाऱ्या तेरेसा रहमानचा हा लढा..
आसाममध्ये ब्रह्मपुत्रेच्या पूरक्षेत्रातील एक वस्ती. ब्रह्मपुत्रा सतत पात्र विस्तारणारी/ बदलणारी नदी आहे. (आसाममध्ये ब्रह्मपुत्रेला ‘ती’ नव्हे तर ‘तो’ म्हटले जाते. ब्रह्मपुत्रा नदी नव्हे नद आहे.) चार घरांमध्ये काम करून पोट भरणारी एक महिला या वस्तीत राहात होती. शब्दश: पाण्यात ती वस्ती होती. स्वाभाविकच ‘संडासाचा खड्डा’ तिथे अस्तित्वातच नव्हता. शौचालयासाठी पाण्यातून दूर जमिनीपर्यंत जावे लागे. महिलांसाठी तर ही अमानवी शिक्षाच होती. अखेर या महिलेने केळीच्या खांबांचा एक तराफा तयार केला आणि रात्रीच्या अंधारात त्या तराफ्यावर बसून घरापासून थोडे दूर जाऊन नैसर्गिक विधी उरकण्याचा परिपाठ सुरू केला.. एरवी घरात अथवा सार्वजनिक शौचालये नसणे हीच समस्या वाटणाऱ्यांच्याही मेंदूला झिणझिण्या आणणारी ही गोष्ट एका ऑनलाइन नियतकालिकात प्रसिद्ध झाली आणि जगभर खळबळ उडाली. सर्वसाधारण महिलेची ही अवस्था तर डायरियासारखे आजार (पाण्याद्वारे हे आजार सहजगत्या होतात.) असलेल्या अथवा मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रियांना काय नरकयातना भोगाव्या लागत असतील या कल्पनेने वाचणारा प्रत्येकजण हादरला.
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी एक बनावट हत्याकांड घडविले. नेहमीप्रमाणे मारला गेलेला चकमकीत मारला गेला आहे, तो अतिरेकी होता, त्याने आधी हल्ला केला, सुरक्षा दलांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रतिहल्ल्यात तो मारला गेला, अशी नेहमीची कहाणी प्रसृत झाली. परंतु ही चकमक एका नवशिक्या फोटोग्राफरने कॅमेऱ्यात बंदिस्त केली. या चित्रफितीमार्फत चकमकीची बनावट कहाणी प्रसिद्ध झाली आणि तशीच सर्वत्र खळबळ उडाली. तब्बल तीन महिने मणिपूरमध्ये कडकडीत बंद पाळला गेला. रस्ते रोखले गेले. अखेर सरकार आणि प्रशासनाला नमावे लागले, दोषींना पकडण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई झाली..
या दोन्ही घटना जगासमोर आणणारी होती एक तरुण मुलगी, तेरेसा रहमान.  जेमतेम तिशीत असलेल्या तेरेसाने अशा अनेक कहाण्यांद्वारे पूर्वाचलामधील समाजाची स्थिती देशासमोर मांडली. उर्वरित देशाला अपरिचित असलेला पूर्वाचल माहीत करून देण्याचे मोठे काम तेरेसाने आपल्या पत्रकारितेमार्फत केले. ‘इंडिया टुडे’, ‘तहलका’, ‘टेलिग्राफ’ आदी मुख्य प्रवाहातील (मेनस्ट्रीम) नियतकालिके तसेच ऑनलाइन नियतकालिकांमार्फत तेरेसाने ही मोहीम सुरू ठेवली आहे.
भौगोलिक परिस्थितीमुळे पूर्वाचलाबद्दल उर्वरित देशाला फारशी माहिती नाही. मुंबईत काही वर्षांपूर्वी गेटवे ऑफ इंडियासमोर एका मणिपुरी तरुणीवर झालेल्या सुरीहल्ल्यात ही बाब ठळकपणे समोर आली. दोन महिन्यांपूर्वी, ११ ऑगस्ट रोजी आझाद मैदानातील धर्माधांच्या नंग्या नाचानंतर घाबरलेल्या आणि परत आपल्या घरी जाण्यास निघालेल्या पूर्वाचलातील हजारो-लाखो तरुणांना थांबविण्यासाठीही काही मोजक्याच संघटना व कार्यकर्ते पुढे आले होते. पूर्वाचल हा भारताचाच एक भाग आहे ही गोष्टच अनेकांना ठाऊक नसण्याच्या पाश्र्वभूमीवर पूर्वाचलातील जनजीवन, समाज, संस्कृती, रितीभाती, दैनंदिन आयुष्यातील समस्या आदींची माहिती करून देण्याच्या तेरेसाच्या कामाचे मोल खूप मोठे आहे.
गेली १२ वर्षे विविध माध्यमगृहांमध्ये कामाचा अनुभव घेतलेली तेरेसा आता ‘थंब प्रिंट’ या स्वत:च्या ऑनलाइन मासिकाद्वारे आपली मोहीम चालविते. या प्रवासात तेरेसाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकारितेमधील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, या पुरस्कारांपेक्षा आपल्या कहाण्यांनी घडवून आणलेले बदल तेरेसाला जास्त सुखावतात. उपरोल्लेखित कहाणीतील  ती महिला तेरेसाच्या घरीच कामाला होती. सहज गप्पांमधून तेरेसाला तिचे प्राक्तन कळले आणि ही खळबळजनक बातमी असल्याचे तिच्यातील पत्रकाराने ओळखले.
पूर्वाचलातील सामान्यांच्या आयुष्यातील अशा अनेक ‘कहाण्या’ तेरेसाने प्रकाशित केल्यानंतरच त्या खरोखरच अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी होत्या हे इतरांच्या लक्षात आले. पण या ओघात पूर्वाचलाबाबत उर्वरित देशात जी जाणीवजागृती झाली तिचे मोल खरोखरच अनमोल आहे.
तेरेसा लहानपणी मेघालयातील शिलाँगला राहात होती. वडील नोकरीनिमित्ताने गुवाहाटीत होते तर आईसुद्धा नोकरीमुळेच शिलाँगला होती. शिलाँगचे निसर्गसौंदर्य हे वर्णन करून सांगण्यासारखे नाही, प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवण्याचेच आहे. बालपणीचा शिलाँगमधील काळ तेरेसाला आपल्या आयुष्यातील ‘सोनेरी काळ’ वाटतो. तेरेसाच्या आईला वाचनाची अतोनात हौस. अनेक वर्षांपूर्वीचे मासिकांचे अंक घरी नीट जपून ठेवलेले असत. लहानग्या तेरेसाला या ‘प्रिंट मिडिया’ची गोडी अशी घरीच लागली. या मासिकांमध्ये आपलेही लेख छापून यावेत, ही बालसुलभ इच्छा तिलाही होत असे. लहान वयातच तिचे लेख तेथील स्थानिक वृत्तपत्रांमधून छापूनही यायला लागले आणि एकप्रकारे अगदी स्वाभाविक आणि सहजपणे ती पत्रकारितेकडे वळली.
दिल्लीच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन’मधून तिने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि तेथून बाहेर पडल्याबरोबर प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून ‘इंडिया टुडे’मध्ये लागली. तेरेसा आपल्या पत्रकारितेतील मूलभूत कौशल्याचे मोठे श्रेय ‘इंडिया टुडे’ला देते. अनेक गोष्टी आपल्याला तिथे शिकायला मिळाल्याचे ती आवर्जून सांगते. पत्रकार होणे हा तेरेसाचा ध्यास होता. त्यामागे पैसा, करिअर आदी प्रेरणा कधीच नव्हत्या. ‘इंडिया टुम्डे’नंतर तिने ‘टेलिग्राफ’ आणि ‘तहलका’मध्येही काम केले. परंतु ३-४ वर्षांनंतर कामात तोचतोचपणा येऊ लागला की ती त्या व्यवस्थेतून बाहेर पडते आणि काहीतरी नवीन सुरू करते. याच भावनेतून तिने ‘थंब प्रिंट’ सुरू केले आहे.
पूर्वाचलातील सामाजिक समस्यांपैकी एक प्रमुख समस्या आहे ती ‘एचआयव्ही- एड्स’बाधितांची. या समस्येवर तेरेसाने प्रखर प्रकाशझोत टाकला. त्यानंतर गुवाहाटीतील जान्हवी गोस्वामी या एड्सपीडित महिलेने पुढे येऊन आपण एड्सग्रस्त असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे तिच्या आई व बहिणीने आणि नंतर हळूहळू अनेक व्यक्ती तसेच संस्थांनी तिला पाठिंबा दिला. या घटनांमध्येही तेरेसाची महत्त्वाची भूमिका होती. एड्सपीडितांनाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, याचे भान या घटनेने दिले. यातूनच मग ‘नेटवर्क ऑफ पॉझिटिव्हज्’ हा गटही स्थापन झाला.
शिलाँगमधील एका एफएम केंद्रावर तब्बल ७० वर्षांचा वृद्ध रेडियोजॉकी आहे, तर आसाममध्ये महिला साक्षरता क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेने महिलांना केवळ लिहिण्या-वाचण्यापुरते मर्यादित ठेवले नाहीतर त्यांच्यातील स्वाभाविक साहित्यिक गुण शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यातून अनेक महिलांच्या कथा, कविता प्रसिद्ध होऊ शकल्या. पूर्वाचलात असे खूप काही भावात्मक, विधायक घडत असते. तेरेसा कायम अशा घटना-प्रसंगांच्या शोधात असते.
 निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या वातावरणात राहणारी पूर्वाचलातील मंडळी त्या निसर्गासारखीच संवेदनशील आहेत, असे तिचे ठाम मत आहे. उर्वरित देशाला पूर्वाचलाची मुख्य ओळख तेथील बॉम्बस्फोट, जातीय हिंसाचार, सुरक्षा दलांच्या मोहिमा, अतिरेकी कारवाया आदींमुळे होते, ही तेरेसाला खंतावणारी बाब आहे. पूर्वाचल हे ‘किलिंग फिल्ड’ नाही. आम्हीही तुमच्यासारखेच आहोत. येथील प्रत्येक राज्याला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे, संस्कृती आहे, सौंदर्य आहे. येथे येऊन ते समजून घ्या, अनुभवा, असे ती कळकळीने विनवते.
या विद्युल्लतेला आपल्या स्वप्नांबद्दल विचारले तर ती थोडी थबकते. मनात खूप काही आहे पण ते व्यक्त करता येत नाही, अशी तिची अवस्था होते. पूर्वाचलाबाबत देशात असलेले गैरसमज धुऊन काढायचे आहेत आणि त्याच वेळी पूर्वाचलालाही अन्य देशांची ओळख करून द्यायची आहे. यासाठी जे जे आवश्यक असेल ते सगळे करण्याची तिची धडपड आहे. नेमके काय करू हे ती शब्दांत वर्णन करू शकत नाही, परंतु हे असे प्रयत्न करीत राहणे हेच तिचे आयुष्य असेल, हे तिच्या संपर्कात आलेला कोणीही समजून घेऊ शकतो.
बांगलादेशातून होणारी आणि देशाच्या सुरक्षिततेलाच नख लावणारी घुसखोरी, चीन, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान आदी देशांनी वेढलेली आणि उर्वरित देशापासून जेमतेम ‘चिकन नेक’च्या पट्टय़ाने बांधली गेलेली ही भूमी कायम भीतीच्या सावटाखाली असते. चीन कायम डोळे वटारत असतो, तर बांगलादेश आणि म्यानमारमध्ये अतिरेक्यांना थारा मिळत असतो. दुर्गम प्रदेश, दळणवळणाची तुटपुंजी साधने आणि या सगळ्यांवर ‘आपण वेगळे आहोत’ ही जाणीवपूर्वक जोपासली गेलेली, खरेतर थोपली गेलेली भावना या सगळ्या प्रतिकूलतेमध्ये तेरेसासारख्या तेजशलाका हा आशेचा मोठा किरण आहे.