लढा आदिवासींच्या हक्कांसाठीचा : आवाज उपेक्षितांचा - सोनी सोरी Print

देवेंद्र गावंडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

छत्तीसगडमधल्या आदिवासींसाठी लढणारी सोनी सोरी पोलिसांच्या लेखी नक्षलवादी आहे. नक्षलवाद्यांच्या वर्तुळात ती पोलिसांची खबरी म्हणून ओळखली जाते तर मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या लेखी सोनी शिक्षिका व समाजसेविका आहे. आज सोनी तुरुंगात आहे, पण एक दिवस बाहेर येऊन आदिवासींसाठीचा आपला लढा चालूच ठेवणार हा तिचा आशावाद पक्का आहे..
नक्षलग्रस्त भाग अतिदुर्गम, डोंगरदऱ्यांच्या विळख्यात असल्याने अविकसित राहिला आहे. एकीकडे पोलिसांचे शासन तर दुसरी नक्षलवाद्यांची हुकूमत. या लढाईत प्रत्येक दिवस दहशतीच्या छायेत जगणाऱ्या सामान्य नागरिकांची जी कोंडी होते, यामुळे त्यांना ज्या झळा सहन कराव्या लागतात त्याच्या अनेक कथा आजवर समोर आल्या आहेत. मात्र एकीकडे नक्षलवाद्यांना चुचकारत तर दुसरीकडे पोलिसांची तरफदारी करीत या सामान्य जनतेला कशी मदत करता येईल, त्यांना विकासाच्या प्रवाहात कसे आणता येईल यासाठी काही जण प्रयत्नशील असतात. छत्तीसगडमधल्या एका साधारण आदिवासी स्त्रीने हाच मार्ग निवडला. शिक्षिका असलेल्या सोनी सोरी हिची वाटचाल या मार्गाने सुरू झाली खरी, मात्र त्यातून ती फार काळ तग धरू शकली नाही. देशद्रोह व इतर डझनभर आरोपाखाली तिला पकडण्यात आलं. ती सध्या रायपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगत आहे. पण नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात एखाद्या स्त्रीने धाडस दाखवले तर ती काय करू शकते याचे सोनी हे उत्तम उदाहरण आहे..
छत्तीसगडमधल्या १४ जिल्ह्य़ांना नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते. या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस किंवा नक्षलवादी यापैकी कुणा एकाची बाजू घेऊन फार काळ जिवंतच राहता येत नाही. म्हणून या भागात राहणाऱ्या बहुसंख्यांनी मौनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. या दोहोंच्या लढाईत मध्यम मार्ग स्वीकारून वाटचाल करणेही सोपे नाही, कारण या युद्धाच्या तीव्रतेमुळे मध्यममार्गाची रेषा दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे. तरीही सोनीने तिच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणूनच जगभरातल्या प्रसारमाध्यमांचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची तुरुंगातील यातनामय जीवनातून सुटका होईल का, तिला न्याय मिळेल का, या प्रश्नाची उत्तरे येणारा काळच देणार आहे. पण एका पीडित, उपेक्षित व प्रस्थापित व्यवस्थेमुळे भरडल्या जाणाऱ्या सामान्यजनांचा आवाज म्हणून सोनीकडे नक्कीच बघावे लागेल.
 येथील नक्षलग्रस्त भागात अलीकडच्या काही वर्षांत गती आलेले पोलीस व नक्षलवाद्यांमधील युद्ध केवळ शस्त्रापुरते मर्यादित नाही. या युद्धाला अनेक पदर आहेत. मानसिक, शारीरिक व सामाजिक पातळीवर सुरू असलेल्या या युद्धात स्थानिकांनी आपल्या बाजूने व्हावे, यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू असतात. अशा वेळी पोलीस किंवा नक्षलवादी यापैकी एकाला यश आले की दुसरा चिडतो. त्यातून मग कारवाई, हत्या असे प्रकार घडतात. सोनीची कथा नेमके हेच दर्शविणारी आहे. नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या दंतेवाडा जिल्हय़ातील पालनार या गावात लहानाची मोठी झालेली सोनी शिक्षण घेतल्यानंतर याच जिल्हय़ातील जबेली गावात प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. वडील काँग्रेसचे कार्यकर्ते व गावचे सरपंच, दूरच्या नात्यातले दोन काका आमदार, एक चुलत बहीण पोलीस अधीक्षक आणि माहेरी भरपूर शेती अशी वजनदार पाश्र्वभूमी लाभलेल्या सोनीला शिक्षिकेचे काम करतानाच आदिवासी समाजाला जागृत करणे गरजेचे आहे असे वाटू लागले. त्यातून तिची समाजसेवा सुरू झाली. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे दुर्गम भागात शासकीय यंत्रणा कामच करत नाही. राजकीय नेतेसुद्धा दौरे करायचे टाळतात. त्यामुळे या भागात राहणारा आदिवासी योजनांपासून वंचित राहतो. सोनीने शिक्षकी पेशा सांभाळत या आदिवासींना योजनांची मदत मिळवून देणे, गावपातळीवर आवश्यक असलेली विकासाची कामे करवून घेणे सुरू केले. वंचित आदिवासींना सोबत घेत शासकीय कार्यालयांचे दरवाजे ठोठावणे, प्रसंगी दबाव आणून कामे करवून घेणे या पद्धतीने सोनीची कामे सुरू होती. यामुळे लवकरच तिचे नाव पंचक्रोशीत झाले. काँग्रेस नेत्याचे घराणे असल्याने सोनीच्या समाजसेवेला यशही मिळू लागले. या भागात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धात अनेकदा सामान्य नागरिकांवर कारवाई केली जाते. एखादी हिंसक घटना घडवून नक्षलवादी पळून जातात. मग पोलीस संशयाच्या आधारावर घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या गावकऱ्यांवर कारवाई करतात. सोनीने अशा प्रकरणातसुद्धा हस्तक्षेप करायला सुरुवात केली. निरपराध नागरिकांना पकडले की सोनीची पावले पोलीस ठाण्याकडे वळायला लागली. अनेकदा नक्षलवादीसुद्धा पोलिसांना मदत केली म्हणून गावकऱ्यांना छळतात. अशा प्रकरणातसुद्धा सोनीचा हस्तक्षेप वाढू लागला. आदिवासींच्या हितासाठी प्रसंगी नक्षलवाद्यांना खडे बोल सुनवायलासुद्धा सोनी मागेपुढे बघायची नाही. तिच्या या सक्रियतेकडे पोलीस व नक्षलवादी बारकाईने बघत होते. सोनीला आपल्या बाजूने वळवले तर फायदा करून घेता येईल, असा विचार दोन्ही बाजूने सुरू झाला. मग सोनीला दोन्हीकडून आम्हाला मदत कर असा दबाव येऊ लागला. प्रारंभी सोनीने याकडे लक्ष दिले नाही. मात्र, दबाव वाढत गेल्यानंतर सोनीने दोन्ही बाजूंना चुचकारणे सुरू केले. नक्षलवाद्यांना पोलिसांची व पोलिसांना नक्षलवाद्यांची माहिती देण्याचा प्रकार सुरू झाला. असा दुहेरी खेळ फार दिवस चालत नाही, याचे भानही तिला राहिले नाही. चाणाक्ष नक्षलवाद्यांनी मग सोनीचा वापर खंडणी गोळा करण्यासाठी करणे सुरू केले. बंदुकीचा धाक असल्यामुळे सोनीला हे काम नाइलाजाने का होईना करावे लागले. पोलिसांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांची सोनीकडे बघण्याची दृष्टी बदलली. त्यांनी सोनीवर नजर ठेवणे सुरू केले. अशा खंडणीच्या प्रकरणात रंगेहाथ कुणाला पकडणे पोलिसांना शक्य नसते. त्यामुळे अशा व्यवहारात सक्रिय असणाऱ्यांना पोलीस इतर गुन्हय़ात अडकवतात. सोनी व अनिलच्या (मूळचा महाराष्ट्रातला असलेला सोनीचा नवरा अनिल फुटाणे) बाबतीत तेच घडले.
२०१० मध्ये दंतेवाडाचे काँग्रेसचे नेते अवधेश गौतम यांच्या घरावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गौतम गंभीर जखमी झाले. हा हल्ला नक्षलवाद्यांसोबत राहून सोनी व अनिलने घडवून आणला असा गुन्हा पोलिसांनी नोंदवला. त्यानंतर या दोघांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मालिकाच सुरू झाली. तेव्हाचे दंतेवाडाचे अधीक्षक एस. पी. कल्लुरी यांनी गौतम हल्ला प्रकरणात सोनीच्या पतीला अटक केली. तसेच गुन्हे दाखल असूनसुद्धा सोनीला मोकळे सोडण्यात आले. त्याचा मोबदला म्हणून सोनीने नक्षलवाद्यांची गुप्त माहिती पोलिसांना द्यायची असे ठरले. सोनीने कारवाई टाळण्यासाठी खबरे होण्याचे मान्य केले. कल्लुरी अधीक्षक असेपर्यंत सोनीला अटक झाली नाही. त्यांची बदली झाली व अंकित गर्ग रूजू झाले. त्यांनी खंडणीच्या प्रकरणात हिस्सार उद्योग समूहाच्या अधिकाऱ्यांसह काही कंत्राटदारांना अटक केली. खंडणीची रक्कम घेऊन जाताना ही कारवाई झाली व सोनी पोलिसांच्या तावडीतून निसटली, असे प्रकरण तयार करण्यात आले. आता अटक होणार हे कळताच सोनीचा ताबा या राज्यात नक्षलवाद्यांच्या बाजूने सक्रिय असलेल्या काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी घेतला व तिला दिल्लीला नेले. दिल्लीत सोनीच्या प्रकरणाला देशव्यापी वळण मिळाले. यामुळे खवळलेल्या पोलिसांनी दिल्ली गाठली व ४ ऑक्टोबर २०११ला सोनीला अटक केली.
माध्यमांनी ‘जहाल नक्षलवादी महिलेला अटक’ अशा मथळ्याच्या बातम्या दिल्या. त्यानंतर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सोनीचा जो ताबा घेतला तो अद्याप सोडलेला नाही. दिल्लीहून सोनीला दंतेवाडय़ाला आणल्यानंतर चौकशीच्या काळात पोलीस अधीक्षक अंकित गर्ग यांनी तिला शिवीगाळ केली, अत्याचारीत वागणूक दिली तसेच तिच्या गुप्तांगात दगड शिरवले असा आरोप झाला. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी याचे भांडवल करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर सोनीची कोलकाता येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणी अहवालाचा काही भाग मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मिळवला व त्यात तिच्या शरीरात दगड टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. यानंतर न्यायालयाच्याच आदेशाने पुन्हा सोनीची तपासणी दिल्लीत एम्समध्ये करण्यात आली. यापैकी एकाही अहवालात या आरोपांची सत्यता सिद्ध झाली नाही. याच दरम्यान जगदलपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना माध्यमांशी बोलताना सोनीने पोलीस कोठडीत कोणताही वाईट प्रकार घडला नाही. बाथरूममध्ये पडल्यामुळे मला जखमा झाल्या असे वक्तव्य करून तिच्या बाजूने लढणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उघडे पाडले. एकीकडे या कार्यकर्त्यांचा दबाव आणि दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईमुळे कुटुंबाची झालेली परवड यातून सोनीची मानसिक अवस्था बिघडत गेली.
वैद्यकीय तपासणीचा गदारोळ थोडा शमल्यानंतर सोनीला रायपूरच्या तुरुंगात आणण्यात आले. या तुरुंगातून सोनीने अनेक पत्रे मानवाधिकार कार्यकर्त्यांना पाठवली. त्याचा आधार घेत हे कार्यकर्ते पोलिसांच्या विरोधात आणि नक्षलवाद्यांना फायदा होईल असे प्रकार करीत राहिले. ही पत्रे ती नातेवाईकांमार्फत वकिलाला पाठवत होती, असा दावा हे कार्यकर्ते करीत राहिले. प्रत्यक्षात सोनीने अशी पत्रेच पाठवली नाही, असे तिच्या वकिलानेच नंतर स्पष्ट केले. सध्या सोनी व तिचा पती दोघेही तुरुंगात आहेत. सोनी बाहेर व पती तुरुंगात असताना त्याने सोनीला लिहिलेल्या पत्रात ‘मी फसलो, तू मोकळी आहेस, तेव्हा किमान आता तरी या चक्रातून बाहेर पड’ असे सूचक वाक्य वापरले आहे. यावरून सोनी व्यवस्थेचा बळी कशी ठरत गेली याची कल्पना येते. गेल्या दोन वर्षांपासून देशद्रोहाचा आरोप झेलणाऱ्या सोनीच्या वडिलांवर मध्यंतरी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यांच्या पायाला गोळी लागल्याने ते कायमचे अपंग झाले. सोनीच्या वडिलांची शेती नक्षलवाद्यांनी ‘जनता ना सरकार’चा प्रयोग राबवताना ताब्यात घेतली. पोलिसांच्या लेखी सोनी नक्षलवादी आहे. नक्षलवाद्यांच्या वर्तुळात ती पोलिसांची खबरी म्हणून ओळखली जाते तर कारवाईच्या नावाखाली पोलीस नक्षल चळवळीला कसे बदनाम करत आहेत हे दाखवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या लेखी सोनी शिक्षिका व समाजसेविका आहे. ज्या अवधेश गौतम यांच्यावर हल्ला केला म्हणून सोनीवर पहिला गुन्हा नोंदवण्यात आला तेच गौतम आता त्या हल्ल्यात सोनी सहभागीच नव्हती, पोलिसांनी तिला नाहक गुंतवले असे सांगत आहेत.
अनिल व सोनी किती काळ तुरुंगात खितपत राहतील हे कळायला मार्ग नाही. त्यांची तीनही मुले मुस्कान, दीपेंद्र व आशू सध्या आजोबांकडे असतात. मात्र, सोनीने अद्याप हिंमत हारलेली नाही. दीर्घकाळ चालणारी न्यायालयीन लढाई आपण जिंकूच आणि आदिवासींच्या भल्यासाठी काम करू, असा हा तिचा आशावाद पक्का आहे.